तुंगारेश्वर

मुंबईपासून जवळच विरार आणि वसईच्या डोंगररांगात तुंगारेश्वर अभयारण्य वसले आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईपासून जवळच विरार आणि वसईच्या डोंगररांगात तुंगारेश्वर अभयारण्य वसले आहे. येथील दाट हिरव्यागार वनराईचं पावसाळ्यातलं रूपडं काही औरच असतं. २४ ऑक्टोबर २००३ ला ८५.७०० चौरस किमीच्या या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. २१७७ फूट उंचीवर तुंगारेश्वर हे डोंगर, जंगल भटक्यांचे आवडते ठिकाण तर आहेच, पण तुंगारेश्वराच्या मंदिरामुळे भाविकांचे श्रद्धास्थानदेखील आहे.

या अभयारण्यात साग, शिसव, खैर, ऐन, आवळा, हिरडा, बेहडा यासारख्या महत्त्वाच्या वनस्पती आहेत. बिबटे, रानडुक्कर, ससे, भेकर, मकाक, लंगूर यांच्यासह पक्ष्यांच्या १५० प्रजाती इथे पाहावयास मिळतात. पावशा, सर्पगरुड, महाभृंगराज, श्याम, जंगली, पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी, हळद्याचं सहज होणारं दर्शन आनंद देऊन जातं.

तुंगारेश्वर अभयारण्याच्या घनदाट वनराईत दडलेल्या शिवमंदिरामध्ये श्रावणमासी भाविकांची गर्दी लोटते. त्यात मंदिराशेजारून वाहणाऱ्या प्रवाहात ठिकठिकाणी निर्माण होणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा धबधब्यांची रेलचेल असल्यामुळे वर्षांपर्यटनासाठी येथे बरीच झुंबड उडते. वसई रोड स्थानकापासून १० किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटय़ापर्यंत आपण शेअर रिक्षाने जाऊ शकतो किंवा थेट रिक्षा तुंगारेश्वर मंदिरापर्यंतही नेऊ शकतो. पण ज्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, पाण्यात मनसोक्त खेळायचे आहे त्यांनी पायीच जाणं उत्तम. मंदिरापर्यंत जाताना लागणारे दोन-तीन ओढे वेड लावतात, चिंब भिजण्याचा आनंद देतात. साधारण तासाभराची पायपीट करत जाणे कधीही चांगलेच.

डोंगररांगेत झाडांच्या गर्द हिरवाईत लपून बसलेले तुंगारेश्वरचं शिवमंदिर प्राचीन असून नेहमी शिवभक्तांनी गजबजलेले असते. मंदिराभोवती असलेली झाडांची गर्दी पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. मंदिराशेजारीच एक झरा वाहतो तो दगडांमधून धावत जातो तेव्हा अनेक निर्माण झालेले अनेक छोटे-मोठे धबधबे लहान मुलासारखे अवखळ होऊन धावताना दिसतात. इथला तुंगारेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे. मंदिरापासून अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या धबधब्यामुळे निसर्ग चहुअंगाने फुलून आल्याची जाणीव होते.

पावसाळी पर्यटनाचं हे खूप सुंदर ठिकाण आहे. येथील आश्रमाच्या आसपास मोराचंही दर्शन होते. पायथ्यापासून पायी चालत आलं तरी अजिबात थकवा जाणवत नाही. मंदिर परिसरात छोटी दुकानं आहेत. तिथं चहा-नाश्ता मिळू शकतो. भाविकांसाठी मंदिर, वनप्रेमींसाठी हिरवाकंच गर्द परिसर आणि ट्रेकर्ससाठी आव्हान देणारी डोंगररांग अशा विविध स्वरूपात तुंगारेश्वर तुम्हाला साद घालत राहते. या भागाचे वैशिष्टय़ म्हणजे येथील जैवविविधता. जंगलाशी खऱ्या अर्थी एकरूप व्हायचे असेल तर येथे एखाद्या जाणकारासोबत जंगलात एक फेरफटका मारलाच पाहिजे. अनेक प्रजातींच्या फुलपाखरांनी हे जंगल समृद्ध आहे. अनेक ट्रेकर्स तुंगारेश्वर ते परशुराम कुंड अशा छोटय़ा आणि सोप्या ट्रेकचाही आनंद घेतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तानसा अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य यांसारख्या जवळच्या स्थळांबरोबर मुंबईकरांना हाकेच्या अंतरावर असलेले तुंगारेश्वर अभयारण्य ही तितकेच प्रिय आहे. वसईतलं हे सर्वात उंच पठार आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे

drsurekha.mulay@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Articles in marathi on tungareshwar

ताज्या बातम्या