News Flash

हाँगकाँगमधील किल्ले

हाँगकाँगला वरचेवर येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

हाँगकाँग म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या गगनचुंबी इमारती, लखलखीत मॉल्स आणि झगमगाटी बाजारपेठा. इथलं सगळं पर्यटनदेखील या झगमगाटाभोवती गुंफलेलं. पण याच हाँगकाँगमध्ये नीट जतन केलेले चार ऐतिहासिक किल्लेदेखील आहेत. हाँगकाँगच्या झगमगाटातून दूर जात हे किल्ले अवश्य पाहायला हवेत.

हाँगकाँग.. चिनी प्रदेशांतर्गत असलेला एक स्वायत्त प्रांत. वेगळा देशच आहे. कारण हाँगकाँगची आíथक आणि राजकीय व्यवस्था चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हाँगकाँगकडे स्वतची उत्पादन क्षमता नसली तरी अशिया खंडात साधारण मध्यवर्ती असलेलं मोठं बंदर असल्याने व्यापार आणि निर्यातीचे ते प्रमुख केंद्र आहे. जगातील महत्त्वपूर्ण आíथक केंद्र म्हणून ओळख असणारा हाँगकाँग ११०६ चौरस किलोमीटर पसरलेला असून, लोकसंख्येच्या घनतेबाबत जगात चौथा क्रमांक पटकावतो.

कामानिमित्त हाँगकाँगला जाणं झालं. हातात मिळालेल्या मोकळ्या दिवसांत मुक्तपणे फिरणंही झालं. पहिला प्रश्न पडला हाँगकाँग शब्दाचा अर्थ काय असावा? स्थानिक कॅन्टोनिज् भाषेत ‘हाँग’ म्हणजे सुवासिक किंवा सुगंधी तर, ‘काँग’ म्हणजे बंदर. अशा या सुवासिक बंदरावर पाऊल ठेवल्यावर संपूर्ण देशातील अचाट स्वच्छता आणि शिस्तीचा सुगंध सतत दरवळत राहिला. हाँगकाँगला वरचेवर येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पर्यटकांनी बघण्याची ठिकाणंही ठरलेली. ही ठिकाणं टूर कंपन्यांनी आधीच ठरवून दिलेली असतात. पण हाँगकाँगच्या कानाकोपऱ्यांत असलेल्या ठिकाणांची माहिती घेत गेलं की तो आपल्याला अधिकच खोलात घेऊन जातो आणि अनोख्या गोष्टींचं दर्शन घडवितो. आकाशात घेऊन जाणाऱ्या शेकडो इमारतींच्या भाऊगर्दीतही निसर्ग, जंगल, खारफुटी आणि पक्षी- वन्यसंपदा यांनाही प्राधान्यक्रमाने संरक्षण दिलेलं प्रकर्षांने जाणवतं. येणारा सर्वसामान्य पर्यटक हे गगनचुंबी शहर पाहून हरखून आणि हरवून जातो. पण गंमत म्हणजे हाँगकाँगच्या एकूण भूभाग वापरापकी फक्त २४ टक्के भागावरच शहरीकरण झालेले आहे, तर ६६ टक्के भूभाग हा वृक्ष, झाडोरा आणि गवताने व्यापलेला असून, १० टक्के भूभागावर खारफुटी, शेती आणि तलाव आहेत. त्यामुळे साहजिकच सह्य़ाद्रीच्या छायेत राहणाऱ्या आपल्यासारख्यांना प्रश्न पडतो की, इथे किल्ले असतील का? शोध घेतला आणि उत्तर मिळालं की, चार-पाच जुने आणि संरक्षित केलेले किल्ले आहेत.

त्यापकी ‘लेई यू मून’ (Lei Yue Mun) हा किल्ला सर्वात मोठा, भरपूर गडावशेष असलेला भक्कम असा किल्ला. ‘लेई यू मून’ या ऐतिहासिक किल्ल्यात सध्या ‘हाँगकाँग तटीय रक्षा संग्रहालय’ (Hong Kong Museum of Costal Defence) स्थापन करण्यात आलेलं आहे. हाँगकाँगच्या ‘शाऊ की वान’ नावाच्या मेट्रो स्टेशनला उतरून साधारण पंधरा मिनिटं पायी गेल्यानंतर समोर उंच टेकडीसारख्या उंचवटय़ावर हा किल्ला खुणावतो. किल्ल्याच्या खालच्या भागात प्रवेश करताच गोलाकार भक्कम तटबंदी केलेली वास्तू दिसते. हा तोफेची दारू तयार करण्याचा कारखाना होय. आत अनेक तोफा एका ओळीने रचण्यात आलेल्या आहेत. हुतात्मा ब्रिटिश सन्याप्रीत्यर्थ स्मारकही बांधलेले आहे. तोफखाना कारखान्याच्या बाहेर २९ फूट लांबीची एक भली मोठी तोफ आपलं स्वागत करते. त्यापाठोपाठ दुसऱ्या महायुद्धात वापरले गेलेले वेगवेगळ्या प्रकारचे रणगाडे प्रदíशत केलेले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण किल्ल्यावरील तोफा, रणगाडे आणि इतर शस्त्रप्रकारांना प्रदíशत करण्याबरोबर त्या प्रत्येकाची सखोल माहितीदेखील दिलेली आहे. पुढे आताच्या काळात बांधलेल्या स्वागतकक्षात आपल्याला संपूर्ण किल्ल्याची इत्यंभूत माहिती मिळते आणि प्रवेश दिला जातो. इथून किल्ल्याच्या वरच्या भागात जाण्यासाठी मार्ग आहे.

गडमाथ्यावर भक्कम अशी तटबंदी असून त्यात भारतीय किल्ल्यांप्रमाणे अनेक ठिकाणी जंग्याही दिसून येतात. वरच्या भागातील काही भक्कम अशा बुरुजांवर चाकांच्या गाडीसकट असलेल्या तोफ बघायला मिळतात. किल्ल्याच्या मागच्या भागात असलेल्या समुद्रीय खाडी मार्गावरून येणाऱ्या परकीय शत्रूंशी लढण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. त्यामुळे खाडीकडच्या भागात सलग तटबंदी आणि बुरुजांची मालिका उभी करण्यात आलेली असून प्रत्येक तोफेचे तोंड त्या दिशेने लावण्यात आलेले दिसते. प्रत्येक तोफेची मारकक्षमता निरनिराळी आहे. एकेका तोफेची माहिती घेत आपण बालेकिल्ल्याजवळ येऊन धडकतो.

‘लेई यू मून’चा बालेकिल्ला हा दुहेरी तटबंदीचा असून त्याभोवती खंदक कोरून त्याला दुर्गम बनविण्यात आले आहे. त्या खंदकावर एका बाजूने पडता दरवाजा टाकून त्यात प्रवेश देण्यात आलेला आहे. आज तिथे पूल उभारलेला आहे. खंदकाच्या खालच्या अंगाला तळखोल्या असून त्यातल्या जंग्यांमधूनही बाहेरच्या दिशेने हल्ला करण्याची योजना दिसते. बालेकिल्ल्यावरील शिबंदीच्या बराकींमधून आताशा अतिशय माहितीपूर्ण असे संग्रहालय उभे केलेले आहे. संग्रहालय हे एकूण ११ मोठय़ा दालनांमधून फिरते. या खोल्या आता वातानुकूलित केल्या असल्या तरी त्याचं प्राचीनत्व टिकवून ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयात आपल्याला इ.स. तेराशेपासून ते आधुनिक काळात किल्ला संवíधत करून संग्रहालयात रूपांतरित करण्यापर्यंतचा सर्व इतिहास, त्या त्या काळातील वस्तू, हत्यारं, हस्तलिखितं, कागदपत्रे, नकाशे, चित्रं, चलन, पोशाख सर्व वस्तूंसकट काळजीपूर्वक मांडून ठेवलाय.

इ.स. १३६८ ते १६४४ िमग राजवट, इ.स. १६४४ ते १९११ दरम्यान िक्वग राजघराण्याची सत्ता, दरम्यान इ.स. १८३९-१८४२ असे दीर्घकाळ चाललेले अफूचे युद्ध, इ.स. १८४१ ते १९४१ च्या दरम्यान ब्रिटिश शासनाचे विविध टप्पे, इ.स. १९४१ ला झालेले हाँगकाँगचे युद्ध आणि त्यात जपानला मिळालेला विजय, त्यानंतर इ.स. १९४५ पर्यंत जपान्यांची राजवट, तिथून पुढे चालत गेलेले विविध शासनकाळ ते थेट हाँगकाँगची पब्लिक लिबरेशन आर्मी स्थापन होण्यापर्यंत प्रत्येक कालखंडाचा आणि घटनेचा तपशील या किल्ल्याशी जोडलेला आहे. हा इतिहास मनात घोळवत आणि विचार करीत बालेकिल्ल्यावर फिरताना काही तोफा संपूर्ण यंत्रणेसकट आजही जशाच्या तशा कार्यरत असलेल्या दिसतात. त्यांतून गोळा उडण्याचे प्रात्यक्षिक इथे असलेल्या स्क्रीनवर दाखविले जाते. बालेकिल्ल्यावरील ब्रिटिशकालीन मागून गोळा भरून पुढे उडवणारी तोफ विशेष बघण्यासारखी आहे.

बालेकिल्ल्यावरून पूर्वेकडील मार्गाने खाली येताना अनेक जुन्या पडीक वास्तू दिसतात. त्यात एक पायऱ्यांची विहीरही आहे. त्याचप्रमाणे तेलाच्या टाक्याही आहेत. काही भुयारी मार्गही सुस्थितीत संवíधत करण्यात आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी पहारेकऱ्यांच्या खोल्याही अभ्यासण्यासारख्या आहेत. खाली थेट पाण्यापर्यंत उतरण्यासाठी मार्ग असून पाण्याला लागूनही तट उभारलेला आहे. खाली पाण्याजवळ एक पुरातन दीपस्तंभ असून त्याजवळच डोंगराच्या पोटात कोरलेल्या एका भव्य खोलीत पाण्याखालून मारा करणारा मोठा टारपेडो आहे. त्याची संपूर्ण यंत्रणा आणि उभारणी जशास तशी जतन करण्यात आली आहे. फक्त टारपेडो वाहून नेणारा रेल्वेसारखा रूळ मात्र उखडला गेलाय.

‘लेई यू मून’च्या खाडीपलीकडे ‘डेव्हिल्स पीक’ नावाची टेकडी असून त्यावरही किल्ल्याचे अवशेष आहेत. त्यावर दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारतीय राजपूत रेजिमेंटच्या कामगिरीच्या इतिहासाचा धागा आहे. डेव्हिल्स टेकडी, तुंग चूंग किल्ला, फान लावू किल्ला, कावलून फोर्ट वॉल सिटी आणि त्याचबरोबर हाँगकाँगच्या तुकडय़ातुकडय़ांत पसरलेल्या काही बेटांवरील तोफखाने (Battery) यांच्याबद्दल जाणून घेणेही आवश्यक आहे.

sudarshan.kulthe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:31 am

Web Title: fort in hong kong
Next Stories
1 घाटमाथ्यावरून : ही वाट दूर जाते..!
2 सायकल डायरी : ‘दो पहिया’ चित्रपट महोत्सव
3 जायचं, पण कुठं? : दार्जिलिंग
Just Now!
X