Breast Cancer Prevention Foods: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्याबद्दलची सर्वांत मोठी भीती म्हणजे स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर). जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा असा आजार आहे, ज्यात स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि गाठी तयार करतात. वेळेत उपचार न झाल्यास या गाठी शरीरात पसरून जीवघेणा धोका निर्माण करतात.

२०२२ मध्ये जगभरात सुमारे ६.७ लाख महिलांचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाला. भारतातही या आजाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणं आणि ते अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी २४ सप्टेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं, “जर महिलांनी हे काही अन्नपदार्थ लहान वयातच खायला सुरुवात केली, तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो.”

महिलांनी रोज खायला हवेत हे ६ अन्नपदार्थ; त्यामुळे कॅन्सरपासून होतो बचाव

१. डाळिंब

डाळिंबात Ellagitannins नावाचं घटक द्रव्य असतं, जे कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही. रोज एक कपभर ताजं डाळिंब खाल्लं, तर इस्ट्रोजेनवर आधारित कर्करोगाचा धोका कमी होतो.

२. क्रुसिफेरस भाज्या

फुलकोबी, ब्रोकोली, कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये Sulforaphane नावाचं संयुग असतं, जे शरीरातील विषारी इस्ट्रोजेन घटक बाहेर काढून ट्यूमरची वाढ रोखतं. आठवड्यातून किमान ३-४ वेळा या भाज्या खा.

३. सोयाबीन आणि डाळी

यात असणारे Isoflavones हे नैसर्गिक इस्ट्रोजेनसारखे घटक आहेत. ते हार्मोन संतुलन राखतात आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका ३० टक्क्यांनी कमी करतात. आठवड्यातून २-३ वेळा सोयाबीन किंवा टोफू नक्की खा.

४. आवळा किंवा पेरू

दोन्हीमध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स डीएनएचं नुकसान होऊ देत नाहीत. रोज एक फळ खा शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी राहतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

५. ऑलिव्ह ऑइल

एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल रोज घेतल्यास शरीरातील सूज कमी होते, पेशींचं संरक्षण होतं आणि ट्यूमरची वाढ मंदावते. सॅलडवर किंवा स्वयंपाकात ते तेल वापरा.

६. जवस (Flaxseeds)

जवसमध्ये असलेले Lignans हे घटक इस्ट्रोजेन संतुलन राखतात आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखतात. फक्त एक टेबलस्पून जवस पावडर रोज दही किंवा स्मूदीमध्ये मिसळा.

तज्ज्ञांचा सल्ला- ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थोडक्यात सांगायचं तर, आपल्या दैनंदिन आहारात या सहा पदार्थांचा समावेश केला, तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. कारण- प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.