हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे अनेक भागात दिवसा गरमी आणि रात्री थंडी पडत असल्याने सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. अनेकांचे याकडे दुर्लक्ष आहे. कधी- कधी हे आजार घातक ठरू शकतात. नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असतो. त्यामुळे सर्दी-खोकलाही एखाद्या गंभीर आजाराची चाहूल ठरू शकतो. बालके आणि वृद्धांना या आजाराचा सर्वाधिक त्रास असतो.
सर्दी, खोकला, पडसे या आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष असते. परंतु या आजारांकडेही गांभीर्याने बघायला हवे. मानवी गालाच्या आतल्या भागात एक पोकळी असते. तिला सायनस असे म्हणतात. सायनस आणि नाक एकमेकांना जोडलेले असते. नाक आणि सायनसचा आतला भाग ओलसर राहावा आणि या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून त्यात ‘म्यूकस’ नावाचा द्रवपदार्थ स्रवत असतो. आपले शरीर दर वीस मिनिटांनी हा स्राव स्वच्छ करतो. हा स्त्राव स्वच्छ न झाल्यास नाक आणि सायनसच्या मध्ये हे द्रव्य साठून राहते. त्यानंतर आपण नाक गच्च झाले असे म्हणतो, यालाच सर्दी म्हणतात. म्युकस साफ न झाल्यामुळे त्या ठिकाणी लगेच जंतुसंसर्ग होतो. घशाला सूज येते. काही वेळेला खोकला येतो. कित्येकांच्या कानात आवाज येऊ लागतात. कित्येक वेळा सर्दीमुळे कानही दुखू लागतो. वारंवार सर्दी होणे हे कदाचित नाक किंवा सायनसच्या कॅन्सरचे लक्षणे असू शकतात. वातावरणातील बदल किंवा ऋतू बदलल्यास खोकला येणे, नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक लाल होणे असा त्रास होतो. लहान मुले, वृद्ध व्यक्तींना याचा त्रास जास्त होतो. दम्याचाही त्रास वाढतो. फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजारही जडतात. याचे प्रमाण वृद्धमंडळी, लहान मुलांमध्ये सर्वात जास्त असते. कारण त्यांची प्रतिकारक्षमता चांगली नसते.
कारणे
- नाकातील हाड वाढणे
- हवेतील प्रदूषण
- जंतूचा संसर्ग
- धूम्रपान व इतर
रस्ते, घरदुरुस्तीच्या प्रदूषणाचाही त्रास
रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांना जंतुसंसर्गाचा धोका असतो. गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे, एसटी, शहर बसमध्ये कोणी शिंकला, त्याला खोकला झाला असेल त्याचाही संसर्ग संपर्कात आलेल्यांना होऊ शकतो. जंतुसंसर्ग होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. हवेचे प्रदूषण. या प्रदूषणाचा परिणाम घसा, नाक, श्वसननलिका यांच्यावर होऊ शकतो.
शहरी भागात सध्या बांधकाम, घरदुरुस्ती, रस्त्यांची कामे वाढत आहे. वाळू, सिमेंट पीओपी या वस्तूंच्या आपण सान्निध्यात येतो. या वस्तूंनी ज्यांना अॅलर्जी असते. त्यांच्या घसा आणि नाकावर परिणाम होतो. घसा खवखवतो, घशामध्ये रुतल्यासारखे होते.
अॅसिडिटीनेही घशाच्या त्रास
अनेकांना गिळताना त्रास होतो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या घशात काहीच नसते. बाहेरचे खाणे हेही जंतुसंसर्ग होण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण आहे. अस्वच्छ ठिकाणी खाल्ल तर जिवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्याने रुग्णाला ताप येतो, घसा फुलतो, ताप येतो. अनेकदा घशात पस होतो. अशा वेळी रुग्णाला प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागतात. घशाचा त्रास होण्याचे चौथे कारण आहे अॅसिडिटी आणि पोट खराब होणे. शेवटी घसा आणि पोट यांचे फारच जवळचे नाते आहे. झोपेत पोटातील अॅसिड घशात येते. त्याचा परिणाम घशावर होतो. रुग्णाला बद्धकोष्ठतेचा (कॉन्स्टिपेशन) त्रास होतो. घसादुखीही वाढते. अशा रुग्णांमध्ये अॅसिडिटीचा उपचार देऊन त्यांचा घसा बरा करता येतो. अशा वेळी बाहेरचे खाणे कटाक्षाने टाळावे लागते.
मुले, वयस्क, मधुमेहींना त्रास
सर्दी-खोकला झाल्यावर अध्येमध्ये घशाचा संसर्गही डोके वर काढतो. हे त्रास होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. एक म्हणजे जंतुसंसर्ग होऊ शकतो. थोडासा तापही येऊ शकतो. हा जंतुसंसर्ग साधारण २-३ दिवस राहू शकतो. उत्तम प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा फारसा त्रास होत नाही. मात्र प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना भरपूर त्रास होतो. तसेच रुग्ण बालक किंवा वृद्ध, मधुमेही, किडनी, हृदयाच्या विकासाचा असला तरी त्याला जास्त त्रास होऊ शकतो. निरोगी व्यक्तींना जंतुसंसर्गाचा त्रास होत नाही, असे नाही. तर त्यालाही जंतुसंसर्गाची शक्यता असते. जसाजसा जंतुसंसर्ग झाला की, निरोगी व्यक्तींनाही घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन ते चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो.
आजार टाळण्यासाठी महत्त्वाचे
- बाहेरचे खाणे टाळावे
- गरम पाणी प्यावे
- कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवून खावेत
- खोकताना, शिकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा
- नित्याने व्यायाम करावा
- रोज मोकळ्या हवेवर फिरण्यास जावे
- आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त फळांचा समावेश करावा
- योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातून सर्दी, खोकला तसेच घशाच्या आजारांना दूर ठेवता येते.
– डॉ. अविनाश गावंडे, नागपूर