मुलाखत
पूजा सामंत – response.lokprabha@expressindia.com

नव्या वर्षांचं स्वागत तुम्ही कसं केलंत? कोणते नवे संकल्प केलेत?

काजोल : आमचा युग आता नऊ वर्षांचा आहे. तो आणि लेक न्यासाच्या ख्रिसमसच्या सुट्टय़ा सुरू आहेत. पण मी आणि अजय ‘तान्हाजी’च्या प्रमोशन्समध्ये गुंतलो आहोत. त्यामुळे एडिटिंग, पोस्ट प्रॉडक्शनमधून अजय थोडा लवकर घरी आला आणि आम्ही बाहेर कुठे न जाता घरीच जेवण घेतले. आम्ही चौघे साधारण १५ जानेवारीनंतर सुट्टीसाठी बाहेर जाऊ. ‘तान्हाजी’प्रदर्शित झाला की थोडा मोकळा श्वास घेता येईल. घरचा सिनेमा असला की हा सगळा ताण असतोच. पण आम्ही नव्या सिनेमाच्या कामात बिझी आहोत हे युगला समजायला लागलं आहे. त्यामुळे तो हट्ट करत नाही. उलट अजय घरी आला की, ‘मम्मा तानाजी आ गया!’ असं सांगतो. अगदी अजयशी फोनवर बोलतानाही युग त्याला म्हणतो, ‘बोलो तानाजी’ हे ऐकून आम्ही सगळे हसत सुटतो! मी पूर्वी नव्या वर्षांचे संकल्प करायचे, पण ते टिकत नसत! आता तर करतच नाही.

अजय : संकल्प? काय असतं ते? मी काही संकल्पबिंकल्प करत नाही. एखादी गोष्ट -काम करण्याचा निर्धार झाला की ते करून टाकतो. मी आजवर जे निर्णय घेतलेत ते माझ्या मनाने. नववर्षांचे संकल्प म्हणून कधी कोणती गोष्ट केली नाही.

काजोल, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या तुझ्या  ‘हेलिकॉप्टर एला’  सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून खंतावलीस का ? ‘तान्हाजी’ मधली सावित्री तुला का करावीशी वाटली?  ‘तान्हाजी’ करण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल तुम्हा दोघांना किती माहिती होती?

काजोल : ‘हेलिकॉप्टर एला’ आणि ‘तान्हाजी’ या दोन सिनेमांच्या तुलनेत काहीही अर्थ नाही, कारण प्रोदीप सोरकार यांच्या ‘हेलिकॉप्टर एला’मध्ये आई आणि तिचा तरूण मुलगा यांच्यातील भावनिक नाते दर्शवलं होतं. त्याची निर्मिती आमचीच होती. नायिकाप्रधान सिनेमा आणि प्रोदीप सोरकार दिग्दर्शक असल्याने मी तो करावा असं अजयला वाटत होतं. ‘हेलिकॉप्टर एला’ प्रेक्षकांना फारसा रुचला नाही. पण आमच्या व्यवसायात हिट फ्लॉप हे ऊन -पावसासारखं सुरू असतं. त्याने मी खंतावले, नराश्य आलं असं आजतागायत कधी घडलं नाही! इट्स ऑल पार्ट ऑफ लाइफ!  माझी आजी (शोभना समर्थ) स्वत निर्माती होती, तिचीदेखील आíथक गणितं तिच्या काळात चुकली. माझे दोन्हीकडचे आजोबा -कुमारसेन समर्थ आणि शशधर मुखर्जी निर्माते होते, माझे वडील (शोमू मुखर्जी) काका जॉय आणि देब हे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक होते. निर्मिती, अभिनय, दिग्दर्शन हे असं वंशपरंपरेने आलं आहे माझ्याकडे. त्यामुळे हिट-फ्लॉप हे चालतंच, हे मला माहीत आहे.

असो, ‘तान्हाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा आहे, सत्य घटनेवर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘उजवा हात’ असलेल्या तानाजी मालुसरे यांचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे. पण तसे फार तपशील मिळत नाहीत, कारण इतिहासाला सगळ्याच घटना, संदर्भ, थोर नेते यांना न्याय द्यायचा असतो.  इतिहासाने तानाजी किंवा अशाच योद्धय़ांवर अन्याय केला असला तरी त्यांच्यावर अजय चित्रपटांची निर्मिती करत राहणार आहे. त्या माध्यमातून पुढील पिढय़ांना अशा थोरांचं कर्तृत्व कळावं असं त्याला वाटतं. मला तानाजीबद्दल अभ्यासक्रमातून मिळाली तेवढीच माहिती आहे.

अजयने मला तानाजी मालुसरे यांच्या प्रेमळ पण कणखर -खंबीर पत्नीची, सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका देऊ केली. लेखक -दिग्दर्शक ओम राऊत आणि अजय या दोघांचं म्हणणं होतं की ही भूमिका मीच चांगली करू शकेन. घरचाच सिनेमा, मला प्रथमच करायला मिळत असलेली ऐतिहासिक व्यक्तिरेखा, नऊवारी साडी नेसून तेव्हाची मराठमोळी स्त्री उभी करणं या सगळ्यामुळे मला सावित्रीबाई ही व्यक्तिरेखा करावीशी वाटली.

अजय : सावित्रीबाईंची भूमिका काजोलनेच (अजय काजल म्हणतो) करावी असं माझं म्हणणं होतं. मला तिच्या अभिनयक्षमतेची खात्री होती. ती चेहऱ्यावरची एक्स्प्रेशन्स फार उत्तम व्यक्त करते. तिला मी सावित्रीबाईंची ऑफर दिली तेव्हा तर ती गमतीने मला म्हणाली, तुला पैसे वाचवायचे आहेत, म्हणून तू मला सावित्रीबाईची भूमिका देतो आहेस.

काजोलने सावित्रीबाई करावी म्हणून तिला राजी करावं लागलं का?

अजय : अजिबातच नाही. आमच्या लग्नानंतर ती सिनेमाच्या निवडीविषयी फार काटेकोर झालीये, असं नाही. तिने नेहमीच मोजकेच सिनेमे केले आहेत. ओम राऊतला (दिग्दर्शक) सावित्रीबाई मालुसरे भूमिकेसाठी उत्तम अभिनेत्री हवी होती. काजोलच्या अभिनयाबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नव्हतं!

सावित्रीबाई आणि तानाजी या ऐतिहासिक भूमिकांसाठी तुम्हा दोघांना काही तयारी करावी लागली का?

काजोल : अज्जिबात नाही! ओम राऊत लेखक दिग्दर्शक म्हणून नवोदित असला तरी त्याने पूर्ण तयारीनिशी ही पटकथा अजयसमोर आणली. त्यासंदर्भातलं सगळं संशोधनही त्यानेच केलं. मला आणि अजयला भूमिकेच्या दृष्टिकोनातून काही संशोधन करावं लागलं नाही, इतक्या त्याने व्याक्तिरेखा सविस्तर लिहिल्या होत्या.  प्रसिद्ध फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे याने माझा लुक (नऊवारी साडी, दागिने) केला तर माझा स्नेही मिकी काँट्रॅक्टर (मेकअप आर्टस्टि ) याने सावित्रीबाईच्या भूमिकेसाठी माझा मेकअप केला. पुण्याहून ७५ वर्षांच्या एक आजी मला नऊवारी नेसवण्यासाठी येत असत. मी दुर्दैवाने त्यांचे नाव विसरले!! असो, मेकअप करून, दागिने घालून, नऊवारी साडी नेऊन कोंढाणा किल्ल्यावर (फिल्मसिटीमधल्या सेटवर) पोहोचले की मला आपोआपच मी सावित्रीबाई मालुसरे आहे असं वाटायचं!

सावित्रीबाई आणि काजोल यांच्यात तसंच तानाजी मालुसरे आणि अजय देवगण यांच्यात काही साम्य आहे का?

काजोल : खरं म्हणजे १६व्या शतकातील स्त्रियांना अमुक करायचं, तमुक करायचं नाही अशा मर्यादा नव्हत्या असं मला वाटतं.  जिजाबाई असो, हिरकणी असो वा तानाजीची पत्नी सावित्रीबाई असो, त्यांना रणभूमीवर जाण्यास मज्जाव नव्हता! घरीदारी सर्वत्र कर्तुत्व दाखवण्याची संधी होती. त्या पती, पिता, बंधू यांचा मानसिक आधार, प्रेरणा होत्या. मला असं वाटतं की सावित्रीबाईप्रमाणे मीही एक संसारी स्त्री आहेच, पण घर आणि करिअर यांचा मेळ मी घालू शकले. ती संधी सगळ्यांना मिळेल असं नाही. मी सावित्रीबाईप्रमाणे माझ्या क्षेत्रात माझा ठसा उमटवू शकले. मी कामाबाबत स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी करत नाही, कधी केली नाही. विमान चालवणं अथवा कार चालवणं ही पुरुषांची कामं आहेत, असं मी कधी मानलं नाही, कारण माझ्या पणजी, आजी, आईने तसं कधी मानलं नाही. आमच्या घरात आजी (शोभना समर्थ), आई (तनुजा) आणि आम्ही दोघी बहिणी, आमचंच राज्य असे. घरात नळ गळतोय, किंवा फ्यूज गेला म्हणून प्लम्बर -इलेक्ट्रिशियन आल्याचं मला आठवत नाही! सगळी कामं आजीच बिनभोभाट करायची. माझी आजी आम्हा सगळ्यांना कारमध्ये बसवून मुंबईहून तिच्या लोणावळाच्या फार्म हाऊसमध्ये जायची. बहुतेक वीकेंड्सना आमची वरात धमाल करत जात असे. कधी तिची कार घाटात बंद पडली की आम्हाला वाटायचं, आता मेकॅनिक कुठे मिळणार? पण आजीने बॉनेट उघडून स्वतची कार दुरुस्त केलेली आम्ही अनेकदा पाहिलंय! स्वतचे आíथक व्यवहार तिने कायम सांभाळले. स्त्रिया दुय्यम नाहीत, उलट अनेक बाबतींत त्या खंबीर आहेत असं आई-आजी मानत. माझ्यावर हेच संस्कार झालेत. असं जगात कुठलंही काम नाही जिथे पुरुषांची मक्तेदारी असेल!

अजय : माझ्यात आणि तानाजी मालुसरेंमध्ये कुठलेही साम्य नाही. कसं असेल? मी सामान्य माणूस तर तानाजी एक शूर-साहसी सेनापती. तानाजीमध्ये जे प्रखर राष्ट्रप्रेम -निष्ठा -समर्पण होतं ते हल्ली बघायला मिळत नाही! ‘तान्हाजी’ सिनेमाची निर्मिती याचसाठी की नव्या पिढीला तानाजी या असामान्य योद्धय़ापासून प्रेरणा मिळावी.

‘तान्हाजी’मध्ये सफ अली खान हा उदयभानच्या भूमिकेत आहे, काजोल, सफ ‘यह दिल्लगी’मध्ये तुझा नायक होता. काय बॉिण्डग आहे तुमच्यात आता?

काजोल : ‘सफ अतिशय बुद्धिमान आहे. आम्हा दोघांनाही वाचनाची आवड आहे. सफने १९८९ मध्येही मला अनेक पुस्तकं सुचवली होती. मी सिनेमात काम करणं कमी केल्यानंतर भेटी कमी झाल्या होत्या. पण ‘तान्हाजी’च्या प्रमोशन्ससाठी मात्र आम्ही अनेकदा भेटतोय. पुन्हा पूर्वीच्या गप्पा सुरू झाल्यात. इट्स प्लेझर वìकग विथ सफ!’

अजय : मीदेखील सफसोबत ‘कच्चे धागे’, ‘ओंकारा’ हे सिनेमे केले आहेत. सफने कुठलेही आढेवेढे न घेता उदयभान ही भूमिका स्वीकारली. ती व्यक्तिरेखा दुष्ट, कावेबाज, छद्मी आणि थोडी स्टायलिशदेखील आहे. या सगळ्याच छटा त्याने उदयभान करताना दाखवल्या!

तुझ्या आणि अजयच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झालीत. या प्रवासाकडे वळून बघताना आज नेमकं काय वाटतं?

काजोल : अजयशी माझी पहिली भेट ‘हलचल’ सिनेमा करताना झाली. मी खूप बडबडी आहे असं त्याला वाटायचं. तर मला वाटायचं की या मुलाला खूप अटिटय़ूड आहे! आम्ही दोनतीन सिनेमे एकत्र केले आणि ‘प्यार तो होना ही’ या सिनेमादरम्यान आम्ही लग्न करायचं ठरवलं. पण आम्ही एकमेकांना कधी आय लव्ह यू वगैरे म्हटलं नाही!

‘फूल और कांटे’ हा अजयचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्याचं करिअर चांगलंच फुललं.  मला त्याचा अभिनेता म्हणून अभिमान आहे आणि आमच्या नात्यात मी आनंदी आहे. एकमेकांना स्पेस देत आम्ही पुढे जात आहोत. माझं करिअर ऐन भरात होतं तेव्हा मी अजयशी लग्न करायचा निर्णय घेतला. खरं तर मी तेव्हा अजयशीच काय पण कुणाशीही लग्न करण्याची घाई करू नये असं माझ्या वडिलांना वाटत होतं. पण मला लग्न करायचंच आहे, असं मी सांगितल्यावर कुणी आडकाठी घेतली नाही.

अजय : आमच्या घरी माझ्या लग्नाबाबत काहीही अटी -बंधनं नव्हतीच कधी. काजल आमच्या घरात दुधातल्या साखरेसारखी विरघळून गेली आहे.

तुमच्या दोघांमध्ये काय साम्य आहेत?

काजोल : छे! छे! आमच्या स्वभावात खूप तफावत आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहोत आम्ही. १५-२० वर्षांपूर्वी अजय खूप अंतर्मुख होता. एखाद्या शांत डोहासारखा अबोल आणि गंभीर. तेव्हा मी खूप बोलत असे. पण आता उलटं झालंय. तो बोलतो आणि मी शांत असते. त्याच्या फिल्म मेकिंग, डायरेक्शन, कािस्टगबाबत मी कधीही ढवळाढवळ करत नाही. तोही सिनेमात अभिनय कर अथवा करू नकोस, कुणाबरोबर काम कर अथवा करू नकोस असे कुठलेही सल्ले माझ्यावर थोपत नाही. त्याच्या व्यावसायिक जीवनात मी ढवळाढवळ करत नाही. आमचे व्यावसायिक आयुष्य आमच्या वैवाहिक जीवनाच्या आड येत नाही!

आम्ही हनीमूनला गेलो तेव्हा ८-१५ दिवसांतच त्याला घरची आठवण यायला लागली. तेव्हा मला वाटलं, असा काय हा, अजून अर्ध जग बघायचं राहिलंय आणि याला घरी जाण्याचे वेध लागलेत! पण तो अजय आहे, हे मी कालांतराने स्वीकारलं. मी पुस्तकी किडा आहे, टिपिकल पत्नी नाही हे त्याला ठाऊकच होतं.

पत्नी अभिनेत्री-मॉडेल अशा ग्लॅमरस व्यवसायात असली की काही नवऱ्यांना असुरक्षित वाटतं. पण नवरा म्हणून, अभिनेता म्हणून अजय त्याला अपवाद आहे. वडील म्हणूनही त्याने त्याची जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळली आहे.

शाहरुखसोबत मी २०१५ मध्ये ‘दिलवाले’ सिनेमा केला होता, त्या वेळेस न्यासा आणि युग दोघेही लहान होते. बल्गेरियाला माझं दोन महिन्यांचं शूटिंग होतं, त्या वेळेस अजयने त्याचा पूर्ण वेळ मुलांना दिला! मी धास्तावले होते, पण अजयने त्याची जबाबदारी खूप नेटकी पार पाडली! वाद झाले तरी ते मुलांसमोर कधीही आणायचे नाहीत हा अलिखित नियम आम्ही कटाक्षाने पाळतो.

अजय : पत्नी म्हणून मला काजलविषयी प्रेम आहेच, कलाकार म्हणून आम्हा दोघांना एकमेकांविषयी आदर आहे. एकमेकांना स्पेस देत आम्ही इथवर आलो आहोत. ती देणं महत्त्वाचं.

तुझ्या करिअरला २८ वर्षे झालीत. कितपत संतुष्ट आहेस तू तुझ्या करिअरबद्दल?

काजोल : मी १७ वर्षांची होते तेव्हा मी ‘बेखुदी’ हा पहिला सिनेमा केला. आता २०१९ मध्ये ‘तान्हाजी’ केला तेव्हा मी हाच विचार करत होते, आज मला नायिकेचीच भूमिका हवी असा अट्टहास नाही, पण भूमिकेचा प्रभाव हा त्या कथानक आणि सिनेमावर पडावा. माझी आई -तनुजा, तिच्यासोबत एखादा तरी चित्रपट करायला मिळावा अशी इच्छा आहे. पण ती हल्ली फिल्म्स करू इच्छित नाही . पाहूया कधी योग येतोय तो!

अजय : मी अतिशय विनम्र -कृतज्ञ आहे. चांगले िहदी आणि मराठी सिनेमे करायचे -उत्तम पण वैविध्यपूर्ण सिनेमांचं बेअिरग सांभाळायचं असा मानस आहे.

तुमच्या मुलांना तुमचे कुठले सिनेमे आवडतात?

काजोल : आमचे हॅपी गो लकी टाइप सिनेमे बघणं युगला आवडतं. न्यासा आता मोठी झालीये. तिला हे समजायला लागलं आहे की अभिनय करताना विविध भूमिका करणं हे कलावंत म्हणून तुमची वाढ होण्यासाठी गरजेचं असतं.

अजय : मला फायटिंग करताना बघून युग थोडा भावूक होतो. मला ऑन स्क्रीन मार खाताना पाहिलं की त्याला रडू येतं. गोलमाल हा सिनेमा त्याला खूप आवडतो. कारण मला गोपाळच्या विनोदी भूमिकेत पाहणं म्हणजे त्याच्यासाठी मोठा आनंद सोहळा असतो.

अजय, बॉलीवूडचा हिरो म्हणजे तो गोराचिट्टा असं सर्वसाधारण मत आहे. हिरोच्या या पारंपरिक प्रतिमेमध्ये तू बसत नाहीस!

अजय : मला  सुरुवातीपासून स्वतबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता. माझे वडील वीरू देवगण (प्रसिद्ध अ‍ॅॅक्शन डायरेक्टर ) यांची प्रचंड मेहनत, हुशारी, कल्पकता आजही वाखाणली जातेय. मी सगळी सिनेसृष्टी -अ‍ॅक्शन, स्टंट्स त्यांच्याकडून, त्यांच्या नजरेतून शिकलो. न्यूयॉर्कला जाऊन अ‍ॅॅिक्टग क्लास करणं, सिक्स पॅक्स अ‍ॅब्ज यांच्या मागे न लागता मी वडिलांचा हात धरून इथे व्यावहारिक ज्ञान मिळवलं. ‘मिस्टर इंडिया’ असो वा ‘रूप की रानी, चोरो का राजा’ असो त्यांनी स्टंट्स केलेले शेकडो सिनेमे आहेत. शक्ल से ज्यादा अक्ल होनी चाहिए, लम्बे रेस का घोडा बनना है तो टैलेंट होनी चाहिए’ या तत्त्वावर ते पुढे गेले आणि माझाही त्यावर ठाम विश्वास आहे. टिपिकल हिरो लुक्स नाहीत म्हणून माझं कुठंही अडलं नाही हे तुम्ही पाहताच. आजही राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, अगदीच काय तर आयुष्मान खुराणा, विकी कौशल हे काही फार देखणे वगैरे हिरो नाहीत, पण आज ते ‘स्टार’ आहेत.! माझ्याकडे आत्मविश्वास होता त्यामुळे माझं कुठेच अडलं नाही. टिपिकल फिल्मी चेहरा नसला तरी माझी अभिनयाची गाडी आज २९ वर्षे सुसाट धावतेय, याचा मला अभिमान वाटतो!’

तुम्ही दोघेही सेलेब्रिटी आहात. त्यामुळे तुमच्या मुलांना मिळणाऱ्या मीडिया अटेन्शनबद्दल तुमची काय मतं आहेत?

अजय : या गोष्टीचं काहीच करता येत नाही! माझ्या मुलीला अभिनयात रस नाही असं ती सध्या म्हणतेय. युगची स्वतची मतं तयार व्हायला थोडा वेळ लागेल. आम्ही जाऊ तिथे पापाराझी संस्कृती आहेच. त्याला आमचा नाइलाज आहे. मुद्दाम एखादी गोष्ट टाळली की ती आपोआप आपल्या जवळ येते. सेलेब्रिटी होण्याचे काही फायदे असतील तर काही तोटे असतात.

काजोल : मी आणि अजय तसे लो प्रोफाइल आहोत. अजय तर त्याच्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत सिनेमाच्या पाटर्य़ानाही फारसा कधी गेला नाही. माझंही तसंच आहे. आमच्यावर रोखलेले कॅमेरे आता आमच्या मुलांच्या दिशेनेही वळतात. हे आम्हाला पालक म्हणून नकोसं वाटतं. पण आता त्याला नाइलाज आहे! मुलांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर पुढे यावं, आमच्या सेलेब्रिटी स्टेट्समुळे त्यांचं बालपण हिरावलं जाऊ नये, त्यांनी नॉर्मल आयुष्य जगावं अशीच आमची इच्छा आहे. पण ते आता आमच्या हातात नाहीये. आमच्या दोघांमध्ये मी कडक आहे तर तर अजय मुलांशी एकदम फ्रेंडली आहे!

‘तान्हाजी’नंतर आता पुढे काय?’

काजोल : लेखक -दिग्दर्शक रेणुका शहाणे यांच्या ‘त्रिभंगा’ या सिनेमाचं शूटिंग मी हल्लीच पूर्ण केलं आहे. तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत. ती नेटफ्लिक्सची निर्मिती आहे.

अजय : ‘मदान’ तसंच ‘भूज’ हे माझे दोन सिनेमे सध्या मी पूर्ण करतोय. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला ‘बिग बुल’ पूर्ण झालाय, या सिनेमाची निर्मिती माझी आहे. ‘तानाजी’ सिनेमाची मराठी आवृत्तीदेखील आहेच.