सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष बुध-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे रोजच्या जीवनातील गोष्टींमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे परिस्थितीतून निर्माण होणारा ताणतणाव कमी होईल. नोकरी-व्यवसायात मेहनतीला पर्याय नाही. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गातील अनुभवी व्यक्तींकडून योग्य सल्ला मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या कामाचा विशेष ठसा उमटेल. मुलांच्या कामाला गती मिळेल. घसा आणि डोळे यांची काळजी घ्यावी. वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा!

वृषभ चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कलाकौशल्यात प्रगती कराल. छंदामध्ये मन रमेल. इतरांनाही सत्कार्याची गोडी लावाल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. वरिष्ठ आपल्या गुणवत्तेची स्तुती करतील. सहकारी वर्गाला मदत कराल. जोडीदाराच्या प्रश्नांवर चर्चा कराल. मुलांमध्ये नवी उमेद जागी कराल. नातेवाईकांच्या समस्या सुटतील. डोळे आणि कान यांचा उष्णतेपासून बचाव करावा. औषधोपचार घ्यावा.

मिथुन चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पनांवर संशोधनात्मक कार्य कराल. नित्यनैमित्तिक कामांना वेगळे स्वरूप देऊन त्यातील रस वाढवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. जुन्या ओळखीतून कामाला गती येईल. परिस्थितीचे भान ठेवून वागाल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्याल. आरोग्य चांगले राहील.

कर्क चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे ज्ञान व कला यांचा योग्य समन्वय साधाल. नावीन्यपूर्ण गोष्टींमध्ये रस वाटेल. नोकरी-व्यवसायात आपले विचार कृतीत आणाल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. गरजवतांना मदतीचा हात पुढे कराल. आर्थिक बाजू सावरून धराल. जोडीदाराचे कष्ट फळास येतील. मुलांना स्वतंत्र विचारांनी पुढे जाऊ द्याल. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक! वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा.

सिंह रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेली कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. खचून जाऊ नका. नोकरी-व्यवसायात मेहनत आणि जिद्दीने टिकाव धराल. सहकारी वर्गाच्या मदतीने नव्या संकल्पना अमलात आणाल. वेळेचा सदुपयोग केल्याने ताणतणाव कमी होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. मान, पाठ, मणका यांचे आरोग्य जपावे. व्यायाम आवश्यक!

कन्या चंद्र-गुरूच्या लाभ योगामुळे आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला योग्य वेळेवर मिळेल आणि मोठे नुकसान टळेल. नोकरी-व्यवसायात परिस्थितीशी निगडित असे निर्णय घेताना मानसिक स्थिती द्विधा होईल. सहकारी वर्गाला समजून घ्यावे लागेल. जोडीदाराच्या कामातील  अडथळे दूर करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. मुलांच्या मेहनतीला योग्य दिशा द्याल. शरीरात वाताचे प्रमाण वाढेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

तूळ शुक्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन कराल. नव्या गोष्टी आत्मसात कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाईल, पण धीर सोडू नका. सहकारी वर्गाची विशेष मदत होईल. मुलांच्या गुणांचे चीज होईल. कुटुंब सदस्यांचा एकमेकांना आधार मिळेल. ओटीपोटात दुखणे, पचनाचे त्रास होणे तसेच अति विचारांनी डोकं जड होणे अशा तक्रारी संभवतात.

वृश्चिक चंद्र-गुरूच्या युतियोगामुळे आपली बौद्धिक पातळी उंचावेल. ज्ञानाचा योग्य विनियोग कराल. समाजकार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात आपल्या अनुभवातून नव्या गोष्टींचा अवलंब कराल. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. सहकारी वर्गाच्या अडचणी  वरिष्ठांपुढे मांडाल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याला यश मिळेल. उत्सर्जन संस्थेत उष्णतेमुळे बिघाड होतील.

धनू चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे वेळेचा सदुपयोग कराल. नव्या संकल्पना राबवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. सहकारी वर्गाकडून महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदाराच्या कामकाजातील अडथळ्यामुळे त्याची चिडचिड वाढेल. आपल्या आधाराची गरज भासेल. मुलांना काही बाबतीत तडजोड करावी लागेल. शिस्तीचे धडे उपयोगी पडतील. घशासंबंधित विशेष काळजी घ्यावी.

मकर चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून इतरांना प्रोत्साहन द्याल. आपल्या विचारांनाही नवी दिशा द्याल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्याल. काही व्यक्तींची नव्याने ओळख होईल. सहकारी वर्ग कामे चोख पार पाडेल. जोडीदाराचा आत्मविश्वास वाढेल. मुलांना आपल्या कामात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होईल. श्वसन आणि पचनाचे त्रास संभवतात. काळजी घ्यावी.

कुंभ रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे मान, प्रतिष्ठा मिळेल. रेंगाळलेली कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नव्या पद्धतींचा अवलंब करताना बारकाईने लक्ष घालावे. सहकारी वर्ग मदतीला धावून येईल. अपेक्षित निकाल लवकरच हाती येईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पार पाडेल. मुलांना नवे पर्याय शोधावे लागतील. सर्दी-ताप आल्यास औषधोपचार घ्यावा.

मीन चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे गोंधळलेल्या मनाला सावरून धराल. हिमतीने पुढे व्हाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि त्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. चिकाटी आणि सातत्य राखल्यास हाती यश येईल. जोडीदार समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलेल. मुलांना मानसिक आधार द्याल. उष्णता व पित्तामुळे डोळ्यांचे त्रास होतील.