How To Avoid Bloating After Breakfast : तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार हे पूर्णपणे तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली यावर अवलंबून असते. म्हणून सकाळचा नाश्ताही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. पण, अनेकदा सकाळी जास्त नाश्ता केल्यावर मळमळते, उलटीसारखे वाटते किंवा खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा जड, गच्च वाटते. मग अशा वेळी अनेक जण नाश्ता करणे टाळून देतात. पण, या परिस्थितीसाठी नकळत आपणही कारणीभूत असतो. म्हणजेच आपण नाश्त्यादरम्यान अशा काही चुका करतो, ज्यामुळे पोट फुगणे आणि पचनाच्या समस्या उदभवू शकतात. एम्स, हार्वर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्ये प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोटफुगी निर्माण करणाऱ्या १० नाश्ता करतानाच्या चुका, सवयी सांगितल्या आहेत.
तुम्ही यापैकी नक्की कोणती चूक करता?
तुम्ही यापैकी नक्की कोणती चूक करता?
- नाश्ता वगळणे आणि नंतर खूप जास्त खाणे.
- दिवसाची सुरुवात साखरयुक्त धान्ये किंवा पेस्ट्रींनी करणे.
- लॅक्टोज असहिष्णुता असूनही दुधाचे सेवन करणे.
- रिकाम्या पोटी कॉफी पिणे.
- योग्य रीत्या न चावता खूप वेगाने खाणे.
- अन्नपदार्थ किंवा पेयांमध्ये कृत्रिम गोड पदार्थांचा वापर करणे.
- अल्ट्रा-प्रोसेस्ड प्रोटीन बार किंवा शेकवर (जसे की फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्ज, साखरेचे प्रकार, रासायनिक पदार्थ) अवलंबून राहणे.
- सकाळी सर्वांत आधी कार्बोनेटेड पेये घेणे.
- नाश्त्यात पुरेसे फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट न करणे.
- जास्त चरबीयुक्त तळलेला नाश्ता करणे.
आतडे – तुमच्या शरीराचा दुसरा मेंदू
आतडे हा प्रत्येक गोष्टीचा पाया आहे. आतडे अन्नाचे पचन करते, पोषक तत्त्वे शोषून घेते आणि तुमच्या शरीराला शक्ती व आधार देण्यासाठी त्यांचा वापर करते. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगायचं तर, ‘आतडे’ म्हणजे त्यात आपल्या पोटातील संपूर्ण पचनसंस्था, ज्यामध्ये पोट, लहान आतडे व मोठे आतडे यांचा समावेश असतो.
आपल्या पचनसंस्थेत खूप सूक्ष्म जीव असतात; जसे की जीवाणू, बुरशी, विषाणू व इतर सूक्ष्मजंतू. या सूक्ष्मजंतूंच्या समूहाला ‘आतड्यातील मायक्रोबायोम’, असे म्हणतात. आतड्यातील मायक्रोबायोम इतका महत्त्वाचा असतो की, त्याला ‘दुसरा मेंदू’ असेही म्हणतात. कारण- त्यामुळे हार्मोन्स, रोगप्रतिकार शक्ती, चयापचय आणि अगदी मूडदेखील नियंत्रित होतो. त्यामुळे व्हर्सिटी स्किन अँड वेलनेस क्लिनिकमधील मुख्य पोषण व वेलनेस सल्लागार, पीएचडी, डॉक्टर मेधा कपूर यांच्या मते, तुमचे आतडे जितके सुस्थितीत असते, तितकेच तुमचे आरोग्यही चांगले राहू शकते.
