वयात येणाऱ्या मुलींचे वाढणारे अनियंत्रित वजन अनेकदा चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव यामुळे असले तरी लहान वयात थायरॉईडचा त्रास उद्भवण्याचे प्रमाणही काहीसे वाढताना दिसते. मध्यमवयीन स्त्रिया तसेच साठीच्या आसपास पोहोचणाऱ्या स्त्रियांमध्ये थायरॉईडच्या त्रासाचे प्रमाण अधिक आढळते. त्याचप्रमाणे थायरॉईडचे कार्य अनियमित होत असल्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये तब्बल चौपट प्रमाणात असते. थायरॉईड ग्रंथीला अवटू ग्रंथी आणि गलग्रंथीही म्हणतात.
ग्रंथीविषयी थोडक्यात..
शरीरातील अनेक महत्त्वाची कार्ये सांभाळणारी थायरॉईड (अवटू) ही दोन इंच लांबीची अंतस्रावी ग्रंथी (एन्डोक्राइन ग्लॅण्ड) मानेच्या पुढील भागात श्वसन नलिकेभोवती पसरलेली असते. फुलपाखराप्रमाणे आकार असणाऱ्या या ग्रंथीचे मेंदूमधील हायपोथॅलॅमस भागाकडून नियंत्रण होते. हायपोथॅलॅमसमधून थायरोट्रोपिन रिलिझिंग हार्मोन (टीआरएच) बाहेर पडते. या रसायनामुळे पिच्युटरी ग्रंथी उद्दीपित होऊन त्याद्वारे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन (टीएसएच) बाहेर पडते. टीएसएचद्वारे अवटू ग्रंथी कार्यान्वित होते. आहारातून येणारे आयोडिन ही ग्रंथी शोषून घेते. टायरोसिन हे अमिनो आम्ल आणि आयोडिन यांच्यातील प्रक्रियेने ‘टी ३’ (ट्राय आयोडोथायरोनाइन) आणि ‘टी ४’ (थायरॉक्झिन) ही दोन संप्रेरके तयार होतात. ‘टी ४’चे प्रमाण ८० टक्के तर ‘टी ३’चे प्रमाण २० टक्के असते.
ग्रंथीची कार्ये
* अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणारी चयापचय क्रिया नियंत्रित ठेवणे.
* हृदयाची गती नियंत्रित करणे.
* अन्नपचनासाठी विशिष्ट वेगाने आतडय़ांची हालचाल घडवून आणणे.
* शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे. तापमान कमी झाले की संप्रेरकाचे प्रमाण वाढते आणि अधिक उष्णतेची निर्मिती होऊन तापमान स्थिर राहते.
* श्वासोच्छवास, शरीराचे वजन, स्त्रियांच्या मासिक पाळीचे चक्र, मांसपेशींची ताकद, रक्तवाहिन्यांचे आरोग्य, चरबीचे प्रमाण इत्यादी अनेक गोष्टी या ग्रंथीच्या कार्यकक्षेत येतात.
विविध व्याधी, त्यांची कारणे, लक्षणे, उपाय
१) हायपोथायरॉईडिझम – यामध्ये संप्रेरकांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झालेले असते.
कारणे – आयोडिनची अपुरी मात्रा, सर्दी, खोकला, फ्लू, काही विशिष्ट औषधांचे सेवन, हृदयरोगावरील काही औषधे, ग्रंथी काढून टाकलेली असणे, प्रतिकारशक्ती करणाऱ्या पेशींनी ग्रंथीवरच हल्ला करणे (ऑटो इम्युन डिसीज), लिथियम धातूचा आहारातील समावेश, क्ष-किरण परीक्षणाच्या आधी आणि नंतर वापरण्यात येणारे रसायन इत्यादी.
लक्षणे – खूप थकवा येणे, थंडी अधिक प्रमाणात जाणवणे, मलावरोध, अनियंत्रित वजनवाढ, आवाजात घोगरेपणा, वाढलेले कोलेस्टेरॉल, मांसपेशींची वेदना आणि ताठरता, पाळीमध्ये अधिक रक्तस्राव होणे, केस पातळ होणे, केस कोरडे होणे, मंद हृदयगती, नैराश्य, सांधेदुखी, शरीरात पाणी साठून राहणे इत्यादी.
उपाय
* –
* दुधात आयोडिनची मात्रा असते. एक कप दुधात दैनंदिन गरजेच्या एक तृतीयांश आयोडिन मिळते.
* चिकन, अंडी, तीळ, शेंगदाणे, लाल भोपळा यातून जस्त मिळते. जस्ताची मात्रा कमी असेल तर हायपोथायरॉईडिझम होऊ शकतो.
* प्रथिनयुक्त आहार -दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, डाळी, उसळी, शेंगदाणे, सोया, बदाम.
* सेलेनियमयुक्त आहार -सर्व प्रकारच्या बेरी, तीळ, शेंगदाणे, सीविड.
* आयोडिनयुक्त मीठाचा वापर.
* शेंगावर्गीय भाज्यांमधून थायरोसिन मिळते.
२) हायपरथायरॉइडिझम – यामध्ये संप्रेरकांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक पातळीत असते हायपोथायरॉईडिझमपेक्षा हा आजार कमी प्रमाणात आढळतो.
कारणे – पिच्युटरी ग्रंथीचे चुकीचे कार्य, कर्करोग, हळूहळू वाढत जाणारी ग्रंथीवरील सूज, घशाचा जंतुसंसर्ग आणि २-३ आठवडे येणारा ताप, ग्रंथीवर तयार होणाऱ्या लहान-मोठय़ा गाठी, ज्या मोठय़ा होऊन संप्रेरके निर्माण करू लागतात.
लक्षणे – पाळीमध्ये कमी वेळा किंवा कमी प्रमाणात रक्तस्राव, हाता-पायांची थरथर, हृदयाची गती जलद होणे, उष्णता सहन न होणे, एकाग्रता कमी होणे, घाम अधिक प्रमाणात येणे, विनाकारण वजन कमी होणे, जुलाब होणे, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवणे, डोळे बाहेर आल्याप्रमाणे दिसणे इत्यादी.
उपाय
* डॉक्टरांच्या सल्लय़ानुसार औषधयोजना करावी. यात रेडिओअॅक्टिव्ह आयोडिन, अॅण्टीथायरॉइड गोळ्या तसेच शस्त्रक्रिया या सर्वाचा समावेश होतो. डोळ्यांच्या चिकित्सेकरिता कधी-कधी स्टीरॉईडचा वापर केला जातो.
* वजन कमी होत असल्याने अधिक उष्मांकयुक्त आहार घ्यावा. सोडियम व पोटॅशियमचे संतुलन राखणे गरजेचे असते.
* अधिक तयार होणाऱ्या स्रावामुळे हाडे ठिसूळ होण्याची शक्यता वाढते. यासाठी कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्वयुक्त गोळ्या / आहार घ्यावा. यात दूध, दुग्धजन्य पदार्थ, पालक, कोबी, अंडी यांचा समावेश करता येईल.
* प्रथिने भरपूर घ्यावीत -अंडी, डाळी, उसळी, चिकन.
* तुळस+आले समप्रमाणात घेऊन
त्याचा रस मधाबरोबर दिवसातून २-३ वेळा चाटावा.
* भाज्या आणि फळे ताजी व पुष्कळ प्रमाणात घ्यावीत. यातील अॅण्टी ऑक्सिडण्ट पेशींच्या संरक्षणासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता उपयुक्त ठरतात. चयापचय प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या हानीकारक द्रव्यांचे निर्मूलन केले जाते.
३) नोडय़ूल्स – थायरॉइड ग्रंथीच्या छोटय़ा-छोटय़ा भागांवर तयार होणाऱ्या गाठी असतात. अशा एक वा अनेक गाठी येऊ शकतात. काही वेळा या गाठींमध्ये पाणी/द्रवसुद्धा असू शकतो.
लक्षणे- गळ्याच्या भागी सूज आल्यासारखी दिसते. गाठी मोठय़ा असल्यास आजूबाजूच्या इतर रचनांवर दाब निर्माण होऊन इतर तक्रारीही उद्भवतात. गिळायला आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो. खोकला येतो / घसा खवखवतो.
उपाय
रेडिओअॅक्टिव्ह आयोडीन देऊन या गाठी सुकवल्या जातात आणि संप्रेरकांची निर्मितीही कमी होऊन त्यांची पातळी आटोक्यात ठेवली जाते. काही दिवसांनी गाठीत कोणताही बदल/वाढ नसेल आणि त्रास होत नसेल तर कोणतीही चिकित्सा केली जात नाही.
४) गॉइटर- थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढणे म्हणजे गॉइटर
कारणे – हशिमोटो डिसीज, ग्रेव्ह्ज डिसीज, इतर संसर्गामुळे येणारी सूज, नोडय़ूल्स, कर्करोग, मानेची सूज.
लक्षणे – काही वेळा गाठ मोठी होणे एवढेच लक्षण असते. कधी कधी जोडीला संप्रेरकांची पातळी कमी/अधिक झालेली असते.
उपाय
* संप्रेरकांची गोळी घेता येते. गोळीमुळे वाढ थांबते अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागते.
* संसर्गाने सूज असेल तर प्रतिजैविके व सूजनाशक औषधे घ्यावी लागतात. जोडीला आल्याचा रस मधाबरोबर घेता येतो.
* बडीशेप, दुध-अंडी, केळी, मासे अशा आयोडिन व टायरोसिनयुक्त पदार्थाचे सेवन करावे.
५) कर्करोग – याची विशिष्ट कारणे नाहीत. गाठींची तपासणी करून घेणे गरजेचे असते. कर्करोग असल्यास ग्रंथी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो आणि संप्रेरकाच्या गोळ्या दिल्या जातात.
इतर विकार
* थायरॉईडचा त्रास असणाऱ्या स्त्रियांना गर्भ राहणे अवघड असते.
* गर्भवती मातांनी थायरॉईडचा विकाराकडे दुर्लक्ष केल्यास गर्भाची हृदयगती अनियमित होऊन गर्भाची वाढ नीट होत नाही.
* प्रसूतीनंतरही थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. हा दोन टप्प्यांमध्ये असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर १ ते ४ महिने. यात हायपरथायरॉईडिझमची लक्षणे आढळून येतात. दुसरा टप्पा म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर ४ ते ८ महिने व कधी कधी १२ महिने. यात हायपोथायरॉईडिझमची लक्षणे आढळून येतात. हा पूर्णत: बरा होऊ शकतो
dr.sanjeevani@gmail.com