मराठी माणूस हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला की तो आपला मराठी झेंडा तिकडे रोवणारच!! महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर, भारताच्या सीमेपार, साता समुद्रापलीकडे, उत्तर अमेरिकेत, फ्लोरिडा नामक प्रांताच्या दक्षिण भागात असलेल्या मायामी, फोर्ट लॉडरडेल आणण वेस्ट पाम बीच अशा तीन शहरांचा व त्यांच्या उपनगरांचा मिळून एकत्रित भाग ‘साउथ फ्लोरिडा’देखील याला अपवाद नाही! सुरुवातीला अनेक दशकांपासून या भागात स्थायिक मराठी रहिवासी एकत्र येऊन आपले सणवार साजरे करीत. त्या वेळी संगणकाने दैनंदिन जीवनात पदार्पण केले जरी असले, तरी तो काळ इंटरनेटचा नव्हता. केवळ दूरध्वनी आणि शाब्दिक प्रसिद्धीने इकडच्या स्थायिकांनी मराठी माणसाला एकत्रित केले. या प्रथेचे रूपांतर काही काळानंतर साउथ फ्लोरिडाच्या महाराष्ट्र मंडळात झाले. २००७ साली महाराष्ट्र मंडळ ऑफ साऊथ फ्लोरिडाचा अधिकृत श्रीगणेश झाला आणि मंडळाचा पाया रचला गेला. संक्रांत हळदी कुंकू, होळी, गुढीपाडवा, गणपती पूजा आणि दिवाळी असे वर्षांचे चार मुख्य कार्यक्रम हे मंडळ गेली आठ वर्षे सातत्याने करीत आहे. त्याचबरोबर भारतातून येणाऱ्या दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम, संगीताच्या मैफिलीदेखील या मंडळाच्या उपक्रमात सामील आहेत.
कुठलेही मंडळ सुरळीत चालू ठेवणे हे एक खूप मोठे शिवधनुष्यच असते. त्याचे वजन आणि त्याची प्रतिष्ठा राखण्याचे काम करते, त्या मंडळाची कार्यकारिणी समिती स्वत:चा वैयक्तिक व्यवसाय, घर, परिवार सांभाळून केवळ आपल्या समाजासाठी, त्याची मूठ घट्ट बांधून ठेवण्यासाठी, नि:स्वार्थ काम आणि कष्ट करण्याची तयारी घेऊन दर दोन वर्षांनी मंडळाची कार्यकारिणी समिती बदलते. समिती बदलली तरी ध्येय मात्र तेच! कारभार बदलला तरी दृष्टिकोन मात्र तोच! अनेक आव्हाने येतात, कठीण प्रसंगदेखील येतात, कधी सामाजिक, तर कधी आर्थिक, तर कधी वैयक्तिकसुद्धा. पण या सगळ्यातून मार्ग काढीत, लांबची अंतरे कापीत, सर्वाना एकत्र करीत, मजलदरमजल आमच्याही मंडळाचा मार्ग तयार होत गेला. दर दोन वर्षांच्या आपल्या कालावधीत आतापर्यंतची प्रत्येक समिती नेहमीच दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर करीत आली आहे. आजकालच्या धकाधकीच्या, चुरशीच्या, जलद आणि दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या या जगात माणूस काही विरंगुळ्याचे, समाधानाचे, मैत्रीचे, जिव्हाळ्याचे आणि गमतीचे क्षण शोधत असतो. हे सर्व लोकांना अनुभवून देणे जेणेकरून लोक पुनश्च अशा कार्यक्रमांना येणे करतील हीच त्याच्या यशाची पोचपावती असते.
मात्र, दरवर्षी इकडच्याही मराठी माणसाला सगळ्यात जास्त वेध कशाचे लागत असतील तर ते म्हणजे गणपती पूजनाच्या कार्यक्रमाचे! गणपती पूजेची आरास करण्यापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत सर्व गोष्टींची चक्रे वर्षांच्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. आजकालच्या तंत्र आणि विज्ञान युगातदेखील या ज्ञानमय आणि विज्ञानमय असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करणे हेच मराठी माणसाचे एकमेव स्वप्न बनते. भारतापासून कितीतरी अंतरावर असलेले आमच्यासारखे अनेक अनिवासीय मराठी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा सण जगाच्या पाठीवर जिथे असू तिथे साजरा करणारच! मग ती वडिलोपार्जित चालत आलेली परांपरा असो, तर काही वर्षांचीच परांपरा असो, किंवा मुलाांच्या हौसेसाठी सुरू केलेली परांपरा असो. या सर्व परांपरेमागे दिसतो तो निव्वळ आपल्या बाप्पाला आणायचा उत्साह आणि आनंद. आपले सणवार आपल्या समाजाचे सांस्कृतिक प्रतीक आहेत. जसे आपल्या आधीच्या पिढीने या सणांची परांपरा आताच्या पिढीपर्यंत पोहोचवली, तसेच इकडे स्थायिक रहिवासीदेखील या परांपरेचा वारसा आपल्या पुढल्या पिढीपर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न करतात. याच प्रयत्नांमध्ये आमच्या मंडळाचादेखील समावेश आहे हे अगदी अभिमानाने सांगावेसे वाटते!
दर वर्षी मंडळाच्या गणेश पूजेला जणू एका सोहळ्याचं रूप येतं! जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासूनच याची आखणी सुरू होते. यंदा कुठला कार्यक्रम करायचा? त्याची रचना कशी करायची जेणेकरून त्यात जास्तीतजास्त लोकांचा समावेश करता येईल हा विचार खूप आधीपासून केला जातो. इकडच्या शाळांना जून महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची सुट्टी लागते. सुट्टीत काही दिवसांकरिता कुणी सहलीला जातात तर कुणी मायदेशी. ऑगस्ट महिन्याच्या १५-१७ तारखेला शाळा सुरू होतात आणि लगेचच गणपती बाप्पाचे आगमनदेखील होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण जुलै महिन्यापासूनच गणपती पूजेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जय्यत तालमी सुरू होतात. अगदी तीन-चार वर्षांपासून ते अगदी साठीच्या पुढच्या कलाकारांची रेलचेल या तालमींना दिसून येते. सर्व मंडळींचा उत्साह अगदी दांडगा असतो. कार्यक्रमात भाग घेणारे सर्व कलाकार मंडळाचे सभासद असले पाहिजेत या नियमाचे पालन तर होतेच, पण मंडळाच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेऊन आपलं स्वत:चं आणि परिवाराचं, साांस्कृतिक, सामाजिक आणि मैत्रीचं वर्तुळ मोठं करण्यासाठी अनेक नवीन नवीन स्थायिक झालेले मराठी आणि काही प्रमाणात अमराठी लोकदेखील सभासद होतात, ही खरंच मोठी बाब आहे!
सर्वसाधारण भारताबाहेरची मराठी मंडळं सगळे सणवार वीकएंडला साजरे करतात. यंदाच्या वर्षी मंडळाची गणेश पूजा सप्टेंबरच्या २६ तारखेला होणार आहे. दरवर्षी गणपती पूजेचा कार्यक्रम हा अगदी खास असतो. यंदादेखील असाच मनोरंजक, पारिवारिक आणि अर्थात परंपरेने नटलेला कार्यक्रम सादर होणार आहे. गणपतीची पूजा, आरती, उत्तर आरती, गणपती पालखी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खास मराठमोळ्या पदार्थाच्या स्नेहभोजनच्या या काय्र्रक्रमात आसपासचे २०० हून अधिक मराठी व अमराठी लोक अगदी आवर्जून येतात. गणपती बाप्पाच्या प्रसादाचे ३५० हून अधिक पेढय़ाचे मोदक समितीचे सदस्य एकत्र येऊन बनवतात. यंदाच्या पालखीची आखणी, मांडणी आणि सजावटदेखील मंडळाच्या एका सभासदाने केली आहे. उत्तर अमेरिकेतल्या न्यूयॉर्क, न्यूजर्सी, बोस्टन, शिकागो, लॉस एंजेलिससारख्या शहरांमध्ये स्थायिक भारतीय लोकांची खूप मोठी संख्या तर आहेच आणि तिथली मराठी मंडळेदेखील सर्व लोकांच्या माहितीतली आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून साउथ फ्लोरिडादेखील आपल्या मराठी मंडळाच्या वाटचालीत कायम आघाडीवर राहील यात काहीच शंका नाही.