07 August 2020

News Flash

सायबर भामटय़ांचेही ‘वर्क फ्रॉम होम’

इंटरनेटच्या काळ्या बाजूविषयी अनभिज्ञ किंवा अर्धवट ज्ञान असलेल्यांची ही वाढती गर्दी सायबर भामटय़ांच्या पथ्यावरच पडली.

करोना व्हायरसच्या लसीवर काम करणाऱ्या मॅसाच्युसेटसमधील बायोटेक कंपनीच्या कॉम्प्युटर सिस्टिममधुन डाटा चोरण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे आरोपपत्रात म्हटले आहे.

सुहास बिऱ्हाडे – response.lokprabha@expressindia.com

चार महिन्यांत ५६० गुन्हेनोंद; कोटय़वधींवर डल्ला

करोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि अनेकांना भरपूर रिकामा वेळ मिळाला. काहींचा नोकरी, व्यवसाय ठप्प झाला, तर काहींचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले. मुलांच्या शाळा बंद झाल्या आणि नंतर ऑनलाइन स्वरूपात सुरू झाल्या. एरव्ही रोख स्वरूपात होणारे लहान-मोठे आर्थिक व्यवहारही ऑनलाइन, कॅशलेस झाले. प्रत्येकाचाच ऑनलाइन वावर कित्येक पटींनी वाढला. बाजारात गर्दी जास्त असेल, तर जसे पाकीटमारांचे फावते, तसेच इंटरनेटच्या काळ्या बाजूविषयी अनभिज्ञ किंवा अर्धवट ज्ञान असलेल्यांची ही वाढती गर्दी सायबर भामटय़ांच्या पथ्यावरच पडली. परिणामी टाळेबंदीच्या काळात सायबर गुन्हेगारीत वाढ झाली.

टाळेबंदीत विविध प्रकारच्या गुन्ह्य़ांत घट झाली असताना, सायबर गुन्हेगारी मात्र झपाटय़ाने वाढली. २५ मार्च ते २५ जुलैदरम्यान राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल ५६० सायबर गुन्ह्य़ांची नोंद झाली आणि २९० आरोपींना अटक झाली. बीड, कोल्हापूर, जालना आदी जिल्हे सायबर गुन्ह्य़ांमध्ये अव्वल आहेत. गेल्या तीन महिन्यांत तर सायबर भामटय़ांनी ऑनलाइन फसवणूक करून कोटय़वधी रुपयांवर डल्ला मारला आहे. सायबर भामटे तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढेच असतात. पोलिसांनी एक मार्ग बंद केला, की दुसरा मार्ग लगेच तयार असतो.

आता काळ बदलला आहे. रस्त्यात अडवून, चाकूचा धाक दाखवून लुटणे किंवा घरात घुसून हातपाय बांधून चोरी करणे या पद्धती आता कालबाह्य़ झाल्या आहेत. आता लूटमार आणि चोरी होते डेटाची. या चोरांच्या हाती चाकू नसतो. बाजारात येणाऱ्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानातल्या त्रुटी हेरणारा मेंदू हेच त्यांचे हत्यार असते. त्याचा वापर करून ते हजारो मैल दूर असलेल्या व्यक्तीच्या मोबाइल, संगणकावर, बँक खात्यांवर डल्ला मारतात. विविध आमिषे दाखवून जाळ्यात ओढतात. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, मानहानीकारक किंवा अश्लील चित्रफिती तयार करून ती प्रसारित करणे, समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पसरवणे, प्रतिमा मलिन करणे अशा स्वरूपाचे गुन्हे वाढले आहेतच, शिवाय विविध क्लृप्त्या वापरून कोटय़वधी रुपयांचा अपहारही केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहावे, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने केले आहे.

काही वर्षांपूर्वी ऑनलाइन फसवणुकीला सुरुवात झाली तेव्हा सायबर भामटे ऑनलाइन लॉटरी लागल्याचे संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करत. आता त्यात खूप बदल झाला आहे. भामटे आता थेट मोबाइल आणि संगणकातच प्रवेश मिळवू लागले आहेत. पूर्वी झारखंडमधील जामतारा हे सायबर भामटय़ांचे केंद्र होते. (याच नावाच्या वेबसीरिजमध्ये हा प्रकार पाहिला असेल.) पोलिसांचे लक्ष जामतारावर गेल्याने या भामटय़ांनी आता पश्चिम बंगालमधून सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील नोएडा तर नायजेरियन नागरिकांचा अड्डा झाला आहे. राजस्थानातील काही जिल्ह्य़ांतही या सायबर भामटय़ांनी आपले बस्तान बसवले आहे.

ऑनलाइन फसवणुकीला ‘फिशिंग’ म्हणून संबोधले जाते. गळाला खाद्य लावून तो गळ हजारो मासे असणाऱ्या एखाद्या तलावात सोडला जातो. हजारो माशांपैकी केवळ एखादाच मासा गळाला लागतो. ऑनलाइन फसवणूक करणारेही अशाच पद्धतीने शेकडो लोकांना आमिषे दाखवतात आणि त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी एखादाच फसतो. आमिषे दाखवून जाळ्यात ओढण्यासाठी एखादा मेसेज किंवा ईमेल हजारो लोकांना पाठवला जातो. त्यातील एखाददुसरा गळाला लागतोच. सुरुवातीला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवणे, तुमचा नंबर अमुक एका स्पर्धेत निवडला गेला आहे, तुमचे गिफ्ट पार्सल आले आहे असे संदेश पाठवून जाळ्यात ओढले जायचे. आजही हे प्रकार सुरू आहेतच, मात्र आता त्यापुढे जाऊन नवनव्या शकला लढवल्या जात आहेत. तुमच्या पेटीएमचे, बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे आहेत, डेबिट कार्ड पडताळणी करायची आहे, तुमच्या पॉलिसी अपडेट करायच्या आहेत अशी वेगवेगळी कारणे सांगून फोनवर बोलण्यात गुंतवून माहिती काढली जाते. समोरील व्यक्तीने आपले नाव, पत्ता, बँकांचे तपशील, कार्डाचे तपशील अचूक सांगितल्याने अनेकांचा विश्वास बसतो आणि लोक फसतात. मात्र ही माहिती काढणे अत्यंत सोपे असते. हॅकर्स आणि सायबर भामटे २४ तास हेच काम करत असतात. बँकांमध्ये, कर्ज विभागात बाह्य़यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिग) काम करणाऱ्यांकडून ही माहिती सहज उपलब्ध होते. तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होऊ लागले आहे आणि लोकही सावध झाले आहेत. त्यामुळे कोणी सहसा ओटीपी देत नाही. मात्र तरीदेखील सायबर भामटे नवनव्या क्लृप्त्या शोधून गंडा घालतात.

अश्लील संकेतस्थळांचा वापर

हॅकर्स तसेच सायबर भामटय़ांनी आता अश्लील संकेतस्थळाचा आधार घेतला आहे. अशी संकेतस्थळे पाहिली जात असताना व्हायरस मार्फत संगणकातील डेटा हॅक केला जाऊ लागला आहे. तसेच अश्लील संकेतस्थळे पाहणाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यात येत आहे. लोक उत्सुकतेपोटी या संकेतस्थळांना भेटी देतात आणि त्याचाच गैरफायदा हॅकर्स, सायबर भामटे घेतात. ही संकेतस्थळे अनधिकृत असल्याने त्यावर कुणाचे नियंत्रण नसते. तिथे आकर्षित करणारे विविध पर्याय असतात. त्यावर क्लिक केले की रॅनसमवेअर डाऊनलोड होते आणि संगणकात व्हायरसचा प्रवेश होता. मोबाइल किंवा लॅपटॉपचा कॅमेरा ऑन होतो आणि रेकॉर्डिग सुरू होते. डेटा चोरला जातो. अशा व्हायरसच्या आधारे संगणकातील खासगी डेटा चोरला जातो. अशी संकेतस्थळे पाहणाऱ्या व्यक्तीस मग सायबर भामटे फोन करतात आणि ब्लॅकमेल करतात. तुम्ही अश्लील संकेतस्थळ पाहत असल्याची माहिती सार्वजनिक करून तुमची बदनामी करू, अशी धमकी देऊन पैसे उकळतात. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हे फंल्ल२े६ं१ी आपल्या संगणकात, मोबाइलमध्ये शिरतात आणि सर्व डेटा हॅक होऊ शकतो.

फुकट वेबसिरीज अंगलट

टाळेबंदीच्या काळात अनेकांनी चित्रपट, वेबसीरिज पाहण्याचा सपाटा लावला. अ‍ॅपवर जे चित्रपट किंवा मालिका पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात, तेच पायरेटेड स्वरूपात मोफत पाहायला मिळत असेल, तर उगाच खर्च का करायचा, अशी मनोवृत्ती दिसते. अनधिकृत संकेतस्थळांवरून मोफत चित्रपट मिळवण्याच्या प्रयत्नांत अनेक जण असतात. सायबर भामटय़ांनी आता अशा व्यक्तींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मोफत चित्रपट किंवा वेबसीरिजच्या लिंक प्रसारित करून त्याद्वारे संगणक किंवा मोबाइलमध्ये व्हायरस प्रवेश करत असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली. मुंबईच्या बीकेसी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ सांगतात, सायबर भामटे किंवा हॅकर्स अशा लिंकचे आमिष दाखवतात. लिंकवरून चित्रपट किंवा सीरिज डाऊनलोड करण्यापूर्वी परवानगी मागितली जाते. त्याद्वारेच व्हायरस किंवा मालवेअर सोडले जाते आणि संबंधित व्यक्तीच्या मोबाइल किंवा लॅपटॉपमधली माहिती चोरली जाते. नंतर त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते. पोलिसांनी १० चित्रपट आणि १० वेबसीरिजची नावे जाहीर केली असून ते मोफत दाखवणाऱ्या लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. एरवीदेखील कोणतेही मोफत चित्रपट किंवा सीरिज डाऊनलोड करण्याचा मोह टाळावा, शुल्क भरून अधिकृत अ‍ॅपद्वारेच चित्रपट पाहावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दिल्ली क्राइम, ब्रूकलीन नाइन-नाइन, पंचायत, अकोरी, फाऊदा, माइंडहंटर, नार्कोस, देवलोक, लॉस्ट या वेबसीरिज आणि मर्दानी-२, झूटोपिया, जवानी जानेमन, छपाक, लव्ह आज कल, इन्सेप्शन, बाहुबली, रजनीगंधा, गली, बाला या चित्रपटांच्या लिंक धोकादायक असल्याचे सायबर सेलने जाहीर केले आहे.

विकृतीला ऑनलाइनची जोड

ऑनलाइन फसवणूक ही बहुतेक वेळा आर्थिक कारणांसाठी किंवा विकृतीतून केली जाते. एखाद्याची अश्लील छायाचित्रे व्हायरल करणे हा त्यातील एक प्रकार आहे. मुली प्रियकरांना आपली अल्पवस्त्रांतील छायाचित्रे पाठवतात. पुढे प्रियकरासोबत बिनसल्यावर तो ही छायाचित्रे व्हायरल करतो. काही वेळा स्वत:साठी मोबाइलमध्ये अनावृत अवस्थेतील छायाचित्रे काढली जातात. मोबाइल विकल्यास, चोरी झाल्यास हीच छायाचित्रे मिळवून त्यांचा गैरवापर केला जातो. कारण मोबाइल किंवा संगणकातून छायाचित्रे डिलीट केली तरी ती विविध सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून पुन्हा मिळवता येतात.

फुकट काहीच नसते

सायबर भामटे, हॅकर्स यापुढील काळात अधिक सक्रिय होत राहणार आहेत. त्यामुळे सावध राहणे एवढेच आपल्या हाती आहे. बँकेशी संबंधित होणारी आर्थिक फसवणूक ही नित्याची आहे. याबाबत बँका वारंवार सूचना देत असतात. कुणालाही आपली वैयक्तिक माहिती, बँकांचे, क्रेडिट आणि डेबिट कार्डाचे तपशील देता कामा नयेत. बँका कधीच आपल्याला फोनवरून असे तपशील विचारत नाही, हे लक्षात घ्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जगात फुकट काहीच मिळत नाही, हे कायम लक्षात ठेवले तरी अनेक धोके टळू शकतील. अनेक अ‍ॅप्स विनामूल्य दिली जातात. त्यामागे काय उद्देश असतो याचा विचार व्हायला हवा. संशयास्पद लिंकवरून काहीही डाऊनलोड करू नये. कोणी कॉल केला तर त्वरित बँकेशी संपर्क साधावा, जवळच्या बँकेचा पत्ता देण्यास सांगावे. ‘बॅकस्टेज’ नावाचा नवीन प्रकार आल्याची माहिती ‘ब्लू स्पाय आएएनसी’ या सायबर सिक्युरिटी कंपनीचे संचालक तुषार विश्वकर्मा यांनी सांगितले. आपण व्हॉटसअ‍ॅपच्या अनेक ग्रुपवर असतो. समवयस्क मित्र, महाविद्यालयीन किंवा कार्यालयीन मित्रांच्या एका तरी ग्रुपमध्ये असतोच. त्यात हलकेफुलके विनोद, अवांतर माहिती, अश्लील छायाचित्रे, चित्रफिती शेअर होत असतात. त्यात बॅकस्टेज नावाचा प्रकार आला आहे. एखादा फोटो फॉरवर्ड केला जातो. उत्सुकतेपोटी तो क्लिक केल्यावर ओपन होत नाही. नेटवर्क इश्यू असे वाटून दोन-तीन वेळा आपण तो क्लिक करतो; पण याच २-३ क्लिकमध्ये फोटोच्या मागे दडलेले मालवेअर काम करतात आणि तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव करतात, असे तुषार विश्वकर्मा यांनी सांगितले. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक आणि छायाचित्रे अजिबात डाऊनलोड करू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला.

सायबर भामटे, हॅकर्स यांना घाबरून ऑनलाइन व्यवहार करायचेच नाहीत का, स्मार्ट फोन वापरायचे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होईल. मात्र यांचा वापर केला नाही तर आपले नित्य व्यवहारच खोळंबतील, प्रगती थांबेल. त्यासाठी यांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली, खातरजमा करून घेतली, नियम-सूचनांचे पालन केले तरी अशा फसवणुकीपासून दूर राहता येते. सावधगिरी हाच यासाठी सर्वोत्तम उपाय आहे.

घातक अ‍ॅण्ड्रॉइड मालवेअर

स्मार्टफोनधारकांपैकी अनेकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असतो. सायबर भामटय़ांनी या स्मार्टफोनधारकांसाठी घातक मालवेअर विकसित केले आहे. हे मालवेअर फोनमधील डेटा हॅक करते. त्यामुळे डेटा तर चोरीला जातोच याशिवाय फोनमध्ये काय टाइप केले जात आहे हेदेखील सायबर भामटय़ांना समजते. वेगवेगळ्या विनामूल्य अ‍ॅप्समधून हे मालवेअर अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये प्रवेश करते आणि आपले कार्य करते. हे टाळण्यासाठी गूगल प्ले स्टोरमधूनच अ‍ॅप डाऊनलोड करावीत. कुठल्याही मोबाइल बँकिंग आणि इतर अ‍ॅपमध्ये ऑटोलॉगिन पर्याय ठेवू नये, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.

फेसबुकची दोन प्रोफाइल्स

फेसबुकवर तुमच्या मित्रांचे, परिचितांचे दुसरे अकाऊंट दिसले तर सावध राहा. हे दुसरे अकाऊंट हॅकर्सने तयार केलेले असण्याची शक्यता असते. त्याद्वारे फसवणूक होण्याचा धोका असतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांनी दिला आहे. समाजमाध्यमांवर फेसबुक हे सर्वात लोकप्रिय माध्यम असून सर्वच जण त्याचा वापर करतात. सध्या लोकांच्या नावाने बनावट फेसबुक खाती तयार करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यात मूळ व्यक्तीची छायाचित्रे आणि माहिती वापरली जाते. आपल्या मित्रयादीत असलेल्याच व्यक्तीचे हे दुसरे खाते असेल, असे वाटून आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवतो. मात्र ज्या व्यक्तीच्या नावाचे हे खाते असते, त्यालादेखील याची कल्पना नसते. त्या माध्यमातून हॅकर्स मात्र लोकांना सहज जाळ्यात ओढतात, असे सायबरतज्ज्ञ सांगतात. बनावट खात्यावरून त्याच्या मित्रांना संपर्क करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असल्याचे आयटीतज्ज्ञ गिरीश (राम) अय्यर यांनी सांगितले. प्रसिद्ध सायबरतज्ज्ञ डॉ. प्रशांत माळी यांनीदेखील अशा बनावट फेसबुक खात्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. फेसबुक वापरणाऱ्यांनी अधूनमधून आपले नाव सर्च करून आपल्या नावाने कुणी बोगस खाते तयार तर केलेले नाही ना, याची खातरजमा करावी आणि तसे आढळल्यास फेसबुककडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना वाढल्या असल्याची माहिती बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिली. बनावट खाती तयार केल्यानंतर मित्रयादीतील लोकांशी संपर्क साधला जातो, त्यांच्याकडे मदत मागितली जाते, काही प्रलोभने दाखवून जाळ्यात ओढले जाते, असे ते म्हणाले. मुलींचे लैंगिक शोषण करणे, ब्लॅकमेल करणे तसेच आर्थिक फसवणूक करण्यासाठी हॅकर्सने फेसबुकचा वापर सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अश्लील संकेतस्थळांचा धंदा

केंद्र सरकारने मागील वर्षी अनेक अश्लील संकेतस्थळावंर बंदी घातली होती. ही संकेतस्थळे परदेशातून चालवली जातात. त्यातून अश्लील साहित्य, चित्रफिती आणि छायाचित्रे प्रसारित केली जात. त्यांचा व्यवहार कोटय़वधींचा असतोच, शिवाय सर्वाधिक मालवेअर, व्हायरस याच मार्गाने प्रवेश करतो. अनेक जण या संकेतस्थळांवर अश्लील चित्रफिती विकून पैसा कमावतात, कारण त्यांना जगभरातून मागणी असते.

बनावट संकेतस्थळे

नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळे तयार केली जातात. लोक काहीही हवे असेल तर गूगलवर सर्च करतात. याचा गैरफायदा सायबर भामटे घेऊ लागले आहेत. नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केले जाते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ते बनावट संकेतस्थळ गूगल सर्चमध्ये सर्वात वर आणले जाते. लोकांना ते खरे वाटून ते त्या कंपनीशी आर्थिक व्यवहार करतात. मुंबईत सध्या नामांकित कंपन्यांच्या नावाने फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

ई-सिम कार्डचे फोन

पूर्वी मोबाइल घेतला की त्यात सिम कार्ड टाकावे लागायचे. आता मात्र ई-सिम कार्डचे फोन आले आहेत. म्हणजे मोबाइल हॅण्डसेटमध्येच सिम कार्ड असते. नव्याने सिम  कार्ड घ्यावे लागत नाही. आपल्याला ज्या सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरची सेवा हवी आहे ती घेतल्यानंतर हे सिम कार्ड (जे मोबाइलमध्ये इनबिल्ट असते) ते कार्यरत होते. सायबर भामटय़ांनी याचाच वापर आता सुरू केला आहे. ते #१२१ या नंबर आणि मोबाइल सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरकडे स्वत:चा ईमेल आयडी ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात आणि ग्राहकाच्या नावे ई-सिम कार्ड सुरू करून घेतात. क्यूआर कोडचा वापर करून ते कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून घेतात. नंतर त्या ग्राहकाला एक लघुसंदेश येतो. त्यावर एक लिंक असते. ती ओपन केल्यास ग्राहकाची सर्व माहिती त्यात मिळते. बँक खात्याचा नंबर, डेबिट कार्ड नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे मग त्यांच्या फोनमध्ये तुमच्या नावाचे ई-सिम कार्ड वापरून तुमच्या बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतात. त्यामुळे शक्यतो ई-सिम कार्ड असलेले फोन वापरू नयेत. समाजमाध्यमांवर आपले मोबाइल क्रमांक शेअर करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने केले आहे.

पासवर्ड डिटेक्टर

आपल्या फोनला पासवर्ड असला की तो सुरक्षित असतो, अशा भ्रमात राहू नये. सायबर भामटे पासवर्ड हॅक किंवा डिटेक्ट करतात. उदाहरणार्थ पासवर्ड डिटेक्टर सर्व नंबर, शब्द, चिन्हे टाकून आपोआप पासवर्ड डिटेक्ट करत असतो. जे काम मॅन्युअली शक्य नाही, ते काम पासवर्ड डिटेक्टर करत असतो. त्यामुळे पासवर्ड क्रॅक करणे फारसे कठीण राहिलेले नाही, असे सायबरतज्ज्ञ सांगतात.

थेट डेटा चोरी

केवायसी अपडेट करणे, अकाऊंट आणि डेबिट कार्डाची पडताळणी (व्हेरिफिकेशन), अशी निमित्ते सांगून कॉल केले जाणे नित्याचे आहे. या कॉल्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात असे. आता थेट मोबाइल आणि संगणकातील डेटा चोरला जात आहे. आधुनिक काळात आपली कुंडली अर्थात आपली खासगी आणि व्यावसायिक माहिती ही आपल्या मोबाइल आणि संगणकात असते. ती चोरून बक्कळ पैसा कमावता येतो. त्यामुळे हॅकर्स डेटा चोरी करण्याला प्राधान्य देतात. हे हॅकर्स एवढे सक्रिय असतात, की दिवस-रात्र त्यांचे काम सुरू असते. हॅकर्स कुणाचाही मोबाइल, संगणक हॅक करतात. मोठमोठय़ा कंपन्या प्रतिस्पर्धी कंपन्यांची माहिती चोरण्यासाठी हॅकर्सची नियुक्ती करतात. या डेटाचा मग व्यावसायिक कामासाठी उपयोग केला जातो, असे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले. त्यामुळे फोन करून आमिषे दाखवून जाळ्यात ओढण्यापेक्षा थेट डेटा हॅक करण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले. राजस्थानातील सायबर भामटे यात सक्रिय असल्याचे काही प्रकरणांवरून समोर आले आहे. एकदा डेटा हॅक केला की खजिनाच मिळत असतो. त्यामुळे सातत्याने मोबाइल, लॅपटॉपमध्ये अधिकृत अ‍ॅण्टिव्हायरस टाकणे, तो अपडेट करणे, अनोळखी लिंक ओपन न करणे, अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करणे, संवेदनशील माहिती संगणकात न ठेवणे इत्यादी काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:09 am

Web Title: cyber criminal hackers work from home coverstory dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 वार्ता.. विघ्नाची
2 ‘हरिओम’ नव्हे ‘हरी हरी’
3 गोंधळाची परीक्षा
Just Now!
X