कुठलाही नवीन सिनेमा येणार हे आजकाल आधी कळतं ते टीव्ही मालिकांमधून. तिथं सिनेमातल्या कलाकारांना बोलवून सिनेमाचं प्रमोशन करणं हा ट्रेंड सेट झाला असला तरी त्याचा आता प्रेक्षकांनाही उबग यायला लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांगल्या विषयांच्या मराठी सिनेमांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या सिनेमांचा प्रेक्षकवर्गही वाढताना दिसतोय. केवळ मनोरंजनासाठी हिंदी सिनेमे बघणारे प्रेक्षक आता आशयघन आणि वेगळ्या पठडीतल्या सिनेमांसाठी मराठीकडेही झुकू लागले आहेत. मराठी सिनेसृष्टीत होणाऱ्या प्रयोगांना यामुळे यश मिळतंय असं म्हणायला हरकत नाही. हिंदीचं मराठीमध्ये अनुकरण आधीही केलं जायचं आणि आताही काही प्रमाणात होतंच. मग ते सिनेमांच्या विषयांमधलं असो किंवा सादरीकरणातलं. अर्थात अनुकरण करणं हे वाईट नाहीच. पण, त्याचं स्वरूप आणि मर्यादा निश्चित असाव्यात. हिंदीचं ‘मार्केटिंग’चं वारंही मराठीकडे वाहू लागलं. सुरुवातीला या मार्केटिंगचं नवखंपण सगळ्यांनी अनुभवलं. कोणतीही नवी गोष्ट आकर्षक वाटतेच. तशी मार्केटिंगचीही वाटलीच. या मार्केटिंगला आता ‘प्रमोशन’ असं गोंडस नावही मिळालंय. ‘प्रमोशन’चा ट्रेंडही हिंदीकडूनच आलाय. पण, आता ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी मराठी सिनेमांच्या मार्केटिंगची अर्थात प्रमोशनची गत झाली आहे. नव्या गोष्टींचं प्रमोशन करणं योग्यच आहे. मनोरंजन क्षेत्रात प्रमोशन करण्याचे नवनवीन प्रयोगही होताना दिसतात. पण, त्याचा अतिरेक होता कामा नये.

टीव्ही हे प्रभावशाली माध्यम म्हणून ओळखलं जातंय. घरोघरी मराठी सिनेमा पोहोचवण्यासाठी घरोघरी असलेल्या टीव्ही या माध्यमाचा सिनेसृष्टी हक्काने वापर करू लागली. याची सुरुवात झाली हिंदीतून. रिअ‍ॅलिटी शोज सुरू झाले आणि हे प्रमोशनचं फॅड हिंदीमध्ये जम बसवू लागलं. विविध वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोजध्ये आगामी सिनेमांच्या कलाकारांची वर्णी लागायची. मग ती कलाकार मंडळी संपूर्ण वेळ त्या एपिसोडमध्ये दिसायचे. शोच्या अखेरीस त्यांच्या सिनेमांविषयी सांगायचे आणि चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा असंही आग्रहाचे आमंत्रण द्यायचे. अशा प्रकाराचं प्रमोशन अजूनही सुरू असतं. किंबहुना ते वाढलंय. आता हा सगळा प्रकार मराठीकडेही बघायला मिळतो. मराठीमध्येही रिअ‍ॅलिटी शोज आहेत. तिथे आता मराठी सिनेमांचं प्रमोशन होऊ लागलं आहे. प्रेक्षकांना याची सवय होतेय तोवरच मालिकांमधल्या प्रमोशनचा नवा ट्रेण्ड पचवायला प्रेक्षकांना सज्ज व्हावं लागलं. प्रेक्षक सज्ज झालेही. त्यांना नव्या ट्रेण्डची सवयही झाली पण, त्याचा वीट यावा इथवर आता परिस्थिती आली आहे. रिअ‍ॅलिटी शो किंवा कथाबाह्य़ कार्यक्रमांमध्ये सिनेमांचे प्रमोशन चालून जातात. कारण तशा कार्यक्रमांना सलग अशी कथा नसते. त्यामुळे ते कार्यक्रम बघताना प्रेक्षकांची लिंक तुटत नाही. याच्याविरुद्ध मालिका बघताना होत असतं. मालिकेत सलग कथा असल्यामुळे आणि त्यात विशिष्ट ट्रॅक्स सुरू असल्यामुळे अशा पद्धतीचं प्रमोशन जरा वेळ बरं वाटतं पण, अतिरेक झालं की खटकतं.

मालिकांमधल्या प्रमोशनचा फंडा चॅनल आणि सिनेमांच्या चांगलाच फायद्याचा ठरतो. कारण सिनेमातले बडे चेहरे मालिकांमध्ये आल्यामुळे मालिकांचा फायदा होतो तर मालिकांच्या लोकप्रियतेमुळे सिनेमा अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मालिका आणि चॅनल ‘एकमेका सहाय्य करू’चा पवित्रा घेतात. ‘लय भारी’, ‘किल्ला’, ‘टाइमपास टू’, ‘डबलसीट’, ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, ‘तू ही रे’, ‘क्लासमेट्स’, ‘मुंबई-पुणे-मुंबई टू’, ‘हॅपी जर्नी’ अशा काही सिनेमांची नावं यामध्ये प्रामुख्याने घेता येतील. विविध वाहिन्यांच्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये या सिनेमांची कलाकार मंडळी दिसली. कधी सिनेमांचं थेट प्रमोशन करताना तर कधी सिनेमाच्या विषयाशी निगडीत मालिकेतलं एखादं पात्र साकारताना सिनेमाचं मार्केटिंग केलं जातं. अलीकडच्या ‘मुंबई-पुणे-मुंबई टू’ या सिनेमामुळे हा ट्रेण्ड पुन्हा अधिक ठळकपणे जाणवला.

आता अधिकाधिक चांगले मराठी सिनेमे येऊ लागले आहेत. प्रेक्षकही त्याकडे वळू लागला आहे. हिंदी सिनेमांच्या स्पर्धेत मराठी सिनेमाही उतरतोय. प्रेक्षकही आता मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये एकाची निवड करु लागला आहे. किंबहुना मराठी सिनेमाला प्राधान्य देऊ लागला आहे. असं असलं तरी सिनेमांचं मार्केटिंग होणं महत्त्वाचं वाटतं. हिंदी सिनेमा याबाबतीत मागे नाही तर मराठी सिनेमांनी का राहायचं असा प्रश्न पुढे येणं वावगं नाही. पण, प्रमोशनच्या नादात समतोल ढासळू नये याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे.

अलीकडचंच उदाहरण घेतलं तर ‘मुंबई-पुणे-मुंबई टू’ या सिनेमाने कलर्स मराठीच्या काही मालिकांमध्ये प्रमोशन केलं. ‘कमला’ आणि ‘अस्सं सासर सुरेखबाई’ या दोन मालिकांमध्ये मुक्ता बर्वे प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. मालिकेच्याच कथेचा एक भाग म्हणून तिने एंट्री घेतली. काही संवादांसह प्रत्येकी एकेका एपिसोडमध्ये वावरली. जाता-जाता सिनेमाचं प्रमोशनही केलं. ‘कमला’ या मालिकेत स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडीच दिसली होती. मालिकेत सुरु असलेल्या पटकथेशी संबंध ठेऊन या जोडीला संवाद दिले होते. त्यामुळे मालिकेतच पाहुणे कलाकार जसे येतात त्याप्रमाणे त्यांचं वावरणं वाटलं. त्या आधी आलेला ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमातले तरुण कलाकार झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत अवतरले होते. पिढय़ांमधील अंतर, नातं, समजंसपणा या सगळ्यावर सिनेमा बेतला होता. हाच धागा पकडत सिनेमातली तरुण कलाकार मंडळी सिनेमातल्या व्यक्तिरेखांमध्येच मालिकेत आले होते. सिनेमातल्याच विषयाचा एक मुद्दा मालिकेतल्या एका एपिसोडमध्ये उचलला होता. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका युवा पिढीचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे ‘राजवाडे..’चं प्रमोशन करण्यासाठी ती मालिका योग्य ठरली. याच मालिकेत ‘टाइमपास टू’, ‘किल्ला’, ‘तू ही रे’ या सिनेमांचंही प्रमोशन करण्यात आलं. या तिन्ही सिनेमांचं प्रमोशन ‘आमच्या सिनेमाला या’ असं थेट नसलं तरी सिनेमाच्या विषयाला धरून मालिकेत यातले कलाकार आले होते. ‘टाइमपास टू’च्या वेळी दगडू प्राजूला पटवण्याचा प्रसंग, ‘किल्ला’ प्रमोशनवेळी लहान मुलांचं भावविश्व आणि ‘तू ही रे’सिनेमाच्या वेळी नवरा-बायकोच्या नात्यावरील भाष्य अशा विविध प्रकारे प्रमोशन करण्याचा प्रयोग केला होता. या प्रयोगाबाबत झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष सांगतात, ‘मालिकेचा विषय आणि सिनेमाचा बाज या दोन्ही गोष्टी साधारण एकाच चौकटीत बसणाऱ्या असतील याची आम्ही काळजी घेतो. कोणत्या मालिकेतून कोणत्या सिनेमाला प्रमोट करायचा हे आधी ठरवलं जातं. दोन्ही माध्यमांचा विषय, प्रेक्षक आणि सादरीकरणाची नाळ जुळायला हवी. मालिका बघताना प्रेक्षकांची लिंक तुटणार नाही यासाठी असा प्रयोग केला जातो. टीव्ही माध्यमाचा प्रमोशनसाठी वापर करणं गैर नाही. किंबहुना तो करायलाच हवा.’

सध्या हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये वाहिन्या कमी आहेत. त्यामुळेच हिंदी रिअ‍ॅलिटी शोजची संख्याही मराठीपेक्षा जास्त आहे. म्हणूनच हिंदी सिनेमांचं हिंदी वाहिन्यांवर प्रमोशन करताना रिअ‍ॅलिटी शोज किंवा कथाबाह्य़ कार्यक्रम पुरेसे ठरतात. मराठीत मात्र तसं होत नाही. मराठी वाहिन्यांवर ‘चला हवा येऊ द्या’, ‘होम मिनिस्टर’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘आमच्या घरात सूनबाई जोरात’, ‘मेजवानी’, ‘किचनची सुपरस्टार’ असे कथाबाह्य़ कार्यक्रम आहेत. पण, यातही पाककौशल्याशी संबंधित कार्यक्रम दुपारी, दोन कार्यक्रम प्राइम टाइमच्या अगदी सुरुवातीला आणि दोन कार्यक्रम रात्री प्राइम टाइमच्या मध्यावर दाखवले जातात. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असल्यास प्राइम टाइम हाती घ्यावाच लागतो. त्यामुळे सगळी धाव ती प्राइम टाइमच्या मध्यावर असलेल्या कार्यक्रमांकडे. या वेळेत फक्त दोन कार्यक्रम आहेत. म्हणूनच सिनेमांचं प्रमोशन मालिकांमध्ये करण्याची आयडीयाची कल्पना सिनेमाकर्त्यांनी शोधून काढली. मालिकांमध्ये सिनेमांचं प्रमोशन करण्याचं हे एक महत्त्वाचं कारण समजलं जातं. कलर्स मराठीचे प्रमुख अनुज पोद्दार मालिकांमध्ये प्रमोशन करण्याचं आणखी एक कारण सांगतात. ‘प्रत्येक मालिकेचा प्रेक्षक वेगळा असतो. सगळाच प्रेक्षकवर्ग सगळ्याच मालिका बघतात असं नसतं. त्यामुळे विशिष्ट एका मालिकेतच सिनेमाचं प्रमोशन केलं तर ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून चॅनलच्या अधिकाधिक मालिकांमध्ये सिनेमाचं प्रमोशन केलं जातं. हे प्रमाण वाढायला हरकत नाही, पण प्रेक्षकांची निराशा न करता आणि मालिकेच्या कथेपासून त्यांना न तोडता प्रमोशन करताना समतोल साधायला हवा.’ प्रेक्षकांशी संबंधित या कारणाचं दीपक राजाध्यक्षही समर्थन करतात. ‘एखादा प्रेक्षक एक मालिका रात्री आणि दुसरी दुसऱ्या दिवशी दुपारी बघत असेल तर या दोन्ही मालिकांमार्फत सिनेमा त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचायला हवा. यासाठीच विविध मालिकांमधून एकाच सिनेमाचं प्रमोशन करणं गरजेचं असतं. मला ही खूप सकारात्मक गोष्ट वाटते’, असं राजाध्यक्ष सांगतात.

‘बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही’, असं म्हटलं जातं. आपण केलेल्या कामाचं मार्केटिंग आपणच करावं असे सल्लेही आजच्या जगात वरचेवर सगळ्यांना मिळत असतात. पण, याला काही मर्यादा असायला हव्यात, असा एक सूर प्रेक्षकांमधून उमटतो. प्रेक्षक त्यांची आवडती मालिका बघत असतात. मालिका ऐन रंगात आलेली असतानाच सिनेमांतले कलाकार मालिकेत एंट्री घेतात आणि प्रमोशनच्या नादात काही वेळा मालिका भरकटल्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग करतात. ‘अधिकाधिक लोकांपर्यंत सिनेमा पोहोचावा’ हा एकमेव हेतू यामागे असला तरी ‘कुठवर असं प्रमोशन असावं’ हा पुढचा प्रश्न उपस्थित होतो. मालिका किंवा इतर कोणताही कार्यक्रम बघताना एकच जाहिरात सारखी दाखवली तर तिचा आपल्याला कंटाळा येतो. म्हणून ती जाहिरात आली की रिमोटच्या म्यूट बटणाकडे आपली बोटं वळतात. पण, एकाच चॅनलच्या मालिकांमध्ये सारखं त्याच त्या सिनेमाचं प्रमोशन करण्यात येत असेल तर मात्र त्याचा कंटाळा येऊ लागतो. प्रेक्षकांवर एखाद्या नव्या गोष्टीचं हॅमरिंग करावं लागतं असाही सिनेमाकर्त्यांचा पवित्रा असतो. पण, ते अति झालं की प्रेक्षकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

प्रमोशनच्या या नवलाईकडे बघताना चॅनल मात्र खूप सकारात्मक आहे. चॅनल आणि मराठी सिनेमा अशा दोन्हीला या प्रमोशनचा फायदा होतो. याबाबत अनुज सांगतात, ‘चॅनल आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांना निश्चितच अशा प्रकारच्या प्रमोशनमुळे फायदा होतो. सिनेमातले लोकप्रिय कलाकार मालिकांमध्ये आले की मालिकेची स्टार व्हॅल्यू वाढते. तर सिनेमा एका लोकप्रिय मालिकेत आला की, सिनेमाच्या प्रेक्षकवर्गात भर पडते. सिनेमातल्या कलाकारांनाही चॅनलच्या प्रेक्षकवर्गाशी नातं जोडायचं असतं. ते जाहिरातींपेक्षा मालिकांमध्ये येऊन जोडण्याचा प्रयत्न करत असतात.’ मालिकांमधून प्रमोशन करण्याचा प्रयोग हवाच आहे पण, तो करताना समतोल साधता आला पाहिजे, असंही त्यांचं म्हणणं आहे. हिंदी सिनेमांच्या प्रमोशनसाठीही काही कलाकार मराठी मालिकांमध्ये येऊन गेले आहेत. कलर्स मराठीच्या ‘एक मोहोर अबोल’ या मालिकेत परेश रावल तर ‘कोण होईल मराठी करोडपती’ या कार्यक्रमात माधुरी दीक्षित आले आहेत. यात आणखी एका नावाची आता भर पडतेय. आलिया भट. ‘शानदार’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती स्टार प्रवाहच्या ‘रुंजी’ या मालिकेत आली होती. नवरात्रीतल्या दांडियाच्या एका इव्हेंटमध्ये पाहुणी कलाकार म्हणून तिची या मालिकेत एंट्री झाली होती. तर ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमाचं प्रमोशनही स्टार प्रवाह या चॅनलवर जाहिरातींच्या माध्यमातून सलमान खानला घेऊन करण्यात आलं होतं. या निमित्ताने हिंदी कलाकार किंवा हिंदी सिनेमे मराठी मालिकांमधून प्रमोट करण्याचा प्रकार भविष्यात वाढत जाण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मराठी सिनेमांचा दर्जा आणि मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता हा बदल होण्याची शक्यता आहे. ‘रुंजी’ याच मालिकेत पूर्वी ‘क्लासमेट्स’ या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं होतं. ‘होणार सून मी या घरची’मध्ये  ‘डबलसीट’ आणि ‘लय भारी’ या सिनेमांचं प्रमोशन झालेलं आहे.

रिअ‍ॅलिटी शो, कथाबाह्य़ कार्यक्रमांमधून सिनेमांतल्या कलाकारांचं येणं-जाणं प्रेक्षकांनी बघितलं आहे. पण, आता मालिकांमध्ये कथेचाच एक भाग म्हणून कलाकारांनी मालिकेत एंट्री घेणं या नव्या प्रकारालाही वेग आलाय. वारंवार एकाच सिनेमाचं प्रमोशन विविध मालिकांमधून बघणं हे प्रेक्षकांसाठी जरी काही वेळा खटकणारं, कंटाळवाणं असलं तरी चॅनलची भूमिका यात वेगळी आहे. सगळेच प्रेक्षक सगळ्याच मालिका बघत नसल्यामुळे अशा प्रकारचं प्रमोशन करावं लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच सिनेमा उत्तमरीत्या पोहोचवणं ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. ते त्यांची ही महत्त्वाची जबाबदारी चोखपणे पार पाडतच आहेत. यात शंका नाही. पण, असं करताना प्रमोशनचा अतिरेक होतोय का याकडेही चॅनल्सचं लक्ष असणं गरजेचं आहे.

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व छोटा पडदा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie promotion in marathi tv serial
First published on: 04-12-2015 at 01:31 IST