भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविध धर्माचे, विविध जातींचे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान ग्रहण केलेले सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्व प्रकारच्या व्यक्ती आपल्या देशात आहेत. अठरापगड लोक आपल्या देशात आहेत, हे जे म्हटले जाते, ते उगाच नाही! त्यातही अनेक गट करायचे नसतील आणि कमीत कमी गटात विभागणी करायची असेल, तर एक साधासुधा मुद्दा म्हणजे ‘मासे खाणारे व मासे न खाणारे’.
आयुर्वेद हे शास्त्र सृष्टीतील सर्वच घटकांना एकाच दृष्टीने पाहायला शिकविते. ते म्हणजे सामान्यांना सुद्धा कळेल असे! उदा. ‘सेवन करण्यास योग्य’ अािण ‘सेवन करण्यास अयोग्य’. सेवन करण्यास योग्य अशा पदार्थाचेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने गट करता येतात. आयुर्वेदाने खाद्यपदार्थाचे चार मोठय़ा उपगटांत विभाजन केले आहे. ते म्हणजे खाद्य, पेय, लेह्य़ आणि चोष्य. खाद्य म्हणजे जे चावून सेवन केले जाते, पेय म्हणजे जे प्यायले जाते, लेह्य़ म्हणजे चाटून खावे लागते आणि चोष्य म्हणजे चोखून ज्याचा आस्वाद घेतला जातो. यांच्यापकी केवळ खाद्यपदार्थाचा विचार करायचे म्हटले तरी त्यांचा पसारा अति होतो असे दिसते. त्यातल्या त्यात खाद्यपदार्थाना कमीत-कमी गटांमध्ये विभागायचे म्हटले तर आज ज्या दोन गटांची चर्चा आहे, त्या गटांत विभागता येईल आणि ते म्हणजे शाकाहारी पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ. शाकाहारी अर्थात जे वनस्पतींपासून, फळांपासून बनविलेले खाद्यपदार्थ म्हणता येतील असे आणि मांसाहारी म्हणजे मासे किंवा प्राण्यांपासून बनविलेले पदार्थ.
शाकाहारी पदार्थाविषयी फारशी चर्चा होत नाही आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे जवळजवळ सगळ्याच व्यक्ती शाकाहारी पदार्थ सेवन करीत असतात. परंतु ‘मांसाहार’ विषय येताच त्यापकी काही मंडळी भुवया उंचावितात. खरे म्हणजे ‘र्सव द्रव्यं पाञ्चभौतिकम्’ या आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांतानुसार सर्वच घटक अगदी किडय़ामुंगींपासून ते मनुष्य प्राण्यांपर्यंत, शेवाळापासून ते वटवृक्षापर्यंत पंचमहाभूतांनी बनलेले असतात. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले हे सर्व पदार्थ शरीरातील पंचमहाभूतांचे पोषण करीत असतात. पदार्थाचे सर्वसाधारणपणे खाद्यपदार्थाच्या दृष्टीने विचार करताना शाकाहारी पदार्थाबद्दल व ते ज्यापासून बनविलेले असतात, अशा घटकांबद्दल बरीच माहिती सापडते. परंतु ज्या वेळी मांसाहारी पदार्थाचा आणि त्यातही विशेषत: मासे या गटाचा विचार होतो, त्यावेळी फारशी शास्त्रीय चर्चा होताना दिसत नाही.
खरे तर विविध प्रकारच्या मासळींमध्ये किमान मोठे मासे, छोटे मासे एवढे तरी भेद करणे आवश्यक असते. उदाहरण द्यायचे झाले तर पापलेट, बांगडा, सुरमई, रावस, मोरी, हलवा यांची सर्वसाधारणपणे मोठय़ा माशांमध्ये गणना होते. तर सौंदाळे, मुडदुशी (नगली), बोंबिल, मांदेली, वेरल्या, शेवटे, धोडय़ारे असे मासे छोटय़ा माशांमध्ये मोडतात. याशिवाय कुल्र्या, तिसऱ्या, खडपी कालवे, कोलंबी अशा प्रकारचे मासेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. त्यापकी प्रत्येक माशाचे स्वत:चे गुणधर्म असतात. उदाहरण द्यायचे झाले तर खोल समुद्रात मिळणारे मोठे मासे (डीप सी फिश) हे सर्वसाधारणपणे अधिक बल देणारे अर्थात् बल्य असतात. उदा. रावस, हलवा, सुरमई. परंतु हे मासे पचायला जड असतात, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. यापकी विशिष्ट मासे उदाहरणार्थ, वर उल्लेखिलेले सौंदाळे किंवा मुडदुशी यासारखे मासे बल्य, स्तन्यवर्धक असल्या कारणाने तसेच प्रसूतीनंतरच्या काळात अर्थात ‘सूतिका’ अवस्थेत लाभदायक असल्याकारणाने सेवन करणे चांगले. याउलट गरोदर स्त्रीने कोलंबी, बांगडा, कुल्र्या हे मासे निक्षून टाळावे. बोंबिल हा मासा ओज (तेज) आणि अशक्त व्यक्तींचे वजन वाढवायला उपयोगी ठरतो.
जरी कोणत्याही ग्रंथात स्पष्ट उल्लेख सापडला नाही तरी ज्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीजनिर्मिती होण्यास व्यत्यय येत असतो अशा स्त्रियांनी गाबोळी खाणे योग्य. परंतु गर्भवती स्त्रीने मात्र उष्ण असल्याने गाबोळी खाऊ नये. उष्ण पदार्थाच्या अतिसेवनाने गर्भपात होण्याचाही धोका असतो. अनेक वेळा खाडीत मिळणारी मासळी सुकवून विकण्याचा प्रघात आहे. सुकवून विकण्यासाठी सर्वसाधारणपणे मिठाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो आणि म्हणून अशी मासळी चवीला खूप खारट लागते. हे मासे पाण्यात ठेवून त्यातील खारटपणा कमी केला जातो. मात्र ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी यासंदर्भात विशेष काळजी घ्यावी. मासे साधारण तीन प्रकारे प्रक्रिया करून खाल्ले जातात. रस्सा, रवा लावून तव्यावर कमी तेलात भाजणे आणि कढईमध्ये तळणे. कढईत तळण्यापेक्षा इतर दोन्ही प्रकारे मासे खाणे अधिक चांगले. तव्यावर भाजलेले मासे टीपकागदावर काढल्यास त्यातील तेल शोषले जाते.
अनेक वेळा कॅल्शियम अधिक मिळण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची कवचयुक्त मासळी खावी असे सांगितले जाते. उदा. तिसऱ्या, कालवे. परंतु हे पदार्थ उष्ण स्वभावी असल्यामुळे गरोदर स्त्रीस अयोग्य असतात. कुल्र्या, तिसऱ्या आणि कालवे या स्वरूपाची मासळी कॅल्शिअम सप्लिमेंट म्हणून वापरली जाते, परंतु यांच्या अतिसेवनाने किंवा वारंवार सेवनाने मूतखडा होण्याची दाट शक्यता असते.
थोडक्यात सांगायचे झाले, तर आयुर्वेदानुसार विचार केला तर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला मिळणारा लाभ वेगळा हे लक्षात घेतलेच पाहिजे.
अर्थात ‘अति सर्वत्र वर्जयेत्’ हे त्रिकालाबाधित सूत्र प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. एका घरातील चार व्यक्तींचा जसा स्वभाव सारखा असत नाही, तर मग त्यांची पचन संस्थेची क्षमतादेखील सारखीच असेल, असे का बरे समजावे? आणि म्हणून ज्यांना कमी भूक लागते, त्यांनी पचायला हलके- सर्वसाधारण छोटय़ा आकाराचे आणि चपळ असणारे मासे खावेत, तर ज्यांना उत्तम भूक लागते आणि सोबत पचविण्याचे सामथ्र्यही असते, अशा व्यक्तींनी मोठे मासे खाल्ले आणि पचवले तर ते लाभकर होते. थोडक्यात काय तर, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि जितक्या प्रकृती तितके वैविध्य- स्वभावात, वागण्यात एवढंच काय तर आहारातही!
वैद्य शैलेश नाडकर्णी – vdshailesh@sdlindia.com