08 July 2020

News Flash

ठाण्यातली रिक्षा संस्कृती

मी ठाणेकर. आमचं शहर महाराष्ट्राचा कला व संस्कृतीचा वारसा जपणारं शहर आहे. वेगवेगळे उत्सव, सण साजरे करण्याची संस्कृती, जागोजागी पोस्टर्स लावण्याची संस्कृती अशा अनेक संस्कृती

| April 3, 2015 01:15 am

मी ठाणेकर. आमचं शहर महाराष्ट्राचा कला व संस्कृतीचा वारसा जपणारं शहर आहे. वेगवेगळे उत्सव, सण साजरे करण्याची संस्कृती, जागोजागी पोस्टर्स लावण्याची संस्कृती अशा अनेक संस्कृती इथे नांदत आहेत. सण म्हणाल तर गटारी अमावास्या आणि पितृ अमावास्या सोडून बाकी सगळेच साजरे केले जातात. गटारी अमावास्या काय साजरी करणार म्हणा; इथली गटारं वर्षांचे बारा महिने वाहत असतात आणि पितृ अमावास्येचं म्हणाल तर वर्षांतले पंधरा दिवस जर पितरं खाली आली तर त्यांना जेवायला काय उभं राहायलादेखील जागा मिळणार नाही, इतकी लोकसंख्या झालीय शहराची. पोस्टर्स म्हणाल तर नगरसेवक, आमदार, खासदार, त्यांचे चिटणीस, कार्याध्यक्ष, या सगळ्यांच्या बायका, त्यांची मुले इतक्या सगळ्यांचे वाढदिवस नि पुण्यतिथ्या साजरी करणारी. पण या सगळ्यांपेक्षा एक वेगळी संस्कृती इथे नांदतेय- रिक्षा संस्कृती.

सकाळी घरातून बाहेर पडल्यावर चार हाका मारल्यात तर साक्षात देवही ‘काय वत्सा?’ म्हणून तुमच्यापुढे उभा ठाकेल, पण रिक्षावाला उभा राहील तर शपथ. कदाचित सकाळी सकाळी नागरिकांकडून व्यायाम करून घेण्याची महानगरपालिकेची ही एक अभिनव योजना असावी. रिक्षा थांबवता थांबवता शाळेत केलेले शारीरिक शिक्षणाचे सगळे प्रकार करून होतात. आमच्या बस स्टॉपला तीन रस्ते येऊन मिळतात तेव्हा रिकामी रिक्षा कुठल्या रस्त्याने येईल हे सांगता येत नाही, मग या तिन्ही रस्त्यांवर काकदृष्टी ठेवणे आलेच. ठाण्यात ‘वन वे’चा अर्थ बहुधा ‘टू वे’ असाच घेतला जातो म्हणून तीन नाही सहा ठिकाणी नजर ठेवावी लागते. बरं ही काकदृष्टी असून चालणार नाही. िपडावर पोसल्या जाणाऱ्या त्या बिचाऱ्या कावळ्याला कसली आलीय दृष्टी. त्यासाठी गरुडाची नजर हवी. बरं एक रिक्षा आली की दहा-पंधरा लोक उंच उडय़ा वगैरे मारून ती पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जर भारतातर्फे उंच उडी किंवा तत्सम जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घ्यायला मिळाला तर ऑलिम्पिक जाऊ दे; गेला बाजार कॉमनवेल्थचं एखादं पदक नक्कीच आणतील.
समजा रिक्षावाला तुमच्यासमोर उभा ठाकला आणि तुम्ही रिक्षात बसलात तर लगेच म्हणेल, शेअर नाही हा मॅडम. मग इतका वेळ बस स्टॉपवर ताटकळलेल्या इतर मैत्रिणींना मागे ठेवून जावेच लागते. चुकून तुम्हाला एखाद दिवशी लवकर जायचंय आणि रिक्षाही मिळाली तर तो लगेच म्हणेल ‘शेअर आहे मॅडम’ आणि पाचवा प्रवासी येईपर्यंत तो थांबून राहतो. एखादी रिकामी रिक्षा समोरून गेलीच तर रिक्षावाला आपण ठेंगा दाखवताना हात जसा करतो त्याच्या अगदी विरुद्ध क्रिया करतो; लोकांचे म्हणणे आहे की ती पेट्रोल संपल्याची खूण आहे, पण मला वाटते तो ठेंगाच दाखवतो आणि सरळ ठेंगा दाखवला तर प्रवासी ग्राहक मंचाकडे जातील की काय अशी भीती त्याला असावी.
चुकून रिक्षा मिळाली आणि आपण त्याला अमुक ठिकाणी जायचे म्हटले तर तो ट्रॅफिकची सबब सांगून नेमक्या दुसऱ्या रस्त्याने नेईल. टीएमटी (ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) या शब्दाचा खरा अर्थ ‘तुमचा मुक्काम ठाण्यातच’ असा असला पाहिजे. एकतर ऑफिस अवर्समध्ये सगळ्या बसेस नऊ महिन्यांची गर्भारीण असावी इतक्या फुगलेल्या असतात आणि चालतातही त्याच स्पीडने. आणि जर बसने तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडलं तर लॉटरीचं तिकीट जरूर काढा कारण प्रवाशांच्या व्यायामासाठी टीएमटीने सोय केलेली असल्याने त्या आठ दिवसांतून एकदा तरी बंद पडून तुम्हाला अर्धा ते पाऊण रस्ता चालायला लावतात. टीएमटीचे बस ड्रायव्हर्स तर जणू पुष्पक विमाने उडवणारे पायलट. बसचा एकही दिवा, एकही मीटर चालू नसताना बस कशी चालवतात त्यांचं तेच जाणोत. तुम्ही जर चालत जायचा विचार करतच असाल तर एखादा ऑर्थोपेडिशियनशी आधी मैत्री करा. इथल्या उघडय़ा गटारावरून लांब उडय़ा घेत घेत धावताना पडलात तर त्याची मदत लागेलच ना!
तेव्हा हे देवा! आम्हा ठाणेकरांच्या कुंडलीत दहावा ग्रह म्हणून विराजमान झालेल्या या रिक्षावाल्याला प्रसन्न करायला एखादं व्रत असेल तर सांगा आम्ही समस्त ठाणेकर ते नक्की करू!
भाग्यश्री अभय चाळके

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 1:15 am

Web Title: auto rickshaw in thane
टॅग Thane,Vachak Lekhak
Next Stories
1 स्वप्नातील भारत २०७५
2 दिएगोचा संघर्ष
3 दि. ३ ते ९ एप्रिल २०१५
Just Now!
X