What Is The Food Cause Of Uric Acid : अनेकदा सांधेदुखी, थकवा, पाठदुखी, वारंवार मूत्रविसर्जनास जावे लागणे, मूतखडा अशा समस्या आपल्याला भेडसावत असतात. शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याची ही महत्त्वाची लक्षणे असू शकतात. जास्त प्रमाणात मद्यपान, मांसाचे जास्त सेवन, पाण्याचे अपुरे सेवन आणि त्याशिवाय फ्लॉवर, पालक, मसूर व राजमा यांसारख्या काही भाज्यांचे जास्त सेवन आदी अनेक बाबी शरीरात युरिक अॅसिड वाढण्याला कारणीभूत असू शकतात. मग नक्की कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये याबद्दल या बातमीतून जाणून घेऊयात…
काय खाऊ नये?
मांस – लाल मांस (बकरी, गोमांस) आणि अवयवांचे मांस (यकृत, मूत्रपिंड) यांचे सेवन कमी करा. कारण- त्यामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते.
अल्कोहोल – बीअर आणि डिस्टिल्ड लिकर, युरिक अॅसिडची पातळी वाढवू शकतात. म्हणून त्याचे सेवन मर्यादित करणे किंवा ते कायमचे सोडून देणे फायदेशीर ठरते.
गोड पेय – उच्च प्रमाणातील फ्रुक्टोजयुक्त कॉर्न सिरपने बनवलेली गोड पेये (कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स) शरीराच्या युरिक अॅसिडची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे यांचे सेवन वेळीच टाळणे चांगले ठरेल.
कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ – आहारात लिंबूवर्गीय फळे, चेरी, स्ट्रॉबेरी व काकडी अशा व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे शरीरात युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकते.
दुग्धजन्य पदार्थ – चीज व दही, तसेच कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य, शेंगदाणे यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा.
कॉफी – काही संशोधनांनुसार, कॉफीचे मध्यम सेवन युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.
जीवनशैलीत कोणते बदल करावेत?
वजन नियंत्रणात ठेवणे – जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे चयापचय बिघडण्याची शक्यता असते, ज्यामुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने तुमचे वजन नियंत्रित करा.
नियमित व्यायाम – चालणे, पोहणे व सायकलिंग यांसारखे व्यायाम नियमितपणे करा; ज्यामुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते.
रक्तातील साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन – जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा. कारण- रक्तातील उच्च प्रमाणातील साखरेमुळे युरिक अॅसिडच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
पुरेसे पाणी प्या – पाणी जास्त प्ययाल्याने शरीरातील युरिक अॅसिड लघवीसह बाहेर पडते. त्यामुळे युरिक अॅसिडचे खडे तयार होण्याचा धोका कमी होतो.
जर तुम्ही युरिक अॅसिडची पातळी वाढवू शकणारी कोणतीही औषधे घेत असाल, तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(टीप – लेखात नमूद केलेल्या टिप्स व सूचना फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावू नये. तुमच्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
