lp00बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेचं अनेकांना कमालीचं आकर्षण असतं. अनेकांना तिथे करिअर करायचं असतं. पण या क्षेत्रात कॅमेऱ्यासमोर उभं राहून अभिनय करणं या पर्यायाइतकेच कॅमेऱ्यामागेही अनेक पर्याय आहेत.

सिने इंडस्ट्री ही ताऱ्यांची दुनिया. याचं ‘दिसणं’च खूप आकर्षक आहे. म्हणूनच या क्षेत्राविषयी तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असते. या क्षेत्रात गेलो की सगळ्यांना दिसणार, लोकप्रिय होणार म्हणून कैक तरुण या क्षेत्राकडे वळतात. ताऱ्यांची झगमगाती दुनिया असल्यामुळे अनेकांना या क्षेत्रात येताना क्रेझ असते ती स्टार होण्याची. पण सिनेमात कलाकार म्हणून झळकणं इतकं सोपं नाही. शिवाय काही जण याच क्षेत्रात इतर वाटांकडे जात वेगळं काही करू पाहत आहेत. इतर वाटा म्हणजे या क्षेत्रातले इतर विभाग. तांत्रिक विभागांची संख्याही मंोठी आहे. त्यामुळे त्यात करिअर करण्यासाठी बराच वाव आहे, असं म्हणायला हरकत नाही. ध्वनिमुद्रण, संकलन, छायांकन, वीएफएक्स इफेक्ट्स, अ‍ॅक्शन सीन्स शिकवणारा विभाग, रंग-वेश-केशभूषा, सेलिब्रेटी मॅनेजर अशा अनेक शाखा या क्षेत्रात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट टीव्ही हे माध्यम दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावशील होत असल्यामुळे सिनेमातल्या अनेक प्रगत गोष्टी टीव्हीत बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सिनेमात वेगवेगळे प्रयोग करू पाहण्यासाठी ही सुवर्णसंधी असेल.
मराठी-हिंदी इंडस्ट्री दिवसागणिक वाढतेय. त्याची व्याप्ती मोठी होतेय. साहजिकच इथल्या कामाचा वेग वाढणार आणि काम करणाऱ्या माणसांची मागणीही वाढणार. नव्याने समोर आलेल्या विभागांपैकी एक म्हणजे सेलिब्रेटी मॅनेजमेंट हा विभाग. या विभागात काम करण्यासाठी तुमच्याकडे समन्वयकाचं कौशल्य लागतं. तसंच वक्तृत्वही उत्कृष्ट असावं लागतं. सेलिब्रेटींच्या मंोकळ्या तारखा माहीत असणं, कधी- कुठे- काय ड्रेस घातला होता याची माहिती असणं, कोणत्या इव्हेंट्सना जाऊ शकतात आणि कुठे नाही याबाबत कलाकारांशी बोलून ठरवणं अशा काही गोष्टी यात असतात. त्यामुळे सतर्क राहून, त्यांच्याशी चर्चा करून कलाकारांचं वेळापत्रक ठरवावं लागतं. अर्थात या विभागात थेट काम करता येत नाही. त्यासाठी आधी एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करावं. आताचे टॉपच्या कलाकारांचे पर्सनल मॅनेजर हे आधी मोठय़ा इव्हेंट कंपन्यांमध्ये ट्रेनी म्हणून काम करीत होते. इव्हेंटमध्ये काम करण्याचा सल्ला यासाठी की, तिथे विविध गोष्टी एकाच वेळी मॅनेज करण्याचं कौशल्य आत्मसात होतं. तसंच वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आल्यामुळे बोलण्याची कला अवगत होते. ज्यांच्यात उपजतच वक्तृत्वकला अवगत आहे ते या विभागात काम करू शकतात. हा विभाग पूर्वी फक्त हिंदूीमध्ये होता. आता ती लाट मराठीकडेही वळली आहे. त्यामुळे या विभागात वाव आहे.
या चकाकत्या दुनियेत कलाकार होण्यासाठी रोज हजारो तरुण इंडस्ट्रीचं दार ठोठावत असतात. पण त्यासाठी मुळात तुमच्यात अभिनय क्षमता आहे का, ते तपासून घेतलं पाहिजे. आता ठिकठिकाणी अभिनयाचं शिक्षण दिलं जातं. अभिनयाचं उत्तम शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. तिथे प्रशिक्षण घेऊन मालिका, नाटक, सिनेमा यांचा अभ्यास करावा. स्वत: त्यात मिळेल ते काम करावं, इतरांचंही बघावं. केवळ निरीक्षणानेही अनेक गोष्टी कळतात. तुमचं अभिनयाचं नाणं खणखणीत असलं तर तुम्ही या क्षेत्रात चमक दाखवू शकाल. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे असं म्हटलं जातं. दिग्दर्शक होण्यासाठी सिनेमा या माध्यमाची दृष्टी एखाद्याकडे असावी. सिनेमाचं तंत्र वेगळं असतं. सर्वार्थाने त्याचा आवाकाही मोठा आहे. त्यामुळे दिग्दर्शनाकडे वळणाऱ्यांनी हे तंत्र शिकून घ्यावं. त्यासाठी अनुभवी दिग्दर्शकांसोबत साहाय्यक म्हणून काम करणं आवश्यक असतं. त्या दिग्दर्शकासोबत काम करताना त्याच्यासारखंचं काम करण्याचा विचार न करता त्यातलं तंत्र शिकून आपण कसं आणि काय वेगळं करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आणि एखाद्या सिनेमाचं दिग्दर्शन करायला मिळालं असं इथे होत नाही. काही वेळा नाटकांचं दिग्दर्शन केलेला तरुण सिनेमाच्या दिग्दर्शनाकडे वळतो. पण दिग्दर्शनाचीच मुळात त्याच्याकडे दृष्टी असते. दिग्दर्शनानंतर महत्त्वाची शाखा येते ती लेखनाची. लेखनासाठी प्रचंड सराव असावा लागतो. हा सराव शाळा-कॉलेजांपासून सुरू केला तर अधिक उत्तम. जसजसा सराव वाढत जातो तसतसं तुमचं लेखन हे प्रगल्भ होत जातं. यासाठी वाचनाला पर्याय नाही. जितकं चांगलं आणि वेगवेगळ्या भाषांमधलं वाचन कराल तितकं ते तुमच्यात लेखनात उतरेल. संघर्ष सगळ्याच शाखांमध्ये आहे. मेहनत केली तर त्याचं फळ नक्की मिळतं.
छायांकन ही अतिशय महत्त्वाची शाखा आहे. इतर शाखांप्रमाणे यातही लक्षणीय बदल झालेत. कॅमेऱ्याची जाण असणाऱ्यांना या शाखेत उत्तम करिअर घडवता येऊ शकतं. मात्र फोटोग्राफीची आवड आहे म्हणून मला छायांकन करायचंय असा दृष्टिकोन चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीचं अर्धवट ज्ञान असणं धोकादायक आहे. फोटोग्राफी आवडते म्हणून छायांकनाकडे वळणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, छायांकनाचं मूळ फोटोग्राफी असलं तरी त्याचं तंत्र वेगळं आहे. त्यामुळे ते शिकून घेऊन मगच त्याचा गांभीर्याने विचार करावा. फोटोग्राफी शिकला असाल तर छायांकन शिकताना सोपं जातं, हे बरोबर असलं तरी छायांकनासाठी प्रचंड संयमी वृत्ती लागते. कारण त्यातल्या तांत्रिक गोष्टी शिकाव्या लागतात. संयम म्हणजे पेशन्स कमी असला की ती गोष्ट करण्याचा कंटाळा येऊ लागतो आणि कालांतराने चुकीचं करिअर निवडल्याची जाणीव होते. त्या वेळी हातातून मौल्यवान वेळ वाया गेलेला असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. असं होऊ नये म्हणून वेळीच आपल्याला काय येतंय, आवड काय, आपली वृत्ती ठरावीक क्षेत्रात काम करण्यासाठी कशी पोषक आहे याचं आत्मपरीक्षण करावं. कारण या क्षेत्रात येण्यासाठी अनेकांची ‘पॅशन’ असली तरी त्यांच्याकडे ‘पेशन्स’ असण्याची आवश्यकता असते. नेमकी तिथेच गडबड होताना दिसते.
ग्लॅमरस अशा सिनेमा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. हेच नेमकं हेरून विविध संस्था तत्संबंधीचे तीन-तीन महिन्यांचे कोर्सेस सुरू करतात. पण, माझं स्पष्ट मत आहे की, या तीन महिन्यांचे कोर्स काहीही मिळवून देत नाहीत. तो कोर्स केला म्हणजे सगळं येतं, असा दृष्टिकोन चुकीचा आहे. सध्या येणाऱ्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसताहेत ते रंगभूषाकार. सिनेमात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे या विभागालाही प्रयोग करत राहणं क्रमप्राप्त असतं. त्यामुळे साहजिकच रंगभूषा या शाखेतही करिअर करण्यासाठी वाव आहे. प्रत्येक विभागात इनोव्हेशन्स झाली आहेत. तसंच रंगभूषेतही झाले. प्रोस्थेटिक आर्ट हा त्यांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा प्रयोग. फक्त प्रोस्थेटिक मेक-अप करण्यासाठीही आता वेगळी माणसं असतात. प्रोस्थेटिक मेक-अप शिकून अनुभवी रंगभूषाकाराला साहाय्य केलं तर यात चांगलं करिअर होऊ शकतं. याच्याशीच संलग्न असं क्षेत्र म्हणजे वेशभूषा. फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस असलेल्या अनेक संस्था आता मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये आहेत. अशा संस्थांमध्ये फॅशन डिझायनिंग शिकून इंडस्ट्रीत प्रस्थापित असलेल्या डिझायनर्सना साहाय्य केलं की तुम्हाला अनुभव येतो. मोठय़ा किंवा प्रस्थापित डिझायनर्सकडे काम करण्याचा एक फायदा असा की, मोठय़ा सेलिब्रेटींच्या संपर्कात राहता येतं, अनेकांशी ओळख होते, संपर्क वाढतो. तुम्ही चांगलं काम केलं की ते कलाकारांच्याही लक्षात राहतं. त्याची चर्चाही कलाकारांमध्ये होत असते. फॅशन डिझायनर हा एखाद्या कलाकाराचा वैयक्तिक असू शकतो किंवा एखाद्या निर्मिती संस्थेचाही असू शकतो. त्यामुळे यात करिअर करण्याची ही दुहेरी संधी आहे.
सिनेमाचं ‘फर्स्ट पोस्टर’ हा इंडस्ट्रीसाठी सण असतो. त्यामुळे पोस्टर मेकिंग यातही कला क्षेत्रातल्या मुलांना संधी आहे. कारण सिनेमाच्या विषयानुसार नव्या संकल्पनेतून पोस्टर तयार करणं हे कौशल्य कला क्षेत्रातल्या मुलांना अवगत असतं. खरं तर कला क्षेत्रातली मुलं इंडस्ट्रीत आली तर इंडस्ट्रीचा फायदाच होणार आहे. याचं कारण म्हणजे, रंगसंगती, विशिष्ट संकल्पनेकडे बघण्याची दृष्टी, विविध प्रयोग, मांडणी, सादरीकरण या सगळ्या गोष्टींची जाण त्या क्षेत्रातल्या मुलांना असते. त्यामुळे त्यांना इंडस्ट्रीत काम करण्याची विशेष संधी आहे. त्यांच्यासाठी आर्ट डिरेक्शन म्हणजे कला दिग्दर्शन हाही एक उत्तम पर्याय आहे. सिनेमाचा आवाका मोठा असतो. त्या-त्या विषयानुसार सेट उभारणं हे खरं तर आव्हानात्मक काम. पण, हा विभाग खूप आव्हानात्मक आहे. दुसरा सेट पहिल्यासारखा न दिसणं यात खरा कस लागतो. इथेही फाइन आर्ट केलेल्या तरुणांना संधी आहे. तसंच इंटिरिअर, आर्किटेक्चरचं ज्ञान असणाऱ्यांना संधी आहे.
संगीत-पाश्र्वसंगीत म्हणजे सिनेमातले यूएसपी. सिनेमा जुना झाल्यानंतर तो लक्षात राहतो ते त्यातल्या गाण्यांमुळेच. त्यामुळे हा विभाग करिअरसाठी उत्तम आहेच. पण, ‘सिनेमातलं संगीत’ असा विषय शिकवता येत नाही. मुळात संगीताचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. इथेही अनुभवी संगीतकारांना साहाय्य केल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे सिनेमांना संगीत देऊ शकतात. पाश्र्वसंगीतासाठी थोडीफार संकलनाची जाण असावी लागते. त्यासाठीही साहाय्यक म्हणून काम करत अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. तांत्रिक विभागांपैकी आणखी एक विभाग म्हणजे संकलन. या विभागाला प्रचंड वाव आहे. सिनेमाची गुणवत्ता ही संकलन कसं होतंय यावरही अवलंबून असते. संकलनाचं तंत्र शिकून घेणं महत्त्वाचं आहे. त्यातही बदल होत असतात. हे नवे बदलही समजून घ्यायला हवेत. संकलन शिकवणाऱ्या संस्था असतात. तिथे संकलनाचं मूलभूत शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा इथेही साहाय्यक म्हणून काम करण्याला पर्याय नाही. एखादी गोष्ट शिकली की त्यात मास्टर होता आलं पाहिजे. वीएफएक्स इफेक्ट्स, अ‍ॅनिमेशन या क्षेत्रातही करिअर करण्याचा वाव आहे. सिनेमात होणाऱ्या विविध प्रयोगांपैकी इफेक्ट्स हाही एक यशस्वी प्रयोग आहे. हॉलीवूडप्रमाणे आता बॉलीवूडमध्येही हा प्रयोग मोठय़ा प्रमाणावर होताना दिसतोय. त्यामुळे अ‍ॅनिमेशन, स्पेशल इफेक्टस्ची जाण असणाऱ्यांसाठी करिअरसाठी हा विभाग खुला झालाय.
तुम्ही केलेली एखादी गोष्ट लोकांपर्यंत कशी पोहोचते हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मार्केटिंग हा मुद्दा महत्त्वाची भूमिका बजावतो. सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर; आपण केलेल्या कामाचं ‘प्रमोशन’ झालंच पाहिजे. प्रमोशनचे हेच वारे सध्या बॉलीवूडमध्ये जोरात वाहू लागले आहेत. एकाच वेळी बनणाऱ्या सिनेमांची संख्या खूप आहे. ते सगळेच सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोठं असतं. हे काम करण्यासाठी टीमही मोठी असावी लागते. म्हणूनच सिनेमाच्या प्रमोशनसाठी मार्केटिंग आणि पीआर ही दोन क्षेत्र आणखी मोठी होणारेत. त्यामुळे इच्छुक तरुणांना इथे करिअर करण्याची उत्तम संधी आहे. पीआर आणि मार्केटिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. यात तुम्ही पदवीही मिळवू शकता. पण, यासाठी तुमचं वक्तृत्व उत्तम असायला हवं. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनवीन संकल्पना मांडता आल्या पाहिजेत.
सिनेमा हे माध्यम दिसताना आकर्षक, ग्लॅमरस दिसत असलं तरी त्यामागे मेहनत प्रचंड आहे. या क्षेत्रातल्या सगळ्याच शाखांमध्ये करिअर करता येऊ शकते. पण, तुम्हाला काय करायचं याबाबत तुम्ही स्पष्ट असायला हवं. जे हवं ते निष्ठेने केलं तर छोटय़ा विभागात करिअर करूनही तुम्ही मोठं नाव कमवू शकता.
(लेखक सिने क्षेत्रातील नामांकित सिनेमॅटोग्राफर व दिग्दर्शक आहेत.)
शब्दांकन : चैताली जोशी
महेश लिमये