समीक्षा या शब्दाचा मूळ अर्थ सम्यक इक्षणम्.. सम्यक म्हणजे, तारतम्याने, सगळ्या अंगाने; तौलनिक पद्धतीने. हल्ली खरंच ही सम्यक दृष्टी समीक्षकांकडे आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलेच्या प्रांगणात प्रत्येक कलाकाराला एका प्रजातीबाबतीत कमालीचं सांभाळून राहावं लागतं. आणि ती प्रजाती म्हणजे समीक्षक. कलावंत आणि समीक्षक या नात्याचा पायाच असा खडबडीत आहे की, जिथे मुळातच संघर्ष आहे. कलाकारानं सादर केलेल्या सादरीकरणाबद्दल मत व्यक्त करण्याचा पहिला अधिकार कुणाचा असेल तर या समीक्षकांचा. यांनी नाकं मुरडली, शिव्या घातल्या की कलाकाराचं पोट ढवळून निघतं. आणि त्याच समीक्षकानं कौतुक केलं की, आसमान ठेंगणं वाटतं. प्रत्येक कलाकाराला पशापेक्षा अधिक गरज असते ती या कौतुकाची. हे नातंच असं आहे की, जिथे काही कुणी गृहीत धरू शकत नाही. एखादं नाटक, सिनेमा रिलीज झाला की पहिलं लक्ष लागलेलं असतं की, ‘‘आता समीक्षक काय म्हणताहेत’’? ज्यांनी कलाकृती बनवलीय त्यांच्या बरोबरीने प्रेक्षकही उत्कंठेनं लक्ष घालतो की, एखाद्या नाटक-सिनेमाबद्दल लोकांचं काय मत आहे हे. सामान्य प्रेक्षकाला एक गाइडलाइन ठरते हे समीक्षण. कुणी तरी जाणकार माणसाने हा सिनेमा चांगला आहे असं म्हटलं की आपण तो पाहण्याचा विचार करतो. कुणी म्हटलं, भिकारडा आहे तर लोक पसे खर्च करून जात नाहीत, असं सोपं आहे हे.
पण खरंच हे सोपं राहिलंय का असं? काही चित्रपटांबद्दल भरपूर वाईट लिहून आलं तरीही अनेक चित्रपट तिकीट खिडकीवर तुफान चालल्याचं आपण पाहतो. किंवा परीक्षण चांगलं आलंय, पण सिनेमा पडला आहे अशी तर खूप उदाहरणं आहेत. म्हणजे हे प्रेक्षक परीक्षण पाहून सिनेमा पाहायला जात नसावेत किंवा वाचलं तरीही त्यांच्यावर त्या परीक्षणाचा परिणाम होत नसावा. मग ते गर्दी कोणत्या बळावर करीत असावेत, असा प्रश्न पडतोच. तर कोणताही प्रेक्षक हल्ली फक्त वर्तमानपत्रातल्या परीक्षणाला महत्त्व न देता, सिनेमा पाहिलेल्यांचं मत जास्त महत्त्वाचं मानतात. प्रत्यक्ष पाहून आलेल्या प्रेक्षकाचं अनुभवकथन आणि जाहिरातींचा भडिमार यांचा परिणाम खूप असतो. मग वर्तमानपत्रातल्या वा माध्यमांतल्या परीक्षणांचं स्थान काय, हे समीक्षक आपली विश्वासार्हता घालवून बसलेत का, हा खरंच चिंतेचा प्रश्न आहे.
समीक्षा या शब्दाचा मूळ अर्थ सम्यक इक्षणम्.. सम्यक म्हणजे, तारतम्याने, सगळ्या अंगाने; तौलनिक पद्धतीने. इक्षणम् म्हणजे पाहणे. सम्यक दृष्टीने पाहणे. हे पाहणे लौकिकार्थानं ‘‘पाहणे’’ असे अभिप्रेत आहे. आणि ज्याला सम्यक दृष्टीने पाहता येतं तो समीक्षक. मग ही सम्यक दृष्टी कशामुळे तयार होते? एखादा सिनेमा, नाटक कोणत्याही विषयावर असू शकतं. त्या विषयांवर लिहिण्यासाठी, त्या विषयांची समज, माहिती, आवाका, तांत्रिक बाजू, माध्यम, अभिनय, लेखन, संगीत, काव्य अशा एक ना एक अनेक बाजू. या आणि इतर असंख्य बाबींबद्दल लिहिताना तुमची तारतम्याची, तुलनेची, सारासार दृष्टी तयार होण्यासाठी प्रचंड वाचन, खूप पाहणं, अवलोकन, निरनिराळे प्रदेश, त्यांच्या भाषा, संस्कृती यांचा अभ्यास, कलेची आस्वादकता, वैचारिक बठक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जगण्याचा अनुभव, या सर्वामधून ही सम्यक दृष्टी निर्माण होत असते. या सगळ्याचा विचार केला तर हल्ली खरंच ही सम्यक दृष्टी समीक्षकांकडे आहे का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण अनेक सिनेमे आणि त्यांची परीक्षणं यामध्ये कमालीचं अंतर असतं.
वर्तमानपत्रात नाटक-सिनेमावर लिहिणाऱ्यांना किंवा वाहिन्यांवर बोलणाऱ्यांना त्यांचा जॉब प्रोफाइल म्हणून समीक्षक म्हटलं जातं. कारण दुसरं काही म्हणायला शब्द नाही म्हणून. म्हणून मग नाटकावर आपण केवळ लिहितो किंवा बोलतो म्हणून हे काम करणारे लोक स्वत:ला बिनदिक्कत समीक्षक म्हणवून घेतात आणि समाजात जरा जास्तच तोऱ्यात मिरवतात. गेल्या काही महिन्यांत मी अनेक सिनेमांच्या रिलीजच्या निमित्ताने जवळपास शेकडो प्रेस कॉन्फरन्सेस केल्या. आणि त्याही महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख शहरांत. सर्व ठिकाणी आम्हाला या तथाकथित समीक्षकांना तोंड द्यावं लागतं. माझा आजवरचा असा अनुभव आहे की, जे वर्षांनुर्वष सिनेमावर लिहीत आहेत अशा चार-दोन माहितीच्या लोकांव्यतिरिक्त बाकी समीक्षक म्हणून आलेल्या लोकांची कीव करावी अशी परिस्थिती आहे. आता प्रत्येक शहरातले तेच तेच चेहरेही माहितीचे झाले आहेत. कोणत्याही शहरात गेल्यावर प्रेस कॉन्फरन्सला समोर वीस-पंचवीस पत्रकार, काही वेळा त्याहीपेक्षा जास्त माणसं बसलेली असतात. एकदा सहज म्हणून माझ्या निर्मात्याला म्हटलं, हे नक्की कोणत्या वर्तमानपत्राचे लोक आहेत हे एकदा तपासायला हवं. कारण एखाद्या गावात वर्तमानपत्रं असतात तरी किती? काही लहान लहान स्थानिक वर्तमानपत्रांचं अस्तित्व आहे त्या त्या भागात. पण तुम्ही स्टॉलवर पेपर घ्यायला जा, पुणे, मुंबई वगळता तुम्हाला इतर गावांत ठरावीक वर्तमानपत्रच दिसतात. मग पत्रकार परिषदेला इतके लोक येतात कुठून? आणि ते लिहीत असतील तर नक्की कुठे लिहिणारे आहेत? इथे पत्रकार परिषदेला हजर राहिल्यावर ते लिहितात तरी का? त्यांनी लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळतं तरी का? अगदी पुणे शहरातल्या एका पत्रकार परिषदेत मी स्वत: हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला धक्काच बसला. त्या पत्रकार परिषदेतले साठ टक्के लोक हे फक्त ‘‘मला सिनेमावर लिहायची आवड आहे’’ एवढय़ाच शब्दांवर आलेले होते. कुठे छापून येतं तुमचं लिखाण? असं विचारल्यावर काही जण म्हणाले, ‘‘आम्ही देतो तसं, काही ओळखी आहेत आमच्या. कुणी घेतलं छापायला तर देतो’’. चॅनेल्सचे लोकही असतात. पण ते नक्की कोणत्या चॅनेल्सचे लोक आहेत हे कळतं तरी. काही मासिकांचे, पाक्षिकांचेही पत्रकार असतात. पण समीक्षक म्हणवून घेताना वास्तवातली परिस्थिती अशी आहे की, काही मोजके लोक सोडले तर समीक्षण या बाबतीत हल्ली ठार अंधार आहे.
या फक्त जेवायला आलेल्या लोकांचं सोडा, पण नामांकित म्हणवणाऱ्या वर्तमानपत्रांचे वर्षांनुर्वष समीक्षक पद सांभाळणाऱ्या समीक्षकांच्या विश्वासार्हतेबद्दल, विद्वत्तेबद्दल, कला वा विषयाच्या अभ्यासाबद्दल खरंच प्रश्नचिन्ह उभं करणारं चित्र आहे. एका प्रमुख वर्तमानपत्राचे समीक्षक समीक्षणाच्या नावाखाली नाटकाची संपूर्ण गोष्ट लिहितात. अगदी सस्पेन्स नाटक असलं तरी. जे गुपित म्हणून लोकांनी पाहायला येणं अपेक्षित आहे तो शेवटही हमखास लिहितात. समीक्षेच्या नावाखाली फक्त रिपोर्टिग केलेलं असतं. कुणी कामं केली आहेत; नेपथ्य, संगीत कुणाचं आहे; निर्माता कोण आहे; आणि माहिती असलेली, मोजकी, तीच तीच वापरली जाणारी सामान्य विशेषणे. चांगल्यासाठीही आणि वाईटासाठीही. नोकरी असल्याने रकाना भरावा लागतो असाच सगळा उत्साह.
तौलनिक टीका करण्याऐवजी समीक्षणाच्या नावाखाली ते ‘‘आपली आवड काय’’ ते लिहीत असतात. त्यांना काय आवडतं आणि काय नाही असा व्यक्तिगत मामला असतो. समीक्षकाची आवड समाजाची असेलच असं नाही. म्हणूनच लोकांच्या आस्वादामध्ये आणि समीक्षकांच्या परीक्षणामध्ये प्रचंड तफावत होत राहते.
पुरस्कार हे तर समीक्षणाचं आणखी एक विस्तृत क्षेत्र. पुरस्कार नक्की कुणाला दिले जातात यावरून नेमकं काय समीक्षण झालंय हे तर नेहमीच दिसत असतं. अगदी उदाहरणच द्यायचं झालं, तर विद्या बालनला ‘डर्टी पिक्चर’मधल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच या सिनेमाला त्या वर्षांत इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विद्या बालन ही उत्कृष्टच अभिनेत्री आहे. तिच्या वकुबाचा प्रश्नच नाही; पण तिने साकारलेल्या कोणत्या भूमिकेचं उदात्तीकरण केलं गेलं, हा प्रश्न आहे. निदान राष्ट्रीय पुरस्कारांबाबतीत तरी याचा विचार होणं गरजेचं आहे की नाही? सिल्क स्मिता या दुय्यम हॉट भूमिका करणाऱ्या एका दाक्षिणात्य नटीवर बेतलेला हा सिनेमा. या सिनेमातल्या नायिकेला पाच रुपये पोटासाठी आणि वीस रुपये शरीरसुखासाठी ऑफर होतात तेव्हा ती पोटासाठीचे पाच रुपये नकार देऊन शरीरासाठीचे वीस रुपये स्वत: स्वीकारते. कष्ट करण्याचा पर्याय समोर असताना, तिला ते स्वीकारण्याची जबरदस्ती नसताना, काय स्वीकारायचं हा तिचा चॉइस असताना तिने निवडलेला तो पर्याय आहे; ती प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांबरोबर स्वत:हून शय्यासोबतीला तयार होते; बक्षीस समारंभात भरस्टेजवर सिगरेट ओढत उद्दामपणे भाषण करते; वैयक्तिक स्वार्थासाठी भररस्त्यावर गाडीवर उभी राहून मद्यधुंद अवस्थेत ट्रॅफिक जाम करते; आयुष्यात कोणताच निर्णय समंजसपणाचा घेत नाही; स्वत:ला सावरायचा घेत नाही; स्वत:त सकारात्मक बदल घडवून आणणारा घेत नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करते, अशी ही गोष्ट. प्रत्येक टप्प्यावर तिला योग्य आणि अयोग्य असे दोन पर्याय दिसत असताना ती प्रत्येक वेळी तात्कालिक फायद्याचा आणि अयोग्य रस्ता स्वत:हून निवडते आणि तिची परवड होते. अशा स्त्रीचं भलं झालं तरच तो खरा सिनेमाचा विषय होईल. अशी स्त्री वैफल्य येऊन आत्महत्या करील नाही तर आणखी काय करील? या सबंध सिनेमात जीवनाचं असं कोणतं उदात्त तत्त्वज्ञान सांगितलं आहे की, ज्याने या स्त्रीविषयी आदर निर्माण होईल? जी स्त्री सगळ्याच तथाकथिक अनतिकतेच्या पायऱ्या ओलांडते आणि फक्त मरून जाते. या भूमिकेनं समाजाचं असं कोणतं उन्नयन केलं? काय आदर्श मांडला? एखाद्या स्त्रीनं कसं जगावं हा तिचा प्रश्न आहे, पण मग यातली नायिका जगणं आनंदानं का नाही स्वीकारत? ती आत्महत्या का करते? या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार देताना या मनोभूमिकेचं समीक्षण ही खरीच चिंतनीय बाब आहे.
सफ अली खानला, अक्षयकुमारला पद्मश्री सन्मान दिला गेला. यांचे असे कोणते सिनेमे आणि भूमिका आहेत, ज्यांनी समाजाचं उन्नयन केलं? सफ अली खानला पद्मश्री मिळाला त्या वर्षी शर्मिला टागोर सेंसॉर बोर्डाची अध्यक्ष होती; याव्यतिरिक्त दुसरं कोणतंच कारण सापडत नाही. हे पुरस्कार देताना या निवडीच्या समीक्षणांकडे दुर्लक्ष हे सवयीचं झालेलं आहे. कारण या निवडींचे निकषच भलभलते असतात.
माझ्या एका सिनेमाच्या प्रेस शोसाठी समीक्षक येऊन बसले होते. त्यातल्या स्वत:ला जबाबदार म्हणवणाऱ्या एक समीक्षकाची सिनेमा सुरू झाल्यानंतर १० व्या मिनिटालाच, खुर्चीवर बसायच्या ठिकाणी, पाठ आलेली होती. दुपारच्या तीनच्या शोला, जेवण करून उन्हातनं आल्यावर थंडगार एसीमध्ये झोप येऊच शकते. पण न झोपता या समीक्षकाने, एरवी पिटातल्या प्रेक्षकासारख्या कॉमेंट्स सुरू केल्या. मुद्दाम मोठय़ाने जांभई देणे, जाहीर मोठय़ा आवाजात चुकचुकणे, चुकीच्या ठिकाणी कुत्सितपणे हसणे असं सगळं चाललं होतं. सिनेमा त्याच्या वागणुकीइतका वाईट नव्हता. काही समीक्षक स्वाभाविक ठिकाणी हसत होते, प्रतिसाद देत होते. याला इतरांच्या प्रतिक्रियांचाही त्रास होत होता. या समीक्षकाला सिनेमा आवडत नव्हता हे त्यानं पाचव्या मिनिटालाच व्यक्त करून झालं होतं. त्याला तो न आवडण्याबद्दल चुकूनही आक्षेप नाही. एखादा सिनेमा नाही आवडू शकत. सगळंच आवडलं पाहिजे असा चुकूनही आग्रह नसतो. पण पहिल्या १० मिनिटांतच त्यानं हा वाईट सिनेमा आहे हे ठरवून टाकलं होतं. पूर्ण सिनेमा पाहून मत बनवण्याची त्याला गरज वाटली नव्हती; हेही एक वेळ समजून घेऊ, पण न आवडणारा सिनेमा पाहताना, जबाबदार समीक्षक म्हणून किमान शांतपणे त्याला बसता येऊ नये? आपल्यामुळे बाकीच्यांना व्यत्यय होतोय याचीही जाणीव नसावी? त्याला जे लिहायचं होतं ते त्यानं लिहिलंच; ते तो लिहिणारच होता. मग किमान समीक्षकाने तरी सिनेमा पाहताना जबाबदारीने वागायला नको का?

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film review
First published on: 25-07-2014 at 01:24 IST