माणसाला अन्न आणि वस्त्राइतकीच महत्त्वाची गरज असते निवाऱ्याची. म्हणजेच घराची. घर या शब्दावरून मराठी भाषेत वेगवेगळ्या म्हणी आणि वाक् प्रचार आहेत. त्याबद्दल-
आज पद्मजासाठी शिकवणीचा शब्द होता. ‘घर’. मी म्हटले, ‘‘पद्मजा, ज्या घरात राहून तू मराठीचे धडे गिरवत आहेस त्या वास्तूबद्दल आज मी तुला शिकविणार आहे.’’ घर म्हणजे होम असे सांगून मी नेहमीच्या पद्धतीने शिकवणी चालू केली.
वर्तमानपत्रात लोकसभा निवडणुका विदूषकाप्रमाणे वागणाऱ्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली लढविल्यामुळे आपण हरलो, असा आरोप त्याच पक्षाच्या पराभूत उमेदवाराने केला होता, अशी बातमी होती. या बातमीचे शीर्षक म्हणूनच ‘घरचा आहेर’ असे ठेवले होते. मी पद्मजाला म्हटले घरचा आहेर देणे म्हणजे जवळच्याच एखाद्या व्यक्तीने टीका किंवा कानउघाडणी करणे.
दुसरी बातमी होती ‘न घर का न घाट का’ अशी स्थिती झालेल्या एका नेत्याची. पद्मजाला म्हटले, ‘‘न घर का न घाट का, म्हणजे न इथला न तिथला असे झाल्यामुळे हाती काहीच न पडणे.
तिसऱ्या बातमीमध्ये एका नामवंत कलाकाराने म्हटले होते की  ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या उक्तीवर माझा मनापासून विश्वास आहे. मला चहाचा कप देताना सौ.देखील पेपरमध्ये डोकावली व म्हणूनच ती पटकन उद्गारली, ‘‘पद्मजा निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे सच्चा टीकाकार आपल्या आसपास असावा. त्याच्या टीकेमुळे आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा आपणास मिळते व त्यामुळे आपण अधिकाधिक परिपूर्ण होत जातो.’’
इतक्यात बाहेरून रखवालदाराचा आवाज आला. तो बिल्डिंगमध्ये घुसणाऱ्या भटक्या कुत्र्याला हाकलवून देत होता. ते पाहून मी पद्मजाला म्हणालो, ‘‘कुत्र्यावरून आठवले, मराठीमध्ये एक म्हण आहे ‘थोराघरचे श्वान त्याला अहो हाड म्हणावे.’ याचा अर्थ होणार एखाद्या नामवंत माणसाच्या आजूबाजूस सदैव वावर असणाऱ्या फडतूस माणसाला पण त्याची खरी लायकी नसताना मान देणे भाग पडते. किंवा वेळप्रसंगी त्याचा उपमर्द करतानादेखील गोड शब्द वापरावे लागतात.’’

मी शिकवणीकडे परत वळणार एवढय़ात शेजारच्या नेने काकू आमच्याकडे फ्रीजमध्ये ठेवायला फुले व दूध घेऊन आल्या. आमचा फ्रीज तर सदैवच भरलेला असतो, त्यामुळे ते पाहून माझी सौ. पटकन म्हणाली, ‘‘हे म्हणजे ‘घरचे झाले थोडे व व्याह्यने धाडले घोडे’. पण नेने काकूंचा गैरसमज होऊ  नये म्हणून सौ.ने हे वाक्य पद्मजासाठी होते असा पटकन खुलासादेखील करून टाकला.
नेने काकू आल्याने साहजिकच महिला मंडळाचे आवडीचे गॉसिपिंग चालू झाले. त्यांनादेखील पद्मजा व मराठी शिकवणी प्रकरण एव्हाना चांगलेच माहीत झाले होते. त्यामुळे त्यांनीही ‘घर चंद्रमोळी, पण बायकोला साडीचोळी’ असा एक वाक्प्रचार सुचविला. मी तो गृहपाठ म्हणून पद्मजासाठी राखून ठेवला.
आता शिकवणीचा पुढचा टप्पा सौ, आई व सासूबाई घेतील असे पद्मजाला सांगून मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या खोलीत गेलो. सासूबाई म्हणाल्या, ‘‘पद्मजा, जुन्या घराला वासे असायचे. वासे म्हणजे बीम्स.’’ असे सांगून त्यांनी खाल्ल्या घरचे वासे मोजणारा असा एक नवीन अर्थ पद्मजाला सांगितला. ज्या व्यक्तीने आपले भले केले त्याचेच वाईट व्हावे असे चिंतणाऱ्या माणसाला उद्देशून हा वाक्प्रचार वापरतात असे काहीसे पद्मजाने डायरीमध्ये नोंदवून घेतले.
‘घर फिरले की घराचे वासे पण फिरतात’ याचा अर्थही पद्मजाला सांगा असे टीव्ही पाहता पाहता नूपुर बेडरूममधून ओरडली. त्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘नूपुर अर्धे काम करू नकोस, म्हण सांगितलीस तर अर्थ पण तूच सांग.’’

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

त्यावर नूपुर म्हणाली, ‘‘ताई, याचा अर्थ होणार वाईट दिवस आले की सगळेच मनाविरुद्ध घडते.’’
एवढय़ात अंथरुणात लोळणारा सौमित्र म्हणाला, ‘‘ताई चल, माझ्याकडून पण तुला एक नवीन अर्थ.. ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’. म्हणजे परस्पर दुसऱ्याच्या जीवावर एखादा दानधर्म करणे किंवा शब्द देऊन मोकळे होणे.’’ पद्मजाला अर्थ नीट समजावा म्हणून मी काम करता करता म्हणालो की पुढारी सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कर्जमेळावे भरवतात व सरकारी बँकांना कर्ज देण्यास भरीस पाडतात, पण जेव्हा ही कर्जे थकतात व बँकेची आर्थिक घडी विस्कटते तेव्हा हेच पुढारी गायब होतात. या वृत्तीला तू हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असे म्हणू शकतेस.
इतक्यात स्नेहाआजी माझ्या सौ.ला म्हणजे तिच्या सुनेला म्हणाली, ‘‘आता दोन दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे तेव्हा बाजारात जाशील तेव्हा साबुदाणा, रताळी असे सर्व उपवासाचे पदार्थ घेऊन ये.’’ स्नेहाआजीला पण एकादशीवरून एक म्हण पटकन आठवली; ती म्हणजे ‘एकादशीच्या घरी महाशिवरात्र.’ पद्मजाला ती म्हण समजावून सांगताना सौ. म्हणाली की कधी कधी आपलेच प्रॉब्लेम आपल्याला नकोसे झालेले असतात व त्याच वेळी दुसरा कोणीतरी त्याचे प्रॉब्लेम आपल्याकडे घेऊन येतो. अशा वेळी ही म्हण वापरली जाते.
अंथरुणात लोळणारा सौमित्र अजून उठत नाही हे पाहून प्राजक्ता म्हणाली, ‘‘सौमित्र, लोळून खूप झाले, आता तोंडावर चटकन पाणी मार व फ्रेश हो.’’ त्यावर सौमित्र म्हणाला  कसा- ‘‘पाण्यावरून मला अजून एक म्हण आठवली पद्मजा ताईसाठी व ती म्हणजे ‘उद्योगाचे घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी.’’ जो माणूस मेहनतीचा ध्यास घेतो त्याच्या घरी ऐश्वर्य आपसूकच सदैव वास्तव्याला येते, असा अर्थ पद्मजाच्या डायरीमध्ये आपसूकच विसावला गेला.
‘घरकोंबडा’ असे अजून एक विशेषण आहे अशी पुस्ती जोडत स्नेहाआजीने शिकवणी पुढे रेटली. जो माणूस सदैव घरात बसून असतो व बाहेरच्या जगाशी फटकून राहतो किंवा बाहेरच्या जगात मिसळत नाही अशा माणसाला घरकोंबडा म्हणतात, असा अर्थ पद्मजाला आजीने सांगितला.
मराठीमधील घरावर आधारित म्हणी पाहून पद्मजा म्हणाली, ‘‘आता मला कानात सारखे घर घर असेच ऐकू येत आहे.’’ त्यावर माझी सौ. म्हणाली, ‘‘पद्मजा, घरघर असे दोनदा म्हणालीस की त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे या पक्षाला अखेरची घरघर लागली की काय, अशी शंका राजकीय पंडितांना येऊ  लागली आहे.’’ असे वाक्य सांगून तिने घरघर लागणे म्हणजे शेवट जवळ येणे असा अर्थ सांगून रंगलेल्या शिकवणीचा अनपेक्षित शेवट केला.     (समाप्त)