दचकू नका! मला ‘म्हातारचळ’ लागलेलं नाही. भारनियमनाच्या अंधारात आम्ही एकेकटी कोकणी माणसं जुन्या-जाणत्या मैत्रिणीची सोबत मिळवतो. ती मैत्रीण म्हणजे गेली ५० वर्षे आम्हाला साथ देणारी- ‘आकाशवाणी’.

वीज वारंवार जाते. टी. व्ही. बंद पडतो. मग बॅटरीवर चालणारी आकाशवाणीच कामी येते. ‘अस्मिता’ हे तिच्या एका मुलीचं, वाहिनीचं नावं आहे.

‘आकाशवाणी’च्या काही मैत्रिणी आता नाहीत. कुणी थकल्या, निवृत्त झाल्या. कुणी या जगातून निघून गेल्या, पण त्यांचे आवाज कानांत, मनात आहेत. करुणा देव (नीलम प्रभू), लीलवती भागवत, ज्योत्स्नाबाई देवधर, निवेदिका मुक्ता भिडे, ‘सहज सुचलं म्हणून’मधील ‘सोना’ अर्थात् विमल जोशी.. यादी काही संपायची नाही. ‘आकाशवाणी’चा गोतावळा फार मोठा. ‘सुप्रभात रसिकहो, सुप्रभात म्हणत ‘प्रभाते मनी’ कार्यक्रमात प्रासंगिक गप्पा करणारे निवेदक प्रभू दीक्षित, ‘आपली आवड’मधील आवाजात जपणाऱ्या कमलिनी विजयकर ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच आठवत असतील.

आयुष्याच्या संध्याकाळी तसेही आम्ही ठेचाळतच असतो. मग तरुण वयात आनंद देणाऱ्या त्या सगळ्या रेडिओ स्टार्सची आठवण येत राहते हो! पुरुषोत्तम जोशींचा भारदस्त पुणेरी स्वर आणि माडगूळकरांचं अमर ‘गीतारामायण’ आठवतं. लहान मुलांच्या ‘गंमतजंमत’ कार्यक्रमात प्रेमळ आजोबांचं स्थान मिळवणारे नारायण देसाई (नानुजी) स्मरणात असतात. ‘आकाशवाणी मुंबय आणि पणजी’.. म्हणत कोकणी कार्यावळ सादर करणाऱ्या दुर्गा नेवरेकरसुद्धा आम्हाला कधी परक्या वाटल्या नाहीत.

ललिता नेने, शरद चव्हाण आणि कुसुम रानडे हे मुंबइंच्या प्रादेशिक बातम्यांतले आवाज तर घरोघरी ठाऊक झालेले. ‘आरोग्यम् धनसंपदा’चा गोड डोस रोज देणाऱ्या सुषमा हिप्पळगांवकर या तर प्रत्यक्ष न पाहिलेल्या डॉक्टरीणबाईच वाटायच्या श्रोत्यांना. ‘परिसर’ सदरातून पर्यावरणावर प्रबोधन करणारे किशोर सोमण एखाद्या संमेलनाच्या निमित्ताने कोकणात आले, तर त्यांना बघायलाच गर्दी!

प्रभाकर जोशी ‘मॅड’ म्हणत ‘टेकाडेभावोजी’ ‘पुन्हा प्रपंच’ या श्रुतिका मालिकेत असे रंगवायचे की, अविस्मरणीय ठरणारच! त्या काळात पगारही फार नसायचे. तरी मनापासून ही मंडळी आवाज देत राहिली. यशवंत देवांसारखी माणसं संगीत विभागात कार्यरत असायची. आकाशवाणी श्रोत्यांसारखीच ऊनपाऊस झेलणारी संसारी होती व आहे. प्राध्यापिका शांता शेळकेंसारखी मंडळी रेडिओच्या पटावर राहिली नाहीत तरी ‘आकाशवाणी’ कधीही हक्काने त्यांना हाक मारायची व हे प्रतिभावंत आयत्या वेळीसुद्धा संहिता लिहून द्यायचे.

नटखट ‘विविधभारती’ होती आकर्षक, पण शेवटी व्यापारी सेवा! ‘सलून’मध्ये केस कापून घेईपर्यंत किंवा हॉटेलात मसाला डोसा खाता-खाता ऐकायला बरी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुणे आकाशवाणी’च्या ‘रत्नमाला’ कार्यक्रमाने जुन्या गाण्यांचा जो अपूर्व आनंद माझ्या पिढीला दिला, त्याला तोड नाही. मालती पांडे, कुंदा बोकील, पुरुषोत्तम देशपांडे (म्हणजेच पु. ल) हिराबाई बडोदेकर, लीला लिमये, प्रमोदिनी देसाई, गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, आर. एन. पराडकर, विठ्ठल शिंदे.. एकापेक्षा एक सरस कलाकारांच्या गायनाचा, सुगम संगीताचा खजिना या ‘रत्नमाला’मुळे खुला झाला. कान धन्य झाले. आता आमच्यापैकी काही जणांना कानांनी कमी ऐकू  येते.. पण तरी ‘आकाशवाणी’ जरा मोठय़ा आवाजात गप्पा मारते. तिला सगळं समजतं! आम्ही काही वषार्र्नी असणार नाही..‘मैत्रीण’ मात्र असेल. सांभाळा आमच्या आकाशवाणीला.
माधव गवाणकर