scorecardresearch

अद्भुतरम्य हायलॅण्ड्स!

हायलँडच्या सफरीत आइल ऑफ स्कायला भेट द्यायलाच हवी. या बेटावरचा निसर्ग अद्भुतच वाटतो.

Scottish Highlands
हायलँडच्या सफरीत आइल ऑफ स्कायला भेट द्यायलाच हवी. या बेटावरचा निसर्ग अद्भुतच वाटतो.

स्वप्नातल्या किंवा लहानपणाच्या कल्पनेतल्या निसर्गचित्रातलं झुळूझुळु वाहणारं पाणी, हिरवळ, कौलारू घरं, दूरवर दिसणारा राजवाडा, त्याच्याकडे जाणारा कमानदार पूल असं सगळं सर्वानाच खुणावतं. हे सगळं काही एकाच ठिकाणी अनुभवण्यासाठी स्कॉटिश हायलँड्सची सफर हवीच.

दर दहाव्या किलोमीटरला एखादा छोटासा तरी ओहोळ, कालवा, झरा, तळं, तलाव, नदी, खाडी किंवा थेट समुद्रच दिसावा.. त्यातलं ते नितळ, निळेशार पाणी नजरेसमोरून हलू नये. एखाद्या परिकथेत शोभतील असे छोटे-मोठे पूल आणि पाण्यामधल्या बेटांवर विराजमान – त्या प्रांताची ओळख बनलेले कॅसल्स – काही भव्य, काही फुटके, काही भग्नावस्थेतही आपला तोरा मिरवणारे, शान राखून असलेले कोट. भोवती वेगवेगळ्या छटांची हिरवाई असणारच. स्कॉटिश हायलँड्सचं हे चित्र. स्कॉटिश हायलँड्स जगभरात ओळखलं जातं तिथल्या व्हिस्कीच्या स्वादासाठी. इथल्या स्कॉचची चव या निसर्गाचं रांगडं देखणेपण लेवून येत असावी. इथला निसर्ग रांगडा आहे, पण उग्र नाही. यात तरलता आहे, स्कॉचला असते तशीच.

स्कॉटलंडमधले नसíगक तलाव ही या प्रांताची ओळख आहे. याला स्कॉटिश भाषेत लॉक (छूँ) म्हणतात. स्कॉटिश हायलँड्समधले महत्त्वाचे लॉक आणि त्याकाठचे परिसर निवांतपणे पाहायचे तर महिनाभर मुक्काम ठोकावा लागेल आणि तरी तिथून पाय निघणार नाही, असा रम्य परिसर. लॉक लोमंड हे स्कॉटिश हायलँड्समधलं सर्वात मोठं सरोवर. हायलँड आणि लोलँडमधली सीमारेषा. अख्ख्या ग्रेट ब्रिटनच्या भूमीवर एवढं मोठं गोडय़ा पाण्याचं सरोवर नाही.

स्कॉटिश लोक तसे अघळपघळ. कथा-कल्पनांमध्ये आपल्यासारखेच रमणारे. त्यामुळे यातल्या प्रत्येक सरोवराला जोडलेली एक तरी आख्यायिका सांगण्यात येते. कधी ती इतिहासाला जोडलेली असते, ऐतिहासिक पात्रांशी निगडित असते, तर कधी पूर्णपणे काल्पनिक. या कथांमुळे या सरोवरांना आणि इथल्या निसर्गाला अद्भुततेचं वलय प्राप्त होतं. इथल्या स्थानिकाला उत्सुकतेने एखाद्या जागेचा इतिहास विचारला की, तो जाज्वल्य अभिमानानं या सगळ्या कथा, दंतकथा उत्साहात सांगणार. या लॉक लोमंडभोवती अशाच कथा रचलेल्या. काही लोकगीतंही याच्याशी निगडित आहेत.

लॉक नेस हे लोकप्रिय सरोवर. लॉक लोमंडनंतरचं मोठं सरोवर. उत्तरेला इनव्हन्रेसपासून दक्षिणेला फोर्ट विल्यम्सपर्यंत पसरलेल्या ग्रेट ग्लेनचा (ग्लेन म्हणजे दरी) हा मोठा भाग. लॉक नेसची खोली गहिरी आहे. त्यामुळेच याच्याशी निगडितही अनेक आख्यायिका इथे प्रचलित आहेत. एक जलचर राक्षस इथे वास्तव्यास असतो म्हणे. राक्षस असला तरी हा इथल्या स्थानिकांचा लाडका. नेस्सी हे त्याचं लाडाचं नाव. लॉक नेसमधल्या बोट राइडमध्ये नेस्सी स्पॉटिंग हा आवडता कार्यक्रम असतो. अर्थातच हा मॉन्स्टर कुणाला दिसत नाही. इनव्हन्रेस या स्कॉटिश शहरापासून ३५ किलोमीटरवर हे सरोवर आहे. ब्रिटनमधल्या सगळ्या नद्या आणि सरोवरांचं पाणी एकत्र केलं तरी त्यापेक्षा जास्त पाणी लॉक नेसमध्ये असेल, असं स्कॉटिश लोक अभिमानानं सांगतात. नेसच्या काठावरचा उर्कव्हार्ट कॅसल निसर्गचित्राला मानवी आयाम देतो.

लॉक नेसकडून फोर्ट विल्यमच्या दिशेने लोलँडकडे परतीचा प्रवास सुरू केला की, एका खोऱ्यात वळणावळणाचा लॉक गॅरी दिसतो. हा लेक प्रसिद्ध आहे त्याच्या आकारासाठी. ठरावीक ठिकाणाहून पाहताना लेक गॅरी थेट स्कॉटलंडच्या नकाशासारखा दिसतो. लॉक लॉकीदेखील तितकाच नितांतसुंदर. या सगळ्या लॉकच्या परिसरात म्हणजे तलावांच्या काठावर पर्यटकांसाठी बेड अँड ब्रेकफास्टसारख्या चांगल्या सोयी आहेत. बहुतेक सरोवरांचा परिसर नॅशनल पार्क म्हणून आरक्षित ठेवण्यात आल्यामुळे पर्यटनाखेरीज इतर व्यावसायिकरण झालेलं नाही. अर्थातच निसर्गाचा निवांत अनुभव घेण्यासाठी हे महत्त्वाचं ठरलंय.

हायलँडच्या सफरीत आइल ऑफ स्कायला भेट द्यायलाच हवी. या बेटावरचा निसर्ग अद्भुतच वाटतो. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीकडून या बेटावर यायला एक पूल आहे. तोदेखील ९० च्या दशकात खुला झालेला. त्यापूर्वी इथे पोहोचायला बोटीतूनच यावं लागे. बॉनी प्रिन्स चार्ली हे स्कॉटिश इतिहासातलं लोकप्रिय नाव. राजपुत्र शत्रूच्या तावडीतून सुटून कसा शिताफीने आइल ऑफ स्कायला पोचला याची कथा ऐकताना आग्याहून सुटका आठवते. इथल्या खाडीकाठच्या काइलाकीन नावाच्या (काइल म्हणजे खाडी) रम्य खेडय़ात राहायला मिळतं तेव्हा या एका सुंदर निसर्गचित्राचा आपणही भाग आहोत, असंच वाटत राहतं.

स्कॉटिश लॉकसारखीच स्कॉटिश कॅसल्सची वेगळी सर करावी लागेल. प्रत्येक कॅसलभोवती एक तरी दंतकथा आहेच. त्यातला इलियन डोनन कॅसल हा स्कॉटलंडची ओळख बनला आहे. स्कॉटलंडच्या फोटोंमध्ये या तेराव्या शतकातल्या कॅसलला हमखास स्थान असतं. तीन सी लॉक अर्थात खाऱ्या पाण्याच्या सरोवरांच्या संगमावर हा कॅसल बांधला गेलाय. १७ व्या आणि १९ व्या शतकात याची डागडुजी केली आहे.

स्वप्नातल्या किंवा लहानपणाच्या कल्पनेतल्या निसर्गचित्रात झुळूझुळु वाहणारं पाणी, हिरवळ, कौलारू घरं, दूरवर दिसणारा राजवाडा, त्याच्याकडे जाणारा कमानदार पूल असं सगळं काही एकाच ठिकाणी अनुभवण्यासाठी स्कॉटिश हायलँड्सची सफर हवीच. भारतीय चित्रपटांमुळे आपल्याकडच्या पर्यटकांच्या मनात युरोपीय निसर्ग म्हटल्यावर आल्प्सच्या कुशीतले स्वित्र्झलड आणि हल्ली ऑस्ट्रिया येतात. तिथल्या पूर्णपणे व्यावसायिकरण झालेल्या पर्यटनापेक्षा स्कॉटिश हायलँडमधला हा रांगडा निसर्ग नक्कीच खेडय़ांत रमलेला, शांत आणि निवांत अनुभव देणारा, खरोखरचा रम्य आणि अद्भुत वाटतो तो यासाठीच.

 

स्कॉटिश हायलँड्सची मुख्य भूमी शेजारच्या आइल ऑफ स्काय नावाच्या बेटाला एका पुलानं जोडली आहे. या बेटावरचा निसर्ग अगदी वेगळा. ट्रॉटíनश द्वीपकल्पाचा हा भाग भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या जुरासिक काळातील भाग मानला जातो. क्वायिरग हे ठिकाण इथल्या वेगळ्या भूरचनेसाठी आवर्जून भेट द्यावं असं. उत्तरेच्या उइग बंदराजवळचा हा भाग हायकिंगसाठी आदर्श मानला जातो. आपल्या नानाचा अंगठा किंवा डय़ुक्स नोजची आठवण देणारा ओल्ड मॅन ऑफ स्टॉर बघायलादेखील आणि चढाई करायलादेखील हौशी हायकर्स इथे येतात.

अरुंधती जोशी arundhati0112@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती ( Lokbhramanti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The journey of the scottish highlands

ताज्या बातम्या