चित्रपट : ‘अयोध्येचा राजा ते ‘टाइमपास’

मराठीत चित्रपट मग तो सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ग्रामीण, कोणताही असो, कथा हाच त्याचा मोठा आधार आणि हुकमी एक्का राहिला आहे.

मराठीत चित्रपट मग तो सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ग्रामीण, कोणताही असो, कथा हाच त्याचा मोठा आधार आणि हुकमी एक्का राहिला आहे. कथेशी पंगा घेतलाच तर रसिकांनी तुमच्याकडे पाठ फिरवलीच समजा.

नवीन मराठी चित्रपटातील ‘मध्यवर्ती भूमिके’साठी पाच-सहा चित्रपटांचा अनुभव असणारा दिग्दर्शक एका ‘लोकप्रिय अभिनेत्या’ला भेटला, त्याचा हा किस्सा.
‘थेट कामाचे बोलूयात’ अशा आधुनिक पद्धतीनुसार एका ओळीची कथा व चार ओळींची भूमिकादेखील सांगून झाली. आता महत्त्वाचा मुद्दा ‘मूल्याचा, अर्थात त्या आकाराच्या मानधनाचा, तोही पक्का व्यावसायिक असल्याने त्याने दोन आकडी लाख सांगतच, कधीच्या तारखा हव्यात हे विचारले, (केवढी तत्परता?)
त्यावर दिग्दर्शक पटकन म्हणाला, छे, छे! एवढी किंमत मी तुला देऊ शकत नाही. माझ्या चित्रपटात ‘कथा’ हीच ‘स्टार’ आहे. २०१४ चा पहिला यशस्वी चित्रपट ‘टाइमपास’मध्ये एक तरी नावाजलेला असा कलाकार आहे का दाखव. मराठीत ‘स्टार’ नव्हे, कथा चालते, असे म्हणतच तो दिग्दर्शक मोबाइल कानाला लावत निसटलादेखील..
असाच एक ‘कुजबुज आघाडी’त लोकप्रिय असलेला एका ‘गुलाबी’ मराठी अभिनेत्रीचा किस्सा. पारितोषिक सोहळ्यातले भन्नाट नाचकाम, सुपारीत लावणीनृत्याचा तडका, कॅलेंडरसाठी फोटो शूट. यात उत्तम ‘पैसा वसूल’ करणाऱ्या या अभिनेत्रीवर ‘आयटम नृत्य’ एकदम सही ठरेल अशा दृष्टीने एक दिग्दर्शक दीड-दोन महिन्यांच्या महत्प्रयासाने तिला भेटला. (चित्रपटात पूर्ण लांबीची भूमिका साकारण्याची कटकट नको, अशी तिची भूमिका आहे म्हणे.) तिने गाण्याचा मुखडा, नृत्य दिग्दर्शक, चित्रपटात गाण्याची जागा वगैरे काहीही विचारणे गरजेचे न मानता थेट मानधन सांगितले. यावर दिग्दर्शक एकदमच गडबडला व स्वत:ला सावरत म्हणाला, या नृत्यानेच माझ्या चित्रपटाची कथा नवे वळण घेते, त्यामुळे एखाद्या नवतारकेला संधी देणे मला परवडेल.
चित्रपटाचे जग अशा किस्से कथा-दंतकथा-भंकसकथा-अफवा-अतिशयोक्ती याने खच्चून भरलंय हे कान-नाक-डोळे उघडे ठेवून फिरलं की समजतं. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा व गुद्दा एकच, मराठी चित्रपट ‘स्टार’वर नव्हे तर ‘कथाआशया’वरच रसिकांना आपलासा वाटतो,
आपण उगाच आपलं मराठीत स्टार नाहीत हो, असे कोकलत असतो. स्टार म्हणून स्वत:ला फोकस करायचे अथवा तसे आपल्याभोवती वलय आणि वळण निर्माण करायचे म्हणजे केवढे कष्ट, चलाखी, डावपेच, खर्च असतो, काही विचारू नका. प्रसारमाध्यमांशी कसे, काय, किती आणि कधी बोलायचे यापासून कोणत्या उत्पादनासाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ व्हायचे यापर्यंत अनेक गोष्टी खेळवाव्या लागतात. त्यासाठी स्वत:ची यंत्रणा लागते, आपल्या स्पर्धेतला चेहरामोहरा अनपेक्षित बाजी तर मारत नाही यावर आपले लक्ष्य नाही असा भास-आभास करून लक्ष्य ठेवावे लागते. आमिर, सलमान, शाहरुख यांच्यातील असो अथवा दीपिका, कतरिना, प्रियांका यांच्यातील तेज स्पर्धा असो, स्वत:भोवतीचे वलय कायम ठेवायला सतत चित्रपटाच्या यशाची फोडणी-जोडणी लागते.
हिंदीतले हे तारे आणि वारे मराठीला झेपायचे नाहीत. मराठीची ती गरजच नाही. मराठीत उत्तम कथा हाच ‘श्वास’ आहे.
प्रेक्षक मराठी चित्रपटाकडून कसदार, आशयपूर्ण कथेची अपेक्षा ठेवतो, तर हिंदी चित्रपटात त्याला वीतभर कथेभोवती मनोरंजनाचा भन्नाट मसाला/ हिंग/ तिखट/ खारट लागते. अशी सर्वसाधारण ‘फोड’ आहे. क्वचितच हिंदीत कधी काळी ‘आनंद’, ‘आँधी’, ‘अभिमान’, कालांतराने ‘स्वदेस’, ‘चक दे इंडिया’, ‘रंग दे बसंती’ असे कथाप्रधान चित्रपट यशस्वी झाले.
मराठीची खासियत म्हणजे उत्तम कथा व हे सत्य केव्हापासून तरी चालत आले आहे.
अगदी १९३२चा पहिला मराठी चित्रपट ‘अयोध्येचा राजा’पासून कथा हीच मराठी चित्रपटाची ‘खरी ताकद’ राहिली. फार पूर्वी फारशा चांगल्या तांत्रिक सुविधा नव्हत्या (मराठी निर्माता कायम गरीब म्हणूनच ओळखला गेला.) पण दिग्दर्शकाचे लक्ष कथेवर असे. तीसच्या दशकातील ‘सैरन्ध्री’, ‘विलासी ईश्वर’, ‘ब्रह्मचारी (मीनाक्षी शिरोडकर यांच्या बेदिंग सुटामुळे ‘गाजलेले यमुनाजळी खेळू कान्हा’ याच चित्रपटातले, पण ते कथेच्या ओघात येते.), ‘सुखाचा शोध’; चाळीसच्या दशकातील ‘श्यामची आई’, ‘शेजारी’, ‘थोरातांची कमळा’, ‘पहिली मंगळागौर’, ‘सूनबाई’, ‘चिमुकला संसार’, ‘रामशास्त्री’, ‘मीठ भाकर’; पन्नासच्या दशकातील ‘पुढचं पाऊल’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘ऊनपाऊस’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘गाठ पडली ठका ठका’, ‘दोन घडीचा डाव’, ‘सांगत्ये ऐका’, ‘जगाच्या पाठीवर’; साठच्या दशकातील ‘मानिनी’, ‘सुवासिनी’, ‘वैजयंता’, ‘चिमण्यांची शाळा’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘थोरातांची कमळा’, ‘पडछाया’, ‘चिमुकला संसार’, ‘एकटी’; सत्तरच्या दशकातील ‘पिंजरा’, ‘अनोळखी’, ‘धाकटी बहीण’, ‘सामना’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’.. असे करता करता आपण एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकात येऊन पोहोचल्यावरही कथेचे हेच वैशिष्टय़ कायम राहिल्याचे दिसते. ‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘दहावी फ’, ‘वळू’, ‘शाळा’, ‘संहिता’, ‘बालक पालक’, ‘टपाल’, ‘फॅण्ड्री’, ‘सरपंच’, ‘भगीरथ’, ‘टाइमपास’.. चित्रपटाचे स्वरूप (व निर्मिती खर्च) कसाही असो, त्यात ‘कथामूल्य’ कायम महत्त्वाचे ठरले. सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, ग्रामीण किंवा लावणीप्रधान असा कोणताही चित्रपट असो, कथा हाच त्याचा मोठा आधार आणि ‘हुकमी एक्का’ राहिला.
अगदी व्ही. शांताराम यांच्यापासून सुरुवात केली तर भालजी पेंढारकर, मा. विठ्ठल, विश्राम बेडेकर, बाबूराव पेंटर, मा. विनायक, राजा नेने, वसंत जोगळेकर, दिनकर द. पाटील, राजा परांजपे, राजा ठाकूर, अनंत माने, आचार्य प्र. के. अत्रे, दत्ता धर्माधिकारी, राम गबाळे, माधव शिंदे, यशवंत पेठकर, राजदत्त, जब्बार पटेल अशा अनेक मान्यवर दिग्दर्शकांनी आखलेला ‘कथाप्रधान चित्रपटा’चा प्रवाह पुढेही कायम राहिला.
आपल्या या कथेच्या वैशिष्टय़ापासून मराठी चित्रपट अधूनमधून फारकत घेतो तेव्हा जागरूक मराठी रसिक त्याच्यापासून फारकत घेतो, दूर पळतो. मग ते हिंदी चित्रपटापासून मराठी चित्रपट निर्माण करणे असो (‘नो एन्ट्री’वरून ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’. ‘गुमनाम’वरून ‘अशाच एका बेटावर’ असे चित्रपट फक्त प्रदर्शित झाले अशी नोंद झाली.)
कधी विनोदाचा अतिरेक असो, रडुबाई प्रतिमेच्या चित्रपटाचे रडगाणे असो (‘माहेरची साडी’च्या यशानंतर चित्रपटाच्या पोस्टरवर अलका आठल्येचा ‘रडका चेहरा’ हुकमी ठरला, मुंबई-पुणे येथे अशा चित्रपटांना पूर्णपणे नाकारले गेले. ग्रामीण भागातील ‘भाबडे प्रेक्षक’ मात्र त्यावर खूश होते.) पण कथेची साथसंगत ‘सोडल्याने क्वचितच एखादा चित्रपट यशस्वी ठरला. काही चित्रपटांचे यश हे त्याच्या प्रदर्शनाच्या वेळचे वातावरण (त्या आठवडय़ात नेमका तो एकच चित्रपट झळकतो व सुदैवाने गर्दी खेचतो), कधी एखाद्या चित्रपटाला पूर्वप्रसिद्धीचा फायदाही होतो..
या कथेच्या यशोगाथेत दादा कोंडकेंचे स्थान काय, असा तुमचा प्रश्न असेलही.. ‘सोंगाडय़ा’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘पांडू हवालदार या त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना ‘कथा’ आहे, त्याचे स्वरूप वा मूल्य वेगळे असेल. त्या चित्रपटांच्या घवघवीत यशाने दादांचा हुकमी प्रेक्षकवर्ग तयार झाला व त्याने ‘तुमचं आमचं जमलं’ पासूनच्या त्यांच्या चित्रपटातील द्वयर्थी विनोद एन्जॉय केले. त्यांच्या चित्रपटाची संस्कृतीच वेगळी. त्याचाही ‘मुका घ्या मुका’, ‘सासरचं धोतर’पर्यंत अतिरेक झाला, तेव्हा त्यांच्याही चित्रपटाची गर्दी ओसरली.
सचिन व महेश कोठारेने युवा प्रेक्षकांना आकर्षित केले. दोघांनीही कथेचा पीळ कायम ठेवत त्याभोवती मनोरंजनाची भट्टी जमवली. ते त्यांचे दिग्दर्शनीय कौशल्य होय. सचिनने हिंदी चित्रपटावरून मराठी चित्रपटाची ‘बनवाबनवी’ केली तेव्हा रसिकांनी त्याकडे पाठ फिरवली. ‘गजब’वरून ‘भुताचा भाऊ’, ‘सत्ते पे सत्ता’वरून ‘आम्ही सातपुते’, ‘बॉम्बे टू गोवा’वरून ‘नवरा माझा नवसाचा’ अशी उदाहरणे पुरेशी आहेत. महेश कोठारेच्याही चित्रपटांचा मसाला कधी-कधी फसतो. (उदा. खतरनाक) तेव्हा रसिक त्याच्या ‘झपाटलेला’ चित्रपटाची आठवण काढतो आणि त्याचा खुशीने ‘थरथराट’ होतो.
कथेशी पंगा घेतलात तर मराठी चित्रपट रसिक तुम्हाला माफ करणार नाहीत अशीच ‘सच्चाई’ कायम अधोरेखित झाली आहे. यापेक्षा कथेशी प्रामाणिक राहिलात, तर आपला मराठी माणूस सतत त्या चित्रपटाचे इतरांकडे कौतुक करतो, मग तो साठ वर्षांपूर्वीचा ‘श्यामची आई’ असो अथवा अवघ्या चार वर्षांपूर्वीचा ‘ताऱ्यांचे बेट’ असो. अर्थात, कथा ताकदवान असतानाच पटकथादेखील कसदार, बंदिस्त हवी.
काही चित्रपट एखाद्या कथा वा कादंबरीवर बेतले जातात, पण त्यासाठीचे ‘दृश्यमाध्यमा’चे कौशल्य (अर्थात माध्यमांतर) जमायला हवे. दिग्दर्शक रवी जाधवला ते ‘नटरंग’च्या वेळी, तर दिग्दर्शक संजय जाधवला ते ‘दुनियादारी’च्या वेळी झ्याक जमले, म्हणूनच हे चित्रपट यशस्वी ठरले. मराठीतील उत्तमोत्तम साहित्यावर चित्रपट निर्माण करावेत, अशी आशा बाळगणे, मराठी समाजाला खूप आवडते. (कारण, मराठीत उत्तम साहित्य निर्माण होते यावर प्रचंड विश्वास व अभिमान आहे) पण ते ‘माध्यमांतर’ जमण्याची दृष्टी व कल्पकता हवी, म्हणजेच पटकथाबांधणीचे कौशल्य हवे.
चित्रपटासाठीच एखादी चांगली कथा-कल्पना सुचू शकते. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ती दिसते) त्यासाठी पटकथाकार व दिग्दर्शकाकडे निरीक्षणशक्ती व वाचन हवे.
आता कथेवरच लक्ष द्यायचे तर मग कथा व त्यातील व्यक्तिरेखा यानुसार कलाकारांची निवड हा घटक येतो (मुक्ता बर्वेची बऱ्याचदा तशीच निवड होते असे दिसते, तिला पर्याय नाही हे तिचे यश आहे. अतुल कुलकर्णीच्या बाबतीतही हा गुण दिसतो.)
‘अगोदर चांगली कथा व मग त्यानुसार कलाकाराची निवड’ असा मराठी चित्रपटाचा प्रवास सुरू होतो. तेच ‘सही’ आहे, तर मग त्यात ‘स्टार’ येतो कोठे? मराठी चित्रपटाचा रसिक ‘स्टार दर्शना’साठी ‘सिनेमाचे तिकीट’ काढत नाहीत (क्वचित एखादा चित्रपट अपवाद) त्याला ‘कथेसाठी चित्रपट’ आवडला रं आवडला की त्या कलाकाराला तो ‘स्टार’ मानतो,
‘नवरी मिळे नवऱ्याला’चे सचिन व सुप्रिया, ‘गंमतजंमत’ची वर्षां उसगावकर (‘वंडरगर्ल’ म्हणून आली व गाजली.) ‘वजीर’, ‘आहुती’, ‘जन्मठेपे’ची अश्विनी भावे (हिने केवढी तरी विविधता दिली, त्यात तिचा ‘स्टारडम’ खुलला.) ‘लेक चालली सासरला’ची अलका आठल्ये (चित्रपटाच्या स्वरूपावर जाऊ नका, आपल्या समाजातील भोळय़ाभाबडय़ा महिलावर्गाला सोशिक नायिका कायम जवळची वाटते. तिच्यावर पडद्यावर येणारी संकटांची मालिका त्यांना आपली कथा-व्यथा वाटते.)
‘जिवलगा’ची रेशम टिपणीस (हिने बोल्डपणा, नवचैतन्य आणले, त्या गुणावर ती संचारली. ‘सत्त्वपरीक्षा’तील अभिनयासाठी तिने राज्य पुरस्कार पटकावला).
‘हमाल! दे धमाल’ने आपला लक्ष्या सुपरस्टार झाला, ही तेव्हाची व्यावसायिक खेळी होती, कारण आपण हिंदीच्या जवळ जात होतो.
‘मुक्ता’ची सोनाली कुलकर्णी (केवळ हिच्या ‘असण्याने’ चित्रपटाबाबतची विश्वासार्हता वाढते, अशी हिची खूप वेगळी ओळख.)
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’चा सचिन खेडेकर (याने अस्सल मध्यमवर्गीय साकारला, मराठी मनाचा संकोच व उद्रेक त्याने साकारला.)
ही काही ‘चित्रपटांमुळे स्टारडम’ मिळाल्याचे मोजकी उदाहरणे.
पण या ‘स्टार्स’ना उत्तम कथानकावरच्या चित्रपटांतूनच वाटचाल साकारावी लागली. वर्षांने ‘अबोली’, ‘लागली पैज’ अशा कथाप्रधान चित्रपटांतून उत्तम अभिनय साकारताच आपण ‘फक्त छान दिसणे, मोकळे हसणे’ या वर्गवारीतील नाही हे सिद्ध केले. त्या गुणावर पंचवीस-सत्तावीस वर्षांची वाटचाल साकारता येत नसते, त्यासाठी कथाप्रधान चित्रपटालाच हुकमी आधार लागतो.
‘मराठी चित्रपटाच्या उत्तम कथेची ही गोष्ट’ गेल्या काही वर्षांत ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘पितृऋण’, ‘जोगवा’, ‘टाइमपास’ अशा चित्रपटांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंतच्या यशस्वी मराठी चित्रपटांत कथा-आशय श्रेष्ठ असलेल्या चित्रपटांची टक्केवारी जास्तच दिसते, त्याचा अभिमान आहे.
इतकेच नव्हे तर आतापर्यंतच्या नाकारल्या गेलेल्या अथवा अपयशी चित्रपटांचा विचार करताना त्यात चांगली कथा नसणाऱ्या, चांगली कथा असूनही हाताळणीत फसणाऱ्या अथवा अगदीच जेमतेम नावापुरती कथा असणाऱ्या चित्रपटांची टक्केवारी जास्तच दिसते. मग तो ‘लव्ह इज वाट’ नावाचा प्रेमपट असो अथवा ‘भुताचा हनिमून’ नावाचा विनोदीपट असो.. हे चित्रपट होते हे माहित्येय?
कथेशी पंगा घेतलाच तर मराठी चित्रपट रसिकांनी तुमच्याकडे पाठ फिरवलीच समजा. तेवढा तो सुज्ञ आहे. कारण, मराठीत चांगली कथा हीच खरी ‘स्टार’ आहे.
मराठी चित्रपटाची खरी ओळख होण्यासाठी ‘कचकडय़ाच्या स्टार’ची गरजच नाही. मुखवटे बदलणारे, खेळवणारे स्टार नकोत.
मराठी चित्रपट मनापासून पाहिला जात असल्यानेच त्याची कथा भिडते, केवळ नेत्रसुखासाठी ‘धूम ३’सारखा झगमगाट आहेच. त्यात कथा शोधूनही सापडणारी नाही व तशी अपेक्षाही नाही.
मराठी चित्रपटाची कसदार कथाच कायम ‘धूम मचाले’ ठरते. तुम्हाला काय वाटते?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ayodhyecha raja to timepass

ताज्या बातम्या