सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-बुधाच्या षडाष्टक योगामुळे वादविवादाचे प्रसंग येतील. शब्दांवर ताबा ठेवा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्या. सहकारीवर्गाकडून जास्त अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंग होईल. जोडीदाराचे कामकाज सुरळीत चालू राहील. त्याच्या कामात वैचारिक लुडबुड करू नका. मुलांकडून चांगली बातमी समजेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्याचे काम जोडीदार करेल. पचनसंस्थेची विशेष काळजी घ्यावी लागेल. वेळेवर पथ्य पाळा.

वृषभ चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे विविध विचारांनी मन व्यापून राहील. विचारचक्र थांबवण्याची आवश्यकता भासेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाच्या समस्यांना वाचा फोडाल. न्यायाची मागणी कराल. जोडीदाराला आपले विचार, मत सध्या पटले नाही तरी त्याच्यावर ते लादू नका. धीर धरा. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. घरात शिस्तीचे व नियमांचे पालन केले जाईल. त्वचेवर फोड येणे, त्यात पू होणे असे त्रास सहन करावे लागतील.

मिथुन रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.  आरोग्य चांगले राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी सविस्तर बोलून  त्यांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्गातील काहींना त्यांच्या वागणुकीचे सडेतोड उत्तर द्याल. जोडीदाराला आपले मुद्दे पटवून देणे कठीण जाईल. तसेच त्याची मते समजून घेणेही जड जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य मदतीला धावतील. मुलांमुळे घरातील वातावरण हलके राहील. कामापुरेसे छोटे प्रवास कराल.

कर्क बुध-शुक्राच्या लाभ योगामुळे कल्पकता, बुद्धिचातुर्य आणि व्यवहार यांचा त्रिवेणी संगम होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची बोलणी जिव्हारी लागतील. सहकारीवर्गाकडून चुका होण्याची शक्यता आहे. सतर्क राहणे गरजेचे आहे. जोडीदाराला त्याच्या कार्यात मेहनतीने स्वत:ला सिद्ध करावे लागेल. नैराश्यापासून त्याला दूर ठेवा. कुटुंबात आनंदी, उत्साही वातावरण ठेवणे आपले कर्तव्य आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा. व्यायाम आणि आहार याकडे लक्ष द्यावे.

सिंह गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे यशाकडे वाटचाल कराल. ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात आर्थिक घडी नीट बसवाल. सहकारीवर्गातील गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. त्याच्या आनंदात सहभागी व्हाल. वैचारिक ओझे कमी होईल. समस्यांची उत्तरे सापडतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घरच्यांवर कडक पहारा नको.  पाठ धरणे, शिरेवर शीर चढणे यांसंबंधी त्रास होतील.

कन्या चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे आर्थिक उन्नतीसह मानसिक आनंद, समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामांना गती मिळेल. सहकारीवर्गाची योग्य साथ मिळेल. त्यांच्यातील गुणांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्याल. प्रसंगावधान राखून आस्थापनेच्या हिताचे निर्णय घ्याल. जोडीदाराच्या मतांची कदर कराल. दोघे मिळून कौटुंबिक बाबींचे निर्णय घ्याल. स्वयंशिस्तीचे पालन करूनच अपचनाच्या तक्रारी दूर करता येतील.

तूळ कृतिशील व ऊर्जाकारक मंगळ आणि भावभावनांचा कारक शुक्र यांच्या केंद्र योगामुळे राग आणि मोह या दोन्ही भावनांवर ताबा ठेवावा लागेल. नोकरी-व्यवसायात आपले मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न होतील. सहकारीवर्गाच्या भक्कम आधारामुळे कार्यपूर्ती शक्य होईल. जोडीदाराच्या कामाच्या व्यापामुळे त्याची चिडचिड वाढेल. परंतु याचा परिणाम आपल्या कौटुंबिक वातावरणावर होऊ देऊ नका. रक्तातील काही घटकांचे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता भासते.

वृश्चिक रवी-गुरूच्या नवपंचम योगामुळे यशाच्या पायऱ्या चढाल. समाजात मानसन्मान मिळेल. हातून सामाजिक कार्य घडेल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा योग्य उपयोग कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्ग बुद्धिमत्तेची चुणूक दाखवेल. अंतिम निर्णय घेताना जोडीदाराची मदत होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या धीराने पार पाडाल. नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. त्यांना आर्थिक मदत कराल. डोके दुखणे, पित्त होणे, छातीत जळजळणे हे त्रास संभवतात.

धनू चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे  आपल्या कृतीतून इतरांना आनंदित आणि उत्साहित कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्ग नव्या समस्या पुढे  मांडेल. अधिकारीवर्गाची मदत मागावी लागेल. जोडीदाराच्या साथीने हितशत्रूंना सडेतोड उत्तर द्याल. स्वीकारलेली जबाबदारी मेहनत घेऊन पार पाडाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सर्द हवेमुळे व दमटपणामुळे त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता!

मकर चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या क्रियाशीलतेला शनीच्या मेहनतीची व चिकाटीची जोड मिळेल. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. त्यांचा सल्ला आपल्या कार्यक्षेत्रात तसेच वैयक्तिक जीवनातही उपयोगी ठरेल. सहकारीवर्गातील आपापसातील मतभेद त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे आरोग्य सांभाळावे.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे नव्या संकल्पना साकार कराल. अंतर्मनाचा आवाज ऐकाल. नोकरी-व्यवसायात नवे करार कराल. धाडसी निर्णय घ्याल. वरिष्ठ आणि सहकारीवर्ग यांतील दुवा बनाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावेल. त्याचे श्रेयही त्याला मिळेल. मित्रमंडळींकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. यशाने हुरळून जाऊ नका. स्वत:वर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.

मीन गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे मोठय़ांचे पाठबळ मिळेल. रखडलेली कामे धिम्या गतीने मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात यश व कीर्ती मिळण्याचे योग आहेत. मेहनतीला पर्याय नाही. सहकारीवर्गाच्या चिकाटीमुळे बऱ्याच प्रमाणात कामाचा उरका पडेल. जोडीदाराच्या व्यवहारचतुर्याने आणि स्पष्टवक्तेपणामुळे येऊ घातलेले संकट टळेल. कामाच्या धावपळीत मणक्याचे आरोग्य जपावे.