बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोक भानच ठेवत नाहीत. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे.
वधू संशोधनाचे दिवस होते त्या वेळची गोष्ट. नागपूरला ‘पाहण्याचा’ कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठय़ांच्या गप्पा सुरू होत्या. तेवढय़ात साधारण चाळिशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वेमध्ये कुठल्याशा विभागात क्लेरिकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
‘‘तुमचं इंजिनीअिरग कुठल्या विषयात झालंय?’
‘‘मेकॅनिकल!’’(मनात : बायोडाटा बघितला नाही का बे?)
‘‘अरे वा! कुठल्या कंपनीत काम करता?’’
‘‘क्ष कंपनीत’’
‘‘कधी नाव ऐकलं नाही. नवीन आहे का?’’
‘‘नाही. ३५ वर्षे जुनी आहे.’’
‘‘अच्छा! तसा मी १९८४ चा डिप्लोमा होल्डर आहे मेकॅनिकल! मला ही इंडस्ट्री चांगलीच माहिती आहे. हे नाव पहिल्यांदाच ऐकलं’’
‘‘तुम्ही कोणत्या कंपनीत होतात?’’
‘‘नाही नाही ! मी पहिलेपासून रेल्वेतच आहे.’’
च्यामारी! आम्ही सहा-सात वर्षांपासून घासतोय तरी या इंडस्ट्रीचा आवाका अजून कळेना अन् ह्य़ाला डिप्लोमा घेऊन अख्खी इंडस्ट्री कळली!
एकदा कंपनीत चर्चा सुरू होती. आमचे एक अत्यंत अनुभवी वरिष्ठ (इलेक्ट्रिकल इंजिनीअर), साइटवरचे अनुभव सांगत होते. आम्ही सगळे भक्तिभावाने ऐकत होतो.
‘‘अरे रात्रभर त्या ट्रान्सफॉर्मरचं इरेक्शन सुरू होतं. पंचवीस हजार किलोव्हॅटचा होता तो..’’
तेवढय़ात एक नुकताच साइटवरून आलेला मॅनेजर पचकला.
‘‘काहीही नका सांगू हो. ट्रान्सफॉर्मर लावणं एवढं कठीण असतं होय? आम्ही तर असं हातांनी झेलत झेलत लावायचो ट्रान्सफॉर्मर!’’
ते वरिष्ठ एकदम स्तब्ध झाले. आणि शांतपणे म्हणाले.
‘‘ट्रान्सफॉर्मर डिझायिनगचं पुस्तकसुद्धा असं हातात झेलता येत नाही. तू ट्रान्सफॉर्मर लावला की खोलीतला टेबलफॅन?’’
एकदा घरी एक ओळखीतले गृहस्थ आले होते. त्या वेळी नुकतंच कपिलदेवला ‘विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेन्चुरी’ हा पुरस्कार घोषित झाला होता. त्या गृहस्थांचं आणि कपिलदेवचं काय वाकडं होतं कोणास ठाऊक पण या घटनेवर झालेली चर्चा खालीलप्रमाणे
‘‘अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा?’’
‘‘का हो? असं का म्हणताय?’’
‘‘कपिलदेवची लायकीच नाहीये!’’
(अरे बापरे..माझ्या एका श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला होता!)
‘‘असं तुम्हाला वाटतं!’’
‘‘मीसुद्धा क्रिकेट खेळलोय म्हटलं.महाराष्ट्राच्या रणजी टीममध्ये होतो. कपिलदेव आयुष्यभर खेळला ते फक्त एका मॅचच्या भरवशावर. तीपण झिम्बाब्वेविरुद्ध .१७५ काढले होते’’
‘‘म्हणजे त्याआधी आणि त्यानंतर, तो कधीच चांगला खेळला नाही???’’
‘‘नाही.!!’’
‘‘तुम्ही किती वर्षे खेळला महाराष्ट्राकडून?’’
‘‘एक सीझन खेळलोय. त्यातही एका मॅचमध्ये प्लेइंग एलेव्हनमध्ये होतो’’
देवां..ज्या मॅचच्या भरवशावर कपिलदेव आयुष्यभर खेळला असं म्हणतायेत त्यात तो कॅप्टन होता हो..आणि वर्ल्डकप जिंकलो त्या वेळी आपण ! आणि हे एका सीझनच्या भरवशावर विस्डेनच्या ज्युरींना अक्कल शिकवतायेत!
कंपनीतल्या एकाने तर कहर केला होता. शाळेत असताना ते हॉकी खेळायचे म्हणे. आणि कर्मधर्मसंयोगाने धनराज पिल्ले त्यांचा वर्गमित्र होता. (खरं – खोटं माहिती नाही!) एकदा ते म्हणाले,
‘‘हा धन्या खरंच नशीबवान निघाला.’’
‘‘का हो?’’
‘‘अरे आम्ही सोबत खेळायचो. मी कॅप्टन होतो शाळेचा.’’
‘‘बरं मग?’’
‘‘अरे दहावी पास झालो. नंतर माझी हॉकी सुटली. आणि हा खेळत राहिला. अभ्यासाच्या नावाने बोंब होती त्याची. झाला भारताच्या टीममध्ये सिलेक्ट.’’
‘‘अहो पण नशिबाचा काय संबध? कॅलिबर होतं त्याचं तेवढं.’’
‘‘कसलं कॅलिबर डोंबल?? मी खेळणं थांबवलं आणि हा सिलेक्ट झाला!!’’
एका मित्राला शेयर मार्केटविषयी बोलायला फार आवडायचं. वॉरेन बफेटनंतर मार्केट त्यालाच कळलंय अश आविर्भावात तो बोलायचा.
‘‘तुला सांगतो. मार्केट उगाच खाली-वर जात नाही. त्याला १०० नियम आहेत. मी अभ्यास केलाय त्याचा. बघ तू.. पुढची पाच वर्षे मार्केट वरच जाणार.’’
त्यानंतर काही दिवसातच मार्केट बदाबदा खाली पडलं.
‘‘अरे असं होतं कधीकधी.दहापकी सात वेळा मार्केट नियम पाळते.तीन वेळा पाळत नाही’’
‘‘त्या तीन वेळा कशा ओळखायच्या?’’
‘‘एवढं सोप्प नाहीये..अभ्यास करावा लागतो.. मी अभ्यास केलाय त्याचा!!!’’
एका मित्राला बढाया मारण्याची सवयच जडली होती. कोणताही विषय काढला की तो सुरू व्हायचा. बोलण्याचा सूर साधारण असा असायचा, ‘‘माझे एक काका यूएसला आहेत .वगरे वगरे..’’ त्याचे काका किंवा मामा जगातल्या सगळ्याच देशांमध्ये होते. ते कमी पडलेच तर दादा आणि ताई तर अगणित होत्या. एकदा असंच कोणत्या तरी विषयावर चर्चा सुरू होती. तो घाईघाईने म्हणाला,
‘‘चल मी निघतो.’’
‘‘अरे कुठे चालला एव्हढय़ात.’’
‘‘अरे मला दादाकडे जायचंय.’’
(एवढी चांगली संधी मी कशी सोडणार!)
‘‘अरे थांब ..संध्याकाळी यूएससाठी कोणतीच फ्लाइट नाहीये!!!’’
असे कितीतरी महाभाग दैनंदिन आयुष्यात भेटतात. कधी रेल्वे किंवा बस प्रवासात आपल्या सहप्रवाशाशी बोलून बघा. वास्तविक प्रवासात होणाऱ्या चच्रेचा उद्देश फक्त टाइमपास हाच असतो. तिथे झालेली ओळख ही तेवढय़ा वेळापुरती असते. पण बढाईखोर अशा संधीची वाटच पाहत असतात. एकदा माझ्या शेजारी बसलेले काका, त्यांना रेल्वे प्रवासाचा कसा दांडगा अनुभव आहे हे सांगत होते.
‘‘अरे मी जेवढे दिवस घरात राहिलो असेल त्याहून जास्त दिवस रेल्वे प्रवासात राहिलोय.’’
‘‘हो का, अरे वा.’’
‘‘ हा रूट तर माझ्यासाठी रोजचाच आहे..सगळ्या गाडय़ांच्या वेळा माहितीयेत मला.’’
‘‘अच्छा.’’
त्यांना खरोखरच गाडय़ांची माहिती असावी. पण त्यांना ते सिद्ध करून दाखवायचंच होतं. पूर्ण प्रवासात आम्हाला क्रॉस झालेल्या प्रत्येक ट्रेनचं नाव त्यांनी मला सांगितलं (एकतर या बहुमूल्य माहितीचा मला काहीही उपयोग नव्हता आणि त्यांनी कोणतंही नाव सांगितलं तरी हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हता.). पण एका कुठल्या तरी ट्रेनचं नाव त्यांना काही केल्या आठवत नव्हतं. ती ट्रेन आम्हाला तेव्हा क्रॉस होत होती.
‘‘अरे मी गेलोय रे या गाडीनी..नाव आठवत नाहीये खरं!’’
‘‘जाऊ द्या काका.’’
‘‘अरे असं कसं? माहितीये ना मला’’
‘‘अहो मग आठवत नसेल तर उतरून विचारून या ना,’’ मी नकळतपणे बोलून गेलो.
ते काका थोडा वेळ शांत बसले. पण त्यांना काही राहवेना.
‘‘रेल्वे बजेट पार हुकलंय बघ या वेळी.’’
‘‘का? काय झालं?’’
‘‘अरे नुकसानीत चाललीये रेल्वे. थोडी भाववाढ करायला हवी होती.’’
‘‘नुकसान?’’
‘‘मग काय? तुमच्या प्रायव्हेट कंपन्यांसारखा खोऱ्यानी पसा नाही ओढत रेल्वे. हेच कळत नाही ना तुम्हाला..अरे तुम्ही लोकं..’’
काका मगाचा बदला घेणार हे माझ्या लक्षात आले.
‘‘सगळं मान्य आहे काका! पण प्रायव्हेट कंपन्यांसारखा इन्कम टॅक्स भरावा लागतो का रेल्वेला? बारा महिने तेजीत चालणारा दुसरा कुठला धंदा पाहिलाय तुम्ही? बरं ते जाऊद्या.कोणत्या धंद्यात ६० दिवसाआधी १०० टक्के पेमेण्ट मिळते? वारंवार वाईट अनुभव येऊनही कस्टमर परत प्रवास करायला येतात असं दुसऱ्या कोणत्या धंद्यात होतं?’’
काका नंतर पूर्ण प्रवासात शांत होते!
चिनार जोशी – response.lokprabha@expressindia.com