scorecardresearch

‘त्या’ दिवसांतील साधने!

मासिक पाळीत वापरात येणारी विविध साधने सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

|| डॉ. शीतल श्रीगिरी, स्त्रीरोगतज्ज्ञ

मासिक पाळीत वापरात येणारी विविध साधने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सॅनिटरी नॅपकिनच्या वापरण्याकडे महिलांचा अधिक कल असतो. पाळीच्या कालावधीतील साधनांची निवड, रक्तस्राव शोषण्याची क्षमता, त्वचेला पूरक आणि वापरण्यास अधिक सोपे यासोबतच आर्थिक विचार करून  महिला मासिक पाळीसाठीची साधने वापरतात.

वयाच्या साधारण बाराव्या-तेराव्या वर्षांपासून पन्नाशीपर्यंत स्त्री प्रजननक्षम असते, याचाच अर्थ या काळात ती प्रत्येक महिन्यात मासिक पाळीच्या चक्रातून जात असते. हल्ली ही प्रक्रिया अगदी दहाव्या वर्षांपासूनसुद्धा सुरू होत असल्याचे दिसू येते. महिन्याच्या या चार ते पाच दिवसांत होणाऱ्या रक्तस्रावाच्या काळात स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग होणे, चट्टे येणे आदी आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

मासिक पाळीत वापराली जाणारी साधने (मेनस्ट्रअल हायजिन प्रॉडक्ट्स )

रक्तस्राव शोषण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पून हे एकदा वापरण्यासारखे, तर कापड/कापडी पॅड आणि कप हे पुनर्वापर करता येण्यासारखे पर्याय आहेत. अविवाहित मुली सहसा नॅपकिनचा (पॅड) पर्याय निवडतात. विवाहित महिलांनी टॅम्पून, कप आदी पर्याय वापरावेत, असे सुचविले जाते.

कापड/कापडाची घडी

आर्थिकदृष्टय़ा न परवडणे, उपलब्धता नसणे किंवा पॅड्स विकत घ्यायला संकोच वाटणे आदी कारणांमुळे काही ठिकाणी अजूनही मुली आणि स्त्रिया पाळीच्या दिवसांत जुने कपडे वापरतात. हे कपडे धुऊन परत वापरले जातात. धुतल्यानंतर बऱ्याचदा हे कापड उन्हात न वाळवणे, योग्य न धुणे तसेच पाळीच्या दिवसानंतर अडगळीत ठेवणे यामुळे अशा कपडय़ांच्या वापराने योनीचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. हे कपडे धुवावे लागत असल्याने याचा वापर करणे शक्यतो टाळले जाते. परंतु दर महिन्याला बाजारातील पॅड्स विकत घेऊन वापरणे शक्य नसल्यास कापडी घडीचाच पर्याय निवडला जातो.

कापडी पॅड

कापडी घडीला पर्याय म्हणून आता पर्यावरणपूरक कापडी पॅड ही बाजारात उपलब्ध आहेत. अंतर्वस्त्राच्या आतून याचा वापर केला जात असून धुऊन पुनर्वापर करता येतो. बाजारातील सॅनिटरी पॅडच्या तुलनेत मऊ आणि नैसर्गिक असल्याने याच्या वापराने त्वचेवर शक्यतो चट्टे येत नाही किंवा मांडय़ामध्ये घर्षण होऊन चालताना त्रास होत नाही. पुनर्वापर केला जात असल्याने सॅनिटरी नॅपकिनप्रमाणे प्लास्टिक कचरा निर्माण होत नाही, तसेच आर्थिकदृष्टय़ादेखील परवडते. मात्र धुऊन वाळवताना स्वच्छतेची काळजी न घेतल्यास महिलांना अंतर्भागात संसर्ग होण्याची भीती असते.

सॅनिटरी पॅड्स/नॅपकिन

महिलांमध्ये सर्वाधिक वापरला जाणाऱ्या हा प्रकार आहे. हे पॅड एकदाच वापरण्यासारखे असून कापूस, प्लास्टिक आणि शोषक जेल (अ‍ॅबझॉबन्ट जेल) यापासून बनवले जातात. यात रेग्युलर, लार्ज, ते अल्ट्रा थिन असे विविध प्रकार असतात. संसर्ग किंवा चट्टे येऊ नयेत यासाठी दर चार ते सहा तासांनी पॅड बदलणे अपेक्षित असते. रक्तस्राव अधिक असल्यास दोन ते तीन तासांनी बदलावेत. वापरणे, बदलणे यासाठी सोपा प्रकार असला तरीही दरमहा होणारा खर्च आणि मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारा प्लास्टिक कचरा हे याचे तोटे आहेत. वापरलेल्या पॅड्सची नीट विल्हेवाट न लावल्यास परिसरात आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

टॅम्पून्स

टॅम्पून्स म्हणजे एक प्रकारे कापसाचा गोळा. योनीच्या आतल्या बाजूस घालून हे वापरात येतात. हे एकदाच वापरता येण्यासारखे असून रक्तस्त्रावानुसार दर दोन ते तीन तासांनी बदलणे आवश्यक आहे. आठ तासांहून अधिक काळ एक टॅम्पून वापरू नये. अधिक काळ योनीमार्गात राहिल्यास इथली जागा अतिकोरडी किंवा जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. यातून इतर तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे याचा वापर करीत असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच बदलल्यानंतर हातांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. या प्रकाराचा प्रमुख फायदा म्हणजे हालचालींना अडथळा येत नाही व मुक्तपणे वावरता येते. नॅपकिन किंवा कापडी पॅडच्या तुलनेत टॅम्पून्स महाग असल्याने सर्वानाच हा पर्याय परवडणारा नाही.

मेनस्ट्रअल कप

अधिक प्रचलित नसलेला पण आरोग्यदृष्टय़ा फायदेशीर आणि पर्यावरणपूरक साधनप्रकार आहे. यात एकदाच आणि पुनर्वापर करता येणारे असे दोन्ही प्रकार आहेत. योनीच्या आत ठेवण्यात येणाऱ्या या कपमध्ये रक्तस्राव शोषला जात नाही तर साठवला जातो. काही कालावधीनंतर हा कप काढून त्यात साठलेला स्रावची शौचालयात विल्हेवाट लावली जाते. बारा तासापर्यंत न बदलता या कपचा वापर करणे शक्य आहे. एक कप अनेक वर्षे वापरता येत असल्याने आर्थिकदृष्टय़ा परवडते, तसेच विघटन न होणारा जैविक कचराही यातून निर्माण होत नाही. सुरुवातीला कप नीट बसवणे जिकिरीचे होऊ शकते. म्हणूनच मग बऱ्याचदा विवाहित महिलांनाच हा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जातो. पुनर्वापर होणारा कप असेल तर नियमित स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कप काढताना नीट काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य खबरदारी घेऊन याचा वापर केल्यास हा सोयीस्कर पर्याय ठरू शकतो.

मासिक पाळीत घ्यावयाची काळजी

वारंवार कापड/ पॅड बदलणे : एकदा रक्त शरीरावाटे बाहेर पडले की ते जंतूंच्या वाढीसाठी अनुकूल माध्यम बनते. म्हणून स्राव कमी असला तरी जंतुसंसर्ग होऊ  नये म्हणून वारंवार साधने बदलणे आवश्यक असते. तसेच हे बदलल्यावर हात आणि योनीची जागा स्वच्छ करणे आणि वापरलेल्या साधनांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

पुनर्वापर करता येणाऱ्या साधनांची स्वच्छता कापड किंवा अन्य पुनर्वापराच्या साधनांचा वापर करीत असल्यास ही साधने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जंतुविरहित राहण्यासाठी जंतुनाशकाचा वापर न करता कडक उन्हात वाळवावीत.

साधनांची विल्हेवाट

एकदाच वापरण्याचे साधन असेल तर ते वापरून झाल्यानंतर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यावरील रक्तस्रावामुळे ते जंतुसंसर्ग पसरण्याची शक्यता असते. सॅटनरी नॅपकिन वापरानंतर पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्यात टाकावेत. कचरा नेणाऱ्या घंटा गाडीत कधी कधी नॅपकिनसाठी वेगळा कप्पा असतो. अशा वेळी पॅड्स त्यातच टाकावेत. पॅड्स ओल्या कचऱ्यात टाकू नयेत, शौचालयामध्ये फ्लश करू नयेत, उघडय़ावर फेकू नयेत.

चट्टे येणे

एकच पॅड अधिक काळ वापरल्यास ओले होऊन मांडय़ांना घासले जाते आणि मांडय़ांवर चट्टे येतात. हे टाळण्यासाठी पॅड वारंवार बदलावेत आणि ती जागा कोरडी राहील याची काळजी घ्यावी. चट्टे आल्यास त्या जागी जंतुप्रतिबंधक पावडर किंवा मलमचा वापर करावा.

संकलन : भक्ती बिसुरे

मराठीतील सर्व लोकआरोग्य ( Lokarogya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Menstrual cycle problems

ताज्या बातम्या