कार्पोरेट जग, तिथले चढउतार, गळेकापू स्पर्धा, संधी, पैसा या सगळ्याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. पण प्रत्यक्षात काय असतं ते सगळं? कापरेरेट जगाचा एक्स-रे दाखवणारी नवी कादंबरी-

रात्री दहाच्या सुमाराला दमून भागून घरी यायचं, कसेबसे दोन घास ढकलायचे आणि गॅलरीत पथारी पसरून, आकाशाकडे निर्हेतुक पाहात पाहात उद्याचा विचार करीत पडायचे या आबाच्या गेल्या काही वर्षांच्या रूटीनला खीळ बसली ती त्याच्या लग्नामुळे.
लग्नही तसे म्हटले तर अचानकच झाले. आईच्या भुणभुणीला ‘पसे नाहीत’ या एका सबबीची ढाल पुन: पुन्हा पुढे करून आबा हा विषय संपवी. एकदा कामानिमित्त नागपूरला वडिलांच्या स्नेह्य़ांच्या घरी उतरण्याचा योग आला आणि त्या गरीब पण सुसंस्कृत कुटुंबाने, विशेषत: त्यांची मुलगी सरलाने त्याला अत्यंत प्रभावित केले. परत आल्यावर आपणहून त्याने आईकडे विषय काढला. आईचा तिच्या कानांवर विश्वास बसेना.
‘‘अरे, त्यांची परिस्थिती पाहिलीस ना जवळून? फार भली माणसं, अजून मोने गुरुजी म्हटलं तर हात जोडणारे हजारो विद्यार्थी भेटतील. स्वातंत्र्यलढय़ात खूप हाल सोसले त्यांनी, पण त्याचं ना कधी भांडवल केलं ना कसले फायदे उपटले. पण त्यामुळे घरांत सुतळीचा तोडा नसेल. शिवाय केवळ परवडत नाही म्हणून बिचारी सरला पुढे शिकली नाही. तुझ्यासारख्या इंजिनीअरला निव्वळ मॅट्रिक मुलगी कशी चालेल?
आबाने सर्व चालवून घेतले, खर्च नको म्हणून रजिस्टर लग्न केले आणि आपला हट्ट पुरा केला. पण धंद्याच्या वाढत्या व्यापात स्वत:च्या संसारासाठी वेळ देण्याची कसरत त्याला जमेना. विसू त्याला अक्षरश: हाकलायचा तेव्हा स्वारी घरी येणार. सरला कितीही वेळ झाला तरी आधी जेवत नाही हे लक्षात आल्यावर तो शरिमदा व्हायचा, पण तिच्या चेहऱ्यावर त्याला कधी असमाधानाची छटा दिसली नाही. घरखर्चाबद्दल त्याने स्पष्ट कल्पना आधीच दिली होती. पण तो देत असलेल्या तुटपुंज्या पशांत सरला इतके चांगले कसे मॅनेज करू शकते, आल्या गेल्याच्या आगत स्वागतांत कमी कसे पडू देत नाही याचे कोडे त्याला कधीच उलगडले नाही.
* * *
एका सकाळी आबा नेहमीच्याच वेळेवर तयार झाला. सरलानेही नेहमीप्रमाणेच स्कूटरच्या किल्ल्या आणि दुपारचा डबा पुढे केला पण कधी नव्हे ते सुचवलं, ‘‘आज जरा लवकर यायचं बरं का! आम्ही वाट पाहू.’’
आबाने भुवया उंचावत प्रश्नार्थक चेहऱ्याने सरला व पाठीमागे उभी असलेल्या आईकडे पाहिले. सरला फक्त मंद हसली. आईने मात्र त्याला जरा दमातच घेतले.
‘‘एवढी ती सांगतेय तर न विसरता ये की जरा लवकर.’’
आबाने काहीच बोध न झाल्याने खांदे उडवले आणि स्कूटरला किक मारली. दुपारी आबा आणि विसूने आपापले डबे उघडले. ‘‘अरे, आज आहे तरी काय? सकाळी मला सांगितलं लवकर घरी ये. आता डब्यांत आपल्या दोघांसाठी बर्फी’’ आबा थोडय़ा कातावल्या स्वरांतच करवादला. विसूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण संध्याकाळी एकदम तंबीवजा इशारा दिला.
‘‘साहेब, घरी लवकर बोलावलंय ना? मग आवरा, आणि हो – डाऽऽयरेक्ट घरीच जा.’’
विसूने स्कूटर बाहेर काढली मात्र, बाजूलाच उभ्या असलेल्या गजरेवालीने गजरे पुढे अगदी त्याच्या नाकाशीच धरले. त्या मंद व मादक वासाने आबा क्षणभर वेडावला. खिशाजवळ हात गेला. पण मोठय़ा मनोनिग्रहाने त्याने स्वत:ला आवरले व झटकन स्कूटर पुढे काढली. जरुरीपेक्षा एक पसाही स्वत:साठी जादा खर्च करायचा नाही ही शिस्तच त्याने स्वत:ला लावून घेतली होती.
सरलाने दार उघडताच आबाला आणखी एक धक्का बसला. नेहमीच्या साध्या साडीऐवजी त्याच्या आवडत्या मोतीया रंगाच्या साडींत सरला स्वप्नांतील परीच भासत होती. पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देताच ती आत पळाली.
जेवायला बसल्यावर त्याला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. आई आणि सरला पंक्तीला आणि बेत तर एकदम स्पेशल.
‘‘अरे आज आहे तरी काय? कुणी सांगणार आहे की नाही?’’
‘‘आहे तुझं डोंबल! अरे, निदान लग्नाचा पहिला वाढदिवस तरी लक्षात ठेवायचास. त्या पोरीला काय वाटत असेल?’’ आईचा राग खरा होता की कृतक हे आबाला कळले नाही. त्याच्या डोळ्यासमोर आले विकत न घेतलेले गजरे; तो धुंद वास त्याला पुन्हा जाणवला. अभावितपणे तो म्हणाला ‘‘माझी बस आज चुकली हेच खरं!’’
५ ५ ५
आबासाहेब कुलकर्णीच्या मेहनतीचे हळूहळू का होईना, पण चांगले परिणाम दिसू लागले होते. के. फॅब्रिकेटर्स अॅण्ड कास्टिंग्ज छोटे असले तरी त्याची दखल पुण्या-मुंबईमधील मोठय़ा इंजिनीयरिंग कारखान्यांनी घेतली होती. छोटे पण गुंतागुंतीचे प्रिसिजन पार्ट जरूर असलेल्या टॉलरन्स लिमिटमध्ये व ठरलेल्या डिलिव्हरी शेल्डय़ुल्सप्रमाणे हवे असतील तर के.एफ.सी.ला पर्याय नाही, असा विश्वास बहुतेक प्रोक्युअरमेंट एक्झिक्युटिव्हमध्ये निर्माण होत होता. कारखान्याचा व्याप आता चांगलाच वाढला होता. दोन शिफ्टमध्ये चाळीसेक कामगार रोलवर होते. विसूभाऊंची लेबर मॅनेजमेंटपण चोख होती. पण अजूनही आबासाहेबांना कारखान्याच्या वा घरच्या गरजा मनासारख्या भागविण्याइतके आíथक स्थर्य येत नव्हते. नव्या नव्या प्रिसिजन मशीनरीच्या आणि खेळत्या भांडवलाच्या सतत वाढत्या गरजेपोटी हा धंदा येणारा सगळा पसा भस्म्या लागावा, असा गिळंकृत करीत होता. अनेक बँकांचे उंबरठे झिजवूनदेखील एका नगण्य कॅश क्रेडिट पलीकडे बँकेचे वित्तसाहाय्य मिळाले नव्हते. पण आबासाहेबांना त्याची फिकीर नव्हती. पुढले प्लॅन्स त्यांच्या डोक्यात अव्याहत चालूच होते.
आज खूप दिवसांनी आबा वेळेवर घरी आले होते. सरलाची जेवण करण्याची धांदल चालू होती. छोटय़ा सुधीरच्या बाळलीलांनी ती व आई दोघी अगदी जेरीस आल्या होत्या. आबाला एकदम जाणवले की आईच्या हालचाली आता फारच कष्टाच्या झाल्या आहेत. सुधीरमागे धावण्याची इच्छा असूनही तिला ना धड वाकता येत नाही ना त्याने काही सांडलवंड करण्याआधी त्याच्यापर्यंत भरभर पोहोचता येत नाही.
आबाने चटकन जाऊन सुधीरला कडेवर घेतले आणि म्हणाला, ‘‘आई, तुझ्या सांधेदुखीवर तुझे घरगुती उपाय पुरे झाले, चांगल्या स्पेशालिस्टला दाखवायलाच हवं, काय गं सरला?’’
सरला होकारच देणार हे जाणून आईने तिला बोलण्याची संधीच न देता आबाला खोडून काढले. ‘‘उगाच काळजी करू नका. तुमचा तो स्पेशालिस्ट घडय़ाळाचे काटे उलटे फिरवून मला पुन्हा तरुण करणार आहे का? अरे, या वयात सर्वानाच हे असे त्रास होतात. सांधे दुखणार, सर्दी-खोकला होणार, माणूस छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून किरकिरणार, चालायचंच!’’
आबाला एकदम भरून आले. किरकिरण्याची बातच सोडा, ही माऊली आपल्या तब्येतीची झळ आबाला लागू नये म्हणून किती दक्षता घेत होती. तिला उद्याच
डॉ. पटवर्धनांकडे नेण्याचे त्याने मनोमन ठरवून टाकले.
‘‘आणि ह्य़ा चोराची दांडगाई कमी करण्याचा काही तरी उपाय शोधायला हवा. एका जागेवर बसून खेळेल असा काही तरी खेळ घेऊन येतो.’’
‘‘एका जागेवर बसण्याचं अजून वय नाही त्याचं!’’ सरला हसून म्हणाली. ‘‘पुढल्या आठवडय़ांत दुसरा वाढदिवस येतोय त्याचा. माझ्या मनात आहे एक- सांगू का?’’
‘‘बोल ना!’’
‘‘त्याच्या वाढदिवसाला तीनचाकी घेऊ या का? तसे थोडेसे पसे बाजूला ठेवलेत मी, उरलेले तुम्ही घाला. घरभर िहडेल आणि शिवाय इथे हात घातला, तिथे घातला असंही होणार नाही, सायकलवर असल्यावर.’’
आबाला काय बोलावं ते सुचेना. या दोघी हा घरगाडा किती समर्थपणे चालवताहेत, पण आपण मात्र त्यांच्या सर्व हौस-मौजा मारून त्यांच्यावर अन्याय करीत आहोत ह्य़ा अपराधी भावनेने तो शरिमदा झाला. यापुढे घराला प्रॉयारिटी द्यायचीच असा निश्चय मनोमन करीत तो म्हणाला.
‘‘फर्स्ट क्लास आयडिया! उद्या-परवाच घेऊन येतो ट्रायसिकल. आणि तुझ्या पशातून तुला आवडेल ते एखादे खेळणे किंवा ड्रेस आण त्याला.’’
आबा निग्रहाने दोन दिवस वेळेवर घरी आला, पण त्याचा आदर्श बाप वा नवरा होण्याचा अॅटॅक थोडा काळच टिकला. कारणही तसेच झाले.
एका सकाळी त्यांनी विसूभाऊंच्या हातात एक छोटा सिलिंडरवजा तुकडा दिला. ‘‘काय आहे हे, कल्पना आहे?’’
‘‘कास्टिंग तर वाटत नाही.’’ – विसूभाऊ. ‘‘बरोबर. हा सिंटर्ड पार्ट आहे. फाइन मेटल पावडरपासून बनविलेला व हाय प्रेशरखाली लुब्रिकेशन इम्प्रेग्नेशन म्हणजे त्याच्या कणाकणांमध्ये लुब्रिकेशन प्रेशरने घुसविल्यामुळे तो कायम सेल्फ-लुब्रिकेटेड केलेला. सध्या बहुतेक चांगल्या दर्जाच्या फॅन्स, मोटर्स व तत्सम इलेक्ट्रिकल इन्स्ट्रमेंटमध्ये हे पार्ट वापरायला सुरुवात झाली आहे. गेले दोन महिने मी याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यामागे होतो आणि आता माझी खात्री झालीय- आपण येथे उडी मारायला हवीच.’’
‘‘म्हणजे नवा प्लान्ट? काय विचार आहे तुमचा?’’ विसूभाऊ.
‘‘विसू, हे अहो-जाहो नव्याने सुरू केलयंस् ते मला अजिबात आवडत नाही. आपलं नातं काय मालक-नोकर आहे का?’’
‘‘प्लीज समजून घ्या. येथे, ऑफिशियल काम करताना, चार माणसं आजूबाजूला वावरत असताना, हा डेकोरम आपण पाळायलाच हवा. ते जाऊ द्या. खर्चाचा अंदाज सांगा.’’
‘‘साधारण दोन ते सव्वादोन कोटी, मार्जनि मनीसहित. मला वाटलं होतंच तुला हा माझा वेडेपणा वाटणार, पण असा वेडावाकडा चेहरा करायची जरूर नाही. सध्या आपल्या आवाक्यापलीकडे आहे हे कबूल. पण इच्छा असली तर मार्ग दिसतो म्हणतात ना, तशी या प्रोजेक्टच्या फिनान्सची पण शक्यता आहे. आपल्या बँकेची स्पेशल इंडस्ट्रियल फिनान्स ब्रँच सुरू झाली आहे. तिचा मॅनेजर खूप उत्साही व धडाडीचा वाटला. त्याला प्रोजेक्ट प्रोफाइल दिली होती. बघू या काय रिस्पॉन्स येतोय तो.’’
आबासाहेबांचा विश्वास अनाठायी नव्हता. त्यांनी शून्यांतून उभा केलेला पसारा, विक्री-नफ्याचा सदैव चढता आलेख व मुख्य म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता या सर्वानी त्या बँक मॅनेजरला खरोखरच प्रभावित केले होते. नवा प्रोजेक्ट रिपोर्टही तेच दर्शवीत होता. पहिल्याच मीटिंगमध्ये इतका सकारात्मक रिस्पॉन्स येईल असे आबासाहेबांना वाटले नव्हते.
‘‘हे पाहा मि. कुलकर्णी, तुम्ही खूप मेहनतपूर्वक हा रिपोर्ट बनविलाय याबद्दल माझे कॉम्प्लिमेंट्स, पण तरीही यात अनेक सुधारणांना वाव आहे. विशेषत: मशीनरी सप्लायर्सचे सिलेक्शन, कपॅसिटी बॅलन्सिंग, प्लँट लेआऊट, मार्केटिंग आणि सेल्स नेटवर्क अशासारख्या बाबी फुलप्रूफ असायला हव्यात हे तुम्हीदेखील मान्य कराल. आम्ही तुमची प्रॉफिटॅबिलिटी एस्टिमेटस्ची इंडस्ट्री पॅरॉमीटर्सची तुलना केली आणि ती देखील थोडी आशावादी वाटतात. या सर्व गोष्टी समर्थपणे हाताळू शकेल अशा एका एक्स्पर्ट कन्सल्टंटचे नाव मी सुचवू इच्छितो.’’
आबासाहेबांना हे अगदीच अनपेक्षित होते. आपण आणि बँक यामध्ये आणखी कुणी येईल अशी कल्पनासुद्धा त्यांनी केली नव्हती आणि अशा प्रोसिजरमधले संभाव्य धोके त्यांना लगेच जाणवले.
‘‘कन्सल्टंट? काय रोल असेल त्यांचा?’’ ‘‘डबल रोल’’ मॅनेजर श्री. साठे मिस्कीलपणे उत्तरले. ‘‘प्रथम तो तुमच्या रिपोर्टचा पूर्ण अभ्यास करून हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करील आणि दुसरा महत्त्वाचा रोल म्हणजे तो आम्हाला ह्य़ा प्रोजेक्टचा रिस्क फॅक्टर म्हणजे बँकेचे साह्य़ देण्यात किती धोका आहे त्याचा सल्ला देईल.’’
‘‘पण मी बनविलेला रिपोर्ट परक्या हाती गेल्यावर त्याचा दुरुपयोग तर होणार नाही ना?’’
‘‘त्याबद्दल नििश्चत राहा, बँकेच्या संबंधित स्टाफव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याची वाच्यता होणार नाही अशी गुप्ततेची हमी मी घेतो.’’
आबासाहेबांना देकार देण्यावाचून पर्याय नव्हता, पण मनातून ते रुष्टच झाले होते. आतापर्यंत अनेक बँक मॅनेजर्सनी प्रथम आशा दाखवून नंतर असंख्य खेटे मारूनही वाटाण्याच्या अक्षता दिल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे, ही नेहमीची एक वेळकाढू चाल आहे, हा बँक मॅनेजर पण शेवटी जातीवर गेला असेच दिसत हाते. विसूभाऊंना सर्व संभाषण ते सांगू लागले.
‘‘तूच सांग विसू, एस्टिमेट्स वास्तववादी व्हावीत म्हणून आपण किती कष्ट घेतले? पंचवीस ठिकाणी चौकशा करून आपण कच्च्या मालापासून प्रत्येक लहान-सहान गोष्टींचे भाव निश्चित केले. याउलट कमीत कमी विक्रीचा दर दाखवला. तरीही हा बँकवाला म्हणतो मी प्रॉफिट जास्त दाखवलाय्. या इंडस्ट्रित इतका कमी ब्रेक-इवन-पॉइंट असणे शक्य नाही म्हणे.’’
‘‘ब्रेक-इवन-पॉइंट? ही काय भानगड आहे?’’ विसूभाऊंची रास्त शंका.
‘‘सोपी गोष्ट कठीण शब्दांत गुंफून आपल्यासारख्याला घाबरावयाची भानगड आहे ही. आपल्या साध्या कामगाराला पण कळतं की एकदम कमी प्रॉडक्शन काढलं तर धंदा तोटय़ात जातो, जितके जास्त प्रॉडक्शन काढता येईल तितका खर्च कमी, नफा जादा. हेच साधे गणित बँकवाले किचकट फॉम्र्युला वापरून बरोबर मधली एक प्रॉडक्शन लेवल ठरवतात जिथे ना नफा ना तोटा. तोच ब्रेक-इवन-पॉइंट. समज, आपला कारखाना दिवसाला जास्तीत जास्त शंभर पार्ट बनवू शकतो. जर प्रॉफिट मार्जनि भरपूर असेल तर पस्तीस-चाळीस पार्ट करूनदेखील हा पॉइंट गाठता येईल. पण ओवरहेड खर्च जास्त असेल आणि ते सर्व भागवायला सत्तर-पंचाहत्तर पार्टस् करावे लागणार असतील तर समजायचं हा ब्रेक-इवन-पॉइंट बराच वर आहे व इतके पार्टस् करू शकलो नाही वा विकू शकलो नाही तर धंदा तोटय़ात जाणार.
आपल्या नव्या प्रोजेक्टचा माझ्या हिशेबाने हा पॉइंट आलाय पंचेचाळीस, पण साठेसाहेबांना तो पन्नासच्या पुढे असणार असं वाटतंय. ठीक आहे, बघू त्यांचा कन्सल्टंट काय उजेड पाडतोय तो.’’
साठेसाहेबांनी बी. नरेश या कन्सल्टंटकडे रिपोर्ट पाठवून दोन आठवडे झाले होते. आबासाहेबांनी हे प्रकरण इतिहासजमा झाले, पुन्हा दुसऱ्या बँकेकडे प्रयत्न करायला हवा असे मनाशी पक्के केले असतानाच नरेशांनी स्वत: फोन करून भेटीची वेळ ठरवली. माझ्याच खर्चाने माझा अमूल्य वेळ वाया घालवून वर मला वाटाण्याच्या अक्षता बँक लावणार हा ‘आ बल मुझे मार’ प्रकार आबासाहेबांना पूर्णतया नापसंत असला तरी भेटीला जाणे भाग होते. आपल्याला एका त्रासिक चेहऱ्याच्या, विद्वत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या प्रौढ इसमाला भेटावे लागणार, त्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये तो आपल्याला वाट पाहात ताटकळत ठेवणार हा त्यांचा अंदाज मात्र पार चुकला.
बी. नरेश हा साधारण आबासाहेबांच्याच वयाचा तरतरीत तरुण त्याच्या छोटय़ाशा ऑफिसमध्ये त्यांची वाट पाहात होता. एका खोलीचेच ग्लास पार्टिशनने रिसेप्शन व नरेशांची केबिन कम कॉन्फरन्स रूम असे भाग केलेले. नरेश व त्यांची सेक्रेटरी एवढाच स्टाफ.
नरेशांनी हसून केलेल्या स्वागताला आबासाहेबांनी अगदी थंड प्रतिसाद दिला. त्यांच्या बोलण्यातला कोरडेपणा व तुटक वृत्ती नरेशांना नक्की जाणवली असणार. किंबहुना ते जाणवावे असेच ते मुद्दाम वागत होते. पण बी. नरेशांचे होमवर्क चोख आहे याचा प्रत्यय आबासाहेबांना पहिल्या पंधरा-वीस मिनिटांतच आला आणि लवकरात लवकर परतण्याच्या इराद्याने आले असूनही त्यांना दोन-अडीच तास कसे गेले ते कळले नाही.
नंतरचे चार-पाच आठवडे आबासाहेब जणू दुसऱ्या जगात वावरत होते. नरेशनी केवळ त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट सुधारला नाही तर प्रोजेक्टकडे पाहण्याची एक नवी दृष्टीच त्यांना दिली.
आज फायनल सीटिंग होते आणि आबासाहेबांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त केल्या.
‘‘मि. नरेश, मी किती नाखुशीने तुमच्याकडे प्रथम आलो होतो हे तुम्हाला चांगले माहिती आहे. खरं तर तुमची माझी गाठ पडणे हा एक अपघातच होता. पण कथा-कादंबऱ्यात नायकाला अपघात होतो आणि अचानक त्याची स्मरणशक्ती परत येते तसं काहीसं माझं झालं आहे. ज्या गोष्टी मी गेल्या काही वर्षांत ट्रायल-एररने शिकलो व नकळत आत्मसात केल्या, त्यांचा उपयोग हा रिपोर्ट बनविताना मी करू शकलो नव्हतो. तो मार्ग मला तुम्ही दाखवलात, याबद्दल तुमचे आभार कसे मानायचे, मला कळत नाही.’’
‘‘तुमच्यासारख्या यशस्वी उद्योजकाकडून असे सर्टिफिकेट याहून मला काय हवंय? पण कुलकर्णीसाहेब, नक्की कोणत्या बाबींतले माझे योगदान तुम्हाला इतके महत्त्वाचे वाटते?’’
‘‘तशा अनेक लहान-मोठय़ा सुधारणा तुम्ही केल्यात, पण दोन-तीन अत्यंत महत्त्वाच्या सांगतो. माझा िपड इंजिनीअरचा. जे करायचं ते शंभर टक्के अचूकच असायला हवं हा माझा हट्ट. त्यासाठी बरीच टेस्टिंग व मेजरिंग इन्स्ट्रमेंट्स माझ्या मशीनरी लिस्टमध्ये होती. तुम्ही मला दाखवून दिलंत की क्वॉलिटीशी तडजोड न करता बरेच टेस्टिंग/मेजिरग गाळता येईल. त्यामुळे मशीनरीच्या किमतीत पण घट होईल व प्रॉडक्शन प्रोसेस विनाकारण स्लो-डाऊन होणार नाही.
दुसरे, माझा अंदाज प्रत्येक शिफ्टसाठी साठ कामगारांचा होता. तुम्ही योग्य मॅन-मशीन रेशो वापरून व क्वॉलिटी कंट्रोलची माणसे कमी करून तो आकडा चाळीसवर आणलात.’’
नरेशांचा चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. ‘‘वा कुलकर्णीसाहेब! तुम्ही माझ्या श्रमांचे व कामाचे अगदी अचूक मूल्यमापन करता आहात, रिअली थँक यू!’’
‘‘तुमची फी वाढवणार नसाल तर आणखी पण सांगतो. माझी प्रॉफिटॅबिलिटी एस्टिमेट्स खरोखरच अगदी प्राथमिक दर्जाची होती. मोठय़ा धंद्यात येणारे अनेक अवांतर खर्च माझ्या लक्षातच आले नव्हते, विशेषत: सेल्स आणि मार्केटिंगचे. एका बाजूने तुम्ही हे खर्च वाढवलेत, पण लेबर कॉस्टमध्ये बचत कशी करता येईल तेही दाखवून दिलंत.
पण मला सर्वात आवडला तुमचा क्वॉलिटी कंट्रोलचा मार्ग. मी अजून जुनीच पद्धत वापरतोय. फायनल प्रॉडक्ट झालं की, क्वॉलिटी कंट्रोल डिपार्टमेंट चेक करणार व बराच माल रिजेक्ट झाल्याने पसा आणि श्रम वाया जाणार. त्याऐवजी तुमच्या मेथडप्रमाणे कच्च्या मालाच्या निवडीपासून प्रॉडक्शनच्या प्रत्येक स्टेजला क्वॉलिटी कंट्रोल करून शेवटी टोटल क्वॉलिटी एवढी वाढवायची की रिजेक्शन अत्यल्प. ही कल्पना मला नवीन होती असे नाही. अनेक जर्नल व पुस्तकांतून हे वाचलं आहे, पण ते प्रत्यक्षात कसं आणायचं हे तुम्ही दाखवून दिलंत. माझ्या ज्ञानांत पडलेली ही सर्वात महत्त्वाची भर.
बरं ते जाऊ द्या. इतका नाठाळ विद्यार्थी मिळाल्याने तुम्हाला जो त्रास सुरुवातीला झाला याबद्दल तुम्ही मला माफ करायला हवं.’’
‘‘कुलकर्णीसाहेब, उगाच लाजवू नका. प्रत्येक प्रोजेक्ट आम्हाला काहीतरी नवं शिकवतो. पण तुमच्याकडून मी जे काही शिकलो त्याची लिस्ट तुमच्या लिस्टपेक्षा मोठी आहे एवढं अगदी मनापासून सांगतो. हे अहो रूपं, अहो ध्वनी मानू नका.’’ बी. नरेशनी प्रांजळपणे समारोप केला.
एकमेकांचा निरोप घेताना दोघांनीही खूणगाठ बांधली होती की, आपण यापुढेही एकत्र काम करणार आहोत.
(क्रमश:)

आबासाहेब कुलकर्णीच्या मेहनतीचे हळूहळू का होईना, पण चांगले परिणाम दिसू लागले होते. के. फॅब्रिकेटर्स अॅण्ड कास्टिंग्ज छोटे असले तरी त्याची दखल पुण्या-मुंबईमधील मोठय़ा इंजिनीअरिंग कारखान्यांनी घेतली होती.