डॉ. तिलोत्तमा पराते

स्मृतिभ्रंश (अल्झायमर्स) हा टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्याची सुरुवात सर्वसाधारणपणे वयाची चाळिशी, पन्नाशी गाठल्यानंतर होत असल्याचे आढळते. वृद्धांमध्ये हा आजार मेंदूच्या क्रिया हळूहळू बंद करतो.

लक्षणांचे चार टप्पे

  • स्मृतिभ्रंशाची सुरुवात विस्मरणापासून होते. ही बाब गंभीर असली तरी त्याकडे रुग्ण वा त्यांचे नातेवाईक फारसे लक्ष देत नाहीत. या टप्प्यात रुग्णाच्या जगण्यात विस्मरणाचे परिणाम जाणवू लागतात. उदा. पैशाचा व्यवहार विसरणे, वाहन चालवताना रस्ता विसरणे किंवा रोजची विविध कामे विसरून जाणे, त्यामुळे रुग्ण आक्रमक वा अस्वस्थ होतो.
  • दुसऱ्या टप्प्यात रुग्ण गोंधळलेला असतो. साध्या- साध्या क्रिया- उदा. कपडे घालणे, खाणे-पिणे, सोपे गणित करणे, चित्र रेखाटणे अशी विविध कामे त्याला जमेनाशी होतात. घडय़ाळ बघून वेळ सांगताना त्याला त्रास होतो. बरेचदा बोलण्यातही फरक पडतो.
  • तिसऱ्या टप्प्यात रुग्ण चालता-फिरता असला तरी त्याला चालण्याकरिता पाय टाकण्याचा योग्य अंदाज येत नाही. अनेकदा या टप्प्यात रुग्णाला वेगवेगळे भासही होतात. आरशात स्वत:चेच प्रतिबिंब बघून तो घाबरतो, रात्री त्याला झोप लागत नाही, तो रात्रभर फिरत राहतो. काही रुग्णांना चालताना त्रासही होत असल्याचे निदर्शनास येते.
  • चौथ्या टप्प्यात रुग्ण शांत राहतो. त्याचे शरीर कडक होत असल्याने तो खाटेवरच पडून राहतो. या टप्प्यात रुग्णांना कपडे घालताना, खाताना किंवा शारीरिक क्रिया करताना कोणाची तरी मदत घ्यावी लागते. काही रुग्णांमध्ये रुग्णाच्या संपूर्ण शरीराला झटकेही येऊ शकतात. या टप्प्यात कुपोषण, जंतूसंसर्ग, हृदयरोग अशा विविध कारणांमुळे मृत्यू ओढवण्याचाही संभव असतो.

या आजारात मेंदूमध्ये ‘बीटा अमायलॉइट पेप्टाइड’ नावाचा पदार्थ जमा होतो आणि ‘अ‍ॅसिटीलकोलीन’ कमी होते. त्यामुळे मेंदूतील पेशींना हानी पोहोचते. रक्ताच्या चाचण्यांचा यात फारसा लाभ होत नसून ‘एमआरआय’ किंवा ‘सीटी स्कॅन’वरून काही गोष्टी स्पष्ट होतात. या आजारात मेंदूचा ‘हिप्पोकॅम्पस’ नावाचा भाग किंवा संपूर्ण मेंदू आकुंचन पावलेला आढळतो.

जोखीम कुणाला?

  • आनुवंशिकता किंवा वातावरणातील काही घटक या आजारास कारणीभूत ठरण्याची शक्यता असते.
  • ‘डाऊन सिंड्रोम’मध्ये जन्मताच बाळाच्या मेंदूची वाढ कमी होते. त्यांच्यात स्मृतिभ्रंशाची लक्षणे कमी वयात दिसू शकतात.
  • शारीरिक हालचाली किंवा मेंदूचा वापर कमी असणाऱ्या लोकांमध्येही या आजाराची शक्यता अधिक असते.
  • मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तात चरबीचे प्रमाण जास्त असणे, नैराश्य हे आजार असल्यास किंवा मद्यपान व धूम्रपान जास्त प्रमाणात केल्यासदेखील काही जणांमध्ये स्मृतिभ्रंशाची शक्यता असते.

उपचार काय?

या आजारावर नेमके औषधोपचार नाहीत, परंतु रुग्णाच्या कुटुंबीयांचे समुपदेशन फार गरजेचे आहे. सुरुवातीला नैराश्य, आक्रोश, झोप न लागणे, झटके येणे यांसारख्या मानसिक स्थितीवर औषधांचा ‘सपोर्टिव्ह थेरपी’ म्हणून उपयोग होऊ शकतो. आजाराच्या सुरुवातीला वापरल्या जाणाऱ्या अशा औषधांबाबत बरेच संशोधन झालेले आहे. ही औषधे मेंदूतील ‘अ‍ॅसिटीलकोलीन’चे प्रमाण वाढवतात व रुग्णांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा दिसू लागते. पण या औषधांचा वापर विलंबाने केल्यास त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

महत्त्वाचे-

  • स्मृतिभ्रंशाचा कालावधी साधारणत: ८ ते १० वर्षांचा असतो, पण तो १ ते २५ वर्षांचाही असू शकतो.
  • या रुग्णांच्या हिताकरिता कुटुंबीयांनी गरजेप्रमाणे स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, जिने, रुग्णाच्या खोलीची व्यवस्था रुग्णाला अनुरूप करून घ्यायला हवी.
  • रुग्णाला वाहन चालवण्यापासून रोखायला हवे, तसेच कुटुंबीयांचे त्यांच्यावर नित्याने लक्ष असणे गरजेचे.
  • आपल्याकडे स्मृतिभ्रंशाविषयी पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे या रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक दिसतो. हे टाळायला हवे.

(शब्दांकन: महेश बोकडे)