कारल्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. फायदे माहीत असूनही ते खायला कडू असल्याने अनेकजण कारलं खाणं टाळतात. विशेषत: लहान मुलं कारल्याचं नाव ऐकताच तोंड वाकड करतात. यामुळे बहुतांश घरात कारल्याची भाजी बनवली जात नाही. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यापासून ते त्वचा चमदार ठेवण्यासाठी कारले गुणकारी मानले जाते. यामुळे जर तुम्हाला कारल्याची भाजी खाण्याची इच्छा असेल तर त्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
कारल्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी टिप्स
१) कारली मिठाने चुरडा
कारल्याचा कडूपणा कमी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे ती मीठाने चुरडणे. यासाठी कारलं दोन भागांमध्ये कापून त्याचे बारीक तुकडे करा, यानंतर त्यात आणि मीठ घालून ती हाताने चुरडून घ्या. आता चुरडलेली कारली एका भांड्यात काढा आणि वीस ते तीस मिनिटे तशीच राहू द्या. यानंतर शिजवतानी त्यातील रस पिळून घ्या.
याशिवाय मिठाच्या पाण्यात काही मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ कारली उकळल्याने त्यातील कडवटपणा कमी होण्यास मदत होते.
२) दह्यात मॅरीनेट करा
कारल्याचा कडूपणा कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे शिजवण्यापूर्वी काही वेळ ते दह्यात भिजवून ठेवा. कडवटपणा दूर करण्यासाठी हा उपाय क्वचितच वापरला जातो पण तो खूप प्रभावी आहे.
यासाठी कारले कापून शिजवण्याच्या किमान एक तास आधी पाण्यात बुडवून ठेवा. नंतर पॅनमध्ये शिजवण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.
३) कारले सोलून घ्या
कारल्यामधील कडूपणा त्याच्या बाह्य पृष्ठभागात असतो. यामुळे कारल्याची भाजी बनवताना त्याच्यावरील भाग सोलून घ्या, यामुळे कारल्याच्या भाजीची चव बर्याच प्रमाणात सुधारते.
कारलं सोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, कारल्याचा पृष्ठभाग हलकासा काढायचा आहे. अन्यथा कारल्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतील.
४) व्हिनेगरचा वापर करा
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता . यासाठी तुम्हाला समान प्रमाणात साखर आणि व्हिनेगर यांचे मिश्रण बनवावे लागेल आणि त्यात कारल्याचे तुकडे टाकायचे आहे. हे मिश्रण तुम्हाला १५ ते २० मिनिटे असेच ठेवायचे आहे.
यामुळे कारल्याची नैसर्गिक चव खराब होण्याचा धोका नसतो शिवाय कडवटपणाही कमी होतो. पण भाजी करण्यापूर्वी कारल्याते तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घेण्यास विसरू नका.