हवामान बदलाचे परिणाम करोनाइतकेच तीव्र..

‘पर्यावरणाची पाचर’ हा अग्रलेख (२७ जुलै) वाचला. पर्यावरण परिणाम मूल्यांकनाचा मसुदा (२०२०) मंजूर करून घेण्याच्या हातघाईवर आलेले केंद्र सरकार उद्योगव्यवस्थेची घडी बसविण्याच्या नादात पर्यावरण ऱ्हास रोखण्यासाठी आपले सरकार काहीही करणार नाही हाच संदेश देत आहे. परंतु या आततायी घाईमुळे उद्योजकांनासुद्धा मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागणार, हे मात्र नक्की. घाईघाईने उद्योग प्रकल्प मान्य करून घेतल्यानंतर वर्षभरात पर्यावरणीय दृष्टिकोनातून त्यात काही दोष आढळल्यास प्रकल्प गुंडाळणे किंवा त्यातील दोष दूर करून पुन्हा उद्योग उभारणे वा न्यायालयाची लढाई लढत कालहरण करणे हे तितकेसे सोपे नसते, हे यापूर्वीच्या अनुभवांवरून कळून चुकले आहे. पाटीवरील खडूने लिहिलेली अक्षरं पुसण्याइतकी ती सोपी गोष्ट नाही, हे सर्व संबंधितांना लवकर कळेल तेवढे बरे. हवामान बदलाचे संकट आपल्यावर कोसळले असून यास पर्यावरण ऱ्हास कारणीभूत आहे याबद्दल शंका नसावी.

या महामारीच्या कालखंडात फक्त आपले सरकारच नव्हे, तर जगभरातील अनेक राष्ट्रे पर्यावरणासंबंधीच्या कायद्यात सूट देत उद्योगव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न करू लागली आहेत.अमेरिकेतील ऊर्जा उद्योगाच्या दबावामुळे तेथील प्रशासनाने एखाद्या कंपनीने प्रदूषणासंबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करणार नाही अशी सूट जाहीर केली आहे. चीनधील अनेक उद्योग प्रदूषण कायद्याला स्थगिती देण्यास राजकीय दबाव आणत आहेत. प्लास्टिक वस्तूंवर करोना विषाणू विसावत नाही हा धागा पकडून प्लास्टिक लॉबी यासंबंधात प्रचार करत जनमत त्यांच्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहे.

करोनाची लागण झाल्यास ज्या तीव्रतेने मृत्यूशी झुंज करावी लागते, तेवढय़ा तीव्रतेने हवामान बदलामुळे मृत्यू झाल्याची नोंद ठेवता येत नाही. हवामान बदलामुळे होणारे मृत्यू तेवढय़ा लगबगीने होत नाहीत. त्यामुळे कोविड—१९ सारखे हवामान बदलामुळे एवढय़ा व्यक्तींची चाचणी, एवढय़ा व्यक्तींना लागण, एवढय़ा व्यक्ती बऱ्या झाल्या, एवढे मृत्यू असे आकडे भरलेले तक्ते रोजच्या रोज जाहीर करण्याची गरज भासत नाही. याचा अर्थ सगळे काही ठीक आहे असे होत नाही. हवामान बदलामुळे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीवर दुष्परिणाम होत असून पूर्ण पृथ्वीच मोठय़ा संकटाच्या उंबरठय़ावर आहे. त्यामुळे वेळीच पर्यावरण ऱ्हासाचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊनच विकास व उद्योगव्यवस्थेची धोरणे ठरविणे मानवी हिताचे ठरेल.

– प्रभाकर नानावटी, पुणे</p>

बुजुर्गाची चलती; काँग्रेसची अधोगती

‘लालकिल्ला’ सदरातील ‘राजस्थानची इष्टापत्ती?’ हा लेख (२७ जुलै) वाचला. गांधी परिवाराशिवाय काँग्रेसला कोणी अध्यक्षच मानवत नाही.  त्यामुळे राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडून पक्षाला तोंडघशी पाडले असेच म्हणावे लागेल. राहुल गांधी नरेंद्र मोदींशी संघर्ष तरी करत आहेत. तसा प्रयत्नही इतरांकडून होत नाही. ज्योतिरादित्य शिंदे किंवा सचिन पायलटांसारख्या नव्या दमाच्या फौजेला योग्य संधी दिली असती तर त्यांनी राहुल गांधींची री ओढून पक्षात जिवंतपणा ठेवला असता. जुन्या नेत्यांची ती हिंमतच नाही. तरुण तुर्काना पक्षात जर उज्ज्वल भविष्य दिसत नसेल तर वैफल्यग्रस्ततेतून असे पक्षाला आव्हान दिले जाते! आज जरी राजस्थानमध्ये सत्तापालट झाला नाही तरी ही टांगती तलवार कायमच राहणार आहे.

काँग्रेस श्रेष्ठींनी दूरदृष्टी दाखवून जुन्या खोडांच्या विळख्यातून पक्षाला सोडवले नाही तर अधोगतीची निश्चितीच म्हणावी लागेल. राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते यांचे गूळपीठ होऊ शकणार नाही या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारून पक्षाची फेररचना करावी.

इतकेच काय पण संघर्ष होणार हे लक्षात आल्यावरच दोन पावले मागे येऊन गेहलोतांकडून मुख्यमंत्री पदाची धुरा सचिन पायलटांकडे सोपवायला हवी होती.

– नितीन गांगल, रसायनी (पनवेल)

योग्य ताळमेळ साधला जावो..

सर्व  प्रकारच्या असुविधा, क्षणाक्षणाला पुढे उभे राहणारे अडचणींचे डोंगर.. उमेद वाढावी अशी एकही बाब नसताना बाबांनी अंगीकारलेले कर्म हेच एक स्वप्न होते. आजपर्यंत या स्वप्नाने अनेकांची आयुष्ये घडवली. तीन पिढय़ा हे काम बिनबोभाट चालले. आणि अचानक बातमी आली ‘बाबा आमटेंच्या स्वप्नांना कौटुंबिक कलहाचा तडा’ (लोकसत्ता २५ जुलै). केव्हा तरी असे काही घडणार होतेच. पण खटकणारी गोष्ट अशी की इतक्या सूत्रबद्ध रीतीने, नि:स्पृहपणे चाललेल्या या कार्यात कार्यकर्त्यांचा छळ, आरोप-प्रत्यारोप , कौटुंबिक वाद इ. अनियमितता, त्रुटींची लागलेली कीड अचानक इतकी सक्रिय, प्रभावी, सर्वव्यापी कशी आणि केव्हा झाली? उद्रेक होण्याइतका असंतोषाचा लाव्हा एकाएकी जमा झाला? बाबा स्वत: किंवा प्रकाश आमटेंच्या बरोबर तन, मन आणि धनदेखील पणाला लावून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही जण ‘आनंदवन  सेवाश्रम’च्या बदलत चाललेल्या कार्पोरेट सेवा संस्थेत ‘ऑड मॅन आऊट’ (विजोड) ठरल्यामुळे तर ही परिस्थिती निर्माण झाली नसेल?

खरे तर इंग्लंड/ अमेरिकेतील भुरळ पडणारे, अत्याधुनिक सेवा-सुविधांनी ओतप्रोत भरलेले, भरभरून आर्थिक लाभही देणारे मोहमयी आयुष्य लाथाडून बाबांची आजची शिक्षित पिढी पुण्या-मुंबईचेदेखील स्वप्न न पाहता हेमलकसा आणि आसपासच्या आदिवासी भागांत सेवाकार्य करत आहे, ही बाबांची पुण्याईच. त्या कार्याला आधुनिक रूप देऊन जास्त परिणाम साधण्याचा प्रयत्नही प्रशंसनीय. कालानुरूप बदलणे ही अस्तित्वासाठीची गरज असते. मात्र परंपरेने आधुनिकतेचा आणि अर्थातच आजच्या वरिष्ठांनी पूर्वीच्या सेवाव्रतींचा योग्य मान ठेवणे हाच योग्य पर्याय!  त्याचा योग्य ताळमेळ साधला जावो.. सगळ्यांना बरोबर घेऊन!

– अनिल ओढेकर, नाशिक

कुरुंदकरांची निष्पक्ष धर्मनिरपेक्षताच महत्त्वाची

‘कुरुंदकरांच्या धर्मविषयक मतांबाबत गैरसमज नको!’ हे पत्र (लोकमानस, २७ जुलै) वाचले. मी माझ्या २३ जुलैच्या पत्रात कुरुंदकरांचा प्रश्न उद्धृत केला आहे, तो त्यांनी (फक्त) बनातवाला यांनाच विचारला आहे, (सर्व मुस्लीम नेत्यांना किंवा मुस्लीम जातीयवाद्यांना नाही) असे पत्रलेखकाचे म्हणणे दिसते. पत्रलेखकांनी त्या प्रश्नाआधीची कुरुंदकरांची विधाने (जी माझ्या पत्रातही दिली होती) ध्यानात घेतलेली दिसत नाहीत. ‘‘हिंदू धर्माची प्रतिष्ठा की भारताची प्रतिष्ठा, असा प्रश्न येईल त्या वेळी धर्म गुंडाळून ठेवून आम्ही भारताच्या बाजूने उभे राहू, असे हिंदूंपैकी कित्येक जण सांगतील. या प्रश्नाला बनातवालांचे उत्तर कोणते?’’ असा प्रश्न जेव्हा कुरुंदकर विचारतात तेव्हा त्यांच्या समोर फक्त बनातवालाच असतात काय? तसेच कुरुंदकर लगेचच जे म्हणतात तेही पत्रलेखकाने ध्यानात घेतलेले नाही, ते असे, ‘‘या देशातील मुस्लीम जातीयवाद्यांचे मत असे आहे की, कोणत्याही मुसलमानाची पहिली निष्ठा परमेश्वर (अल्ला) प्रेषित आणि त्याचा धर्म याच्याशी असते.. भौगोलिक निष्ठा, प्रांतीय निष्ठा वा भाषिक निष्ठा गौण आहेत.’’ तसेच त्याच पुस्तकात भाग तीनमध्ये एकूणच मुस्लीम नेते आणि मुस्लीम मानसिकता यावर जे प्रदीर्घ लेख आहेत ते वाचल्यावर कुरुंदकरांच्या नजरेसमोर फक्त बनातवाला नसून एकूणच मुस्लिमातील जातीयवाद्यांच्या मानसिकतेची चिकित्सा करायची होती, हे स्पष्ट होते.

अर्थात ज्या दृष्टिकोनातून हिंदुत्ववादी ही चिकित्सा करतात, ती कुरुंदकर यांना कधीही मंजूर नव्हती, हेही तितकेच खरे. त्यांना निष्पक्ष धर्मनिरपेक्षतेतून केलेली चिकित्सा अपेक्षित होती. म्हणूनच मुस्लीम जातीयवादापेक्षा कैक पटीने अधिक आणि कठोर चिकित्सा त्यांनी हिंदुत्ववादी आणि त्यांची विचारसरणी यांची केली. बहुसंख्याकांचा जातीयवाद अधिक घातक असतो, असेच त्यांचे मत होते. पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लीम अनुनय करणे किंवा मुस्लीम चिकित्सा टाळणे हे त्यांना मान्य नव्हते. माझे २३ जुलैचे पत्रसुद्धा हिंदुत्ववाद्यांची अप्रत्यक्ष पाठराखण करण्यासाठी नव्हते तर, ‘निवडक धर्मनिरपेक्ष’ या २२ जुलैच्या ‘अन्वयार्थ’ला पूरक म्हणून होते.

– अनिल मुसळे, ठाणे पश्चिम

गोष्टी कानावर पडू लागल्या तर वाचल्या जातील!

‘मराठी  किशोर वाङ्मयात ‘नव्या’ नायकांचा दुष्काळ’ हे वृत्त (लोकसत्ता, २६ जुलै) वाचले. किशोर वाङ्मयाच्या घटत्या संख्येचे मुख्य कारण कमी होत चाललेला किशोरवयीन वाचकवर्ग हे आहे. एकविसाव्या शतकातील पिढी मोठी होत असताना, शालेय पुस्तकांत लक्षात राहाव्या अशा गोष्टी वा कविता फारच कमी होत्या. श्रावणात पाऊस पडून गेल्यावर घरातील मोठय़ांच्या तोंडून ‘श्रावण मासी..’ हमखास ऐकायला मिळते. त्यानंतर त्यांच्या आठवणीत कोरल्या गेलेल्या ‘ती फुलराणी’, ‘ फक्त लढ म्हणा’ यांसारख्या अनेक कविता ऐकताना ‘क्या बात है!’ अशी दाद नकळतच दिल्याशिवाय राहवत नाही. माझ्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना शाळा संपून इतकी वर्षे झाले तरीदेखील शाळेतल्या इतक्या कविता कशा काय लक्षात आहेत, असा प्रश्न मला पडायचा. त्याचे उत्तर मला माझ्या वडिलांच्या पाचवीच्या पुस्तकात सापडले. त्यांच्या त्या चार दशके जुन्या पुस्तकातल्या गोष्टी आजही शाळेत वाचलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त जवळच्या वाटतात!

दोन-चार दशकांपूर्वी जसे किशोर वा बाल वाङ्मय होते, तसे आता उरलेले नाही. लहानपणी ‘शेरसिंह’बरोबर राजा होऊन धूर्त तरसाला शिक्षा केलेल्या किंवा ‘चिकू’ आणि ‘मिकू’बरोबर भटकलेल्या चंपकवनाचे स्वरूपदेखील आता बदलले आहे. गोष्ट ही ‘धडा’ किंवा ‘लेसन’ या रूपाने अभ्यास म्हणून समोर येण्याआधी आणि यूटय़ूब वा व्हिडीओ गेम्सऐवजी कानावर पडू लागली तर नक्कीच या वयोगटातील वाचकवर्ग वाढेल. आजच्या किशोरांसाठी त्यांच्या काळानुरूप नक्कीच एखादा नायक उदयास यायला हवा; ‘बोक्या’सारखा मित्रच नाही, असे व्हायला नको!

– बकुल येनारकर, चंद्रपूर</p>