सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या मेहनतीला यश मिळेल. कष्टाचे चीज होण्यासाठी मात्र सातत्य राखावे लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताचा मान ठेवाल. सहकारी वर्ग मदतीला तत्पर असेल. त्याच्याकडील कल्पना समजून घ्याल. जोडीदाराचा कार्यप्रवास यशाच्या दिशेने होईल. त्याला आपल्या साथीची जोड द्यावी. मुलांना स्वतंत्र विचार करू द्या. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. प्रवासाचा अट्टहास धरू नका. शक्य असल्यास तो टाळा. अपचनाचा त्रास संभवतो.

वृषभ भाग्य स्थानातील बुध-गुरूच्या युतीमुळे गुरूच्या ज्ञानाचा आणि बुधाच्या व्यवहारी वृत्तीचा सुरेख संगम होईल. आपल्या कार्यक्षेत्रात लाभदायक घटना घडतील. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना वरिष्ठांपुढे मांडाल. सहकारी वर्गाच्या कामातील त्रुटी भरून काढाल. जोडीदाराच्या कामाचा ताण वाढेल. त्याचे काम अपेक्षित वेळेत पूर्ण होईलच असे नाही. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा.

मिथुन चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे कलात्मक दृष्टीला वाव मिळेल. नवे प्रयोग यशस्वी ठरतील. परंतु पर्यायी व्यवस्था तयार असावी. नोकरी-व्यवसायात नावीन्याची ओढ स्वस्थ बसू देणार नाही. वरिष्ठांचा शाब्दिक मार वर्मी लागेल. डोक्यात राग घालून घेऊ नका. सहकारी वर्गावर विश्वास ठेवून पुढील योजना आखा. जोडीदाराला आपल्या पाठबळाची गरज भासेल. मुलांची कामे व्यवस्थित पार पडतील. त्वचा आणि उष्णतेचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे नेहमीप्रमाणे साध्या सरळ मार्गाने जाताना विशिष्ट गोष्टींकडे व्यावहारिक दृष्टीने बघाल. आपले अंदाज खरे ठरतील. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. वरिष्ठांचे साहाय्य मिळेल. सहकारी वर्ग आपल्या विचारांना पुष्टी देईल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढल्याने त्याचे वेळेचे गणित चुकेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. पोटाचे विकार बळावतील. आहार व व्यायामाकडे लक्ष द्यावे.

सिंह रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे हाती घेतलेल्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात नव्या समस्या उद्भवल्यास त्यांचे निराकरण करताना साकल्याने विचार करावा. घाईने घेतलेले निर्णय अडचणीत आणतील. सहकारी वर्ग अपेक्षित मदत करणार नाही. त्यांच्या कलेने घ्यावे लागेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. भविष्यातील योजनांचा विचार कराल. कौटुंबिक वाद वाढवू नका. मुलांना सद्य परिस्थितीचे भान द्याल.

कन्या चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे आजूबाजूचे उत्साही वातावरण पोषक ठरेल. विविध कामांची जबाबदारी आपल्यावर येऊन पडेल. मर्यादेपलीकडे जाऊ नका. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. सहकारी वर्गाची मदत घेऊन कामाला गती द्याल. जोडीदाराची रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांना शिस्तीचे धडे देण्याची गरज पडेल. कौटुंबिक वातावरण अभ्यासाला पोषक ठरेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

तूळ चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे उत्स्फूर्त लेखन कराल. आपल्या साहित्याचा प्रभाव पडेल. नोकरी-व्यवसायात  कायद्याच्या भाषेतील कामे अचूकपणे पूर्ण कराल. सहकारी वर्गावर अधिक विसंबून राहू नका. ऐन वेळी अडचणींचा सामना करावा लागेल. नातेवाईकांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील. जोडीदार आपल्या कामकाजात जास्तच व्यस्त असेल. मुलांना आपल्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. पडझड, मार लागणे, हाड तुटणे यांपासून सावध राहावे.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे  स्वत:हून स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या नेटकेपणाने पूर्ण कराल. उत्साह वाढेल. नेहमीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याने सभोवतालचे वातावरण आनंदी राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाबरोबर शब्द जपून वापरावेत. सामाजिक बांधिलकी जपणारा छंद जोपासाल. ज्येष्ठ व्यक्तींची आत्मीयतेने काळजी घ्याल. जोडीदाराची कामाच्या ठिकाणी पत वाढेल. डोकेदुखीचा त्रास अंगावर काढू नका. वेळीच उपाय करा.

धनू गुरू-चंद्राच्या युतियोगामुळे आपले मत प्रभावीपणे मांडाल. विचारांमधील स्पष्टपणा दिसून येईल. नोकरी-व्यवसायात आस्थापनेच्या हिताचे मुद्दे वरिष्ठांच्या चर्चेत निर्भीडपणे मांडाल. सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल. आर्थिक व्यवहार डोळसपणे करावा. एखाद्याच्या मोठेपणावर भुलू नका. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. नातेवाईकांच्या वादाच्या मुद्दय़ापासून लांब राहिलेलेच बरे! मुलांचे हट्ट डोईजड होऊ देऊ नका. वात-पित्ताचा त्रास संभवतो.

मकर शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे भावनेच्या आहारी न जाता प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कराल. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या आर्थिक उलाढाली होतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाच्या चुकांचे खापर आपण आपल्या माथी फुटू देणार नाहीत. सत्याचा आग्रह धराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मर्जी संभाळाल. मुलांना हिंमत वाढवण्याची संधी उपलब्ध करून द्याल. संधिवात आणि पित्ताचा त्रास बळावेल.

कुंभ रवी-नेपच्यूनच्या युतियोगामुळे रवीच्या ऊर्जेला नेपच्यूनच्या उत्कटतेची जोड मिळेल. उत्साह वाढेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात शिस्तीचे आणि रोखठोक धोरण स्वीकाराल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाच्या कमतरता भरून काढण्याचे मन:पूर्वक प्रयत्न कराल. ते आपल्या कामाची जाण ठेवतील. प्रवासयोग संभवतो. परिस्थितीचा अंदाज घ्यावा. जोडीदाराची कामे वेगात पूर्ण होतील. कौटुंबिक समस्यांवर अतिविचार करू नका. मार्ग सापडेल.

मीन गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे लाभकारक घटना घडतील. हाती घेतलेल्या कामाची पूर्तता करण्यासाठी अनेकांची मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ महत्त्वाचे ठरेल. नवे नियम, नव्या अटी यांचे काटेकोर पालन कराल. सहकारी वर्गाकडून अधिक अपेक्षा न ठेवता आपल्या जबाबदाऱ्या स्वत:च पार पाडाल. आर्थिक गणिते सुटतील. जोडीदार चांगली साथ देईल. अतिश्रमामुळे दमणूक होईल. योग्य व्यायाम, विश्रांती आणि आहार यांकडे लक्ष द्यावे.