सिनेमाच्या लोकप्रियतेचा अंदाज आता प्रोमोवरूनच येतो. सिनेमाचं ‘दिसणं’ जितकं महत्त्वाचं झालंय तितकंच त्याचं ‘असणं’ही महत्त्वाचं आहे. हे ‘असणं’ असतं त्याच्या संवादांवरून. ‘क्लासमेट्स’ या आगामी सिनेमातल्या तरुण संवादांनी मजा आणलीय. तरुणांची भाषा सिनेमातून डोकावते.

‘लोहा गरम है और तू भी बेशरम है..’
‘दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना की मला काय करायचं ते कळत नाही. व्हॅनिला आइस्क्रीम आणि तू..’
‘आपल्याला तुझी लव्हशिप पाहिजे.’
अहा.. हे कोणत्याही कॉलेजच्या नाक्यावरचे संवाद नाहीत. तर हे संवाद आहेत ‘क्लासमेट्स’ या आगामी मराठी सिनेमाच्या नाक्यावरचे आहेत.
‘प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बॅच असते जिच्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कुणी येत नाही’ या वाक्याने सिनेमाच्या पहिल्या प्रोमोकडे तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं. हे वाक्य ऐकलं आणि अनेकजण हमखास फ्लॅशबॅकमध्ये गेले असतील, कॉलेजच्या आठवणींमध्ये रमले असतील. अशा अनेक आठवणी करून दिल्यात ते ‘क्लासमेट्स’ या सिनेमाच्या प्रोमोजनी. याचं वैशिष्टय़ म्हणजे, यातली भाषा. प्रोमोमध्ये असलेल्या संवादांनीही तरुणाई सिनेमाकडे आकर्षित झाली आहे. तरुण मंडळींना सिनेमातली भाषा ही जवळची वाटतेय. लव्हशिप, कॉन्सेलेशन प्राइज, एफवायजेसी का असे शब्द, वाक्य सर्रास कॉलेज कट्टा, नाका, कॅम्पसमध्ये बोलले जातात. यावर मिळणारी उत्तरं कधी मजेशीर असतात तर कधी विचार करायला लावणारी. अशीच वाक्यं या सिनेमातही ऐकायला मिळणार आहेत. ‘टाइमप्लीज’, ‘नवा गडी नवं राज्य’ अशा नाटक-सिनेमांचा लेखक क्षितिज पटवर्धनने या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. कॉलेजचं वातावरण अनुभवण्यासाठी क्षितिजने यातल्या व्यक्तिरेखांचे संवाद तरुण केले आहेत.

व्यक्तिरेखेवरून संवाद
संवादांची चर्चा हवी, ते चटकदार हवेत म्हणून तसे लिहिले नाहीत. तर सिनेमात वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांवरून संवादांमध्ये मजा आणली आहे. संवाद हे रोजच्या आयुष्यातले असले तरच ते प्रेक्षकांना रिलेट करू लागतात. सहज, सोपं ऐकायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. संवाद लोकप्रिय होतात; त्यात त्या व्यक्तिरेखांचं यश असतं.
– क्षितिज पटवर्धन

‘चटकदार संवाद हवेत म्हणून या सिनेमासाठी तसे लिहिले नाहीत. तर प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वभाववैशिष्टय़े लक्षात घेऊन ती लिहिलेली आहेत. सिनेमात वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाचे तरुण दाखवले आहेत. एक कॉलेजमधल्या सगळ्यांना मदत करणारा, एक टॉम बॉइश मुलगी, एक विक्षिप्त lp45बोलणारा मुलगा, राजघराण्यातली असूनही छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधला आनंद घेणारी एक तरुणी, समंजस-फोकस्ड असलेला एक मुलगा, गावाकडून मुंबईत शिकायला आलेला एक मुलगा अशा भिन्न स्वभावाचे तरुण सिनेमात आहेत. त्यामुळे त्यानुसारच त्यांचे संवादही लिहिले आहेत. सुरुवातीला व्यक्तिरेखांचे डिझाइन केले, मग त्यांचे संवाद लिहिले गेले’, संवादलेखक क्षितिज सांगतो. तरुणांचे विषय, त्यांची भाषा, त्यांचे विचार, स्टाइल, त्यांच्यातले ट्रेंड्स असं सगळं सिनेमा, मालिका, नाटकांतून दाखवल्यावर तरुणांना ते नक्की रिलेट होतं. हेच नेमकं ‘क्लासमेट्स’ या सिनेमात बघायला मिळतं. म्हणूनच या सिनेमाच्या पहिल्या झलकमध्येच तरुणाई प्रेमात पडली. याबाबत क्षितिज सांगतो, ‘प्रोमोमधल्याच संवादांना तरुणांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. ते संवाद त्यांना त्यांच्यातले वाटतायत. परवाच ट्विटरवर हे संवाद वापरून दोघांचे वाद सुरू होते. ‘तुझी लव्हशिप हवी’, ‘चड्डीत राहायचं’ असे काही संवाद वापरून दोघं एकमेकांशी बोलत होते. ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक तरुणांनी बघितल्यावर ‘आमची भाषा या नाटकाद्वारे रंगभूमीवर बघायला मिळाली’ अशा प्रतिक्रिया त्या वेळी आम्हाला मिळाल्या होत्या. तशाच प्रतिक्रिया ‘क्लासमेट्स’चे प्रोमो बघून मला मिळत आहेत. याचा नक्कीच आनंद आहे.’
कोणत्याही कलाकृतीत संवाद उत्तम असले की, त्याला चार चांद लागतात. ती कलाकृती जुनी झाल्यावरही तिचे संवाद लक्षात राहिले तर ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाले असं म्हणता येईल. जुने-नवे अनेक सिनेमे आजही लक्षात आहेत ते त्यांच्या संवादांमुळेच. संवादांचं महत्त्व क्षितिज सांगतो, ‘संवाद हे रोजच्या आयुष्यातले असावेत. ते तसे असले तरच ते प्रेक्षकांना रिलेट करू लागतात. संवाद लोकप्रिय होतात; त्यात त्या व्यक्तिरेखांचं यश असतं. सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं ठरावीक तत्त्वज्ञान असतं. त्या तत्त्वज्ञानानुसार त्याचे संवाद ठरत असतात. पण, ते पुस्तकी असले तर मात्र त्याचा काही उपयोग नाही. ते बोलीभाषेतले असावेत तरच ते प्रेक्षकांना विशेषत: तरुणांना रिलेट करतात. एखाद्या सिनेमात किंवा नाटकात नायक अॅड एजन्सीमध्ये काम करणारा असेल तर त्याच्या तोंडी फक्त ‘उद्याची डेडलाइन आहे’, ‘ही फाइल आजच्या आज पूर्ण व्हायला हवी’ अशीच वाक्यं ऐकायला मिळतात. वास्तविक जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांची भाषा इतकी साधी, सोज्वळ नक्कीच नसते. त्यामुळे तसं दाखवलं तर ते पुस्तकी वाटेल.’

चर्चेत असलेले प्रोमोमधले संवाद :-
* लोहा गरम है और तू भी बेशरम है. . .
* दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना की मला काय करायचं ते कळत नाही. व्हॅनिला आइस्क्रीम आणि तू.
* आपल्याला तुझी लव्हशिप पाहिजे.
* मलाही कॉन्सेलेशन प्राइज घ्यायची सवय नाही.
* तुला साधं माझ्यावर चिडताही येत नाही?.
तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. ज्यांचा त्रास होतो त्यांनाच जीव लावून बसते मी.
* अन्या, चड्डीत रहायचं हा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्लासमेट्स’ हा सिनेमा तरुणाईचं विश्व रेखाटतं. मैत्री, प्रेम, शत्रुत्व याचे वेगवेगळे पैलू सिनेमातून उलगडतील. पण, याचा यूएसएपी ठरतोय ती त्याची भाषा, संवाद. आजच्या तरुणाईचं विश्व रेखाटण्यासाठी त्यांची भाषा सिनेमात दाखवणं आवश्यक होतं. आणि हे संवादलेखकाने लक्षात ठेवलंय. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या स्वभाववैशिष्टय़ांचा विचार करून संवाद लिहिले आहेत. याबाबत क्षितिज सांगतो, ‘मी कॉलेजमध्ये असताना इलेक्शनच्या वेळी वापरली जाणारी भाषा, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्यांची भाषा, गावाकडून आलेल्यांची भाषा असे वेगवेगळ्या प्रकारची भाषा ऐकली आहे. त्यामुळे भाषेतली ती मजा सिनेमात आणण्याचा प्रयत्न केलाय.’ संवाद रोजच्या भाषेतले प्रत्येक कॉलेजचा कट्टा, नाक्यावरचे असले तरी त्यात वेगळी मजा असल्याचंही तो सांगतो. या सिनेमात ‘तारामती’ नावाचीही आणखी एक गंमत आहे. तरुणाईला या सिनेमाचे प्रोमोज जसे आवडले तसा सिनेमाही आवडेल की नाही ते लवकरच कळेल.
चैताली जोशी