परतीच्या पावसानंतर आता हळूहळू थंडी वाढत असल्याचे जाणवत आहे. हिवाळा हा अनेक जणांचा आवडता ऋतू. पावसाळ्यामुळे निसर्गाचे फुललेले रूप पाहण्यासाठी अनेकजण या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात. पण याच दिवसांमध्ये काही आजार बळावतात, त्यामुळे हिवाळ्यामध्ये तब्येतीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हवामानातील बदल, प्रदूषण आणि हिवाळ्यात पडणारे धुके यांमुळे बऱ्याचजणांना श्वसनाशी निगडित समस्या उद्भवतात. यासह अनेकांना हिवाळ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास होतो.

हिवाळ्यात तापमानामुळे सांध्यांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते. यामुळे रोजची कामं करतानाही अडचणी येतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या.

आणखी वाचा : पायांच्या स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवतात का? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा लगेच जाणवेल फरक

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते. दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

सॅल्मन मासे व अंडी
सॅल्मन मासे ओमेगा ३ फॅटी ॲसिड चे उत्तम स्त्रोत मानले जाते. ओमेगा ३ फॅटी ॲसिडच्या सेवनाने गुडघेदुखी वर आराम मिळतो तसेच गुडघ्यांवरील सूज कमी होण्यास मदत मिळते. अंड्यांमध्ये विटामिन डी आणि अनेक पोषक तत्व आढळतात जे हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी सॅल्मन मासे आणि अंडयांचा समावेश करावा.

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन आणि मिनरल आढळतात. ज्यामुळे हाडं मजबुत होण्यास मदत मिळते. तसेच सूज येण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एंजाईमला ब्लॉक करण्यासाठी हिरव्या भाज्या मदत करतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)