05 April 2020

News Flash

खेळ : मैदानावरचे तारे

एका भाडय़ाच्या खोलीत आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सोनाली शिंगटे राहायची.

सोनाली शिंगटे

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे

प्रशांत केणी

लोअर परळ म्हणजे कबड्डीचा बालेकिल्ला. येथील ना. म. जोशी मार्गावर अनेक जुन्या चाळी आपले अस्तित्व टिकवून आहेत. श्रमिक जिमखान्याच्या प्रवेशद्वाराशेजारची जुनी हरहरवाला चाळसुद्धा यापैकीच एक. तेथील दहा बाय दहाच्या खोल्या, सततच्या पावसाचा मारा खात उभ्या असलेल्या. त्यातल्याच एका भाडय़ाच्या खोलीत आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सोनाली शिंगटे राहायची. पण काही महिन्यांपूर्वीच तिच्या संघर्षमय आयुष्यात चांगले दिवस आले आहेत. आता ती सांताक्रूझ येथील रेल्वेच्या वसाहतीमध्ये राहते.

२०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघात सोनालीचा समावेश होता. त्यावेळी भारताने रौप्यपदक जिंकले होते. मग २०१९च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघात तिचा समावेश होता. गेल्याच महिन्यात सोनालीला राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले. ‘खूप मोठी स्वप्ने पाहण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने मी विचार करते. सध्या तरी राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेतील कामगिरीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवणे मला महत्त्वाचे वाटते,’ असे सोनालीने सांगितले.

सोनालीचे वडील विष्णू सुरक्षारक्षकाची नोकरी करायचे, तर अपंग आई खानावळ चालवायची. एकूण परिस्थिती बेताचीच. २९ वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या सावतवाडीहून वाडीहून हा परिवार मुंबईला आला, पोट भरण्यासाठी. त्याकरिता नाना उद्योग केले त्यांनी. चहाचा स्टॉल टाकला. त्यातून भागेना म्हणून सोनालीची आई साखरू यांनी खानावळ सुरू केली; पण त्याही परिस्थितीत त्यांनी सोनालीला शिकवले. विष्णू शिंगटे यांनी सुरुवातीला ज्या लोअर परळ रेल्वे कार्यशाळेबाहेर चहाची टपरी सुरू केली होती, त्याच रेल्वेमध्ये चार वर्षांपूर्वी सोनालीला नोकरी लागली. गतवर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा चालू असतानाच सोनालीचे पितृछत्र हरपले.

कुटुंबाच्या संघर्षांविषयी तिची आई सांगते, ‘‘तो काळ अत्यंत कठीण होता; पण आम्ही हिमतीने घर चालवले. सोनालीला नोकरी लागल्यापासून आता थोडे बरे दिवस आले आहेत.’’

आयुष्याशी कबड्डी सुरू असताना सोनाली प्रत्यक्ष कबड्डीच्या मैदानाकडे कशी वळली? याविषयी ती म्हणाली, ‘‘बालमोहनमध्ये शालेय शिक्षण सुरू  असताना मी कबड्डीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. बारावीची परीक्षा दिल्यानंतर सुटी सुरू झाल्यावर घरी आर्थिक साहाय्य करण्यासाठी नोकरी पत्करली आणि कबड्डी खेळायचे ठरवले. हौस तर होतीच, पण या खेळात प्रावीण्य दाखवल्यास पोलिसात नोकरी मिळते, हे ऐकून होते. पुढे राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनामुळे या खेळाकडे मी व्यावसायिकपणे पाहू लागले. सुवर्णा बारटक्के, गौरी वाडेकर, रक्षा नारकर यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंमुळे जीवनात ध्येय ठेवायला शिकले. रेल्वेत अशोक सुवर्णा, गौतमी राऊत, बनानी साहा यांचे मार्गदर्शन मिळते आहे.’’

मुंबईत नावलौकिक असलेल्या शिवशक्ती महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना सोनालीने महर्षी दयानंद महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी देना बँकेच्या (आता बँक ऑफ बडोदा) कबड्डीच्या शिष्यवृत्तीची फार मदत झाल्याचे ती सांगते. कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे एकदा प्रतिनिधित्व केल्यानंतर गेली चार वर्षे ती राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वेकडून खेळते आहे.

‘‘भिवंडीत २०१६ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्कूटी मिळाली होती. तो क्षण अजूनही माझ्या मनात ताजा आहे. त्याच वर्षी नोकरीसुद्धा मिळाली. कबड्डी हा खेळ माझी स्वप्ने पूर्ण करू शकतो, हे त्या वेळी माझ्या चांगलेच लक्षात आले. आज घरात बक्षिसांचे चषक ठेवायलाही पुरेशी जागा नाही; पण मला विश्वास आहे, की लवकरच स्वत:च्या मालकीच्या घराचे स्वप्नही ही कबड्डी पुरी करेल.’’ हे सांगताना सोनालीच्या चेहऱ्यावर खेळाबद्दलचे प्रेम आणि विश्वास दोन्हीही झळकत होते.

पोटासाठीची धाव

सुप्रिया दाबके

मॅरेथॉनसारख्या असंख्य शर्यती धावायच्या कशासाठी?.. तर पोटासाठी!.. हेच उत्तर आहे परभणीच्या गेली अनेक वष्रे चरितार्थ चालवण्यासाठी धावणाऱ्या ज्योती गवते हिचे. तंदुरुस्ती राखण्याच्या क्रेझमुळे मॅरेथॉनमधील सहभागाचा आकडा एकीकडे विक्रमी वेगाने वाढत असताना ज्योतीसारख्या काही धावपटूंचा शर्यती जिंकून घर चालवण्यासाठी असलेला संघर्ष लक्ष वेधून घेतो.

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक रवी रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ वर्षीय ज्योती मॅरेथॉनमध्ये धावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. चतुर्थ श्रेणी शिपाई पदावर नोकरी करणारे वडील काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. अनेक वर्षे १० बाय १०च्या झोपडीत ज्योतीने कुटुंबीयांसोबत आयुष्य काढले. मॅरेथॉनमध्ये जिंकलेल्या पैशाच्या बळावर ज्योतीने आता पक्के घर बांधले आहे. आजही ज्योतीचा मॅरेथॉनमधील सहभाग हा कुटुंब चालवण्यासाठी असतो. गेल्या वर्षी काठमांडूतील दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत (सॅफ) कांस्यपदकही तिने जिंकले. गेली १० वर्षे मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या ज्योतीला कुटुंबाच्या स्थर्यासाठी नोकरीची प्रतीक्षा आहे.

अर्थातच मॅरेथॉन स्पर्धा म्हटली की ज्योतीचा सहभाग महत्त्वाचा आणि बक्षीसही नक्की. आजपर्यंत तिला काही लाख रुपये पारितोषिक म्हणून मिळाले आहेत. हे पैसे तिने घरच्यांसाठीच ठेवले आहेत. परभणीत तिचे छोटे घर आहे. या घरातून बाहेर पडून मॅरेथॉन स्पर्धा जिंकणे सोपे नव्हते. २०१०मध्ये मुंबईची मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्याआधी तिचे प्रशिक्षक रवी रासकटला यांनी भाकीत केले की ज्योती ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकणार. ते खरे ठरले. खरे तर ती त्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर होती. परंतु पहिल्या दोन स्पर्धकांनी जवळच्या मार्गाने अंतर पार केल्याने त्यांना बाद ठरविण्यात आले. २००९मध्ये याच स्पर्धेत ज्योतीने अनवाणी धावून सर्वाचे लक्ष वेधले होते. अनवाणी पळून तिने दुसरा क्रमांक मिळवला. मॅरेथॉनसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा तिला मिळत नाहीत तरीही मोठय़ा जिद्दीने ज्योती मेहनत करून नावारूपाला आली आहे. भारताची मुंबई मॅरेथॉनमधील संभाव्य विजेती खेळाडू म्हणून तिच्याकडे बघितले जाते. घरची ऐपत नसतानाही जिद्दीच्या जोरावर मॅरेथॉनमध्ये ज्योतीने नाव कमावले. तिला रवी रासकटला यांनी धीर देऊन प्रशिक्षण दिले. ज्योतीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. त्यामुळे यश तिच्याकडे येतेच. परभणीत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ती रोज सराव करते. अ‍ॅथलेटिक्समध्ये ज्योतीने मोठय़ा अंतराच्या शर्यती गाजवल्या आहेत. ज्योती २०१०पासून मॅरेथॉनमध्ये धावत आहे. मुंबई, बेंगळूरु आणि सुरतच्या राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तिने ठसा उमटविला. २०१५मध्ये हैदराबादच्या मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावला. अलाहाबादची मॅरेथॉन तिने सलग चार वेळा जिंकली. ४२ किलोमीटरच्या धावण्यात ती चॅम्पियन ठरली. २०१४ मध्ये मॅरेथॉन शर्यतीत तिने तिसरा क्रमांक मिळवला. २०१६ आणि १७ मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविले.

ज्योतीने वयाची तिशी ओलांडली असली तरी आजही तिचा उत्साह आणि कुटुंब चालवण्यासाठी धावण्याची जिद्द ही वाखाणण्याजोगी आहे. पोटासाठी काही पण असे म्हटले जाते तसेच ज्योतीच्या बाबतीत पोटासाठी धावणे असेच म्हणायला हवे.

जिद्दीचा नेम

सुप्रिया दाबके

भारताची कनिष्ठ स्तरावरील मराठमोळी नेमबाज भक्ती खामकरचा संघर्ष हा दरवेळेस नेमबाजीसारख्या महागडय़ा खेळात टिकाव धरून राहण्यासाठी असतो. मात्र तरीदेखील प्रत्येक वेळेस जिद्द ठेवत डोंबिवलीचे खामकर कुटुंबीय भक्तीला प्रोत्साहन देतात ही कौतुकाची बाब आहे.

नेमबाजीत कोणत्याही स्पर्धेत सहभागी व्हायचे, नेमबाजीसाठी लागणारी लाखो रुपयांची साधने विकत घ्यायची यासारख्या अडचणींवर मात करण्याची वेळ खामकर कुटुंबीयांवर येते. मात्र तरीदेखील भक्ती या सर्व अडचणींवर मात करत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होते तेव्हा कष्टाचे चीज होते. आई मंदाकिनी यांच्याकडे पाहून भक्तीने दहावीनंतर नेमबाजी करायला सुरुवात केली. भक्तीची आई हीदेखील राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहे. अर्थातच सुरुवातीला आई नेमबाजीसाठी वापरत असलेल्या साधनांनीच भक्ती नेमबाजी करायची. मात्र भारताच्या कनिष्ठ संघात भक्तीची निवड झाली तेव्हा नवीन साधनांची गरज लागली. त्यावेळेस १० लाखांचे कर्ज काढावे लागले होते. अजूनदेखील हे कर्ज खामकर कुटुंबीय फेडत आहेत. त्यातच काही वेळेला भविष्य निर्वाह निधीतील पैसेदेखील काढावे लागतात. मात्र भक्तीच्या खेळाच्या आड काही येणार नाही याची काळजी तिचे आई-वडील घेतात.

भक्तीने अर्थातच आई-वडील तिच्यासाठी करत असलेल्या या कष्टाची जाणीव ठेवली आहे. तिला भारताच्या नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे आणि अरुण वारिशी यांचे मार्गदर्शन मिळते. त्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय कनिष्ठ नेमबाजी स्पर्धामध्ये यश मिळवले आहे. ज्यावेळेस मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नसते तेव्हा माझी आई असते, असेदेखील भक्ती आवर्जून सांगते. आई नेमबाजीसाठी मदत करते, अभ्यासात बाबा मदत करतात असेदेखील भक्ती सांगते. भक्ती कला शाखेत दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. नेमबाजी सरावात व्यस्त असल्याने अनेक वेळा भक्तीच्या अभ्यासाच्या नोट्स तिचे वडील घेऊन येतात.

आई-वडिलांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे भक्ती पूर्णपणे नेमबाजी सरावावर लक्ष केंद्रित करून आहे. दोहा येथे गेल्या वर्षी झालेल्या आशिया कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भक्तीने सांघिक आणि वैयक्तिक प्रकारांमध्ये मिळून चार पदके मिळवली. अर्थातच सध्या कनिष्ठ स्तरावर भक्ती भारताचे प्रतिनिधित्व करत असली तरी २०२४ ऑलिम्पिक पात्रतेचे लक्ष्य तिने ठेवले आहे. वरळीच्या महाराष्ट्र रायफल संघटनेत नेमबाजीचा सराव भक्ती जोमाने करत आहे. नेमबाजीत यश मिळवायचे असेल तर प्रत्येक वेळी शांत राहून खेळ करण्यावर भर देण्याचा सल्ला तिच्या आईने दिला आहे. नेमबाजीसारख्या महागडय़ा खेळात टिकाव धरून यशस्वी होऊन दाखवण्याची भक्तीसोबत तिच्या आई-वडिलांची जिद्द नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

जैस्वालची ‘यशस्वी’ गाशा

ऋषिकेश बामणे

सचिन तेंडुलकरप्रमाणे क्रिकेटचे मैदान गाजवावे, हे स्वप्न उराशी बाळगून काही वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या १८ वर्षीय यशस्वी जैस्वालने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावून संपूर्ण विश्वाला स्वत:च्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्य़ात राहणारे यशस्वीचे वडील भूपेंद्रकुमार पूर्वी केटररकडे कामाला होते. परंतु यशस्वीने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशामुळे त्यांचेही नशीब पालटले. सध्या भूपेंद्रकुमार रंगविक्रीचा व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील अनेक कार्यक्रमांनासुद्धा त्यांना सन्मानाने आमंत्रित करण्यात येते.

परंतु यशस्वीच्या आयुष्यात प्रसंग घडला तो २०१३मध्ये. मुंबईत आपल्या काकांच्या घरी वास्तव्यास आलेल्या यशस्वीला क्रिकेटचा खर्च भागवण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकण्याचा व्यवसायही करावा लागला. त्याचप्रमाणे काही काळाने काकांच्या कुटुंबाने त्याचे पालनपोषण करण्यास नकार दिल्यावर यशस्वीवर रस्त्यालगत झोपडीमध्ये राहण्याची वेळही ओढवली. परंतु ज्वाला सिंग यांनी २०१३मध्ये आझाद मैदानावरच यशस्वीला फलंदाजी करताना पाहिले आणि त्याच्यातील कौशल्य हेरून त्याच्या आयुष्याला वेगळेच वळण दिले.

ज्वाला यांनी यशस्वीच्या क्रिकेटव्यतिरिक्त पालनपोषणाचीही जबाबदारी घेतल्याने यशस्वी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहे. २०१८मध्ये झालेल्या आशिया चषकात यशस्वीने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारसुद्धा त्यानेच मिळवला. त्याचप्रमाणे गतवर्षी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत यशस्वीने सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. त्यामुळेच २०२०च्या आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर कोटीच्या घरात बोली लावून संघात सहभागी करून घेतले.

२०२० या वर्षांमुळे मात्र यशस्वी भारतातील घराघरात पोहोचला. दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात यशस्वीने चार अर्धशतके आणि एका शतकासह सर्वाधिक ४०० धावा केल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने झळकावलेले शतक वाखाणण्याजोगे होते. दुर्दैवाने अंतिम फेरीत ८८ धावांची खेळी साकारूनही यशस्वीला भारताला विश्वचषक जिंकवून देण्यात अपयश आले. परंतु यशस्वीच्या कामगिरीने सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींचे हृदय अभिमानाने फुलून आले.

‘पृथ्वी’मोलाची गोष्ट

ऋषिकेश बामणे

भारतरत्न सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आणि पुढील काही दिवसांतच मुंबईतून एका नव्या ताऱ्याचे नाव सर्वाच्या ओठी आले ते म्हणजे पृथ्वी शॉ. त्या वेळी अवघ्या १४ वर्षांच्या पृथ्वीने प्रतिष्ठित हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेकडून खेळताना ५४६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. तेथूनच पृथ्वीच्या उदयाची कहाणी सुरू झाली.

सध्या २० वर्षांचा पृथ्वी भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघातील स्थानासाठी शिखर धवन, मयांक अगरवाल यांसारख्या खेळाडूंबरोबर स्पर्धेत असून अफाट गुणवत्ता आणि फटके मारण्याच्या कौशल्यामुळेच त्याला सातत्याने संघात स्थान देण्यात येत आहे.

पृथ्वीचा जन्म बिहारचा; परंतु वडील पंकज व्यवसायानिमित्त मुंबईत आले. त्यामुळे पृथ्वीचे कुटुंबही मुंबईत आले. वांद्रे येथील एमआयजी येथून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पृथ्वीने जवळपास सर्वच स्पर्धामध्ये छाप पाडली. स्वत: सचिननेच एकदा पृथ्वीची भेट घेऊन त्याला, तू एके दिवशी नक्की भारतासाठी खेळशील, असे सांगितले.

राहुल द्रविड यांच्याशी ओळख झाल्यावर पृथ्वीतील नेतृत्वगुणही चाहत्यांसमोर आले. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली २०१८च्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पृथ्वीने भारताचे यशस्वी नेतृत्व करत जगज्जेतेपद मिळवून दिले. त्यानंतर पृथ्वीने रणजी करंडक, इराणी करंडक यांसारख्या स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या स्पर्धामध्ये पहिल्याच लढतीत शतक झळकावून स्वत:चे नाणे खणखणीत वाजवले.

अखेरीस २०१८च्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वीची भारतीय संघात निवड करण्यात आली. पहिल्याच डावात त्याने धडाकेबाज शतकी खेळी साकारून भारतासाठी सर्वात कमी वयात कसोटी पदापर्णात शतक झळकावण्याचा विक्रम नावावर केला. मात्र दुर्दैवाने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाल्यावर दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली.

त्यानंतर गतवर्षीच ऑगस्टमध्ये उत्तेजक चाचणीत अजाणतेपणी दोषी आढळल्यामुळे पृथ्वीवर आठ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणातून सावरण्यासाठी पृथ्वीला बराच वेळ लागला. त्याशिवाय त्याच्या प्रतिमेलाही काळिमा फासला गेला. एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या मुंबई प्रीमियर ट्वेन्टी-२० लीगमध्ये खोकल्यावर उपचार म्हणून घेतलेल्या औषधाने पृथ्वीचा घात केला. मुख्य म्हणजे या स्पर्धेतही पृथ्वीच्या नेतृत्वाखाली नॉर्थ मुंबई पँथर्सने विजेतेपद मिळवले होते.

परंतु असंख्य अडचणींवर मात करून पृथ्वी पुन्हा एकदा नाव कमावण्यासाठी सज्ज झाला असून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो सर्वस्व पणाला लावेल, यात शंका नाही.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 1:20 am

Web Title: article on stars on the sports field abn 97
Next Stories
1 करोनाइतक्याच अफवा भयंकर!
2 तीव्र हवामान बदल हेच नवे वास्तव, नियोजनात सावळागोंधळ
3 वाहन उद्योगाला ई-चार्जिग
Just Now!
X