अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

#करोनाशीदोनहात

करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली अन् स्थलांतरित मजुरांच्या हातचं कामच गेलं. अशा परिस्थितीत आपलं गाव गाठलेलं बरं, म्हणून जो-तो आपलं घर जवळ करण्याचा प्रयत्न करू लागला. हजारो किलोमीटरचा प्रवास कोणी आपल्या कुटुंबकबिल्यासहित पायी प्रवास करू लागला, तर कोणी रानावनातून-रेल्वेच्या पटरीवरून चालू लागला, तर कोणी सायकलवरून अंतर कापू लागला; परंतु अजूनही मुंबईमध्ये हे स्थलांतरित मोठय़ा प्रमाणात अडकलेले होतेच. या आपत्तिकाळात अडकलेल्या स्थलांतरितांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी चित्रपटांतील खलनायक असणारा सोनू सूद धावून आला अन् स्थलांतरितांच्या मनातील नायक ठरला.

मुंबईत अडकलेल्या स्थलांतरितांना घरी पोहोचविणं आपलंही कर्तव्य आहे, अशा सामाजिक भावनेतून सोनू सूदने पदरच्या खर्चातून मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी बसेस आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली आहे. अनेक चित्रपटांमधून खलनायकाची भूमिका निभाविणारा सोनू सूद प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मजुरांना घरी पाठविण्याची व्यवस्था करताना दिसला. सोनू सूद आणि त्याची टीम अडकलेल्या हजारो स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी शेकडो बसेसची सोय, इतकंच नव्हे तर त्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी त्यांच्या खाण्यापिण्याची सोयदेखील करताना माध्यमांमधून दिसून आली. सोनू सूदचे मदतकार्य पाहून अनेक लोकांनी सोनू सूदकडे त्याच्या ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर तत्सम समाजमाध्यमांवरून घरी पोहोचविण्याची मदत मागताना दिसले.

‘अडचणीत सापडलेल्या भक्तांच्या मदतीला धावून आलेला परमेश्वर’ अशी प्रतिमा घरी सुरक्षित पोहोचलेल्या मजुरांच्या मनात निर्माण झालेली आहे. ‘बिहारच्या सिवान जिल्ह्य़ातील लोक सोनू सूद यांचा पुतळा उभा करण्याच्या तयारीत आहेत’ अशा आशयाचे ट्वीट करून सोनू सूदच्या एका चाहत्याने सोनू सूदला सलाम केला. मात्र, त्याला प्रतिउत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, ‘‘माझ्या पुतळ्यासाठी खर्च करण्यापेक्षा गरिबांच्या मदतीसाठी ते पैसे वापरा.’’ हे प्रतिट्वीट पाहता, पडद्यावरचा खलनायकच गरिबांच्या आयुष्यातील खरा नायक ठरला आहे, असं दिसतं. मजूर त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचत नाहीत तोपर्यंत हे मदतकार्य सुरूच राहणार आहे, असे सांगून मजुरांना मदत हवी असेल तर नि:संकोचपणे माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन करत सोनू सूदने व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि टोल फ्री नंबर समाजमाध्यमांमधून शेअर केला आणि नाव, नंबर आणि पत्ता पाठवून द्या. माझी टीम तुमच्याशी त्वरित संपर्क साधेल, असे आवाहनदेखील केले. त्यामुळे अडकलेल्या प्रत्येक मजुराच्या मनात घरी पोहोचण्याची आशा निर्माण झाली. त्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो व्हॉट्सअ‍ॅप मेसेजस, कॉल्स येऊ लागले. त्यातून शेकडो गाडय़ांची व्यवस्था केली जाऊ लागली. अन्नाचे पॅकेट्स वाटले जाऊ लागले. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान अशा अनेक राज्यांतील स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था सोनू सूदची टीम करू लागली.

सोनू सूद माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ‘‘मला अजूनही शेकडो मेसेजस आणि कॉल्स येत आहेत. दिवस-रात्र मी आणि माझी टीम स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी काम करीत आहोत. मला असं वाटतं की, टाळेबंदीच्या काळात हेच माझं काम झालेलं आहे. या कामामुळे एक मानसिक समाधान मिळत आहे.’’ करोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि या काळात आपल्या जिवाची कोणतीही पर्वा न करता दिवसरात्र सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी सोनू सूदने मुंबईतील स्वत:चे हॉटेल उपलब्ध करून दिले आहे. या विधायक कामामुळे समाजमाध्यमांतून सोनू सूदवर कौतुकांचा वर्षांव होत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सोनू सूदचे कौतुक केलेले आहे.

खरं तर करोना आणि टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या अनेक सकारात्मक-नकारात्मक घटनांवर भविष्यात चित्रपट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात सलमान खानपासून सोनू सूदपर्यंत सर्वानी करोनाकाळात केलेल्या कामाची दखल घेऊन अनेक सिनेमे येऊ शकतात. तूर्तास अशा शक्यतांमध्ये सोनू सूद आघाडीवर आहे, कारण दिग्दर्शक संजय गुप्ता आणि सोनू सूदच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहे. त्यात सोनू सूद यांच्यावर चित्रपट करण्याची तयारी दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी दर्शविली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटात सोनू सूदची भूमिका अक्षय कुमार करणार असल्याची चर्चादेखील गुप्तांनी सांगितले. मात्र, चित्रपट येईल की नाही अजून ठरलेलं नाही.

चित्रपटातील खलनायक सोनू सूद रस्त्यावर उतरून मजुरांच्या खाण्यापिण्यापासून त्यांना घरी सुरक्षित पोहोचविण्यापर्यंत काम करताना दिसत आहे. त्याच्याबरोबरीने आपणही हे विधायक कार्य हाती घ्यावं, हा विचार सोडून त्याच्या मदतकार्यावर राजकारण करताना राज्यकर्ते दिसले. हे राजकारण असं.. काही दिवसांपूर्वी ‘‘आम्हाला परवानगी द्या. आम्ही बसेसची सोय उपलब्ध करून रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांना घरी सुरक्षित पोहोचवितो,’’ अशी मागणी काँग्रेसने योगी सरकारकडे केलेली होती. मात्र, त्याच्यामध्ये योगी सरकारने स्थलांतरितांच्या प्रवासाविषयीचं गांभीर्य विसरून काँग्रेसच्या या विधायक मागणीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून अडचणी निर्माण केल्या. अशा वातावरणात सोनू सूद स्थलांतरितांसाठी बसेस उपलब्ध करून मजुरांना घरी पोहोचविण्याचं काम करू लागला होता. हाच मुद्दा लक्षात घेत काँग्रेसने योगी सरकारवर निशाणा साधला की, ‘‘बरं झालं सोनू सूद महाराष्ट्रात आहे. तेथून तो मजुरांना घरी पोहोचविण्याचे चांगलं काम करत आहेत. सोनू सूदने उत्तर प्रदेशमध्ये हेच कार्य करायला घेतले असते तर योगी सरकारने पहिल्यांदा सोनू सूदच्या बसेसना स्कूटर संबोधले असते, नंतर त्याच्या आरोग्यावर शंका उपस्थित केली असती, त्यानंतर त्याला सरळ कारावासात पाठविले असते.’’ मुळात करोनाच्या या महामारीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जे राजकारण केलं जातंय, हेच चुकीचं आहे. करोनाचा विषाणू कोणताही भेदभाव न करता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये दिवसेंदिवस आपले हातपाय पसरत आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना मदतीचा हात देत सर्वानी करोना संकटाला तोंड दिलं पाहिजे. मात्र, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना सोनू सूदने रचलेली कविताच सकारात्मक उत्तर आहे. ती कविता अशी..

माना की घनी रात है

इस रात से लडने के लिए

पूरा भारत एक साथ है..

तेरी कोशीश, मेरी कोशीश रंग लाएगी

मौत के इस मैदान में जिंदगी जीत जाएगी

बस्स, सिर्फ कुछ ही दिनों की बात हैङ्घ