scorecardresearch

रंग माझा वेगळा

‘‘सात रंग मिसळले की पांढरा रंग होत नाही. मी खूप वेळा करून बघितलं. रंगपेटीतले ते सात रंग संपून गेले माझे!’’ महिका फुरंगटली होती.

‘‘सात रंग मिसळले की पांढरा रंग होत नाही. मी खूप वेळा करून बघितलं. रंगपेटीतले ते सात रंग संपून गेले माझे!’’ महिका फुरंगटली होती.
‘‘पण ती बाबांनी आणलेली सातरंगी भिंगरी फिरवली की दिसतो ना पांढरा?’’
‘‘त्या भिंगरीत काहीतरी लबाडी असणार.’’
आईने उरलेसुरले रंग वापरून महिकाच्या मदतीनेच नवी भिंगरी बनवली. तिनेही गिरकी घेऊन पांढराच रंग दाखवला. आणि महिका पुरती गोंधळली.
‘‘मग तेच रंग बशीत मिसळले की काळा का होतो?’’
‘‘कारण बशीतल्या लाल रंगावर जेव्हा पांढरा प्रकाश पडतो तेव्हा त्याच्यातले लालखेरीजचे इतर सगळे रंग त्या मिश्रणात पकडून ठेवले जातात. फक्त लाल प्रकाशच मोकळा रहातो आणि तेवढाच आपल्या डोळ्यांना दिसतो. म्हणजेच पांढऱ्या प्रकाशातून इतर रंगांची वजाबाकी होते. निळ्या, पिवळ्या रंगांचंही तेच. तेही आपापला रंग सोडून बाकीच्या रंगांचा प्रकाश आपल्यात दडवतात. म्हणजे तू जेव्हा ते सगळे रंग मिसळलेस तेव्हा त्यांच्यातल्या लाल रंगाने निळा आणि हिरवा प्रकाश लपवला. मग पिवळ्याने निळा दडवला आणि निळ्याने लाल आणि हिरवा झाकून टाकला. त्या वजाबाकीतून उरलं काय? शून्य रंग! म्हणजेच काळा रंग.’’
‘‘मग भिंगरीत पांढरा का दिसतो?’’
‘‘भिंगरीच्या लाल भागातून लाल प्रकाश येतो; निळ्यातून निळा, पिवळ्यातून पिवळा, वगैरे. असा सात वेगवेगळ्या भागांतून सात रंगांचा प्रकाश आपल्या डोळ्यांकडे येतो. भिंगरी गरगर फिरवली की ते साती प्रकाशांचे किरण एकमेकांत मिसळून आपल्या डोळ्यांत शिरतात. त्यांची बेरीज होते. आणि साती रंगांची बेरीज म्हणजे पांढरा रंग.’’
‘‘आणि डोळ्यांना कसं कळतं ते सगळे रंगीत प्रकाश मिसळून आल्याचं?’’
‘‘आपल्या डोळ्याच्या बाहुलीमागे एक भिंग असतं. त्याच्यातून तो प्रकाश आत जातो. डोळ्याच्या पाठीमागे सिनेमाच्या पडद्यासारखा, नेत्रपटल नावाचा पडदा असतो. भिंगातून येणारा प्रकाश नेत्रपटलावर प्रोजेक्ट केला जातो. तिथल्या शंकू (cone) सारख्या दिसणाऱ्या पेशींवर तो पडला की त्यांच्यातली रंग ओळखणारी रसायनं जागी होतात आणि त्या रंगरसिल्या प्रक्रियेने तिथे वीज तयार होते. तो विजेचा संदेश तिथल्या विजेच्या तारांमधून, म्हणजेच नसांमधून मेंदूकडे पोचवला जातो. प्रत्येक शंकू आपापल्या रंगाचा संदेश पाठवतो. नेत्रपटलावर तसे अनेक शंकू असतात. त्यांच्यातले काही शंकू निळाच रंग ओळखतात; काही हिरवाच तर काही फक्त लाल. आपल्या भोवती तर अनेक रंग असतात. पण ते सगळे रंग निळा-हिरवा-लाल या तीन प्राथमिक रंगांच्या वेगवेगळ्या प्रमाणातल्या बेरजेने बनलेले असतात. त्यांच्यातल्या प्रत्येक छटेमुळे तशाच तीन प्रकारचे रंगपारखी शंकू नेमक्या त्याच प्रमाणात जागे होतात आणि समोर दिसणारा रंग मेंदूला बरोब्बर कळवतात.’’

तबकडीत रंग मिसळताना होणाऱ्या वजाबाकीत लाल, निळा आणि पिवळा हे तीन प्राथमिक रंग धरले जातात. लाल आणि निळ्याच्या मिश्रणाने बनणारा जांभळा हा पिवळ्याचा विरोधी रंग. तसाच निळा आणि पिवळा मिसळून होणारा हिरवा रंग तांबडय़ाचा विरोधी आणि पिवळ्या-तांबडय़ांनी झालेला शेंदरी हा निळ्याचा विरोधी. तबकडीत विरोधी रंग मिसळले की तिहेरी वजाबाकी होते आणि काळिमा उरतो.
बेरजेच्या गणितासाठी आपल्या डोळ्यांतल्या शंकूंसारखे लाल, निळा आणि हिरवा हे तीन रंग मूलभूत मानतात. इथे लाल आणि निळा यांच्या बेरजेने जांभळा होतो; निळ्या आणि हिरव्याने हिरवट निळा होतो आणि लाल आणि हिरवा मिळून पिवळा रंग देतात. आणि बेरजेतली विरोधी जोडी एकत्र आली की सफेदी येते.
रंगांच्या बेरजा-वजाबाक्यांनी असंख्य छटा बनतात. संथ तलावात दिसणाऱ्या लहरींसारख्या प्रकाशाच्याही लहरी असतात. कुठल्याही प्रकाशाचा रंग त्याच्या लहरींच्या लांबीनुसार ठरतो. तांबडय़ा रंगाची लहर-लांबी सर्वात अधिक असते तर जांभळ्याची सर्वात कमी. ती लहर-लांबी मोजता येते. अशा मोजमापांमुळे कुठल्याही ‘लहरी’ मिश्रणातून नेमकी कोणती छटा तयार होईल ते ठरवायला सूत्रं आणि गणितंदेखील असतात. इंटरनेटवर त्याच्यासाठी खास कॅलक्युलेटर्सही मिळतात. रंगतज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय सभेने त्यांच्यातल्या प्रत्येक छटेला स्वत:चा क्रमांकही दिला आहे!
निसर्गातल्या अगणित रंगांची प्रत्येक छटा जर गणितात बसवता येते तर प्रत्येक माणसाला ती नेहमी, हुबेहूब तश्शीच दिसते का?
मुळीच नाही.
मुळात प्रत्येक गोष्टीचा रंग भोवतालच्या परिस्थितीनुसार बदलत असतो.
वस्तूचा रंग आपल्याला दिसतो तो तिच्याकडून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे. तो प्रकाशच मुळी पांढरा नसला; त्याच्यात काही रंग कमीच असले तर वस्तूकडून परावर्तित होणाऱ्या रंगातही त्या छटांची उणीवच असते. सूर्यप्रकाशात लालभडक दिसणाऱ्या साडीवर घरच्या दिव्याच्या प्रकाशात किंवा चांदण्या रात्री जांभळट झाक येते. ती झाकही कापडाचा पोत, त्याच्यासाठी वापरलेली रंगद्रव्यं वगैरे अनेक गोष्टींमुळे बदलते; सुती, रेशमी आणि पॉलिएस्टरच्या कपडय़ांत वेगवेगळी दिसते. म्हणूनच स्त्रिया साडीवरचा मॅचिंग ब्लाउझपीस टय़ूबलाईटच्या प्रकाशात निवडत नाहीत.
रंगांची गंमत त्यांच्या आजूबाजूच्या रंगांमुळेही अधिक खुलून दिसते. परस्परविरोधी जोडय़ा एकमेकींना शोभून दिसतात. हिरव्या पानांतून डोकावणारं लालभडक जास्वंदीचं फूल नजरेत ठसतं. जांभळ्या मखमली पेटीत विसावलेला सुवर्णहार अधिकच साजरा दिसतो. त्याउलट जर एखाद्या चित्रात प्राथमिक रंगच एकमेकांजवळ भरले तर चित्राला अस्थिरता येते आणि ती नजरेला खुपते.
रंगाच्या छटेवर वेगाचाही परिणाम होतो. ताऱ्यांकडून पृथ्वीकडे येणारा प्रकाशही लहरींच्या रूपातच येतो. विश्वातले काही तारे पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या ताऱ्यांच्या वेगामुळे त्यांच्याकडून निघालेल्या प्रकाशलहरींवर त्या आवेगाचा दाब पडतो आणि त्या घट्ट चुणतात. म्हणून त्या प्रकाशाची लहर-लांबी घटते आणि तो निळसर दिसतो. त्यामुळे त्या ताऱ्यालाच निळसर झाक येते. त्याउलट पृथ्वीपासून दूर जाणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशाच्या लहरी एकमेकींपासून फाकतात आणि त्यांची लहर-लांबी वाढते. म्हणून ते तारे लालसर दिसतात. म्हणजेच वस्तूंचा, नजरेला दिसणारा रंग त्यांच्या वेगाप्रमाणेही बदलतो. डॉपलर नावाच्या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने १८४२ मध्ये आपल्या खगोलनिरीक्षणावरून हा तर्क केला. म्हणून लहरींच्या त्या चुणण्या-फाकण्याला डॉपलर इफेक्ट असं नाव आहे.

हे खुद्द वस्तूच्या रंगातलं वैविध्य झालं. पण तो रंग जाणण्यातही ‘नेत्रे नेत्रे दृष्टिर्भिन्ना’ असते. जगातल्या सुमारे आठ ते दहा टक्के माणसांना लाल आणि हिरव्या रंगांतला फरक कळत नाही. ते बहुदा पुरुषच असतात आणि त्यांच्यामध्ये तो दोष त्यांच्या आईच्या जनुकांतून आलेला असतो. (तिला मात्र सगळे रंग व्यवस्थित दिसतात.) त्यांच्यातल्या बहुतेकांच्या नेत्रपटलात हिरवा रंग ओळखणारे शंकू जन्मत:च गैरहजर असतात. काही लोकांमध्ये लाल रंगशंकू नसतात. त्याशिवाय फार थोडय़ांना, नीलशंकूंच्या अभावामुळे निळ्या-पिवळ्यात काहीच वेगळेपणा जाणवत नाही.
या दोषांमुळे एरवी फारसा त्रास होत नाही. पण लाल-हिरव्या रंगांधळेपणामुळे मोटार किंवा आगगाडी चालवताना सिग्नलचे लाल-हिरवे दिवे वेगळे ओळखू येत नाहीत. आपल्याकडचे कित्येकजण तर वरचा दिवा तो लाल आणि खालचा तो हिरवा घोकत दिवसा गाडी चालवतात. रात्री अंधारात वरचा-खालचा वगैरे काही समजत नाही आणि त्या घोकंपट्टीचा फायदा होत नाही. त्यामुळे त्या लोकांत अपघातांचं प्रमाण जास्त असतं
म्हणून ड्रायव्हिंग लायसेन्स घेण्यापूर्वी डोळे रंगांधळेपणासाठी तपासून घ्यायला हवेत. त्याच्यासाठी इशिहारा-चार्ट्स नावाचे खास रंगीत तक्ते असतात.
वरच्या इशिहारा-चार्टमधल्या डाव्यात निळ्या-पिवळ्या छटाही आहेत. त्यामुळे हिरव्या-लाल रंगांची जाण नसलेल्यांना तो २५ आकडा वाचता येतो. पण उजवीकडचा लाल-हिरव्या छटांनीच बनलेला २९ मात्र त्यांना निर्थक ठिपक्यांसारखा दिसतो.
आंतरराष्ट्रीय संकेत वापरून बनवलेले रंगीत नकाशे समजून घेणं रंगांधळ्या माणसांना कठीण जातं. आता असे नकाशे बनवताना नव्या दृष्टिकोनातून अधिक काळजी घेतली जाते.
रंग न कळल्यामुळे त्या माणसांच्या रोजच्या जगण्यातली इतर रंगत कमी होत नाही. त्यांना जे काही गढूळ रंग दिसतात त्यांनाच ते लहानपणापासून लाल आणि हिरवा म्हणायला शिकलेले असतात. त्यामुळे व्यवहारात चुका होतात; त्यावरून क्वचित चेष्टाही होते. पण सहसा जिवावर बेतत नाही. म्हणून तर तो दोष उत्क्रांतीच्या ‘बळी तो कान पिळी’ गाळणीतून तगून राहिला!
आताच्या नव्या संगणकांवर दीड कोटीहून अधिक रंगछटा दिसतात आणि निसर्गात तर अक्षरश: अनंत रंग असतात! माणसांच्या डीएनएमध्येही भरपूर वैविध्य असतं आणि त्याचा त्या रंगपारखी शंकूंच्या प्रमाणावरही परिणाम होतो. त्यामुळे कुठलाही एक रंग वेगवेगळ्या माणसांना निरनिराळा दिसू शकतो!
जगाच्या विविध भागांतल्या मानवजमातींमधल्या जीन्समध्ये काही एकसंध बदल झाले आहेत. त्याचा रंगज्ञानावरही परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. कदाचित त्याचमुळे जगातल्या निरनिराळ्या भाषांतल्या रंगशब्दांत बरंच वैविध्य आढळतं. इंग्रजीत इंद्रधनूच्या सप्तरंगांना सात स्वतंत्र नावं आहेत. मराठी-हिंदी भाषादेखील रंगसंपन्न आहेत. पण व्हिएतनामी, थायी, कोरियन वगैरे भाषांत निळ्या आणि हिरव्या रंगांना दोन वेगळी नावं नाहीत. म्हणून तिथल्या कथांची इंग्रजी भाषांतरं करताना त्या green-blue रंगाला ‘grue’ असा नवा शब्द योजतात. कोरियन कादंबरीच्या मराठी रूपांतरात त्या रंगाला ‘निळा + हिरवा = निरवा’ म्हणून निरवानिरव करावी लागेल! आफ्रिकेतल्या बांटू जमातीही तशी ‘निरवा’णीची भाषाच बोलतात. नामीबियाजवळच्या हिम्बा जमातीत तर पांढरट, मातकट, निरवा आणि गडद असे चारच रंगशब्द आहेत. त्यांच्या डोळ्यांत निळे रंगशंकू नसावेत अशी शास्त्रज्ञांची अटकळ आहे. आता ती जमात ‘विश्वाळते’ आहे. पण त्यांच्या संभाषणाच्या इंग्रजी भाषांतराची मात्र अजून गडदावरच गडबड उडते आहे.

रंगांसाठी जे शब्द योजले जातात त्यांनीही त्या रंगांचा चेहरामोहरा बदलतो. प्राथमिक रंगांची नावं सोडली तर नारंगी, गुलाबी, जांभळा वगैरे मराठी किंवा पीच, ऑलिव्ह, अॅक्वामरीन हे इंग्रजी रंगशब्द वस्तूंच्या नावांवरून बनवलेले आहेत आणि बऱ्याचदा ते शब्द उच्चारताना त्या वस्तू, त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह क्षणभर मनात झळकून जातात. रशियन भाषेतल्या हिरव्या शब्दाचा मूळ अर्थ ‘जहर’ असा होता. पोलिश भाषेतला निळ्या-जांभळ्याचा एक शब्द ‘मार खाऊन काळ्यानिळ्या झालेल्या अंगासारखा’ असा आहे. ‘निळासावळा नाथ’चं पोलिश भाषांतर करताना सासरच्यांनी कणीक तिंबल्यावरचा ‘अ’नाथ डोळ्यांसमोर कळवळत असावा!
रंगांचं व्यक्तिमत्त्व स्थळ आणि संस्कृतीनुसारही बदलतं. आपल्याकडे लाल-केशरी रंग शुभ असतो तर काही इतर देशांत हिरवा रंग पावित्र्याची धुरा वाहतो. सुदानी लोक दक्षिणेकडच्या सावळ्या माणसाला ‘काळा’ पण उत्तरेकडच्याला मात्र ‘हिरवा’ म्हणतात. इंग्रजीत असूयेचा रंग हिरवा आहे. आपल्याकडच्या डोहाळजेवणाचा हिरवा साज त्या रंगाचं सृजनाशी असलेलं नातं सांगतो. रक्तक्षय झालेला माणूस मराठीत पांढराफटक पडतो तर अरबीत तो पिवळा पडतो. गुलाबी रंगाचा लाजरेपणा मात्र जगभरात सगळीकडे सारखाच असावा.
तान्ह्य बाळांच्या मनात भाषा तयार झालेली नसते. कुठलीही रंगीत वस्तू पाहताना त्यांच्या मेंदूच्या उजव्या भागात अधिक संदेश पोचतात. पण एकदा का त्यांना बोलता यायला लागलं की त्यांचा डावा, भाषेशी नातं सांगणारा मेंदू रंगसंदेशांना अधिक दाद देतो. कदाचित म्हणूनच लाल रंगाने लिहिलेला ‘हिरवा’ हा शब्द घाईत वाचताना जीभ अडखळते.
प्रत्येक रंगाचं जाणवणारं रूप माणसाच्या मानसिकतेवरही अवलंबून असतं. काहीजणांना लाल-शेंदरी छटांनी अस्वस्थ वाटतं आणि निळ्या-पारव्याने शांतता लाभते तर इतर कुणाला लाल-केशरी उधळणीने उत्साह येतो आणि निळ्या-जांभळ्याने उदास वाटतं. पण बहुतेकांच्या मनांत लाल-पिवळे रंग अश्मयुगातल्या, ऊब आणि सुरक्षा देणाऱ्या शेकोटीची आदिम आठवण जागी करतात आणि उत्तेजित करतात. निळे-जांभळे रंग जलाशयाच्या थंडाव्याशी, गारठय़ाशी किंवा रात्रीशी निगडित असल्यामुळे मनात गूढ हुरहुर निर्माण करतात. म्हणूनच आनंदी संगीतिकेसाठी नेपथ्य-शास्त्रात ऊबदार रंगांचा वापर होतो तर शोकांतिकेच्या पाश्र्वभूमीत निळाईवर भर असतो. रंगांचा भुकेवरही परिणाम होतो. हळद-तिखटाच्या रंगाचं कालवण, खरपूस सोनेरी बटाटावडे, केशराच्या रंगाचा गोड शिरा भूक चाळवतात. निळा-जांभळा रंग मात्र जांभळां-करवंदांखेरीज बाकी खाण्याच्या पदार्थात दिसला की अन्नावरची वासनाच उडते. एकाग्रचित्ताचं, अध्ययनाचं मात्र रंगांशी वेगळंच नातं आहे. अलीकडच्या एका संशोधनात आढळलं आहे की पिवळ्या किंवा निळ्या प्रकाशांत अभ्यास छान होतो. तसा तो शुभ्र पांढऱ्या प्रकाशात होत नाही.
प्रत्येकाच्या नजरेला दिसणारा रंग भिन्न असतो. लिओनादरे-दा-विन्ची हा माणूस अनेक बाबतीत असामान्य होता. तो कित्येक शास्त्रांत पारंगत होता. तो दोन्ही हातांनी उत्तम चित्रं काढू शकत असे. यंत्रशास्त्र आणि चित्रकला या दोघांतही त्याला सारखीच गती होती. कदाचित त्याच्या नजरेला इतरांपेक्षा कितीतरी अधिक रंगछटाही दिसत असतील. त्याने रंगवलेल्या मोनालिसाची कांती खऱ्या युवतीच्या कांतीसारखी सजीव दिसते. बहुतेक मोनालिसा रंगवताना लिओनादरेने त्याची दिव्यदृष्टी वापरली असेल आणि आपल्या सामान्य नजरेला वेगवेगळे दिसू न शकणारे शतरंग भरले असतील. कुणी सांगावं, कदाचित हेच त्या कांतीच्या जादुई पोतामागचं रहस्य असेल!

रंग एरवी रुक्ष, वस्तुनिष्ठ असतात; भौतिकशास्त्राच्या सूत्रांच्या गणितांत बसतात; स्वत:ची ओळख चक्क आकडय़ांत सांगतात. तरीही माणसाच्या जित्याजागत्या नजरेतून पाहिलं की तेच रंग सापेक्ष, व्यक्तिनिष्ठ बनतात. सहजासहजी ध्यानातही न येणाऱ्या या विरोधाभासातच रंगांच्या किमयेची सारी गंमत दडलेली आहे. त्या किमयेमुळे, त्याच सप्तरंगांमधून, आनुवंशिकता, मानसिकता, संस्कृती, भाषा, धर्म, वय या साऱ्यांच्या पाश्र्वभूमीनुसार प्रत्येकासाठी खास, अगदी खाजगी इंद्रधनुष्य साकारतं; ‘गुंतुनी गणितांत साऱ्या रंग माझा मोकळा!’ हा आगळा ‘रंग-फंडा’ सांगतं.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Colour

ताज्या बातम्या