03 August 2020

News Flash

तरुणही उभे ठाकलेत निवडणूक तयारीच्या रिंगणात…

‘आजची तरुणाई काही करत नाही, त्यांना समाजकारण, राजकारण यांत काही रस वाटत नाही. फक्त पार्टीमध्ये आजची तरुणाई मश्गूल आहे. समाजव्यवस्थेचे त्यांना भान नाही.’

| April 4, 2014 01:01 am

‘आजची तरुणाई काही करत नाही, त्यांना समाजकारण, राजकारण यांत काही रस वाटत नाही. फक्त पार्टीमध्ये आजची तरुणाई मश्गूल आहे. समाजव्यवस्थेचे त्यांना भान नाही.’ अशी अनेक तथाकथित मते आजची तरुण पिढी मोडून काढते आहे. निवडणुका जवळ आल्यावर कॉलेजच्या कट्टय़ापासून ते फेसबुक आणि ट्विटरपर्यंत सगळीकडे तरुणाई निवडणुकीबाबत आपली मते ठामपणे मांडत आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल हे प्रामुख्याने या सगळ्या चर्चाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की, फक्त चर्चेवर ही तरुण मंडळी थांबली नाहीयेत, तर निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांबरोबर काम करत आहेत. स्वत: राजकारणात उडी घेतल्याशिवाय आपल्याला हवे असलेले बदल घडू शकणार नाहीत, हे आजच्या तरुणाईनं ओळखलं आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष कृतीचा मार्ग अवलंबत आधी राजकारणाविषयी उदासीन असलेले तरुणसुद्धा आपल्या मागण्या सरकारकडे विविध माध्यमातून मांडत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तरुण मंडळी कॉलेज, अभ्यास, नोकरी हे सगळं सांभाळून राजकीय पक्षांबरोबर काम करत आहेत.
अण्णा हजारेंच्या आंदोलनात तरुणाईने दिलेला भरघोस प्रतिसाद यापूर्वी जनतेने अनुभवला आहे. एकीकडे तरुणाईची ही काम करण्याची इच्छा आणि शक्ती, आणि दुसरीकडे देशात मोठय़ा संख्येने असलेला तरुणवर्ग या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून घ्यायचे राजकीय पक्षांनी ठरवले आहे. निवडणुकांच्या दृष्टीने याचा कसा फायदा होईल यासाठी विविध मार्ग आखले गेले. त्यामुळे तरुणांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांचे अधिकार मिळविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. त्याबरोबरच समाजाभिमुख, समाजोपयोगी काम केल्याचं समाधान मिळत आहे. या अनुभवाचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकेल. शिवाय या तरुण रक्तामधूनच देशासाठी उद्याचा एक जबाबदार नेता मिळेल. विविध पक्षांबरोबर काम करणाऱ्या अशाच काही तरुण कार्यकर्त्यांशी संवाद झाला.
किरण साळुंखे (वय २५ वर्षे) ‘डिलोइट’ कंपनीत तांत्रिक सल्लागार म्हणून नोकरी करतो. त्याबरोबरच भाजपासाठी पर्यायाने नरेंद्र मोदींसाठी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘मिशन २७२ प्लस’ साठी काम करत आहे. किरणसारखे आणखीही तरुण आहेत, ज्यांचं उद्दिष्ट आहे, लोकसभेतील ५४६ जागांमधील २७२ जागा भाजपाला मिळवून देणं आणि भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित करणं, जे २७२ प्लसचे ध्येय आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर करणं जमलेलं नाही. किरण साळुंखे त्याच्या सहभागाबद्दल म्हणाला, ‘‘ही माझी कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर निवडणुकीसाठी काम करण्याची पहिलीच वेळ आहे. मी भाजपाला पाठिंबा देतो कारण अनेक वर्षे मी भाजपाच्या राज्यांचा विकास बघतोय. नरेंद्र मोदींनी गुजरातचा जो कायापालट करून टाकलाय त्याने मी भारावून गेलो. मला वाटतं, नरेंद्र मोदी देशाला चांगली दिशा, प्रगती देऊ शकतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपाने जाहीर केलेल्या मोबाइल क्रमांकावर मी मिस कॉल दिला होता. त्यानंतर भाजपाच्या कार्यालयातून फोन आला आणि काम करायला उत्सुक असलेल्या लोकांची सभा झाली. त्यात कशा प्रकारे काम करायचं आहे यावर मार्गदर्शन-चर्चा झाली. ‘मिशन २७२ प्लस’ च्या टीममध्ये तरुणांची संख्या खूप आहे. आम्ही विविध आगळेवेगळे उपक्रम सतत करतो आणि तरुणाई आमच्या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद देते. मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांची ‘लोकसभा मतदारसंघाचा दुवा’ या पदासाठी नेमणूक करण्यात आली आहे व प्रत्येकाच्या हाताखाली काम करणाऱ्या साधारण दोन हजार स्वयंसेवकांची टीम बनवण्यात आली आहे. हे स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या भागामध्ये जनप्रचाराचे काम करीत आहेत. मी नोकरी सांभाळून काम करत असल्यामुळे शनिवार-रविवारचा पूर्ण वेळ या कामासाठी देतो. विविध ठिकाणी जाऊन आम्ही सभा घेतो. भाजपाने आतापर्यंत केलेलं काम आणि तुलनात्मक तपशील याबरोबरने समाजाच्या प्रश्नांचे निरसन कसं करता येऊ शकतं या माहितीचं सादरीकरण करतो. हे सादरीकरण (पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन) भारतभर वापरलं जातंय. त्याबरोबरच लोकांच्या घरी जाऊनसुद्धा आम्ही ही माहिती देतो. ‘मेरे सपनों का भारत’ या मोहिमेअंतर्गत आम्ही ठिकठिकाणी जाऊन तरुणाईची मतं गोळा केली आहेत आणि ती मोदींपर्यंत पोचवली आहेत. नरेंद्र मोदींनी तरुणाईची राजकारण आणि समाजकारणातील महत्त्वाची भूमिका ओळखून विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. ‘समाजशास्त्र हा विषय महत्त्वाचा आहे, तरुणाईसाठी शिक्षण आणि नोकरी हे सर्वात महत्त्वाचे आहे, त्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे’ अशा विधानांतून आणि कृतीतून ते देशातील तरुण मंडळींना आवाहन करतात. राजकारण बदलत आहे आणि तरुणाईचा वाढता सहभाग हा या बदलाचाच भाग आहे. त्यामुळे नक्कीच तरुणाईचा सक्रिय सहभाग हा राजकारणाला पोषक आणि आवश्यक आहे.
गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर केवळ ०.९% आहे. मोदींनी अवलंबलेली मूल्यमापन पद्धती राजकारण आणि समाजाच्या भविष्यासाठी अनुरूप आहे व मला ही पद्धत जास्त भावते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामासाठी जबाबदार ठरविल्यानेच समाजाचा विकास आणि अंतिम ध्येय साधता येऊ शकतं.’ असं किरण सांगतो.
भाजपाबरोबरच काम करणाऱ्या आणि घाटकोपर-मुलुंड या मतदारसंघाचा ‘लोकसभा मतदारसंघ दुवा’ ही जबाबदारी असलेल्या संजय गुमत यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, ‘‘माझं किराणा मालाचं दुकान आणि इंटरनेट निगडित व्यवसाय आहे व ते सांभाळून मी नरेंद्र मोदींसाठी काम करत आहे. मी गुजराती आहे, त्यामुळे माझे गुजरातला बऱ्याचदा जाणं-येणं होत असतं. तिथे मी नरेंद्रजींनी गुजरातची केलेली प्रगती बघितली आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी मी स्वयंसेवी वृत्तीने काम करत आहे. आम्ही विविध रेल्वेस्थानकांवर जाऊन सदस्यत्वाचे फॉर्म भरून घेतले. मोदींच्या कामाविषयी लोकांना माहिती दिली. जानेवारीपासून रोज दोन तास मी या कामाला देत आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं, त्यांच्या समाजाच्या नेत्याकडून असलेल्या अपेक्षा विचारणं, पैसा देतात म्हणून कुठल्याही पक्षाला मत देऊ नका तर तुमच्या मताचा भविष्यात काय परिणाम होणार आहे याचा विचार करा आणि मगच योग्य उमेदवारास तुमचं मत द्या, या मुद्दय़ांवर त्यांना सतर्क करणं अशी विविध कामं आम्ही करत असतो. मला वाटतं की देशाला अशाच नेत्याची गरज आहे जे फक्त बोलणार नाहीत, आश्वासनं देणार नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून स्वत:ला सिद्ध करतील आणि समाजाच्या उन्नतीचा विचार करतील. मोदी नेहमीच तरुणांबरोबर वेळ घालवतात व त्यांच्या कल्पनांचा, प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करतात व त्याची अंमलबजावणी करतात. पण मला असं वाटतं की, तरुणाईचा राजकारणातील सक्रिय सहभाग वाढत जरी असला तरी मुंबईत मात्र तरुणांना इच्छा असूनदेखील त्यांच्याकडे या कामाला द्यायला पुरेसा वेळ नाही. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात ते एवढा वेळ काढू शकत नाहीत. मात्र गुजरातमध्ये मोठय़ा संख्येने तरुणाई राजकारणात सहभाग घेत आहे. माझी सगळ्यांना एक विनंती आहे की एकेक मत लाखमोलाचं असतं. त्यामुळे तुम्हाला हवा तो चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी नि देशाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी कृपया मतदान करा.’
नरेंद्र मोदींप्रमाणे तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी! ‘आप’बरोबर सध्या काम करणाऱ्या शरयू जाखोटिया (वय २४ वर्षे) हिच्याशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी एमबीए करायला अमेरिकेत गेले होते. तेव्हा अण्णा हजारेंनी भारतात जनलोकपालसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर आंदोलन केलं. त्यांना मोठय़ा प्रमाणात तरुणाईकडून मिळालेला पाठिंबा, अण्णा हजारेंचं उपोषण या सगळ्या बातम्या मी अमेरिकेत टेलिव्हिजनवर बघत होते आणि मी भारावून गेले. माझा या चळवळीला असलेला पाठिंबा दाखविण्यासाठी मी सोशल नेटवìकग साइटवर त्यांचे पेज लाइक केले. त्यांच्या वेबसाइटवरसुद्धा मी देशातील घडामोडींची माहिती मिळवत होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये मी शिक्षण संपवून भारतात परत आले व मला वाटायला लागलं की समाजोपयोगी काम केलं पाहिजे. मी कुठल्याही राजकीय पक्षासाठी आधी कधी काम केलं नव्हतं. आणि राजकारणात मला आधीपासून रससुद्धा नव्हता. पण मी विचार केला की, आपण किती दिवस सरकारच्या नावाने फक्त तक्रार करत राहणार, आपण सामाजिक बदलासाठी स्वत: काही प्रयत्न करतोय का? म्हणून मी ‘आप’च्या अंधेरी ऑफिसमध्ये गेले. हळूहळू तिथे काम कसं चालतं याचा अंदाज घेऊ लागले. सगळेजण तिथे स्वत:ची नोकरी, शिक्षण सांभाळून स्वयंसेवी वृत्तीने काम करतात. मी पण डिसेंबर २०१३ पासून या कामाचा भाग झाले आणि ‘आप के युवा’ या मोहिमेत सामील झाले. विविध महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सदस्यत्वाच्या फॉर्मचं वाटप करायचं इ. कामं आम्ही करू लागलो. विद्यार्थ्यांबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवणं, त्यांच्या समस्या समजून घेणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं. मी सध्या विलेपार्ले येथील एअरपोर्ट कॉलनीजवळील एका चाळीत जाऊन रहिवाशांशी संवाद साधला तेव्हा असं कळलं की त्यांच्या इथे एक गटार आहे जे गेले पाच वर्षे कुणी साफ केलं नाहीये. त्यामुळे दरुगधी, आरोग्याच्या तक्रारी अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आम्ही तेथील नगरसेविकेला पत्र लिहून हे कळवणार होतो व पद्धतशीर पुढचं पाऊल उचलणार होतो. परंतु तिथे आमची टीम तिथे गेल्याचे कळल्यावर दुसऱ्या दिवशीच तेथील नगरसेविकेने स्वत: जातीने लक्ष घालून ते गटार साफ करून घेतले. आम्ही या निमित्ताने अनेक झोपडपट्टय़ांमध्ये फिरलो. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सगळ्यांमुळे माझ्यामध्ये एक माणूस म्हणूनसुद्धा खूप बदल घडला आहे. ‘आप के युवा’ने एक बझ ग्रुप स्थापन केला व त्याच्यामार्फत जनप्रचारासाठी फ्लॅशमॉबसारखा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. जागोजागी जाऊन डान्स करून गर्दी जमा करणे आणि मग आलेल्या लोकांपुढे ‘आप’चे विचार मांडणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणे असे या उपक्रमाचे स्वरूप होते. तसेच ‘नुक्कड नाटक’ग्रुप तर्फे विविध सामाजिक विषयांवर पथनाटय़ सादर केली, हेसुद्धा जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. ‘आप’ हा एकतर नवा राजकीय पक्ष आहे, येथील काम करणारे स्वयंसेवक उच्चशिक्षित आहेत आणि इथे मला एक चांगलं कामाचं वातावरण अनुभवायला मिळतं.’’

भाजपचा सोशल मीडिया तरुणाईच्या हाती…
तरुणांना आकर्षित करण्यासाठी आज सारेच पक्ष सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. अर्थात तरुणांना आकर्षित करायचे असेल तर सोशल मीडियावरील भाषा, पोस्टचा विषयदेखील तरुणांना रुचणारा हवा. अन्यथा केवळ पोस्ट टाकून त्याकडे कोणी पाहणार नाही आणि अपेक्षित परिणाम साधणारा नाही. त्यामुळेच की काय, पण भाजपचा सोशल मीडिया सांभाळणारी सारी टीम या तरुणाईने व्यापलेली आहे. विनीत गोयंका या तरुणाच्या नेतृत्वाखाली देशभरात तब्बल ७२ जणांची एक भली मोठी टीम गेल्या एक वर्षांपासून यासाठी चोवीस तास काम करीत आहे. या सर्वामध्ये मुख्यत: तरुणांचा भरणा जास्त आहे. याच टीमपैकी काही जण गेल्या एक वर्षांपासून दिल्लीमध्येच वास्तव्यास आहेत. कोणी आपली नोकरी सोडून आले आहे, तर कोणी नोकरी करीत करीत या कामात आहे. 
महत्त्वाचे म्हणजे हे सारे आपापल्या क्षेत्रांत तज्ज्ञ आहेत. रॉबिन हे ४२ वर्षीय तंत्रज्ञ आयटी आर्किटेक्ट असून त्यांनी २००९ च्या निवडणुकांमध्ये काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या सपोर्टबरोबरच कंटेंट जनरेशनदेखील करतात. तर कल्पना रवी ही इंग्रजीत एमए केलेली स्क्रिप्ट रायटरचे काम पाहणारी तरुणी आपली नोकरी सांभाळून हे काम पाहते आहे. त्या मुख्यत: उच्च वर्गाच्या अनुषंगाने इंग्रजी मजकूर लिहितात. तसेच भाषेबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन चिकित्सक असल्यामुळे सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या सर्व मजकुराचे बारकाईने वाचन त्या करतात. त्यात गरजेनुसार बदलदेखील करतात. जयवंत थोरात हा डेलमध्ये नोकरी करणारा ३६ वर्षीय अभियंता. निवडणुकांच्या कामासाठी त्यांनी नोकरी सोडली आहे. देशासाठी काही काळ देता यावा यासाठी त्याने नोकरी सोडून मे २०१३ पासून तो या टीममध्ये कार्यरत आहे. डेलमध्ये ट्रेनिंग विभागात रिजनल हेड असल्यामुळे त्याला अनुभवदेखील बराच आहे. या टीममध्ये तो मराठी आणि इंग्रजीमधून कंटेंट लिहिण्याचे काम पाहतो. परेश चौधरी हा जळगावचा २६ वर्षीय तरुण मराठीतून पोस्ट करण्याचे काम करतो. पक्षाकडून आलेल्या मजकुरावर आधारित दिवसभरात २०-२५ पोस्ट तो मराठीतून करीत असतो. हिंदीमध्ये मजकूर लिहिण्याचे काम करणारे रिझवान शेख हा मूळचा मुंबईचा तरुण गेले वर्षभर दिल्लीत वास्तव्यास आहे. 
मनोज जोशी, शिल्पी तिवारी असे अनेक तरुण दिल्लीतून मध्यवर्ती केंद्रातून सर्व डिजिटल मीडियावरील कंटेंट सांभाळण्याचे काम करतात. एका कॉमन ग्रुप ई-मेल आयडीच्या आधारे या सर्वाना ब्रिफ दिले जाते. त्यांनी कंटेंट लिहिल्यावर तो तपासून त्याच्या कायदेशीर पक्षीय बाजू तपासून तो ब्लास्टिंग केला जातो. ब्लास्टिंग म्हणजे एकाच वेळी मोठय़ा संख्येत ई-मेलवर मजकूर पाठवणे. यासाठी आजअखेर तब्बल १७००० तरुणांचा सहभाग आहे. या माध्यमातून एकदा पोस्ट केलेला मजकूर पुढे हजारो जणांपर्यंत नेणारे कार्यकर्ते असंख्य आहेत. राज्याच्या पातळीवरच बोलायचे झाले तर आज भाजपकडे पाच हजार कार्यकर्त्यांची टीम आहे. पक्षाकडून येणारा मजकूर सर्वदूर पसरविणे ही त्यांची जबाबदारी आहे.

विविध राजकीय पक्षांच्या युवासेनेचे उपक्रम
१) भाजप (नरेंद्र मोदींसाठी 
‘मिशन २७२+’ साठीचे उपक्रम)
’ मंथन सदर : राष्ट्रीय लोकशाही आघाडीबद्दल सादरीकरण, १० वर्षांची अराजकता आणि नरेंद्र मोदींची भारताबद्दलची दूरदृष्टी.
’ मेरे सपनों का भारत : या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद आणि 
या विषयावरील त्यांच्या कल्पनांबद्दल चर्चासत्र.
’ मतदानाची आवश्यकता समजवण्यासाठी ‘वोट इंडिया वोट’ कॅम्पेन.
’ ‘नमो’ चहा वाटप : विविध सणांदरम्यान देवळाजवळील भक्तगणांसाठी.
’ चाय पे चर्चा : संपूर्ण भारतभरातून नरेंद्र मोदींबरोबर प्रत्यक्षदर्शी व्हिडीओ कॉन्फरन्स.
’ इस लिए मोदी : यूटय़ुबवर ‘इस लिए मोदी’ स्पर्धा ज्यात तरुण मोदी आपल्याला पंतप्रधान म्हणून का हवे आहेत, याविषयी भाष्य करणारे व्हिडीओ टाकले जातात.

२) आम आदमी पार्टी (आप) 
’ बझ ग्रुप : विविध ठिकाणी जाऊन फ्लॅशमॉब स्वरूपात डान्स करून गर्दी गोळा करून जनजागृती करणे.
’ नुक्कड नाटक : विविध सामाजिक विषयांवर पथनाटय़े करणारी टीम.
’ महाविद्यालयीन उपक्रम : ज्यात तरुणांना विविध महत्त्वाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केले जाते. उदा. माहितीचा अधिकार, विविध महाविद्यालयीन समस्या.
’ वैद्यकीय शिबिरे
’ दारोदारी जाऊन स्वयंसेवकांसाठी प्रचार रॅली

३) काँग्रेस
’ भारत के मजबूत हाथ : या प्रचार माध्यमातून विविध व्यवसायाच्या लोकांनी कसा भारताचा कायापालट झाला आहे हे एका व्हिडीओद्वारे दाखवण्यात आले.
’ अंतर्गत निवडणुका : युथ काँग्रेसच्या मोहिमेतून त्या त्या विभागाचा उमेदवार निवडण्यासाठी अंतर्गत निवडणुका.
’ तुमच्या उमेदवाराला भेटा : या मोहिमेतून आपल्या विभागाच्या उमेदवाराला जाणून घेण्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग मिळवला.
’ तरुण भारताचे सामथ्र्य जाणा- राजकारणातील बदलासाठी जास्तीत जास्त तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध संधी देण्यात आल्या.
’ व्यावसायिक प्रशिक्षण : या उपक्रमांतर्गत प्रत्येक ‘युथ काँग्रेस’चा सदस्य अधिक प्रभावी व जाणकार कसा होईल, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याविषयी विचारले शरयू म्हणाली, ‘‘सर्वात आधी जनलोकपाल विधेयक मंजूर करणे हे केजरीवालजींचे मुख्य ध्येय आहे. जे ध्येय सध्याच्या राजकीय स्थितीत शक्य होत नव्हते. तेव्हा राजीनामा दिल्यावर परत निवडणुकांमध्ये निवडून येऊन ‘आप’चे सरकार स्थापन झाले तर हे प्रश्न सहज मार्गी लागतील. त्यांच्या ४९ दिवसांच्या सत्तेत जे चांगले काम केले ते न दाखवता इतर गोष्टींना प्रसारमाध्यमांनी जास्त महत्त्व दिले असे मला वाटते.’’ शरयूच्या म्हणण्याप्रमाणे ‘आप’मध्ये तरुणांच्या विषयांवर जास्त लक्ष दिले जाते, त्यामुळे तरुण मंडळींची संख्या सुद्धा इथे अधिक आहे. 

केजरीवाल आणि नरेंद्र मोदींबरोबर राहुल गांधींनीसुद्धा तरुणांची मने काँग्रेसच्या जिंकून घेतली आहेत. ‘राजकारणात तरुण मंडळी हवी आहेत, आजची तरुणाईच उद्याचे उज्ज्वल भविष्य रंगवू शकेल’ असे वारंवार आपल्या भाषणांतून मांडून ‘तरुणाई’ हा अजेंडय़ावरील विषय असल्याचे राहुल गांधींनी दाखवून दिले. ‘युथ काँग्रेस’च्या माध्यमातून तर तरुणाईला एक राजकीय न्यायपीठच त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. सध्या काँग्रेसबरोबर काम करत असलेल्या अमेय मांगले (वय २३ वर्षे) याच्याशी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला की, ‘‘मला राजकीय घडामोडींबाबत आधीपासूनच उत्सुकता वाटत आली आहे व मला त्याबद्दल माहिती मिळवायला, वाचायलासुद्धा आवडते. मी ‘डालबर्ग’ नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीत सल्लागार म्हणून काम करतो. मागच्या वर्षी मी दोन आठवडे काँग्रेसबरोबर काम केले आणि मला जाणवले की राजकीय क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे काम करायला, त्याबद्दल सखोल ज्ञान मिळवायला दोन आठवडे हा फार कमी कालावधी आहे. म्हणून मी या वर्षी सहा महिन्यांची सबॅटिकल घेऊन काँग्रेसबरोबर दिल्लीमध्ये काम करत आहे. माझे काम दीर्घ पल्ल्याच्या दृष्टिकोनातून आहे- पंचायती राजपद्धतीचे प्रभावी विकेंद्रीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे. तसेच निवडणुकींसाठी मध्य प्रदेशमधील एका लोकसभा खासदारासाठी मी आवेदनपत्रावर काम करत आहे. काँग्रेसबरोबर काम करण्याचे कारण म्हणजे हा एक जुना आणि विशाल राजकीय पक्ष आहे. या पक्षात बरेच बदलसुद्धा घडत आहेत. ‘युथ काँग्रेस’मधील अंतर्गत निवडणुका हे याचे एक उदाहरण आहे. काँग्रेसने २०१४ च्या निवडणुकांसाठी युथ काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना तिकीट दिले आहे. आज राजकारणात तरुणांची संख्या आणि शक्ती, प्रभाव वाढत आहे. प्रसारमाध्यम, सोशल नेटवर्किंग साइट यामुळे तरुणांमधील जागरूकता तर वाढली आहे, त्याचबरोबर राजकारणातील त्यांचा सक्रिय सहभागसुद्धा वाढला आहे. ही खरेच कौतुकाची बाब आहे.’’
तरुण मंडळींची राजकीय क्षेत्रातील एन्ट्री राजकीय पक्षांनासुद्धा लाभदायक ठरणार आहे. कारण पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या ९० हजारच्या वर गेली आहे. तेव्हा अखेर निवडणुकीचे सूत्रधार तरुण मतदार आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2014 1:01 am

Web Title: elections and youth 2
Next Stories
1 देण्यातला आनंद!
2 दानाचे स्वरुप काळानुसार बदलायला हवे
Just Now!
X