Foods to Cure Mouth Ulcers Fast: तोंडात फोड होणे ही एक सामान्य; पण अत्यंत त्रासदायक समस्या आहे. त्यामुळे फक्त खाण्या-पिण्यातच अडचण नाही, तर त्यामुळे बोलताना आणि हसतानाही त्रास होतो. बर्याचदा लोक याचा संबंध फक्त उन्हाळा, पचनसंस्थेतील बिघाड किंवा थंड पदार्थ यांच्याशी जोडतात. पण, खरी कारणे थोडी वेगळी आहेत. जीवनसत्त्वांची कमतरता अथवा काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांच्या अभावामुळे हे फोड निर्माण होतात.
विशेषतः बी१२, बी९ (फॉलिक अॅसिड), बी२ (रायबोफ्लेविन) व क या जीवनसत्त्वांची कमतरता हे फोड येण्याचे मुख्य कारण ठरते. पण, चिंता करण्यासारखे नाही. कारण- काही सहजसाध्य पदार्थ तुम्ही खाल्ल्याने ही कमतरता लवकर भरून येईल आणि फोड त्वरित बरे होतील.
कोणत्या जीवनसत्त्वांमुळे येतात तोंडात फोड?
- बी१२ : कमी झाल्यास रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होते. परिणामी थकवा, कमजोरी आणि तोंडात फोड दिसू शकतात.
- फॉलिक अॅसिड (बी९): पेशींची दुरुस्ती करण्यात मदत मिळते. याची कमतरता असल्यास फोड आणि पचनाची तक्रार उदभवू शकते.
- क: शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि जखमा लवकर भरून येतात. याच्या कमतरतेमुळे तोंडात सूज आणि फोड दिसतात.
- बी२: त्वचा आणि तोंडाच्या पेशींना आरोग्यपूर्ण ठेवतो. कमतरता असल्यास ओठ फाटणे आणि तोंडात फोड होतात.
‘हे’ पाच पदार्थ खाल्ल्याने मिळेल त्वरित आराम
१. दही आणि ताक: प्रो-बायोटिक्समुळे पचन सुधारते आणि बी जीवनसत्त्वाची कमतरता भरून येते. रोज एक कप दह्याचे सेवन फायदेशीर ठरते.
२. पालक आणि हिरवी पालेभाजी: फॉलिक अॅसिड आणि क जीवनसत्त्वाचा समृद्ध स्रोत. पालकाचे सूप किंवा त्याच्या भाजीचा तोंडातील व्रणांवर जलद सकारात्मक परिणाम होतो.
३. पेरू आणि लिंबू: क जीवनसत्त्वाची विपुल मात्रा. पेरू खाल्ल्याने किंवा लिंबूपाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि फोड त्वरित बरे होतात.
४. अंडी आणि दूध: बी१२ हे जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात मिळते. रोज एक अंडे आणि एक ग्लासभर दूध शरीराला आवश्यक ते पोषण मिळवून देते.
५. बदाम आणि शेंगदाणे: बी२ हे जीवनसत्त्व आणि आरोग्यदायी चरबी मुबलक प्रमाणात मिळते. तोंडातील पेशी सुस्थितीत राहता, आणि फोड दूर होतात.
तोंडातील फोड फक्त बाह्य त्रासामुळेच येत नाहीत, तर ते शरीरातील पोषणाच्या कमतरतेचेही लक्षण असू शकते. योग्य आहार आणि वर सांगितलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास, फोड त्वरित बरे होतील आणि पुन्हा ते होण्याची शक्यता कमी होईल.
तेव्हा आजच आहारात बदल करून, आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढा आणि तोंडाला त्रास न होता, मनमोकळेपणाने हसण्याचा अनुभव घ्या.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)