महाअनुभव
युनिक फिचर्सच्या महाअनुभवचा दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी दर्जेदार मेजवानी असते. यंदाच्या अंकात व्हॅन गॉग याच्या १८८८ सालच्या चित्राचे मुखपृष्ठ केले आहे. तिथपासूनच हा अंक आपला वेगळेपणा अधोरेखित करतो. व्हॅनगॉग आणि शरच्चंद्र चटर्जी या दोघांनीही आपापल्या क्षेत्रातली चाकोरी सोडून आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला होता. व्हॅन गॉगवर वसंत आबाजी डहाके यांचा मर्मस्पर्शी लेख आणि बी. के. एस अय्यंगार गुरुजींवर समीर कुलकर्णी यांचे शब्दचित्र आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून राहणारे आहे. विश्वास पाटील यांनी सखा शरच्चंद्र या लेखात शरच्चंद्र चटर्जी यांचं साहित्य आणि त्यांचा आयुष्यपट उलगडून दाखवला आहे. महाराष्ट्रातले ख्यातनाम राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांचाही महत्त्वाचा लेख या अंकात आहे. गेल्या शंभरेक वर्षांत देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस पक्षाचे त्यांनी केलेले खोलवर विश्लेषण वाचायलाच हवे असे आहे. नाशिकच्या विनायकराव पाटील या राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावर असलेल्या जुन्या जाणत्या नेत्याचे अनुभव अंकात वाचायला मिळतील. यंदाच्या अंकाचं वेगळेपण म्हणजे कथाशेजार हा हिंदूी कथांचा उल्लेखनीय विभाग. ज्यात मंजूर एहतेशाम, ग्यानरंजन, स्वयंप्रकाश, असगर वसाहत यांच्या लघुकथांचा अनुवाद दिला आहे. आज हिंदूी कथा देशातील इतर भाषांहून अधिक विस्तारतेय, त्या पाश्र्वभूमीवर या कथा वाचकांसाठी मोठय़ा खजिन्याचे प्रवेशद्वार ठरावे. या कथा वाचून हिंदी साहित्याबद्दलचं वाचकांचं कुतूहल आणखी वाढू शकतं. अनिल अवचट यांचा लेख नेहमीप्रमाणे वाचनीय आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते आणि सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर यांचे स्वानुभवावर आधारित लेख चांगले आहेत. दीप्ती राऊत, मयुरेश प्रभुणे आणि मुक्ता चैतन्य या तीन पत्रकारांनी लिहिलेले शोधलेख अंकाची गुणवत्ता वाढवणारे आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांचा दुबईवरील लेख अंकाचा वाचनप्रवास सुखकर करतात. नव्या आणि जुन्या लेखकांच्या साहित्याची सुंदर गुंफण अंकात करण्यात आली आहे.
संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी.
पृष्ठे १८६, किंमत १२० रुपये.
आवाज
खिडकी चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘आवाज’ या दिवाळी अंकाला तशी जुनी परंपरा आहे. हा अंक लोकप्रिय आहे तो यातल्या हास्यचित्र मालिका, कथाचित्रे, चुटके, कथा यासाठी. यंदाही अनेक लोकप्रिय लेखकांनी यामध्ये लेखन केले आहे. अशोक पाटोळे, मंगला गोडबोले, मुकुंद टाकसाळे, सुधीर सुखटणकर, पुंडलीक वझे, ज्ञानेश बेलेकर या लेखकांचं लेखन आहे. कथाचित्रे, साहित्य अशा विभागांमधून त्यांनी लेखन केलं आहे. या अंकाचं आणखी वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये राजकारणावर विनोदी अंगाने भाष्य केले जाते. यंदाही डॉ. यशवंत हरिहर पाटील यांचं ‘टिंगलगाणी’मधून सादर केलेलं लेखन वाचण्यासारखं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची अमेरिकेतली भेट, युती तुटण्यासारखी महत्त्वाची घटना, जागावाटपाच्या चर्चा, प्रचारदरम्यान झालेली टीका-टिप्पणी असं सारं काही या ‘टिंगलगाणी’मधून वाचायला मिळेल, तर ‘ती मी नव्हेच’, ‘फुल्टू भाषातमाशा’, ‘सरपंचाची गर्लफ्रेंड’, ‘हिरो नं.१’, ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘गुंडय़ाबाऊ’ अशा अनेक कथा आणि लेख अंकात आहेत. विशेष लक्ष वेधून घेतात ती कथाचित्रं. तसंच काही चुटकुलेही मजेशीर आहेत. काही राजकीय भाष्य, टीका, घडामोडी यावर कथाचित्रांच्या माध्यमातून विनोदी भाष्य केलं आहे. देशाच्या सद्य परिस्थितीवरही उपहासात्मक टिप्पणी केली आहे. ‘आवाज’ या अंकाचं हेच वैशिष्टय़ आहे. विनोदी कथा, लेखांसह काही गंभीर विषयांवर उपहासात्मक टीका करणं हे या अंकामध्ये आवर्जून असतं. कथाचित्रांच्या माध्यमातून याचं लेखन केलं असल्यामुळे वाचकांच्या ते नेहमी पसंतीस उतरतं. कथा आणि लेखांच्या अधेमधे काही चारोळ्याही लक्ष वेधून घेतात. यात आणखी एक नमूद करता येईल ते म्हणजे प्रभाकर झळके यांचं ‘वाहनांना जेव्हा वाचा फुटते’ हे कथाचित्र. यांमध्ये देवांच्या वाहनांनी जर बोलायला सुरुवात केली तर ते काय आणि कसे बोलतील या विषयीचे हे हास्यचित्र मजेशीर आहे. देवांच्या वाहनांना वाचा फुटणं ही कल्पनाच वेगळी आहे. त्यामुळे असा हास्यपूर्ण, राजकीय घडामोडींवर उपहासात्मक भाष्य करणारा, जुनी परंपरा असलेला ‘आवाज’ हा दिवाळी अंक उत्तम झाला आहे.
संपादक : भारतभूषण पाटकर
पृष्ठे : २५२; किंमत : १६० रुपये
सामना
सामनाचा यंदाचा दिवाळी अंक अनेकविध विषयांना स्पर्श करणारा आहे. विनोदाचा फराळ, चराचरातला फराळ, फराळ निघाले सहलीला, भूक असो पण फराळ आवरा अशा फराळविषयक अनोख्या लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंगेश तेंडुलकर, डॉ. यू. म. पठाण, शिरीष कणेकर अशा मान्यवर लेखकांचे लेख वाचनीय आहेत. तर डॉ. प्रकाश खांडगे यांच्या नोहे एकल्याचा खेळ या आत्मचरित्रातील निवडक भाग मुंबईतील गिरणगावाचं एकेकाळचं सांस्कृतिक वैभव उलगडून दाखविणारा आहे.
संपादक : उद्धव ठाकरे, पृष्ठे १३६, किंमत ७० रुपये.
मुंबई तरुण भारत
सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी काढलेल्या चित्राने अंकाची सुरुवात होते. गेल्या महिन्यात झालेल्या त्यांच्या चित्रप्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाविषयी त्यांनी या अंकात लेख लिहिला आहे. ठिकठिकाणी असलेल्या वीरगळांची माहिती देणारा चंद्रशेखर पिलाणे यांचा लेख अनेक किल्ले आणि गड यांची सैर करवून आणतो. उद्योगनगरी असं धारावीचं चित्र योगिता साळवी ‘धारावीची उद्यमशील संस्कृती’ या लेखातून रेखाटतात. बारीपाडा हे महाराष्ट्रातील आदिवासी पाडय़ांचे प्रतिनिधित्व करणारे एक गाव. इथल्या जीवनसंघर्षांवर चितारलेला रिपोर्ताज ‘बारीपाडा.. पाडय़ापासून गावापर्यंतचा प्रवास’ या लेखातून प्रथमेश म्हसकर यांनी मांडला आहे. स्टुडिओंची मुहूर्तमेढ, वाटचाल, पडझड याचा आढावा घेणारा ‘मुंबईतील स्टुडिओंचे गतवैभव’ हा लेख जरूर वाचायला हवा. साहित्यसंपन्न कोकणी लोकगीतांविषयीचा ‘भरजरी वाङ्मयाची परंपरा : कोकणी लोकगीते’ हा लेख अंकात आहे. यंदाच्या अंकात न्या. नरेंद्र चपळगावर यांची ‘माझा लेखनप्रवास’ ही त्यांची मुलाखत वाचण्यासारखी आहे.
संपादक : दिलीप करंबेळकर, किरण शेलार
पृष्ठे : १६१; किंमत : १०० रुपये.
पत्रिका
मराठी विज्ञान परिषदेचा पत्रिका या मासिकाचा पाचशेवा अंक हा दिवाळी अंक आहे. अनेक मान्यवर तज्ज्ञांचे अभ्यासू लेख, विज्ञान कथा, बच्चे कंपनीसाठी विज्ञान कथा असा वैविध्यपूर्ण असा भरगच्च दिवाळी अंक पत्रिकाने दिला आहे. मंगळयानाचा हेमंत लागवणकर यांनी वेध घेतला आहे. भित्तीचित्रकथाचा अनोखा शोध घेतला आहे तो सुहास बहुळकर आणि माणिक वालावलकर यांनी. नकाशा शास्त्राचा रंजक इतिहास अविनाश पंडित यांनी मांडला आहे, तर विमानोड्डाण व्यवस्थापन त्याच क्षेत्रातील अजय जोशी यांनी उलगडून दाखवले आहे. क्रीडा क्षेत्रात विज्ञानाने केलेले आमूलाग्र बदल टिपले आहेत ते निरंजन घाटे यांनी. बाळ फोंडके यांचा खोटे कधी बोलू नये हा लेख वाचनीय आहे. अॅमेझॉनच्या जंगलात सुरू असणारे अनोखे प्रयोग मांडणारा दिलीप हेर्लेकर यांचा ‘सलग ते अलग’ हा लेख एका वेगळ्या वैज्ञानिक प्रयोगाची ओळख करून देणारा आहे.
अंकात विज्ञानकथांचा खजिनाच आहे म्हटले तरी हरकत नाही. शिरीष गोपाळ देशपांडे, विश्वास जोशी, डी. व्ही कुलकर्णी, सुधा रिसबुड, राजीव तांबे, आशीष महाबळ यांच्या विज्ञान कथा या अंकात आहेत.
पत्रिका, संपादक मंडळ, पृष्ठे : २०८; किंमत : १०० रुपये.
संस्कारदीप
राजकारण, समाजकारणात रस असलेल्या वाचकांसाठी ‘संस्कारदीप’ हा दिवाळी अंक म्हणजे मेजवानी ठरेल. या अंकात बहुतकरून महाराष्ट्राची सद्यस्थिती, राजकारणातल्या घडामोडी यावर भर दिला आहे. या अंकात ‘अस्वस्थ महाराष्ट्र’, ‘कथा’, ‘विशेष लेख’, ‘लेख’, ‘कविता’ ‘वात्रटायन’ असे विभाग केले आहेत. ‘अस्वस्थ महाराष्ट्र’मध्ये निवडणुकीआधी घडलेल्या काही राजकीय घडामोडींचं विश्लेषण, छंोटय़ा राज्यांना विचारमंथन करण्याची कशी आवश्यकता आहे, महाराष्ट्राला सध्या असलेल्या नेतृत्वामध्ये कसा दुष्काळ आहे हे सांगणारे लेख आहेत; तर विशेष लेखांममध्ये ‘भाजपाचा सायलेंट ऑपरेटर’, ‘कामगार चळवळ’ असे लेख आहेत. केवळ राजकारण, समाजकारण नसून त्यात कथांचांही समावेश आहे. ‘थोरली आई’, ‘पुरुषाय:’, ‘स्वर्ग खुणावतोय’, ‘पोह्य़ाचे गोड पॅटिस’, ‘एका स्वप्नाच्या दोन गोष्टी’ अशा कथा आहेत, तर काही कवितांचीही मेजवानी आहे. ‘शिवसेना-नेतृत्वाच्या चार पिढय़ा’ हा लेखही वाचण्यासारखा आहे. राजकारणासोबतच अंकात नातेसंबंधांवर आधारितही एक लेख आहे. ‘वाढत्या घटस्फोटांमुळे कुटुंबसंस्था विस्कळीत’ असा कुटुंबसंस्थेवर भाष्य करणारा लेख आहे.
संपादक : प्रमोद तेंडुलकर
पृष्ठे : ११२; किंमत : ५० रुपये.
श्री दीपलक्ष्मी
समाज-दर्शन, ललित लेख, कथा, दीर्घकथा, चित्रकथा, कविता अशा वेगवेगळ्या विषयांची आवड असेल तर ‘श्री दीपलक्ष्मी’ हा दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच. अनेक वर्षांची परंपरा असलेला हा दिवाळी अंक सजावट आणि मांडणीमुळे आकर्षक आणि देखणा असतो. विविध विषयांच्या लेखनासह व्यंगचित्रं, रेखाचित्रं, शब्दचित्रं, आठवणी असेही काही भाग आहेत. दिवाळी अंकांमध्ये एरव्ही फारसा कुठेही न दिसणारा दीर्घकथा हा विभाग या अंकाचं वैशिष्टय़. यामध्ये ‘द्रोणपर्व’, ‘वृंदावन’, ‘इस मोड पे जाते है’, ‘पडद्यामागे’ अशा कथांचा समावेश आहे, तर कविता या विभागात प्रवीण दवणे, आनंद देशमुख, गौरी कुलकर्णी, नंदिनी देशमुख अशा अनेकांच्या कविता आहेत. शब्दचित्रं या विभागात माया अँजेलो, शिरीष देशपांडे, सरदार, गुरुदत्त, शरद पोंक्षे यांच्याविषयीचे लेख आहेत. या अंकात ‘महानगरचे दिवस’ हा सुनील कर्णिकांचा लेखही वाचण्यासारखा आहे. व्यंगचित्रं हेही या अंकाचं आकर्षण म्हणता येईल. यामध्ये असलेल्या कथांमध्येही वैविध्य आहे.
संपादक: हेमंत रायकर
पृष्ठे: ३०४ ; किंमत: २०० रुपये.