सेनेचे निकष अन्य प्रश्नांना लावू नका!

‘गांधीवादामुळेच देशाचे नुकसान!’ असे मत निवृत्त मेजर जनरल बक्षी यांनी व्यक्त केले आहे. तसेच तत्कालीन सरकारवर देशद्रोहाचा शिक्काही मारला आहे. या बक्षी साहेबांनी भारतीय सेनेत देशासाठी जी सेवा दिली आहे त्याविषयी आदर बाळगून या वक्तव्यावर पुढील मते व्यक्त करावीशी वाटतात :

(१) गेल्या ७२ वर्षांत ‘नुकसान’ झाल्याचे खापर गांधीवादावर फोडताना याच कालावधीत आपण १९६५, १९७१ व १९९९ (कारगिल) या युद्धांत पाकिस्तानला धूळ चारली आहे, हे बक्षी विसरतात. तसेच १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे करून एक नवीन देश निर्माण केला गेला हेही ते विसरतात. हे देशाचे नुकसान आहे काय? हा देशद्रोह असू शकतो काय? यात गांधीवाद कुठे आला?

(२) सेनेतून निवृत्त झाल्यावर सेनेचे निकष अन्य प्रश्नांना लावून युद्ध व त्यातील विजय हेच अशा समस्यांवर एकमेव उत्तर आहे, असे ठामपणे मांडणे हे युद्धखोरीचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये कूटनीती अत्यंत महत्त्वाची असते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे आणि कोशातून बाहेर यायला हवे.

(३) ‘पाकिस्तानला सैन्याच्या माध्यमातूनच शेवटचा धक्का दिला पाहिजे, म्हणजे पाकिस्तान संपेल’ – या त्यांच्या मताचा अर्थ, पाकिस्तानशी युद्ध करून त्याला हरवले की तो देश संपेल, असा होतो. परंतु लष्करी कारवाईने देश संपत नाहीत, हे गेल्या काही दशकांत सिद्ध झालेले आहे. तसेच तथाकथित ‘संपलेला’ देश आपल्या शेजारी असणे हे आपल्याला परवडणारे आहे का?

(४) ‘काश्मीरमध्ये असंख्य सैनिकांची रसद पुरवल्यामुळे सैनिकांवर होणारी दगडफेक थांबली आहे,’ हे त्यांचे मत तांत्रिकदृष्टय़ा बरोबर वाटत असले, तरी ते तिथल्या लोकांच्या समस्या वा प्रश्नांवर उत्तर नव्हे. काही ठरावीक जिल्ह्यंमध्ये होणारी दगडफेक थांबविणे खरोखरच आवश्यक असले, तरी एकूण प्रश्नावर ते कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही.

(५) बक्षी हे विविध वाहिन्यांवर अत्यंत भावनाप्रधान वक्तव्य करणारे व प्रेक्षकांचे रक्त उसळवणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. पण तसे करताना ते खोटे बोलतात हेही सिद्ध झाले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात त्यांनी महबूबा सरकारला जबाबदार ठरविणारी कहाणी जाहीरपणे एका वाहिनीवर सांगितली होती. परंतु ती पुराव्यासह खोडली गेली होती. त्यांची मते विचारात घेताना ही बाबदेखील विचारात घेतली जावी.

– उत्तम जोगदंड, कल्याण</strong>

गांधीवादाला दोषी ठरवणे ही तर कृतघ्नता

‘गांधीवादामुळेच देशाचे नुकसान!’ हे निवृत्त मेजर जनरल गगनदीप बक्षी यांचे विधान (‘लोकसत्ता’, ६ सप्टेंबर) सवंगता आणि अज्ञान यांचा उत्तम नमुना आहे. ज्यास ‘गांधीवाद’ असे म्हटले जाते किंवा बक्षी महोदयांसारखी मंडळी ज्यास गांधीवाद समजतात, तो या देशात १९२० पर्यंत नव्हताच. त्याआधीचा भारताचा इतिहास बक्षी महोदयांना माहिती नाही का? जेव्हा हा देश परकीयांच्या आक्रमणाला बळी पडला, जेव्हा या देशातील राजांनी आपल्याच बांधवांचा पराभव करण्यासाठी परकीय राजांना आमंत्रण दिले, जेव्हा या देशातला लढवय्या समाज परकीयांच्या सैन्यात सामील होण्यात धन्यता मानून अगदी शिवाजी महाराजांवर चालून येत होता आणि जेव्हा या देशातील तथाकथित वरिष्ठवर्णीय मंडळी आधी फारशी व मग इंग्रजी भाषा शिकून परकीयांच्या चाकरीत समाधानी होती, तेव्हा या देशात बक्षी म्हणतात तो गांधीवाद नव्हता.

काश्मीर आणि कलम-३७० याबाबत बक्षीजी बरेच अस्वस्थ दिसतात. त्यांच्या मते, कलम-३७० रद्द होण्याचा निर्णय ७० वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता. खरे तर काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंगाने १५ ऑगस्ट १९४७ रोजीच काश्मीरचे विलीनीकरण भारतात केले असते; परंतु त्याने धर्मनिरपेक्ष भारतात विलीन होऊ  नये असा सल्ला त्याला तथाकथित हिंदुत्ववादी नेत्यांनी दिला नसता तर कलम-३७० चा प्रश्नच आला नसता, हे बक्षी विसरतात. तसेच राजा हरिसिंग आणि त्याला स्वतंत्र राहण्याचा सल्ला देणारी मंडळी गांधीवादी नव्हती हेदेखील ते विसरतात.

बक्षी यांना आठवत नसेल, पण काश्मीरमध्ये सैन्य पाठवायच्या निर्णयाचे गांधीजींनी समर्थनच केले होते. राष्ट्रपित्याची अहिंसा भेकडाची अहिंसा नव्हती. ब्रिटिशांच्या प्रचंड सामर्थ्यांसमोर दीनदुबळ्या भारतीयांचा लढा उभारून माहात्म्याने देशात नवा राष्ट्रवाद आणि खरेखुरे राष्ट्र जागृत केले. महात्मा देशाचे नुकसान करत नव्हता, तर लोकांना निर्भय करून त्यांना गुलामीविरुद्ध उभे राहण्याची, स्वातंत्र्याची प्रेरणा देत होता आणि आजही देत आहे. हे लक्षात न घेता, गांधीवादाला देशाच्या नुकसानासाठी जबाबदार धरणे हा अडाणीपणा तर आहेच, पण त्याचबरोबर ती कृतघ्नताही आहे.

– डॉ. विवेक कोरडे, मुंबई</strong>

बक्षिसीसाठी केलेल्या विधानांना गांभीर्याने घ्यावे?

निवृत्त मेजर जनरल बक्षी यांनी पाकिस्तानला सैन्याच्या माध्यमातून शेवटचा धक्का देऊन संपवून टाकण्याची भाषा करून उग्र राष्ट्रवाद्यांना खूश केले असले, तरी त्या संदर्भात काही मूलभूत प्रश्न मात्र शिताफीने चकवले आहेत. ते असे :

(१) मुळात पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करायचे, संपवून टाकायचे हे आपल्याकडच्या उजव्या देशप्रेमींचे जुनेच स्वप्न आहे. पण म्हणजे नेमके काय करायचे? २० कोटी लोकांना ठार तर मारता येणार नाही ना? मग त्या देशाचे आर्थिक कंबरडे मोडायचे, तर तेथे अराजक निर्माण होणार नाही का? आणि त्याचा फायदा घेऊन तालिबान, आयसिससारख्या विघातक शक्तींनी जर पाकिस्तानवर ताबा मिळवला किंवा चीन, अमेरिकेने संधी साधली तर भारताच्या डोक्याची कटकट कायमची संपेल की वाढेल? बरे, आपले उजवे कट्टरपंथी म्हणतात त्याप्रमाणे, पुन्हा एकदा पाकिस्तानचे विलीनीकरण करून ‘अखंड हिंदुस्थान’ बनवला, तर वाढीव २० कोटी मुस्लिमांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्याची मानसिकता कोणत्या बाजूकडे आहे?

(२) बक्षी आणि अनेक जण काश्मीर आणि इतरत्रही, वाट्टेल तेवढय़ा लष्करी बळाचा वापर करून समस्या सोडवायचे समर्थन करतायत. पण आधुनिक जगात केवळ लष्करी सामर्थ्यांच्या जोरावर एखाद्या प्रदेशातील जनतेला कायमचे देशप्रेमी बनविल्याचे उदाहरणही त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. सैन्यदलाच्या ताकद आणि कर्तृत्वावर दुमत असण्याचे काहीच कारण नाही; पण मुळात त्या मार्गाच्या काही मर्यादा ध्यानात न घेता, केवळ लोकभावना खूश करण्यासाठी त्यांचा वापर करणे अंतिमत: धोक्याचेच नाही का?

(३) मागील सरकारने केलेल्या देशद्रोहाची भांडेफोड करायला बक्षींनी इतका उशीर का लावला बरे? आपले हे सत्याचे प्रयोग त्यांनी तात्काळ केले असते, तर जास्त देशहिताचे झाले नसते का?

उन्मादी वातावरणात अनुभवी लोकांनी सर्व प्रश्नांची संयमित उत्तरे शोधली, तर ते देशासाठी जास्त उपयुक्त होईल. बक्षिसीच्या आशेने केलेल्या स्फोटक विधानांना किती गांभीर्याने घ्यावे, हा मुद्दा आहे.

– चेतन मोरे, ठाणे</strong>