सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

उत्तम प्रतीच्या आंब्यासाठी कोकणचं हवामान पूरक असलं तरी फळांच्या या राजाला या मोसमात थ्रिप्स या किडीच्या प्रादुर्भावामुळे चांगलाच फटका बसला आहे. गेली दोन-तीन वर्षे सतत वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणाऱ्या आंबा उत्पादकांना यातूनच मार्ग शोधावा लागणार आहे.

फळांचा राजा असलेला आंबा बाजारात दाखल होऊ लागला, की ऐन उन्हाळ्यातदेखील एक वेगळेच चैतन्य पसरते. पिवळाधम्मक आंब्यांच्या पेटय़ांनी सजलेली बाजारपेठ प्रत्येकालाच आकर्षित करते. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक जण आंब्याचा आस्वाद घेतच असतो; पण यंदा या आंब्याच्या उत्पादनावर अनेक मर्यादा आल्या आहेत. त्यातल्या काही निसर्गनिर्मित आहेत, तर काही मानवनिर्मित. आंबा उत्पादक, व्यापारी यांच्याशी संवाद साधल्यावर एकूणच बाजारपेठेतील मंदावलेली आवक पुन:पुन्हा अधोरेखित होत राहते. लांबलेली थंडी आणि थ्रिप्स या किडीच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी एकूण उत्पादनापैकी ४० टक्केच आंबा बाजारात दिसत आहे. मागील वर्षी ओखी वादळ, बदलते तापमान यामुळे आंब्याची आवक निम्म्यावर आली होती, तर आता सलग दुसऱ्या वर्षीदेखील ही आवक आणखीन मंदावताना दिसत आहे.

यंदा हिवाळ्यात नेहमीपेक्षा अधिकच तीव्रतेची थंडी आपण अनुभवली. त्या थंडीचा आनंद व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी समाजमाध्यमांवरून उतू जात असतानाच दुसरीकडे या थंडीने आंब्याच्या भरघोस उत्पादनाची आशा मंदावून टाकली. ‘कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संघा’चे अध्यक्ष विवेक भिडे सांगतात, ‘या वर्षी नेहमीपेक्षा ३० ते ४० टक्केच उत्पादन झाले आहे. थ्रिप्स कीड हे त्याचे मुख्य कारण आहे. ही कीड फळ अगदी प्राथमिक अवस्थेत असताना येते. मोहोर आल्यानंतर कैरी छोटी असतानाच पोपटी, तांबडय़ा रंगाच्या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही कीड फुलातील मध चाटतेच, पण मोहोरही कुरतडते. कधीकधी फळ मंगळसूत्राच्या मण्याएवढं असताना कीड आली तर आंब्यावर रांगोळी घातल्यासारखे डाग पडतात.’

याचबरोबर अचानक लांबलेल्या थंडीचाही पिकावर परिणाम झाल्याचे विवेक भिडे नमूद करतात. ते सांगतात, ‘सर्वसाधारणपणे महाशिवरात्रीनंतर रात्रीच्या तापमानात वाढ व्हायला सुरुवात होते, पण यंदा हे तापमान १५ ते १४ अंश इतके खाली उतरले. गेल्या दहा वर्षांत तापमानात असा बदल झालेला नव्हता. थंडीच्या काळात काही वेळा दिवसा तापमान ३५ अंश सेल्सियस, तर रात्री १४ ते १५ अंश इतके असायचे. दिवस-रात्रीच्या तापमानातील फरक हा १२ ते १५ अंशांचा असला तर त्याचा फळावर विपरीत परिणाम होत नाही; पण २० अंशाचा फरक पडला तर ते फळासाठी हानीकारक ठरते.’

थ्रिप्स आणि थंडीच्या परिणामामुळे बाजारात येणाऱ्या आंब्यावर परिणाम झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व आंब्याचे व्यापारी संजय पानसरे नमूद करतात. ते सांगतात, ‘थ्रिप्स कीड शेतकऱ्यांना पुरेशी न उमजल्यामुळे हा फटका बसलेला आहे. कोकणात याचा फटका बराच आहे, तर काही प्रमाणात गुजरातच्या आंब्यावरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे गतवर्षांपेक्षा निम्माच आंबा बाजारात आला आहे. त्यातही आलेल्या आंब्यापैकी फक्त २५ टक्केच आंबा चांगल्या गुणवत्तेचा आहे, उरलेल्या आंब्यावर खार पडणे वगैरे बाबींमुळे त्याची गुणवत्ता घसरलेली आहे.’

बाजारपेठेतील आंब्याची आवक आज कमी असली तरी सुरुवातीचे वातावरण खूप आश्वासक होते, असे नवी मुंबई येथील आंबा व्यापारी बाबासाहेब भेंडे यांनी नमूद केले. ते सांगतात, ‘या वर्षी मोहोर भरपूर होता. तेव्हा न भूतो न भविष्यति असे उत्पादन होईल, असे सांगितले जात होते; पण हा मोहोर फसवा होता. पुरेशी फलधारणा झालीच नाही. त्यात पुन्हा थ्रिप्समुळे बराच फटका बसला. परिणामी सध्या बाजारात आंब्याची आवक कमीच आहे. मोसम अगदीच मर्यादित म्हणजे १० एप्रिल ते १० मे इतपतच टिकून राहील असे आज वातावरण आहे, तर दुसरीकडे आवक कमी असल्याने स्थानिक बाजारातील दर चांगले असले तरी निर्यातीला फारसा जोर मिळणार नाही. कारण निर्यातीसाठी स्थानिक बाजारापेक्षा कमी दर अपेक्षित असतो.’  कर्नाटकातील आंब्याची आवक मात्र वाढताना दिसत असल्याचे बाबासाहेब भेंडे सांगतात. कर्नाटकातील आंब्याच्या बागा या कोकणाच्या तुलनेने नवीन असून तेथे लागवडीसाठी अधिक जमीन उपलब्ध असल्यामुळे तेथील आंब्याची आवक वाढत असल्याचे त्यांचे मत आहे.

नेहमी मार्चपासून आंब्याचे अपेक्षित असणारे उत्पादन यंदा होऊ शकले नाही. राजापूर, रत्नागिरी भागांत अगदीच नगण्य फळ मिळाले, तर काही प्रमाणात देवगडचा आंबा मार्चमध्ये बाजारात आला. कीड आणि थंडीच्या फटक्यातून वाचलेला ४० टक्के आंबा साधारण १५ एप्रिलपासून तयार होताना दिसत आहे. हा ट्रेण्ड नेहमीपेक्षा विपरीत असल्याचे विवेक भिडे नमूद करतात. ते सांगतात, ‘साधारणपणे १ एप्रिलपासून लाखभर पेटय़ांची आवक बाजारात दर दिवशी होऊ लागते; पण ती सध्या विलंबाने आणि कमी प्रमाणात म्हणजे ७० ते ८० हजार पेटय़ा इतकीच होत आहे. पुढील आठवडाभरात सर्वच ठिकाणचा माल एकदम बाजारात येईल. त्यामुळे बाजारात फील गुडची भावना निर्माण होईल, पण एकदम माल आल्यामुळे आंब्याला भाव कमी मिळेल. त्यातही गुहागर, दापोली, हर्णे येथील आंबा उशिराने बाजारात दाखल होईल. कारण सरत्या थंडीत तेथील तापमान पाच अंशांपर्यंत खाली गेले होते. बाजारात त्या आंब्याच्या विक्रीवर परिणाम झालेला असेल. उरलेल्या आंब्याची पुढील १५ दिवसांत घाईघाईने तोड करावी लागेल. कारण २० मेच्या दरम्यान पाऊस येण्याची भीती असते. या सर्वाचा एकूणच परिणाम हा आंबा शेतकऱ्याची अर्थव्यवस्था कोलमडण्यात झालेला आहे.’

या अनुषंगाने एकूणच आंब्याची बागायती आर्थिकदृष्टय़ा कठीण होत असल्याच्या चित्राकडे विवेक भिडे लक्ष वेधतात. कीटकनाशक आणि संपूर्ण वर्षभराची मजुरी मिळून प्रत्येक पेटीमागे किमान ५०० ते ६०० रुपये खर्च होत असल्याचे ते सांगतात. यंदाच्या वर्षी आंबा उत्पादक हे आर्थिक पातळीवर अत्यंत वाईट अवस्थेत असून सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे, कर्जाची पुनर्रचना करावी, अशी मागणी विवेक भिडे यांनी केली आहे.

किडीचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल हे घटक तसे सर्वच पिकांसाठी विपरीत परिणाम करणारे असतात. थ्रिप्सचा फटका यापूर्वीदेखील कोकणातील आंब्याला बसलेला आहे; पण थ्रिप्सची गणना मुख्य कीड म्हणून कधीच झाली नव्हती; पण या वर्षी थ्रिप्सने चांगलीच गडबड उडवून दिली आहे. विवेक भिडे सांगतात की, ही कीड मिरचीवरदेखील येते; पण मिरचीचे पाच एकरांचे शेत दोन-तीन तासांत फवारून होते. साधारणपणे थ्रिप्सचा प्रादुर्भाव पहिल्या तीन दिवसांत पिकाला नष्ट करतो. त्या हिशोबाने आंब्याच्या झाडांवर फवारणी करायची असेल तर एकाच दिवसात ही फवारणी पूर्ण होऊ शकत नाही. एखाद्याची ५०० कलमं असतील तर ती अनेकदा दोन-तीन ठिकाणी विखुरलेली असतात. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या फवारणीतील बागेचे कमी नुकसान होते, दुसऱ्या दिवशी फवारणी करायची बाग अर्धवट वाचू शकते, तर तिसऱ्या दिवशी फवारणी करताना मोहोर किंवा फळाच्या जागी काडय़ाच शिल्लक राहिलेल्या दिसतात. एकूणच थ्रिप्सचा अटकाव करताना एकूण आंब्याच्या उत्पादनाला फटका बसतोच.

या सर्वातून आंबा बाजारात येतो तेव्हा ग्राहकांच्या अपेक्षांचाही फटका बसतो. त्याबद्दल  संजय पानसरे सांगतात, ‘ग्राहक १५-२० एप्रिलनंतर आंबा स्वस्त व्हायची वाट पाहतात. त्यातच पुन्हा कर्नाटक, केरळमधील आंबादेखील येत असतो. केरळचा आंबा हा कोकणपेक्षा निम्म्या दरात मिळतो, मात्र आंब्याचे दर्दी कोकणातील आंबाच विकत घेतात. यंदा स्थानिक बाजार बरा असल्यामुळे निर्यातीला वाव कमी आहे, पण त्याच वेळी जेटची विमानसेवा बंद असल्यामुळे वाहतुकीचं एक माध्यम कमी झालं असून इतर विमान कंपन्या वाहतुकीचा दर वाढवत आहेत. त्याचाही निर्यातीला काही प्रमाणात फटका बसत आहे.’

कोकणातील आंबा उत्पादन आणि व्यापाराची ही परिस्थिती असताना एकूण देशभरातील उत्पादन व्यापारातील आकडेवारी पाहणेदेखील गरजेचे ठरेल. देशभरातील आंब्याच्या उत्पादनात गेल्या चार वर्षांत अजिबात घट झालेली नाही. मात्र महाराष्ट्रातील उत्पादनात गेल्या वर्षी (२०१८-१९) २५ टक्क्य़ांची घट झाली होती. यंदा ही घट आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी कर्नाटकातील आंब्याची वाढ अगदी नियमितपणे होताना दिसते. मात्र त्याच वेळी संपूर्ण देशातून होणारी निर्यात गेल्या दोन वर्षांत कमी होताना दिसत आहे.

थ्रिप्ससारख्या किडीचा प्रादुर्भाव, वाढती थंडी यांसारख्या वातावरणातील बदलांवर नेमके काय उपाय करता येतील याचा विचार करणे म्हणूनच गरजेचे आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे उद्यानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. आर. साळवी यातील अनेक बाबींवर प्रकाश टाकतात. ते सांगतात, ‘वातावरण बदल हे होतच असतात. त्या गोष्टी आपल्या हातात नसतात. उत्पादन खालावण्यासाठी एकच अमुक कारण नाही. अनेक कारणांचा एकत्रित परिणाम उत्पादनावर होत असतो. थ्रिप्स आणि थंडी यांचा परस्परसंबंध आहे. थंडी वाढली की थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यावर जे उपाय केले जातात, त्याऐवजी थ्रिप्सचा प्रादुर्भावच होऊ नये म्हणून आधीच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र त्या केल्या जात नाहीत. त्यासाठी कॉन्फिडॉर हे औषध एकदाच फवारण्यास विद्यापीठातर्फे सांगितले जाते, पण अनेक शेतकरी ते दोन वेळा फवारतात. थ्रिप्स हा तसा महत्त्वाचा धोकादायक घटक नव्हता; पण आता तो मुख्य धोका झाला आहे. तसेच इतर फवारण्यादेखील पुन:पुन्हा करणे धोकादायक असते, पण लोकांकडून त्या पुन्हा पुन्हा होताना दिसतात.’

किडीच्या प्रादुर्भावाबरोबरच पावसाचादेखील फटका या वर्षी आंब्याला बसला आहे. डॉ. साळवी सांगतात, ‘२०१८ मध्ये पाऊस लवकर संपला. एरवी साधारणपणे १० ऑक्टोबरला पाऊस संपतो, पण मागील वर्षी तो सप्टेंबरलाच संपला. त्या वर्षी पावसाचे प्रमाण हे नेहमीपेक्षा १५ टक्के कमी तर होतेच, पण पाऊस सर्व महिन्यांत समान न पडता जुलै आणि ऑगस्टमध्ये अधिक झाला. झाडाला जे बाष्प मिळते आणि अन्नद्रव्य शोषण होते ती प्रक्रिया तीन-चार आठवडे आधी गेलेल्या पावसामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्याचा परिणाम म्हणून तीन वेळा मोहोर यायला हवा तो दोनदाच आला. त्यातच एरवी ७०-७२ दिवस असणारी थंडी ९७-९८ दिवस लांबल्याने मोहोराचे परागीभवन झाले नाही. अशा सर्वच घटकांचा परिणाम यंदाच्या आंबा उत्पादनावर झाला आहे.’

यंदाचे हे चित्र पाहता फळांच्या राजाला याचा चांगलाच फटका बसला आहे.  कोकणचे हवामान आंब्यासाठी पूरक आहे. मात्र गेली दोन वर्षे वेगवेगळ्या कारणांनी आंब्याच्या एकूण उत्पादनावर बराच परिणाम होत आहे. त्यातील त्रुटींचा अभ्यास करून येथील आंबा उत्पादकाला मार्ग काढावा लागेल. अन्यथा अशा अनेक कारणांनी उत्पादन घसरत असताना इतर राज्यांतील उत्पादन मात्र आपल्यावर कुरघोडी करणारं ठरेल.