पावसाळ्यात शहराबाहेर जाऊन डोंगरकपारींमध्ये धबधब्यांखाली मनसोक्त भिजायचं हा अनेकांसाठी आवडीचा कार्यक्रम. त्यांच्यासाठी मुंबईच्या आसपासचे तसेच माळशेज घाटातले माहीत असलेच पाहिजेत असे काही धबधबे-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थिटबी / कळू धबधबा

पावसाळी भटकंती म्हटली की डोळ्यासमोर येतो तो वळणावळणाचा रस्ता, डोंगर, आणि कडय़ांवरून कोसळणारे धबधबे. अशा सगळ्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटातून दिसतो एक अजस्र प्रपात. हरिश्चंद्रगडाच्या पोटातून कोकणात कोसळणारा हा प्रचंड प्रपात म्हणजेच कळू धबधबा होय. कोकणातील थिटबी गावातून साधारण तासाभराच्या चालीने या धबधब्याच्या तळाशी जाता येते. माळशेज घाटाच्या पायथ्याच्या सावर्णे गावा शेजारून डावीकडे (मुंबईहून नगरकडे जाताना) वळणाऱ्या छोटय़ा सडकेने दोन किलोमीटर अंतर पार करून थिटबी गावात पोहोचावे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्याच्या थेट खालपर्यंत जाता येत नसले तरी तीन टप्प्यात कोसळणारा हा प्रचंड झोत, परिसरातील डोंगर, आजूबाजूचे हिरवेकंच जंगल आणि त्यातून उसळून वाहणारा याचा प्रवाह हा सगळाच देखावा मंत्रमुग्ध करून जातो.

धोदाणी धबधबा

मलंगगड-माथेरान डोंगररांगेतून वहात येणारे पावसाचे पाणी अनेक प्रपातांच्या रूपात डोंगर कडय़ांवरून ठिकठिकाणी थेट कोकणात झेपावताना पाहायला मिळते. याच काही प्रपातांपकी एक असलेला धोदाणी धबधबा हा पनवेल स्थानकापासून अवघ्या १९ किलोमीटर अंतरावर वसलेल्या धोदाणी या माथेरान डोंगराच्या पायथ्याच्या गावानजीक आहे. गावामागील माथेरान विकटगड भागातील पावसाचे पाणी ज्या ओहोळातून वाहून येते. हा धबधबा त्याच ओहोळावर आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी गावाशेजारून वाहणाऱ्या ओहोळाच्या कडेकडेने डोंगराकडे जाणाऱ्या पायवाटेने चालत गेल्यास साधारण पाऊण तासात आपण धबधब्यापर्यंत पोहोचतो.

या प्रपाताचे पाणी कडय़ावरील खडकामुळे विभागले जात असल्यामुळे प्रपात दोन भागात कोसळतो. सुमारे १०० फुटांवरून कोसळणाऱ्या मुख्य प्रपाताच्या तळाशी खोल डोह तयार झाला आहे. तर शेजारूनच वाहणारे पाणी ८० अंशी तिरकस खडकावरून खळाळत वाहत असते. धबधब्याच्या पाठीमागील कातळ कडय़ावरून याहीपेक्षा मोठा प्रपात रोरावत कोसळताना पाहण्याची मौज काही औरच आहे.

ट्रेकर मंडळींनी धोदाणी ते माथेरान (सनसेट पॉइंट) हा दीड तासाचा छोटासा सोपा ट्रेक करायला हरकत नाही. पनवेल बस स्थानकापासून धोदाणी गावासाठी नियमित बससेवा सुरू असून खासगी टमटम रिक्षाही सहज उपलब्ध होतात.

दैत्यासुर धबधबा

वर वर्णन केलेल्या सगळ्या धबधब्यांचा बाप म्हणता येईल असा एक प्रचंड झोत कर्जतजवळील जमारुंग गावाशेजारच्या डोंगरकडय़ावरून कोसळतो. येथील एका डोंगराच्या माथ्यावर एक नसíगक भगदाड म्हणजेच नेढे असल्यामुळे याला नािखडाचा डोंगर असे  नाव पडले आहे. या नािखड डोंगराच्या पदरावरून अनेक धबधबे कोकणातील सह्य़ाद्रीची वाडी परिसरात कोसळतात. पावसाळा सुरू झाला की या भागातील डोंगरातील पाणी अनेक ओहोळांच्या रूपात एकत्र येऊन एक महाकाय प्रपात रोरावत कडय़ावरून खाली झेपावतो. पाण्याच्या या रौद्रभीषण स्वरूपावरून त्याला मिळालेले दैत्यासुर हे नाव एकदम समर्पक वाटते. या अजस्र धबधब्याचे रौद्र भीषण रूप पाहणे हा वेगळा अनुभव असला तरी प्रवाहाच्या थेट खाली जाणं धोक्याचे आहे. कारण हा प्रपात खूप उंचावरून कोसळत असतो.

सह्यद्रीच्या वाडीला जाण्यासाठी कर्जतहून जमारुंगाची एस. टी. पकडावी. पुढे डुक्कर पाडामाग्रे तीन किलोमीटर अंतर चालत जाऊन सह्य़ाद्रीच्या वाडीवर पोहोचता येते. अन्यथा कर्जत स्थानकाहून सहा आसनी खासगी रिक्षादेखील मिळतात.

पडसरे धबधबा

पावसाळ्यात थंड हवा, धुके, हिरवळ, जंगल, खळाळत वाहणारे पाणी आणि जोडीला शांत वातावरण अनुभवायचे असेल तर पडसरे धबधब्याला एकदा जरूर भेट द्यावी. शहरांना जोडणाऱ्या हमरस्त्यापासून बरेच आत असल्यामुळे येथे गाडीच्या डेकवर जोरात गाणी लागून बेधुंद हुल्लडबाजी करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांची फारशी गर्दी नसते.

खोपोली-पाली रस्त्यावर पालीच्या साधारण सहा-सात किलोमीटरवर अलीकडे पडसरे गावाला जाणारा फाटा आहे. या फाटय़ापासून पडसरे गाव आठ किलोमीटरवर आहे. पडसरे गावाच्या रस्त्यालगत असलेले कावळे धरण परिसर मुद्दाम थांबून पाहावा  इतका नयनरम्य आहे. मुख्य रस्त्यापासून छोटय़ाशा पायवाटेने या बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला पाच-दहा मिनिटे पुरेशी होतात.

कावळे धरण ओलांडले की गाडी वळणावळणाचा घाट चढू लागते, घनदाट जंगलातून जाणाऱ्या नागमोडी रस्त्यावर दिवसाढवळ्याही चिटपाखरूही दिसत नाही. ऐकू येत असतो तो जंगलातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि जंगलात भिरभिरणाऱ्या पक्ष्यांचा किलकिलाट.  एका विशिष्ट उंचीवर तर ढग खाली उतरल्यामुळे सगळीकडे धुके पसरून वातावरण धूसर होऊन जाते. जणू काही एखाद्या हिल स्टेशनवरच आल्याचा अनुभव आपल्याला येथे मिळतो.

पडसरे गावाच्या अलीकडे अगदी रस्त्याला लागूनच पडसरे धबधबा आहे. तुलनेने उंची कमी, मात्र रुंदीला बराच मोठा असल्यामुळे त्याखाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. तळाशी बरीच विस्तीर्ण जागा आहे. त्यात डुंबण्याचा आनंद काही औरच आहे. येथे येण्यासाठी स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच. नसेल तर पालीवरून सहा आसनी रिक्षा मिळू शकते.

धनगर धबधबा

बदलापूर स्थानकापासून साधारण आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेले कुंडेश्वर, तेथील शिवस्थानामुळे आणि कुंडामुळे सर्वश्रुत आहे. पण याच कुंडेश्वर मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर असलेला धनगरचा धबधबा वाटेपासून आतल्या बाजूला असल्यामुळे  गर्दीपासून अजूनही अलिप्त आहे.

कुंडेश्वर मंदिराच्या रस्त्यावर मंदिराच्या साधारण एक किलोमीटर आधी एक छोटी पायवाट डावीकडच्या रानात शिरते. याच पायवाटेने थोडे चालत गेल्यावर वाट ओहोळात उतरते.

धनगर धबधब्याला जाण्यासाठी ओहोळाच्या पाण्यातूनच चालत जावे लागते. सतत वाहत्या पाण्यामुळे खडकाला शेवाळे धरते. त्यामुळे पाण्यातून चालताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक. दहा-पंधरा मिनिटांची सोपी चाल आपल्याला धबधब्याजवळ घेऊन जाते. ७०-८० फुटावरून कोसळणारा हा प्रपात झुडपांच्या आडोशामुळे मुख्य रस्त्यावरून दिसत नसल्यामुळे येथे हुल्लडबाज पर्यटकांचा गोंधळ नसतो. धबधब्याचा तळ उथळ असून थेट प्रपाताखाली उभे राहून भिजत येते.

बदलापूर स्थानकाजवळून खाजगी रिक्षा घेऊन येथे जाता येते.

कालोते मोकाशीचा धबधबा

जास्त चालावं न लागता थेट धबधब्याच्या खाली भिजायचे असेल तर खालापूर- चौक (कर्जत) रस्त्यानजीक वसलेल्या कालोते मोकाशी गावाजवळील कालोते-मोकाशी धबधब्याला जायला हवे. येथे पोहोचायला कर्जत अथवा चौक येथून सहा आसनी रिक्षा मिळतात. गावाच्या शेजारीच कालोते-मोकाशी नावाचा बंधारा आहे. या बंधाऱ्यावरून फेरफटका मारण्यात एक वेगळीच मौज आहे.

गावामागील धरणाच्या पाण्याला वळसा मारून ओढय़ाच्या काठाने डोंगरात चढणाऱ्या पायवाटेने अवघ्या पाऊण तासात आपण धबधब्याच्या डोक्यावर जाऊन पोहोचतो.

८०-९० फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या माऱ्याने तळाशी मोठे डोह तयार झालेले आहे. धबधबा कोसळतो तो कातळ खालून झिजून छतासारखा पुढे आल्याने पाण्याचा झोत कातळकडय़ावरून न ओघळता थेट डोहात कोसळतो. पाउस जास्त असल्यास डोहात उतरण्याचा मोह टाळावा. धबधब्याच्या वर डोंगरात चालत गेल्यास अनेक ठिकाणी छोटय़ामोठय़ा टप्प्यांवरून खळाळत वाहणाऱ्या पाण्यात डुंबण्यायोग्य सुरक्षित जागा मिळतात.

ट्रेकिंगची हौस असल्यास धबधब्याच्या मागील डोंगर दीड तासात चढून पलीकडे बहिरीच्या डोंगरातून पळसदरी अथवा डोलीवली या कर्जत दरम्यानच्या रेल्वे स्थानकात पोहोचता येते.

वरदायिनी धबधबा

नागोठणे ते कोलाड हमरस्त्यावरून सुकेळी िखडीच्या आधी डावीकडच्या डोंगरात दोन टप्प्यात कोसळणारा एक भलामोठा प्रपात आपले लक्ष वेधून घेतो. तोच हा वरदायिनी धबधबा. या धबधब्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा आकार. १५-२० फुटी आडव्या पसरलेल्या कातळ कडय़ावरून उसळून वाहणारे शुभ्र पाणी दुरून हवेवर फडफडणाऱ्या पडद्यासारखे दिसते.

येथे पोहोचण्यासाठी सुकेळी िखडीच्या आधी जिंदाल कंपनीच्या पुढील डावीकडच्या फाटय़ावरून खेरवाडी गाव गाठावे. खेरवाडी गावातून बलगाडी जाईल, अशा कच्च्या रस्त्याने ३० मिनिटे चालत जाऊन आपण धबधब्याजवळ पोहोचतो. दोन टप्प्यांत कोसळणाऱ्या या धबधब्याच्या तळाशी सपाट कातळ आहे. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे येथे बरेच शेवाळ जमा होतं. थेट धबधब्याखाली जाताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे.

धबधब्याच्या वरच्या डोंगरात वरदायिनी मातेचे प्राचीन मंदिर आहे. येथे जाण्यासाठी तासाभराची चढाई करावी लागेल. वरदायिनी मंदिरापर्यंत जायचे झाल्यास गावातून वाटाडय़ा घ्यावा.

तुंगारेश्वर

मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या तुंगारेश्वर जंगलाची सफर पावसाळी भटकंतीचा पुरेपूर आनंद देणारी ठरते. तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीत वसलेलं तुंगारेश्वरचं शिवमंदिर सदैव शिवभक्तांच्या ओढय़ाने गजबजलेले असते. चहुबाजूने उंचच उंच वाढलेल्या मोठमोठय़ा झाडांच्या गर्द राईच्या विळख्यात झाकोळलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकाची प्रचंड गर्दी उसळते. मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या झऱ्यावर ठिकठिकाणी असलेल्या  दगडी टप्प्यामुळे येथे अनेक छोटे मोठे धबधबे निर्माण होतात. या पाण्यात डुंबण्यासाठी येथे भरपूर पर्यटक गर्दी करतात.

येथे येण्यासाठी वसई रोड स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटय़ापर्यंत शेअर रिक्षा मिळतात. पुढे चार किलोमीटर पायपीट करायची नसल्यास खासगी रिक्षा थेट गेटपर्यंत नेऊन सोडते. तेथून कच्च्या मातीच्या सडकेवरून जाताना दोन-तीन वेळा ओढा ओलांडताना पाय ओले करत तासाभरात आपण देवळापर्यंत पोहोचतो.

ट्रेकिंगची हौस भागवायची असेल तर तुंगारेश्वर ते माथ्यावरील परशुराम कुंड असा छोटा सोपा ट्रेक करता येऊ शकतो. या वाटेवरील जंगलात अनेक जातीही फुलपाखरे, कीटक पाहायला मिळतात. डोंगरमाथ्यावरील पठारावर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला कास पठारावर फुलणाऱ्या फुलांपकी काही जातीची फुले फुललेली पाहायला मिळतात. श्रावण महिन्यात मात्र भाविकांची गर्दी लक्षात घेऊन येथे येणे टाळावे.

पावसाळ्यात मजा करायला जाताना हे लक्षात असू द्या

  • धबधब्यावर, नदी अथवा समुद्रकिनारी अजिबात मद्यपान, धुम्रपान करुन जाऊ नये.
  • गोंगाट करुन निसर्गाची शांतता भंग करु नये.
  • आपण सोबत नेलेल्या सर्व प्लास्टिक, थर्माकोल अथवा अन्य वस्तू आपल्यासोबत परत शहरात आणून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
  • सेल्फी काढून सोशल मीडियावर मिरवण्यासाठी जीवावर बेतेल असं (कडय़ाच्या काठावर जाणे, तलावाच्या काठावर जाणे) काहीही करु नये.
  • अपरिचित ठिकाणी जाताना गावातील एखादा मार्गदर्शक आवर्जून सोबतीला न्यावा. पावसाळ्यात वाटांवर हरवून जाण्याची शक्यता असते.
  • डोंगरात भटकायला जाणार असाल तर संबंधित गावातील गावकऱ्यांना तुम्ही कुठे जाताय, केव्हापर्यंत परत येणार आहात याची कल्पना द्यावी. शक्य असल्यास गावातील एक दोन व्यक्तींचे मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावेत.
  • पावसाळ्यात शेवाळे तयार होऊन धबधब्याच्या परिसरात घसरडे तयार होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे अशा ठिकाणी अत्यंत जपूनच वावरावे.
  • डोंगरात पाऊस पडायला लागला की ओढय़ाचे, धबधब्याचे पाणी क्षणात वाढते. शहरी लोकांना त्याचा अंदाज येत नाही. अशावेळी वाढलेल्या पाण्यातून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. त्यातच गांगरल्याने वेडेवाकडे साहस केले जाऊ शकते, ते पूर्णत: टाळावे.
  • ओढय़ाचे अथवा छोटय़ा नदीचे पाणी वाढले असेल, पाणी पूलावरुन वहात असेल तर त्या पाण्यातून वाहन पलिकडे नेण्याचे अथवा चालत जाण्याचे वेडे साहस करु नये. स्थानिकांच्या मार्गदर्शनानेच पुढील कृती करावी.
  • आपले सर्व सामान वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ते पुन्हा एका मोठय़ा प्लास्टिक पिशवीत भरावे. सुक्या कपडय़ांचा जोड कायम सोबत बाळगावा.
  • सतत पावसात भिजत असल्याने दिवसभरात पाणी पिण्याचे टाळले जाते. पण तुम्ही डोंगरात भटकत असाल तर न चुकता ठरावीक वेळाने पाणी प्यायलाच हवे.
    डॉ. प्रीती पटेल – response.lokprabha@expressindia.com
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waterfall rain picnic enjoy
First published on: 21-07-2017 at 01:04 IST