नगर जिल्ह्य़ातला अकोले हा तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितिंगा, रतनगड, अलंग-मदन-कुलंग हे बेलाग किल्ले, कळसूबाईसारखे महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर, भंडारदरा धरण, घनदाट झाडी, घाटमाथ्याला अगदी लागून असल्यामुळे भरपूर पाऊस आणि विविध सुंदर मंदिरे यांनी अकोलेचा सारा प्रदेश खरंच नटला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावामधले सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडित मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये येते ते म्हणजे टाहाकारी इथले श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर.
टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला. जिथे तिने टाहो फोडला ते ठिकाण टाहो करी, आणि मग टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले असे इथे सांगितले जाते. अकोल्याच्या वायव्येला १६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे काहीसे निराळे मंदिर आहे. तीनही गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरूढ झालेल्या अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. मंदिराच्या उर्वरित दोन गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात. छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक दगडी झुंबर अप्रतिम आहे.
मंदिराच्या बाह्य़ अंगावर अनेक अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे म्हणतात त्यांचे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले दिसते. काही सुरसुंदरींच्या डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत. जवळच एक पडकं देऊळ आहे. तिथे एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते, तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो, ज्यात वीणा भजन हा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला जातो. इथे मिळणारे अस्सल खव्याचे फिके पेढे आवर्जून खावेत असे असतात.
ashutosh.treks@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2016 रोजी प्रकाशित
आडवाटेवरची वारसास्थळे : जगदंबा मंदिर – टाहाकारी
मंदिराच्या उर्वरित दोन गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-07-2016 at 02:16 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagadamba mandir tahakari