scorecardresearch

भविष्य विशेष : महाराष्ट्राची अग्निपरीक्षा

गुरू-शनी युती योग घेऊनच आपण २०२१ सालात पदार्पण करत असलो, तरी या नव्या वर्षांत अनेक कुयोग होत आहेत, त्यांचीही दखल आपल्याला घ्यावी लागणार आहे.

भविष्य विशेष : महाराष्ट्राची अग्निपरीक्षा
८ जानेवारीला प्लुटो मकर राशीत येतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील बुध-शुक्राच्या केंद्रात वर्षभर राहणार आहे. अशी ही महाराष्ट्राच्या कुंडलीतील पहिल्या चार महिन्यांची बोचरी ग्रह स्थिती असेल.

उदयराज साने – response.lokprabha@expressindia.com

गुरू-शनी युती योग घेऊनच आपण २०२१ सालात पदार्पण करत असलो, तरी या नव्या वर्षांत अनेक कुयोग होत आहेत, त्यांचीही दखल आपल्याला घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षांच्या (२०२०) शेवटास गोचर मंगळाने २४ डिसेंबरला मेष राशीत प्रवेश केला. त्यामुळे ५ जानेवारीपासूनच शनी-मंगळ केंद्र योगाला सुरुवात होईल, त्यापाठोपाठ १७ जानेवारी ते ऑगस्टपर्यंत शनी-हर्षल केंद्रयोग होत आहे. तसेच ११ जानेवारीपासून सुरू होऊन ८ फेब्रुवारीपर्यंत गुरू-मंगळ केंद्रयोग राहणार आहे. गोचर राहू हा महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील शनीच्या षडाष्टकात फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. याच महिन्यात गोचर राहू-नेपच्यूनच्या केंद्रयोगात राहणार आहे. तसेच ११ फेब्रुवारीपासून गोचर मंगळ कृत्तिका या उग्र व राक्षसगणी नक्षत्रात प्रवेश करतो. हा योगसुद्धा ११ मार्चपर्यंत राहणार आहे. त्यापुढे मंगळाचे राहूवरून भ्रमण होणार आहे. ८ जानेवारीला प्लुटो मकर राशीत येतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील बुध-शुक्राच्या केंद्रात वर्षभर राहणार आहे. अशी ही महाराष्ट्राच्या कुंडलीतील पहिल्या चार महिन्यांची बोचरी ग्रह स्थिती असेल. त्यानंतर ५ एप्रिलला गोचर गुरू कुंभ राशीत प्रवेश करेल. या सर्व पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रासाठी २०२१ कसे असेल, हे पाहणार आहोत.

महाराष्ट्राच्या धनू लग्नाच्या कुंडलीत धनस्थानात प्लुटो येत आहे, त्याचा पंचमातील बुध-शुक्राशी केंद्र योग लगेचच होत असून, हा केंद्र योग संपूर्ण वर्षभर टिकणार असल्याने त्याचा विचार प्रथम करू. राज्यातील नवे सरकार डोक्यावर तीन लाख कोटींचे कर्ज घेऊनच अधिकारावर आले. या केंद्रयोगामुळे व्यापारी ग्रह बुध अडकल्याने व्यापार आणि शेअर बाजारात मंदीची धारणा वेगवेगळ्या कारणांसाठी दिसून येणार आहे. करोनाच्या जीवघेण्या संकटातून राज्य स्थिरस्थावर होण्यासाठी बराच कालावधी जाणार असल्याने, आर्थिक आघाडीवर आशादायक चित्र दिसणार नाही. गोचर बुध हा त्याच्या नियमित भ्रमणात वायुराशीत वक्री राहणार असल्याने, आगामी पावसाळा फक्त महाराष्ट्रापुरताच नाही, तर पूर्ण देश पातळीवरसुद्धा त्रासाचा जाणार आहे. महाराष्ट्राला कायमच अवकाळी पाऊस झोडपून काढतो. त्यात कोणतीही सुधारणा होणार नसून, नेहमीप्रमाणे हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणार ठरेल. बुध- प्लुटो केंद्रयोगामुळे शिक्षण क्षेत्रातसुद्धा खूप नुकसान होणार आहे. गोचर शुक्र-प्लुटो केंद्र योगामुळे महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसाय, आलिशान फर्निचरचे कारखाने, कॉस्मेटिक्स्, फूल बाजार, सोन्या-चांदीचे व्यापारी, हवालामार्फत केले जाणारे व्यवहार, परदेशी चलनासंबंधीचे व्यवहार, कापड बाजार, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, वाहन उद्योग, कलाकुसरीच्या वस्तू, अशांसारखे शुक्रप्रधान व्यवसाय अडचणीत येणार आहेत. अनेक कलाकार या कुयोगाच्या कात्रीत अडकणार असून, त्यांच्या स्थानाला धक्का बसेल. स्त्रिया व लहान मुलांनाही या कुयोगाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

जानेवारीपासूनच शनी-मंगळ केंद्रयोग सुरू होणार असल्याने, अपघातासारख्या अप्रिय घटना, संप-आंदोलने, सामाजिक विषमता, जातीय तेढ आणि अन्य अप्रिय घटनांमुळे वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे. याचा सत्तारूढ पक्षास त्रास होणार आहे. राज्यातील व्यापार आणि उद्योग बाधित होणार आहेत. गुरू-मंगळ केंद्रयोग वातावरणातील उष्णता भयंकर वाढवणार असल्याने, उकाडा जरा लवकरच जाणवू लागेल. समाजात उधळपट्टीला प्रतिष्ठा प्राप्त झालेली पाहावयास मिळेल. राज्यातील श्रीमंत वर्ग श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन घडवेल.

या वर्षांतला सर्वात मोठा कुयोग हा शनी-हर्षल केंद्रयोग आहे. महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा पुरोगामी राज्य असूनही या केंद्रयोगामुळे लोकोपयोगी सुधारणांना व विकासाला निधीअभावी कात्री लावण्याची वेळ राज्यकर्त्यांवर येईल. कृत्तिका नक्षत्रात मंगळ ११ फेब्रुवारी ते ११ मार्च असेल. त्याची तीव्रता वाढवणारा राहू-नेपच्यून केंद्रयोगही असून त्यामुळे दोन महिने भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. मागचे संपूर्ण वर्ष करोनाच्या छायेत गेले आणि त्यातील काही वादग्रस्त घटनांमुळे सामाजिक असमतोल आणखी बिघडला. त्याचे पडसाद नव्या वर्षांत उमटतील. सामाजिक तेढ वाढण्याची शक्यता असून सरकारला अतिशय दक्ष राहावे लागणार आहे.

५ एप्रिलला गुरू कुंभ राशीत प्रवेश करतो. त्यामुळे एप्रिलआधी झालेली पडझड सावरण्यात बराच काळ जाणार असला तरी, एकीकडे रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा, दुसरीकडे अवकाळी पाउस, जोडीला गारपीट या वाईट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. गोचर गुरू राज्याच्या कुंडलीत तृतीय स्थानात येत असल्याने राज्याची आर्थिक घसरगुंडी पुन्हा जागेवर आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल, त्याला काही प्रमाणात यश येईल. पण राजकीय घडी मात्र झपाटय़ाने बिघडत जाणार आहे. सरकारला अनेक आघाडय़ांवर लढावे लागणार असल्याने, हे सरकार घायकुतीला येणार आहे. तशातच गोचर शनी मकर राशीत वक्री होईल व गुरूचे बळ कमी पडत चालल्याचे लक्षात येईल. गोचर हर्षलचे भ्रमण महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील रवीवरून सुरू असल्याने नित्य नव्या अडचणींना जसे तोंड द्यावे लागणार आहे, तसेच नव्या नेतृत्वाचा शोध घेण्यामुळे राजकीय अस्वस्थता आणखी वाढणार आहे. गोचर हर्षल १६ अंशांपर्यंत जाणार असून महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील नेपच्यूनच्या प्रतियोगात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठे बदल घडून येण्याची शक्यता दिसते.

१६ जुलैपासून कर्क संक्रमण सुरू होते. शनी-हर्षल केंद्रयोग सुरू असताना, हर्षल हा महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील नेपच्यूनच्या प्रतियोगात येत असल्याने महाराष्ट्रात जबर पाऊस पडणार आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होईल. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात हा पाऊस तापदायक ठरणारा आहे. या वेळेचा पाऊस अत्यंत लहरी असून काही ठिकाणी मुबलक प्रमाणात पडेल, तर काही ठिकाणी अजिबात पडणार नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान होईल.

२०२१च्या ग्रहमानाचा तिसरा टप्पा हा सप्टेंबर ते डिसेंबर असा आहे. यात प्रामुख्याने गोचर राहू हा कृत्तिका नक्षत्रात १७ सप्टेंबरपासून प्रवेश करतो. महाराष्ट्राच्या मूळ कुंडलीतील प्लुटो हा राहूच्या कुयोगात डिसेंबरअखेपर्यंत असल्याने, राज्याच्या मूळ कुंडलीतील गुरूच्या कुयोगात असल्याने, संमिश्र फलदायी होईल. अनेक जटिल प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सपशेल फसेल. राजकीय स्थिती अत्यंत नाजूक झाली असताना, महाराष्ट्राचे अर्थकारण जबरदस्त ढासळलेले दिसून येईल. सत्तारूढ पक्षास याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. गुरू बदलानंतर राजकीय स्थिती अत्यंत नाजूक होण्यास सुरुवात होईल. त्याला कारणेही तशीच असणार आहेत. त्रिपक्षीय सरकारात आंतरिक वाद नव्याने उफाळून येतील. आरोप-प्रत्यारोप, राजकीय हेवेदावे, रोज होणारी नवी आंदोलने यामुळे हे सरकार घेरले जाणार आहे. यात जनतेचे प्रचंड नुकसान होणार आहे. एकूणच २०२१ साल महाराष्ट्रासाठी फारसे आशादायी नसून, एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागणार आहे. नव्या वर्षांत अर्थकारणाला गती मिळणार नाही, तसेच सतत कर्ज काढण्याची वेळ सरकारवर येणार आहे. राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचलेली दिसेल. यातूनच जनतेने स्वत:च बोध घेऊन २०२१ मध्ये काटकसरीचे धोरण प्रारंभापासूनच अवलंबले तरच या वाईट ग्रहस्थितीपुढे टिकाव लागेल. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘वाणी, नाणी आणि पाणी उगाची नासू नये’.

राजकीय पटलावर…

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बरोबर एक वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. त्यावरच आपण फलज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. यासाठी आपण प्रथम काँग्रेसच्या कुंडलीचा विचार करू. काँग्रेसच्या धनू लग्नाच्या कुंडलीत गोचर शनी हा मकर राशीत  गुरूच्या बरोबर आला आहे. ही गुरू-शनी युती २१ डिसेंबरला झाली. ८ जानेवारीला गोचर प्लुटोचे आगमन मकर राशीत होत आहे. गोचर राहूचे आगमन याआधीच झाले आहे. काँग्रेसच्या मूळ पत्रिकेतील चंद्राच्या धनातून हा राहू जात आहे. ‘हर्षल’चे गोचरभ्रमण मेष राशीतून सुरू असून काँग्रेसच्या कुंडलीत हा हर्षल पंचमातून आणि काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील चंद्र-शनीवरून हात आहे. ‘मंगळ’ हा राश्याधिपती असून या गोचर मंगळाने २४ डिसेंबरला मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याचे भ्रमण काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील ‘चंद्र-शनी’वरून सुरू होईल. ५ जानेवारीपासूनच गोचर मंगळाच्या कारवाया आपण पाहणार आहोत. सरकारमधील एक पक्ष अजिबातच समाधानी नाही, हेच यातून दिसून येईल. गोचर हर्षल आणि काँग्रेसच्या मूळ पत्रिकेतील शनी याचा युतीयोग जसा होत आहे तसाच गोचर शनी आणि गोचर हर्षल यांचा केंद्रयोगही होत असल्याने पक्षात मोठे बदल होण्यासाठी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट कार्यरत झालेला दिसण्याची चिन्हे आहेत. हा गट सरकारमधून बाहेर पडण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. याची सुरुवात १४ जानेवारीपासूनच होईल आणि १४ मे रोजी वृषभ-रवी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या वेळी ‘शनी-हर्षल-मंगळ-रवी-राहू’ या सर्व ग्रहांची भ्रमणे निर्णायक ठरतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार करता २७- ५-१९९९ स्थापन झालेला हा पक्ष सत्तेवर असल्याने आपण त्याचा विचार करणार आहोत. ‘गुरू-शनी’ मकरेत, ८ जानेवारीला गोचर प्लुटो मकरेत. गोचर हर्षल मेषेत, गोचर मंगळाचे २४ ला मेष राशीत आगमन व ५ ते २५ जानेवारीपर्यंत मंगळाचा रुद्र अवतार पाहावयास मिळणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या सप्तम स्थानातील भ्रमणाच्या काळात पक्षातील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली जाण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरुवात मकर संक्रमणापासून होईल. ‘शनी-हर्षल’ केंद्रयोग ‘शनी-मंगळ’ केंद्रयोग एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून सुरू होणारा ‘रवी-शनी’ कुयोग आणि गोचर राहू व राष्ट्रवादीच्या मूळ पत्रिकेतील प्लुटोचा प्रतियोग तसेच ८ जानेवारीला मकरेतील प्लुटो या पक्षाच्या ‘मंगळ-गुरू’ प्रतियोगाच्या केंद्रात असल्याने असंतोषात वाढ होऊ शकते. यामुळेच पक्षासाठी गोचर मेष आणि वृषभ-रवी सर्वाधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच असणार आहे कारण सत्तेवर येतानाच अशी काहीतरी विभागणी निश्चितच केली गेली असण्याची दाट शक्यता आहे, पण या पक्षाचा उपमुख्यमंत्री असल्याने मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे जाणे अपेक्षित आहे.

जानेवारीच्या मकर संक्रमणापासून सत्तासंघर्षांची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठे औदासीन्य असून गोचर शनी आणि मूळ कुंडलीतील चंद्र यांच्या अशुभ योगामुळे असे घडत असले तरी राजकारणात काही मिळवायचे असेल तर संघर्ष करावाच लागेल आणि त्याची सुरुवात या मकर संक्रमणापासून होईल. या पक्षाच्या मूळ कुंडलीतील शनीवरून होणारे हर्षलचे भ्रमण, मूळ कुंडलीतील ‘रवी-बुधा’वरून होणारे राहू भ्रमण गोचर प्लुटोचे मकर राशीतील भ्रमण. हे सर्व ग्रह हेच सांगतात. आगामी काळात पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता असून हे सर्व भाकरी फिरविली नसल्याने होणार आहे.

शिवसेनेची स्थापना १९-०६-१९६६ साली झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या सशक्त प्रेरणेतून या पक्षाचा जन्म झाला. या पक्षाच्या मिथुन लग्नाच्या कुंडलीत मूळ कुंडलीतील रवीच्या षडाष्टकात प्लुटो असून हा योग तब्बल तीन वर्षे चालणार आहे. त्यामुळे पक्षात फार मोठे फेरबदल घडून येणार आहेत. ‘हर्षल-प्लुटो’ युतीच्या केंद्रात मंगळ असून या केंद्रयोगाच्या जवळ गोचर राहू फेब्रुवारीच्या शेवटापासून येत असून पक्षात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. वृषभेच्या मंगळाचे भ्रमण गोचर राहूवरून होणार असल्याने पक्षातील असंतोषाला वाट मिळण्याची चिन्हे आहेत. १४ मार्चच्या मीन रवीपासून प्रत्येक रवी भ्रमण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेच्या कुंडलीत २१ मार्च ते १ एप्रिलपर्यंत मंगळ-राहु युतीयोग होत असल्याने आणि शिवसेनेच्या मूळ कुंडलीतील ‘राहू’ हा ‘कृत्तिका’ नक्षत्रात असल्याने त्याची दखल घ्यावी लागते. महाराष्ट्रात सामाजिक असंतुलन वाढण्याची शक्यता आहे, यामुळेच शिवसेनेच्या नेत्यांनी सबुरी ठेवावी. मुख्यमंत्र्यांना प्रकृतीचे त्रास फेब्रुवारीपासून सुरू होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांच्या कुंडलीतील गोचर राहू हा मूळ कुंडलीतील चंद्राच्या केंद्रात आणि मूळ कुंडलीतील शनीच्या षडाष्टकात राहणार असल्याने आरोग्याचा त्रास वाढू शकतो. शिवसेनेने ५ एप्रिलपर्यंत संयम ठेवला, तर  त्यांना गोचर गुरूची चांगली साथ मिळू शकते. या सरकारच्या शपथविधी कुंडलीत गोचर शनी हा शपथविधी कुंडलीतील मंगळ आणि राहू अशुभ योगात येत असल्याने या तीन पक्षांत सत्तासंघर्ष चांगलाच जोर पकडण्याची शक्यता आहे. अत्यंत कमी निधीमुळे विकासकामे ठप्प होण्याची आणि प्रशासकीय कामांत अनंत अडचणी येण्याची चिन्हे आहेत. या समस्या सरकारला जेरीस आणतील, असे दिसते.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या