नवी दिल्लीतील निवडणुकीत भाजपला धूळ चारत सत्ताग्रहण केलेल्या आपचे आता तरी सारे काही सुरळीत पार पडेल, अशीच सामान्य मतदारांना अपेक्षा होती. गेल्या खेपेस झालेल्या ४९ दिवसांच्या महाभारतानंतर दिल्लीतील जनतेला कोणताही धोका पत्करायचा नसावा, त्यामुळेच एकाच वेळेस त्यांनी मोदी आणि पर्यायाने भाजपच्या उधळलेल्या वारूला लगामही घालताना दुसरीकडे केजरीवाल यांना दणदणीत बहुमत दिले. त्यामुळे खरे तर आता कोणतीच गडबड होण्याचे काही कारण नव्हते. आताशा देशाचे आणि खासकरून त्यातील तरुणाईचे लक्ष आपल्याचकडे लागून राहिले आहे, याची केजरीवाल यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ‘आप’ल्यावरील प्रसिद्धी- बिंदू ढळतो आहे, असे लक्षात आले की, केजरीवाल लगेचच क्रियाशील होतात. अर्थात ते मॅनेजमेंटमधील तज्ज्ञ आहेत, त्यामुळे याचे महत्त्व त्यांच्याइतके आणखी कुणाला पक्के कळलेले असणार? त्यांचे नेतृत्व आणि त्यांचा पक्ष हे त्यांच्यातील मॅनेजमेंट गुरूचेच फलित आहे. अन्यथा अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल ही नवी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलीच नसती. दिल्लीतील आंदोलनामुळे अण्णा हजारे हे नाव देशभरात सर्वतोमुखी झाले, मात्र तरीही आपण निवडणुकीस उभे राहिलो तर नक्कीच हरू. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकप्रियता लाभली, पण त्यांना निवडणूक नाही जिंकता आली, तशीच आपली अवस्था होईल, असे विधान अण्णा हजारे यांनी केले. पण याच अण्णांच्या बळावर मोठे झालेल्या केजरीवाल यांनी थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारली. लोकप्रियतेचे रूपांतर मतांमध्ये करण्याचे राजकीय शहाणपण हे केजरीवाल यांच्यामध्ये दडलेल्या मॅनेजमेंट गुरूचेच यश आहे. हे राजकीय शहाणपण तर गेली कित्येक वर्षे लोकप्रिय असलेल्या राज ठाकरे यांनाही जमलेले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा राजकीय पक्ष जन्माला आला, त्या वेळेस महाराष्ट्रात असेच वातावरण निर्माण झाले होते. त्या वातावरणाचा फायदाही सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांना झाला. मात्र लोकप्रियतेचे मॅनेजमेंट अर्थात मतपेटीतील रूपांतरणात मात्र ते सपशेल कमी पडले आणि आता तर त्यांची राजकीय शक्तीही क्षीण झाल्यासारखीच अवस्था आहे. केजरीवाल मात्र यात माहीर निघाले. त्यांनी नेमक्या वेळेस,नेमकी गणिते मांडत त्यांच्या सर्व खेळी यशस्वी करून दाखवल्या. अर्थात त्यांच्या या खेळींना वेगळ्या अर्थाने साथ मिळाली ती दिशाहीन भरकटलेल्या काँग्रेसची. केजरीवाल यांच्या यशात अशा प्रकारे काँग्रेसचा वाटाही मोठा आहे, तर नवी दिल्लीतील यशामागे भाजपच आहे. कारण केंद्रात सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने भाजप आणि मोदींची पावले पडत होती, ते पाहता केजरीवाल यांच्या रूपाने भाजपला धोबीपछाड देण्याची संधी आयती चालून आली आहे, असे दिल्लीच्या मतदारांना न वाटते, तरच नवल होते. अर्थात झालेही तसेच आणि केजरीवाल यांना तुफानी बहुमत मिळाले. दिल्लीच्या पटावरून काँग्रेसचे अस्तित्व पुसले गेले आणि भाजपलाही त्यांची जागा दाखविली गेली.
आता एवढे यश मिळाल्यानंतर ते कोणत्याही सामान्य माणसाच्या डोक्यात जाणे तसे स्वाभाविकच होते. त्यात केजरीवाल यांच्यासारख्या आततायी व्यक्तीच्या बाबतीत हे असे होते तेव्हा; झालाच तर सर्व विरोध त्यांनी मोडून काढणे तसे साहजिकच होते, आणि झालेही तसेच. खरे तर हे सारे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण आदी मंडळींना हे लक्षात यायला हवे होते.

केजरीवाल यांनी यादव, भूषण यांच्या गच्छंतीसाठी योग्य वेळ निवडली. आपल्याला हवी तीच बाजू मीडियासमोर व्यवस्थित जाईल हेही पाहिले. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्यासमोर
भावनिकतेचा आदर्श ठरेल, असेच भाषणही ठोकले. त्या भाषणाची संपादित प्रत सार्वजनिक केली. (संपादित एवढय़ाचसाठी कारण आपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत झालेला गोंधळ त्या व्हिडीओ क्लिपमधून व्यवस्थित वगळण्यात आला आहे) इथेही केजरीवाल यांचे ‘मॅनेजमेंट’ सक्रिय होते.
पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी हा तर अरविंद केजरीवाल यांनी खेळलेला एक उत्तम डाव होता. त्यांचे भाषण हे पूर्णपणे भावनेने ओतप्रोत भरलेले होते. आपल्यावर अन्याय कसा झाला, याचीच व्यवस्थित मांडणी त्यांनी केली. मग स्वत:ला असलेला मधुमेह, तरीही पक्षासाठी केलेले १५ दिवसांचे उपोषण, जिवाला उत्पन्न झालेला धोका, आई आणि बायकोचे रडणे- त्यांना वाटलेली भीती हे सारे आपण पक्षासाठी केले असे त्यांनी भावनिक आवाहन करत सांगितले. आपल्याविरुद्ध गेले वर्षभर षड््यंत्र सुरू आहेत, पण आपण पक्षासाठीच गप्प बसणे पसंत केले. आरोप सतत होत होते. पण दिल्लीची निवडणूक होईपर्यंत थांबलो. दिल्ली निवडणुकीत झालेल्या आरोपांनाही त्यांनी शिताफीने उत्तरे दिली. शिताफीने एवढय़ाचसाठी कारण स्वत:ची भावनिक खेळी खेळून झाल्यानंतर कुणीच काही म्हणणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री होती. ते आरोप त्यांनी तीन-चार मिनिटांत उडवून लावले. म्हणजेच कुणी आरोपांबाबत विचारणा केली तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसमोरच त्याला आपण उत्तर दिले आणि तेव्हा कुणीच काही बोलले नाही, असे म्हणायला केजरीवाल पूर्ण मोकळे. हे केवळ आणि केवळ उत्तम मॅनेजमेंट गुरूचेच लक्षण ठरावे. इस पार्टी को मैने मेरे खूनसे सिंचा है, असेही सांगायलाही ते विसरले नाहीत.
अखेरीस गोष्ट कोणती सांगितली तर एकाच मुलावर हक्क सांगणाऱ्या दोन आयांची. ज्यात मुलाचे दोन तुकडे करून दोघींना घ्या, असे सांगितल्यावर खरी आई विद्ध होते. त्याचप्रमाणे मी जन्माला घातलेल्या या पार्टीचे तुकडे नको, मी राजीनामा दिला आहे, आता तुम्हीच काय ते ठरवा. मी चाललो.. असे म्हणत प्रत्यक्षात एका र्अजट मीटिंगला जातो आहे असे जाहीररीत्या सांगून केजरीवाल गेले ते थेट घरी. केजरीवाल यांनी हे सारे करताना दाखविलेल्या शहाजोगपणाचा तर तो कळसाध्यायच होता.
ही पार्टी माझी आहे, मी जन्माला घातली आहे, मी माझे रक्त शिंपून तिचे पोषण केले आहे ही सारी विधाने काय दर्शवितात? यातील मीपणालाच यादव, भूषण आदी मंडळींचा नेमका आक्षेप होता. पण त्यांनाही काही गोष्टींचा विसर पडला असावा. योगेंद्र यादव हे राजकारणाचे उत्तम अभ्यासक आहेत. पण अभ्यास कागदावरचा आहे आणि ते राजकीय प्रात्यक्षिकात मात्र कच्चे आहेत. नेमके हेच केजरीवाल यांनी त्यांना दाखवून दिले आहे. राजकारणात थिअरी-पेक्षा प्रॅक्टिकल महत्त्वाचे हा यादव, भूषण यांना मिळालेला धडा आहे. शिवाय एरवीही बाजू घेण्याची वेळ येते त्या वेळेस बहुतांश मंडळी सत्तेच्याच बाजूने जाणे पसंत करतात. काठावर सत्ता असतानाही हाच अनुभव येतो. इथे तर केजरीवाल यांना मोदींप्रमाणेच निरंकुश सत्ता मिळाली आहे. मग अशा वेळेस हा अनुभव न येता तरच नवल होते. राजकारणात हे असेच होत असते. इथे केवळ कागदावर बहुमत असून भागत नाही, ते प्रत्यक्षात सिद्ध करावे लागते तरच सत्ता तुमची असते. आपमध्ये जे झाले तिथे तर पक्षातील बहुमतही आपल्या बाजूने नाही, याची यादव आणि भूषण यांना पूर्ण कल्पना होती आणि त्याची जाणीव केजरीवाल यांना होती. म्हणून तर योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यासारख्या दिग्गजांच्या संदर्भातही अशी कारवाई करण्यास ते धजावले. हा खरे तर केजरीवाल यांनी दिलेला इशारा आहे. आपमध्ये जे काही होईल, ते फक्त आणि फक्त केजरीवाल केंद्रितच असेल, बाकी कुणालाही इथे थारा नाही.
अर्थात हे दूरगामी राजकारणासाठी योग्य नाही. पण केजरीवाल यांनी आजवर कुठे दूरदृष्टी दाखविली आहे. सध्या तर केवळ दिल्ली हेच त्यांचे जग आहे. अन्यथा यादव यांच्यासारख्या अभ्यासकाचा योग्य तो मान ठेवून त्यांनी त्यांना सोबतच ठेवले असते. कारण दिल्ली हाती म्हणजे देश हाती असणे नव्हे, हे अद्याप केजरीवाल यांना कळणे बाकी आहे. त्यांचा हा आततायीपणा असाच कायम राहिला, तर त्याचाही प्रत्यय त्यांना लवकरच येईल आणि दिल्लीचा पराभव वर्मी बसलेले मोदी व भाजपच त्यांना त्याचा प्रत्यय देतील, हेच या ‘आप’बितीचे पुढचे पाऊल असेल!
01vinayak-signature
विनायक परब