लहानग्यांच्या भावविश्वातील परी, सिंड्रेला, हिमगौरी आणि तिचे सात बुटके एका फ्लोटवर स्वार झालेले असतात, तर थ्री वाइज पिग्ज आपल्याच मस्तीत धम्माल उडय़ा मारत जात असतात. मध्येच एखादा जादूगार वेगवेगळे प्रयोग करीत असतो. विदूषक आपल्या अचाट विनोदी कसरती करीत असतो. मध्येच हंप्टी डंप्टी गर्दीतील चिमुरडीला हॅलो करतो आणि तीदेखील त्याला तितक्याच सहजपणे जणू काही आपल्या गाण्यातला हंप्टी प्रत्यक्षात आला आहे, असे समजून हॅलो करते. सारा माहौलच परीकथामय आणि लहानग्यांच्या भावविश्वात रमून गेलेला असतो.
अशा प्रकारे परीकथेतील आणि कार्टूनमधील पात्रं एकत्र आणून त्यांची परेड काढण्याची पद्धत डिस्नेलॅण्डसारख्या भल्या मोठय़ा थीम पार्कामध्ये होत असते. वाद्यांच्या तालावर, मस्त रंगीत कल्पक फ्लोटवर, गाडय़ांवर सजलेली नाचगाण्यात रंगून गेलेली धमाल तिकडे सुरू असते. पण ते पाहायला जायचे तर भरपूर खर्च करून परदेशवारी करावी लागेल. पण आता अशीच धम्माल परेड आपल्याला भारतात अनुभवयाची सोय इमॅजिकामध्ये झाली आहे. अ‍ॅडलॅब इमॅजिकाच्या थीम पार्कच्या प्रांगणात सुट्टीच्या निमित्ताने सध्या रोज संध्याकाळी ग्रॅण्ड परेड आखण्यात आली आहे. परीकथेतील पात्रे ही खरे तर परीकथेपुरतीच मर्यादित असतात. पण त्यांच्या त्या सुंदर नाजूक अशा फॅण्टसीत लहानांबरोबर आपण सारेच रमून जातो. पण हीच पात्रं जर आपल्यासमोर प्रत्यक्षात अवतरत असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत आपल्याला नाच करायला मस्ती करायला मिळाली तर आणखीनच धमाल येते.
२०१३ मध्ये सुरू झालेल्या थीम पार्कमध्ये सध्या एक ग्रॅण्ड परेड सुरू आहे. अनेक धम्माल राइड्समधील मोगॅम्बो, राबोटरे अशी अनेक पात्रे आणि परीकथेतील पात्रे एकत्र आणून एक धम्माल परेड इमॅजिकाने सुरू केली आहे. पुस्तकाच्या भल्या मोठय़ा प्रतिकृतीवर विराजमान झालेली परी, त्यावर तिचे सुंदरसे घर, तर फळांनी, झाडांनी बहरलेल्या भल्या मोठय़ा प्रतिकृतीवर विसावलेला डायनासोर असे सारे काही मस्तीचे वातावरण या परेडमध्ये दिसून येत आहे. या साऱ्या पात्रांसोबत मस्ती करायची, खाऊ खायची आणि त्यांच्यासोबत फोटो काढायची संधीदेखील मिळते आणि काही काळ का होईना लहानग्यांच्या भावविश्वाशी रममाण होता येते.
१ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे