संतुलित आहार ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असली तरी वाढत्या वयानुसार किंवा वातावरणातील बदलत्या घटकांनुसार शरीरात काही बदल होत असतात. या बदलांना योग्य प्रकारे हाताळणे हेही तितकंच महत्त्वाचं. वयाच्या चाळिशीनंतर वैद्यकीय चाचण्या वर्षांतून एकदा करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला आपण अनेकदा ऐकतो. या चाचण्यांमध्ये एक चाचणी म्हणजे अमायलेज. या चाचणीची थोडी अधिक ओळख करून घेऊ.
‘रक्तातील अमायलेज’ (सीरम अमायलेज) या शब्दाचा अर्थ पाहणे महत्त्वाचे आहे. आपली पचनसंस्था अन्नकणांवर प्रक्रिया करून ते पचायला सोपे करते. हे काम मुख्यत्वे आपली विकरे (एन्झाइम्स) करतात. ज्या पदार्थावर ती काम करतात, त्याचंच नाव त्याला दिले जाते. अमायलेज हा एक पिष्टमय पदार्थ असून त्याच्यावर ही विकरे काम करतात म्हणून या चाचणीचे नाव अमायलेज.
म्हणजेच आपल्या खाण्यात जी कबरेदके येतात, त्यांना पचवायचे काम करतात ही अमायलेज विकरे. ही विकरे मुळात बनतात कुठे? एक मुख्य ठिकाण म्हणजे आपल्या लाळग्रंथीत म्हणजेच कानाखाली, जबडय़ाखाली आणि जिभेखाली अशा तीन ग्रंथींत. दुसरे ठिकाण म्हणजे आपले स्वादुपिंड.
लाळग्रंथीत आणि स्वादुपिंडात बनणारे अमायलेज जाते कुठे? तर तोंडात अािण लहान आतडय़ात- जिथे त्याची गरज आहे तिथे. पण आपण जी चाचणी करतो, ती मात्र रक्तातल्या अमायलेजची. असे का? यासाठी आपण या ग्रंथीची रचना बघू.
आकृती १ मध्ये दाखवल्याप्रमाणे स्वादुपिंड पेशी (किंवा लाळग्रंथीपेशी) अमायलेज तयार करतात आणि बाणाच्या दिशेने पेशीबाहेर स्रावतात. मग सगळा स्राव एकत्रितपणे नलिकेमार्फत आतडय़ात येतो (किंवा तोंडात येतो.). हे झाले निरोगी व्यक्तीबाबत. पण एखाद्याला जर गालगुंड झाले असेल किंवा एखादा स्वादुपिंडाचा आजार झाला असेल तर मात्र ही पेशींची घट्ट वीण विस्कळीत होते आणि अमायलेज उलट दिशेने रक्तात मोठय़ा प्रमाणात मिसळू लागते, अशा वेळी अमायलेजसाठी रक्ताची चाचणी केली तर तीत नक्कीच वाढलेले प्रमाण दिसून येते.
पण एक प्रश्न असाही पडतो की, कोणताही आजार नसतानाही रक्तात अमायलेजचे प्रमाण ४० ते १४० युनिट/लिटर इतके असते. हे झाले योग्य प्रमाण. पण हे प्रमाण याहूनही कमी झाले तर? याचा अर्थ काय असू शकतो? एक शक्यता ही की स्वादुपिंडाच्या ज्या पेशी हा स्राव बनवतात, त्याच निकामी झाल्या आहेत.
पण काही वेळा अमायलेजची प्रत्यक्ष पातळी योग्य प्रमाणत असली तरीही चाचणीत मात्र कमी दिसते. ही शक्यता खूप लठ्ठ व्यक्तींच्या बाबतीत असते. ज्यांच्या शरीरात (रक्तात) खूप मेद असतात, हे मेद चाचणीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे रक्तातले अमायलेजचे प्रमाण कमी दिसते. याखेरीज चाचणीसाठी रक्त देण्यापूर्वी आपण काही अन्न खाल्ले असेल तरीही रक्तात मेदाचे प्रमाण वाढून चाचणी खरे प्रमाण दाखवत नाही. कोणत्याही रक्ताच्या चाचणीपूर्वी १२ तास काही खाऊ नये हा संकेत यासाठीच पाळायचा असतो.
अमायलेज हे प्रथिन शरीरात बनते कसे? तर अर्थातच आपल्या पेशीतील जनुके ही प्रथिने बनवतात. विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीत हे जनुक एकापेक्षा अधिक संख्येत आढळतात. शरीरातील जितकी जनुकांची संख्या अधिक, तितके अमायलेज बनण्याचे प्रमाण जास्त. अमायलेज बनवणारे हे जनुक काय फक्त काही प्राण्यांतच आढळते? असे अजिबात नाही- अगदी जिवाणूंमध्येही ही विकरे आढळतात. तीही सुमारे १२ विविध प्रकारची अशा तऱ्हेने उत्क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तयार झालेले हे जनुक पुढे प्रत्येक टप्प्यावर प्रगट होतच राहिले. आजही आपल्या निकोप आरोग्याचे निदान करण्यासाठी ते नियमितपणे वापरले जाते. सजीवाला जगण्यासाठी फायदा
वाघ, सिंह अशा जंगली प्राण्यांच्या लाळेत विकरांचे प्रमाण शून्य असणे हेही सहज समजण्यासारखे आहे. मुळात त्यांच्या आहारात कबरेदके अत्यंत कमी आणि त्यातही ती तोंडात चघळण्याची किंवा चावत बसण्याची क्रियाही ते करत नाहीत. त्यांचे जेवण हे बहुतांशी प्रथिनयुक्त. अशा वेळी लाळेत हे विकरण बनण्यात वाया जाणारी शक्ती किंवा त्यासाठी द्यावी लागणारी किंमत इतर योग्य ठिकाणी वापरली गेली तर त्या सजीवाला जगण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
श्वानांच्या शरीरात २० ते २३
माणसाने शेतीचा शोध लावला आणि पिष्टमय पदार्थ मोठय़ा प्रमाणात खाऊ लागला, त्या वेळी त्याच्या शरीरातील अमायलेज जनुकांची संख्याही वाढली. लांडगे हे पाळीव श्वानांचे पूर्वज. आपण त्यांना पाळू लागलो आणि त्यांच्या अन्नाचे स्वरूप खूप बदलले. लांडग्याच्या शरीरात अमायलेजच्या जनुकांची संख्या २ ते ३ असते, तर श्वानांच्या शरीरात ती २० ते २३ इतकी मोठी आढळते.