01vijayमेष स्वभावत: तुम्ही व्यवहारी नाही. जे तुम्हाला हवे असते ते मिळविणे हे एकमेव उद्दिष्ट तुमच्यापुढे असते. त्याचा आनंद या आठवडय़ात घेऊ शकाल. व्यवसाय-उद्योगात चालू कामाव्यतिरिक्त काही तरी नवीन आणि वेगळे करावे ही कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. नोकरीमध्ये तुमचा कामाचा वेग वाखाणण्याजोगा असेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या सहवासात वेळ कसा गेला हे तुम्हाला समजणार नाही. कुटुंबीयांसमवेत प्रवासाला जाण्याचे बेत ठरतील. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल. 

वृषभ जे आहे त्यात समाधान न मानता जे पूर्वी मिळाले नाही ते मिळविण्याकरिता तुम्ही प्रयत्नशील राहा. व्यवसाय-उद्योगामध्ये तुम्ही पूर्वी केलेले नियोजन आणि चालू असलेले काम याचा योग्य समन्वय झाल्यामुळे एखाद्या स्वप्नाची पूर्तता होण्याची शक्यता आहे. सध्या चालू असलेल्या नोकरीत बदल करण्यासाठी ताबडतोब प्रयत्न सुरू करा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. फक्त त्यांनी थोडीशी तडजोड करण्याची तयारी ठेवावी. घरामध्ये कुटुंबीयांसमवेत एखाद्या निसर्गरम्य स्थळी प्रवास करण्याचे योग येतील.

मिथुन सभोवतालच्या व्यक्तींचा मूड कसाही असो, पण तुमची स्थिती मात्र मन की खुशी दिल का राजा अशी असणार आहे. व्यापार-उद्योगात मात्र कोणतेही नवीन बेत आखण्यापूर्वी तुमच्या खिशाची चाचपणी करा. नवीन व्यक्तींशी व्यवहार करताना त्यांचा खरा हेतू समजून घ्या. नोकरीमध्ये तुम्हाला कामाचा आळस आलेला असेल. परंतु वरिष्ठ मात्र तुमच्यावर भिस्त ठेवतील. नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब होइल, पण चिकाटी सोडू नका. घरामध्ये प्रत्येक सदस्य आपल्या आवडी-निवडीच्या बाबतील चोखंदळ बनेल.

कर्क तुमची रास अतिशय भावनाप्रधान आणि स्वप्नाळू आहे. या आठवडय़ात तुम्ही एखाद्या स्वप्नमयी कल्पनेत दंग होऊन जाल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांची वर्दळ चांगली राहील. पूर्वी केलेल्या प्रयत्नातून एखादी नवीन ऑर्डर मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या कर्तृत्वाला चालना देणारे चांगले काम मिळाल्यामुळे अविश्रांत मेहनत घ्यायची तुमची तयार असेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादी महागडी कल्पना इतरांच्या गळी उतरविण्यात तुम्ही सफल व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमचा आधार वाटेल.

सिंह प्रत्येक क्षेत्रात आपण इतरांच्या एक पाऊल पुढे पाहिजे ही तुमच्यातली भावना तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. व्यवसाय-उद्योगात एखादा नवीन प्रयोग केल्याने त्यातून थोडे जरी पसे मिळाले तरी तुम्ही हुरळून जाल. हातातल्या पशाचा काटकसरीने वापर करा. नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट कामापुरती विशिष्ट सवलत मिळेल. पण तुम्ही मात्र गरजेपेक्षा जास्त फायदा घ्याल. जर बदली हवी असेल तर लगेच प्रयत्न करा. घरामध्ये एखाद्या छानशा कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळेल.

कन्या चांगल्या ग्रहस्थितीचा कसा फायदा उठवायचा हे तुम्हीच ठरवायचे आहे. मनामध्ये गोंधळ असेल तो टाळण्यासाठी र्सवकष विचार करून निर्णय घ्या. व्यापार-उद्योगात बाजारातील परिस्थिती आणि तुमचे अंदाज आडाखे यांचा योग्य समन्वय झाल्यामुळे प्राप्ती वाढण्याचे संकेत मिळतील. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामाकरिता तुमची निवड होईल. जादा जबाबदारीही तुमच्या गळ्यात पडेल. घरामध्ये तुमच्या नियोजनबद्ध काम करण्याच्या पद्धतीमुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाची धुरा तुमच्यावर सोपविली जाईल.

तूळ जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद माना. जे आपल्याजवळ नाही त्याचा जास्त विचार करत बसू नका. अन्यथा कोणतीच कामे होणार नाहीत. व्यवसाय-उद्योगात ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला काही कारणाने नकार दिलेला होता, त्यांच्याकडून सहकार्य मिळण्याचे आश्वासन मिळेल. नोकरीमध्ये तुमची वेळ आणि शक्ती वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन आणि संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता उपयोगात आणाल. घरामध्ये काही मोठे आणि खर्चीक बेत इतर सदस्य तुम्हाला सुचवतील. त्याला तुम्ही ताबडतोब होकार देणार नाही.

वृश्चिक स्वभावत: तुम्ही जिद्दी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीत हार मानत नाही. हा स्वभाव उपयोगी पडेल. व्यवसाय-उद्योगात मात्र भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते, याची आठवण ठेवून तुमचे निर्णय निश्चित करा. नोकरीमध्ये वरिष्ठ ‘आवळा देऊन कोहळा’ काढण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही या प्रलोभनांना बळी पडणार नाही. घरामध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य आणि एखाद्या समारंभाच्या निमित्ताने हातातले पसे कधी निसटतील याचा पत्ता लागणार नाही. तरीही त्याचा विचार न करता तुम्ही आलेल्या क्षणाचा आनंद लुटाल.

धनू ग्रहांच्या जोरावर तुम्हाला तुमचे काम करत राहायचे आहे. त्यामध्ये घिसाडघाई न करता शांतचित्ताने विचार आणि नियोजन करून पुढे जावे लागेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे महत्त्वाची कामे जरी मध्यस्थांवर सोपविली तरी त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या. नोकरीमध्ये शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न कराल. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यापेक्षा नेहमीची पद्धत जास्त उपयोगी पडेल. घरामध्ये वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. प्रत्येक जण आपले बेत ठरवून त्याच मार्गाने जाण्याचा हट्ट धरेल.

मकर तुमच्या नेहमीच्या दैनंदिनीपासून तुम्ही थोडे जरी लांब राहिलात तरी तुम्हाला ते आवडत नाही आणि तुम्ही अस्वस्थ होता. व्यवसाय उद्योगात एखादे नवीन पद्धतीचे काम सुरू केले असेल तर त्यामध्ये गती येण्यासाठी थोडेसे धाडस करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीमध्ये प्रत्येक काम करताना त्यातून आपला फायदा कसा होईल, याचा विचार तुमच्या मनात येईल. मात्र ही गोष्ट वरिष्ठांच्या लक्षात येणार नाही. घरामध्ये तुमची आग्रही भूमिका इतरांना आवडणार नाही. पण तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर होऊ देणार नाही.

कुंभ दैनंदिन कामामध्ये तुम्ही नेहमीच आनंद मानता. पण या आठवडय़ात मात्र एकाच वेळी तुम्हाला तुमचे घर आणि व्यावसायिक कामे या दोन्ही आघाडय़ा सांभाळाव्या लागतील. व्यापार उद्योगात गिऱ्हाईकांची आवडनिवड आणि बाजारातील फॅशन या दोन गोष्टींकडे लक्ष ठेवून कामाच्या स्वरूपामध्ये छोटे-मोठे बदल कराल. नोकरीमध्ये सध्याच्या कामामध्ये तुम्हाला काही बदल करून हवा असेल तर योग्य संधी पाहून तुमची मागणी वरिष्ठांसमोर ठेवा. घरामध्ये मुलांच्या हट्टाला महत्त्व द्यावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन तुम्ही अनेक नवनवीन गोष्टींचा विचार करण्याच्या मूडमध्ये असाल. तुमचे घर आणि व्यवसाय या दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहिल्यामुळे सगळ्यांना तुमचा सहवास आपुलकीचा वाटेल. व्यापार-उद्योगात मत्री करार किंवा भागीदारीचा प्रस्ताव तुमच्याकडे येईल. गाफील राहून त्याला होकार देऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून चांगले काम करून घेतील, पण त्यांचा तुम्ही उल्लेख केलात तर तो मात्र त्यांना आवडणार नाही.
विजय केळकर