परवाना निलंबनासारखी शिक्षाच सर्वत्र हवी

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘वेगमर्यादा ओलांडल्यास वाहन परवाना निलंबित’ हे वृत्त (लोकसत्ता, ७ फेब्रु.) वाचले. वेगमर्यादाभंगाची कारवाई एसटी बसगाडय़ांवर होत नव्हती. पण काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जो एसटी बस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (रिक्षा) अपघात होऊन अनेकांना हकनाक जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या एकाच रस्त्यापुरती का होईना, खासगी बसप्रमाणेच एसटी बसचीही गय न करण्याचे ठरवले, हे स्वागतार्ह आहे. पूर्वी वेगमर्यादा ओलांडली की एक हजार ते बाराशे रुपये दंड देऊन चालक निसटून जात, पण आता चालक परवाना निलंबानाच्या भीतीने तरी थोडी जरब बसेल. या निर्णयाने एक जरी अपघात कमी झाला आणि त्यातून एक जरी जीव वाचला तर हा निर्णय सार्थक ठरेल. हा नियम केवळ द्रुतमार्गापुरता मर्यादित न ठेवता सगळ्या महामार्गासाठी लागू करण्यात यावा. यासाठी वाहतूक विभागाने वेग गणक यंत्रे जागोजागी बसवली पाहिजेत, जेणेकरून बाकीच्या ठिकाणीसुद्धा जे निर्ढावलेले चालक आहेत त्यांनादेखील वचक बसेल.

– विशाल ज्ञानेश्वर बेंगडे, कुरवंडी (ता. आंबेगाव, जि. पुणे)

आत्मचिंतनातून स्वयंनिर्णयाचा मार्ग सापडेल..

‘प्रतिमांच्या छळछावण्यांतली दुविधा’ (६ फेब्रुवारी) हा ‘चतु:सूत्र’ सदरातील श्रुती तांबे यांचा लेख वाचला. समाजमाध्यमांच्या आभासी जगात मश्गूल होऊन वास्तव्याला बगल देणारी आजची पिढी ही आपल्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणेच आपली स्वयंनिर्णयाची क्षमताही गमावून बसली आहे, परिणामी या माध्यमातील मतांनाच स्वमत समजून मानसिक पंगुत्वाला कवटाळत आहे. परंतु खरी खेदाची बाब म्हणजे या पिढीला आपल्या या मानसिक पंगुत्वाची यित्कचितही जाणीव नाही. त्यांच्या या असमर्थतेचा दुरुपयोग उच्चपदस्थ मंडळी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करीत आहे.

तेव्हा हे मानसिक पंगुत्व निकालात काढून वास्तवाची चाड येण्यासाठी व आपली स्वयंनिर्णयाची क्षमता परत अवगत करण्यासाठी लेखात सांगितल्याप्रमाणे ‘अत्त दीप भव’- दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ‘आत्मचिंतन’ आणि ‘आत्मपरीक्षण’ यांची नितांत आवश्यकता आहे.

– ज्ञानदीप भास्कर शिंगाडे, कन्हान (नागपूर)

मागच्या पानावरून पुढे..

‘राज्यभर सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्याचा’ दिव्य विचार राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी मांडल्याचे वाचले. त्यांच्या आणि आजच्या वारा वाहील तिकडे जाणाऱ्या सामान्य पालकाच्या विचारात काहीच फरक नाही. मातृभाषेतून शिक्षण हेच उत्तम शिक्षण असते, असे जगभर सिद्ध झालेले असताना आणि प्रगत देशांनी तसे धोरण जपलेले असताना  शिक्षणमंत्र्यांचा हा विचार म्हणजे ‘मागच्या पानावरून पुढे’ असे म्हणायला हवे. त्यापरीस अनुदानित शाळांना शासनाच्या नियमात बसून का होईना, पण शिक्षक नेमण्याचे स्वातंत्र्य द्यावे. मूलभूत सुविधांसाठी अनुदान द्यावे. याने बरीच मदत होईल. किमान राज्यातल्या आदर्श मराठी शाळांचा एक दौरा करावा, कदाचित विचार बदलेल.

मराठी राजभाषा दिन येऊ  घातलाय, तेव्हा अभिजात मराठीचा राग आळवला जाईलच, मराठी सक्ती वगैरेची गाजरे दाखवली जातील. या सगळ्या लोभस कल्पना आहेत. तरी भान न हरपता या सगळ्याचे जे मूळ आहे, त्या मातृभाषेतूनच शिक्षणाचा आग्रह धरावा. मुलांना मातृभाषेतून शिकवावे आणि सोबतच्या पालकांनाही हे पटवून द्यावे. मराठी भाषा दिनाच्या याच खऱ्या शुभेच्छा ठरतील!

– अपूर्व ओक, ठाणे</p>

नेहरूंवरील मोदींचे आरोप अशोभनीय

‘पंतप्रधानपदासाठीच फाळणी!’ ही बातमी (लोकसत्ता, ७ फेब्रुवारी) वाचली. ‘पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपद हवे होते म्हणून देशाची फाळणी केली गेली,’ असा नवीनच शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावला आहे. नरेंद्र मोदी यांना खोटा इतिहास मांडायचा आहे असे यावरून दिसते! नेहरूंबद्दल मोठय़ा प्रमाणात द्वेष विद्यमान सत्ताधाऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे हे लोक आता वाटेल ते बोलत आहेत. यांना खरा इतिहास सर्वासमोर येऊ  द्यायचा नाही आणि देशाची फाळणी कशी झाली याचा नवीन इतिहास यांना लिहायचा आहे.

सर्व भौतिक सुखाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवून, वडिलांचा रोष पत्करून जवाहरलाल नेहरू १९१२ साली मायदेशी परतले. १९१७ साली ते होमरुल चळवळीतही सहभागी झाले. स्वातंत्र्यसंग्रामात असताना नेहरूंना नऊ  वेळा ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले आणि ते एकंदर ३२५९ दिवस तुरुंगात होते. अशा अनेक प्रकारे नेहरूंचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. भारताचे ‘बाल्कनायझेशन’ करण्याचा ब्रिटिशांचा डावही त्यांनी पुढे हाणून पाडला. माऊंटबॅटन यांना भारताचे कैक तुकडे पाडण्यापासून रोखण्यामध्ये नेहरूंची भूमिका महत्त्वाची आहे. आपला देश टिकवून ठेवण्यात नेहरूंची कामगिरी ऐतिहासिक आहे ती मान्य करावीच लागेल. भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारचे खोटे आरोप करणे हे अशोभनीय आहे.

सर्वानीच यानिमित्ताने नेहरू यांचे योगदान समजून घेणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

– कमलाकर शेटे, खेडनगर (ता. कर्जत, जि. अहमदनगर)

मोदी हे तर ‘गो’माता स्वरूप..!

भाजपच्या देशभरातील अनेक नेते-प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना यापूर्वीच अनेक महान विभूतींशी केलेली आहे. अनेकांना ते छत्रपती शिवाजी महाराज ते वल्लभभाई पटेलही वाटतात. भगवान विष्णू, गणपती, तांडव करणारा श्रीशंकर आदी विविध देवतांचा मोदी अवतार असल्याचेही अनेकांचे म्हणणे असल्याचे माध्यमे सांगत असतात. अनेकांनी पुस्तके वगैरे लिहून त्यांना तसे दर्शवलेही आहे. मात्र ‘लोकमानस’मधील एका पत्रात (७ फेब्रुवारी) पत्रलेखकांनी मोदींची तुलना प्रभू श्रीरामाशी केली आहे. श्रीरामाप्रमाणेच जनसेवेसाठी मोदींनीही पत्नीचा त्याग केला, यातून त्यांना मोदी आणि श्रीरामामध्ये साम्य दिसले!

हे सगळे पाहिल्यावर मला तर, मोदी हे गोमाता स्वरूप दिसतात. हिंदूंचे ३३ कोटी देव ज्याप्रमाणे गायीच्या ठायी एकवटलेले असतात, तद्वत मोदींच्या ठायीही सर्व देव आणि महापुरुष एकवटलेले आहेत असे मला वाटते. मोदींचे दर्शन टीव्हीवर झाले तरीही समस्त देवदेवतांचे दर्शन घडल्याच्या आध्यात्मिक अनुभूतीने मी सद्गदित आणि अगदी धन्य होऊन जातो!

– रवींद्र पोखरकर, ठाणे