गोल्ड विशेष
सेलिब्रेशन असो की गुंतवणूक भारतीय समाजमनाचा पहिला पर्याय असतो, सोनं! पिवळंधम्मक, झळाळतं, बावनकशी सोनं! काळ बदलला, पिढय़ा बदलल्या, जगणं बदललं पण सोन्याला असलेलं महत्त्व कमी झालं नाही. असं काय आहे या सोन्यामध्ये?
भारतात अगदी पुरातन काळापासून सोने ही संचयमूल्य असलेली मालमत्ता म्हणून मान्यता होती. रोमन राजवटीपूर्वी इ.स.पू. ५०० ते ३०० वर्षे सोन्याचा हुंडणावळीसाठी, विनिमयासाठी वापर केला जात असे. प्राचीन काळी इ.स.पू. पहिल्या सहस्रकात चिनी संस्कृतीत व हिंदुस्थानात सोन्याचा चलन म्हणूनही वापर होत होता. सुवर्णाचा भक्कम पाठिंबा असलेल्या चलनी नोटांचा वापर सुरु वातीला ग्रेट ब्रिटनने सुरू केला व नंतर औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांनी त्याचे अनुकरण केले. सतराव्या शतकापासून सोने शुद्धीकरणासाठी व वितरणासाठी ग्रेट ब्रिटनमधील लंडन येथे नेण्यात येऊ लागले व ते शहर सोन्याच्या व्यापाराचे मुख्य केंद्र बनले.
आताच्या तुलनेत त्या काळात सोनं मुबलक प्रमाणात वापरत असले तरीही सोन्याचं महत्त्व तेव्हाही अनन्यसाधारण असंच होतं. त्या काळी गुंतवणुकीचे विविध प्रकार किंवा इतर काही मार्गही नव्हतेच. त्यामुळे बहुतांशी गुंतवणूक म्हणजे सोने किंवा चांदीतच व्हायची. अर्थात सोने हे अलंकार किंवा सुवर्णमुद्रा अशा स्वरूपात घेतले जायचे आणि चांदी भांडय़ांच्या रूपात. त्यामुळेच अजूनही उत्खननात सुवर्णमुद्रा, सोन्याचे अलंकार, देवांच्या मूर्ती इ. सापडतात. आजही बाकी कुठे गुंतवणूक केली नसेल, परंतु एकतरी सोन्याचा दागिना तुम्हाला गरिबाच्या घरात मिळेलच. बाकी जगात कुठे इतकं महत्त्व सोन्याला नसेल तितकं महत्त्व आपल्या देशात आहे. अर्थात अजूनही बहुतांशी घरात सोनं खरेदी केलं जातं ते एक परंपरा किंवा संस्कृती म्हणूनच आणि अर्थात हे सर्व सोनं दागिन्यांच्या स्वरूपात असतं आणि पिढय़ान् पिढय़ा जपलं जातं. गेल्या काही वर्षांत मात्र सोन्याकडे एक गुंतवणूक पर्याय म्हणून बघितलं जायला लागलंय. अडीअडचणीला घरातलं सोनं कामाला येतं असं घरातली वडीलधारी माणसे म्हणायची ते किती खरे आहे ते आता सिद्धच झालंय.
सोनं खरेदी अगदी प्राचीन काळापासून चालत आली असली तरीही ती वर म्हटल्याप्रमाणे गुंतवणूक या उद्देशाने केली जात नाही. तसेच ही गुंतवणूक म्हणून मानायचे ठरवले तरीही ती मूर्त स्वरूपातील गुंतवणूक असल्याने तिची द्रवणीयता कमी असते. तसेच अजूनही आपण खरेदी केलेले सोने अगदी तशीच वेळ आल्याशिवाय विकायचा विचारही करत नाही. किंबहुना अगदी शेवटचा पर्याय म्हणून आणि अगदी नाइलाजाने सोने विक्रीचा पर्याय निवडतो आपण. गेल्या काही वर्षांत मात्र सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय असल्याचं मानलं जाऊ लागलंय. याचं मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत सातत्याने झालेली वाढ आणि शेअर बाजारातील वाढती अनिश्चितता. आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा अंतर्भाव होऊ शकतो ही कल्पना गुंतवणूकदारांच्या मनात रु जल्यापासून सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. २००८ मध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व आर्थिक पेचप्रसंगानंतर सगळ्याच देशांच्या मुख्य बँकांनी सोन्याचे महत्त्व ओळखून आपापला सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली आहे. २००९ मध्ये भारताने २०० मेट्रिक टन सोने खरेदी करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. सोन्याच्या वाढत्या किमती पाहता आर्थिक पेचप्रसंगावर कागदी नोटांपेक्षा सोनेच तारणहार ठरते हे आता जगाला कळून चुकले आहे.
सोनंच का?
प्लॅटिनम, चांदी असे इतर महागडे धातू उपलब्ध असताना सोनंच का, असा प्रश्न कुणालाही पडणे साहजिक आहे. परंतु याचेही उत्तर आपल्या प्राचीन संस्कृतीत दडले आहे. पिढय़ान् पिढय़ा गेली हजारो र्वष धन संपत्ती म्हणून तसेच चलनाला पर्याय म्हणून केवळ सोन्यालाच मान्यता मिळाली आहे. घराण्यात सोने बाळगणे आणि स्त्री धन म्हणून सोने अंगावर घालणे हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. काही वर्षांतच जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आणि सर्वात मोठा विकसनशील देश म्हणून मान्यता मिळणाऱ्या आपल्या देशात कितीही र्निबध लादले तरी सोन्याची मागणी घटेल याची कुठलीही चिन्हे नाहीत. घसरणारा रु पया, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती वित्तीय तूट तसेच चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी सरकारने सोने आयातीवर र्निबध लादलेच, त्याशिवाय दागिन्यांवर आयात करही लावला. मात्र तरीही सोन्याच्या उलाढालीवर परिणाम झालेला दिसत नाही. रिझव्र्ह बँकेने घातलेल्या ८०:२० र्निबधाचे आता स्वागतच होत आहे. ८०: २० योजना म्हणजे कंपन्यांनी आयात केलेल्या एकूण सोन्यापैकी किमान २० टक्के सोने पुन्हा निर्यात करणे बंधनकारक आहे. यामुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल असे सरकारला वाटत असावे. अजूनही आपल्या लोकांची मानसिकता सोनं मिळेल तेव्हा घेऊन साठवून ठेवावं हीच आहे. युरोपियन राष्ट्रांत सोन्यासाठी तितकेसे आकर्षण नसले तरीही भारताखालोखाल चीन आणि रशिया सध्या आपला सोन्याचा साठा वाढवताना दिसत आहेत. सोन्याच्या खाणीतील साठा झपाटय़ाने कमी होत असल्याने सोने दुर्मीळ होत चालले आहे. तसेच सोने खणकाम प्रचंड खर्चीकदेखील आहे. म्हणूनच सोन्याचा पुरवठा मागणीला कमी पडू लागेल अशी चिन्हे आहेत. चांदी हा गुंतवणूक पर्याय म्हणून खूप आकर्षक वाटत असला तरीही सोन्याच्या तुलनेत चांदीचे मोल थोडे फिकेच! जगभरात सोन्याप्रमाणे चांदीची उलाढाल आणि पर्यायाने महत्त्व वाढायला अजूनही बराच काळ जावा लागेल. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने ज्याप्रमाणे ईटीएफ किंवा पेपर स्वरूपात उपलब्ध आहे तशी चांदी अजूनही नाही याचे हेच महत्त्वाचे कारण असावे. मात्र ज्या गुंतवणूकदारांना चांदीत गुंतवणूक करायचीय आहे किंवा ट्रेड करायचे आहे ते स्पॉट एक्स्चेंजवर करू शकतात. चांदीदेखील सोन्याप्रमाणेच कॉइन्स किंवा बार स्वरूपात घेऊन ठेवल्यास उत्तम.
आपल्या देशात बचत, गुंतवणूक, अलंकार व प्रतिष्ठा या अनेक कारणांसाठी सोन्याची खरेदी होते. आजमितीला भारतात सुमारे १३ ते १५ हजार टन सोन्याचा साठा असून जागतिक उत्पादनापैकी सुमारे २५ टक्के सोन्याचा वापर (कन्झम्शन) एकटय़ा भारत देशात होतो. दरवर्षी केवळ नऊ टनाच्या आसपास देशात उत्पादन होत असल्याने ६० टक्के सोन्याची आयात करण्यात येते. भारतात सध्या सुवर्णालंकार बनवणाऱ्या जवळपास एक लाख कारागीरांच्या सराफ पेढय़ा असून पाच लाखापर्यंत कुशल कामगार तेथे कार्यरत आहेत.सोनं कमावून लग्न केलं..
रत्नागिरीच्या देवरुखमध्ये राहणारी प्रमिला गोसावी २००८ साली मुंबईला आली मनाशी एक ठाम निश्चय करून. घरची परिस्थिती अगदीच बेताची आणि त्यात दोन भावंडांची शिक्षणं. गावी असताना ती एका खानावळीत नोकरी करायची, पण ती खानावळ होती तीन ते चार कि. मी. लांब आणि त्यात महिन्याला पगार यायचा तो केवळ हजार रुपये. प्रमिलाने मुंबईत असलेल्या भावाबहिणीकडे जायचे ठरवले. आपल्या भावंडांवर आपले कोणतेही ओझे लादायचे नाही आणि स्वत:च्या लग्नाची जबाबदारी स्वत: घ्यायची या उद्देशाने तिने लगेचच मुंबईत घरकामाला सुरुवात केली.
आपल्या लग्नासाठी आपल्याकडे सोने असणे गरजेचे आहे हे प्रमिलाला कळले होते आणि याच जाणिवेतून तिने तिच्याही नकळत सुरू केले तिचे आíथक व्यवस्थापन. घरकामाला सुरुवात केल्यापासून तिने दरमहा येणाऱ्या पगारातले चार हजार रुपये एका सोनाराकडे गुंतवायला सुरुवात केली. २०११ पर्यंत तिने रोज सकाळी साडेसहापासून रात्री साडेआठपर्यंत म्हणजे दिवसाला जवळपास १२ तासांहूनही जास्त वेळ कामं केली आणि ही कामं करता-करता ती चार वष्रे सोन्यात गुंतवणूक करत राहिली. या गुंतवणुकीतून २०११च्या अखेरीस तिने स्वत:च्या हिमतीवर एक सोन्याचा हार, सोन्याची माळ, मंगळसूत्र, कानातले, सोन्याची अंगठी हे दागिने बनवून घेतले. एवढेच करून ती थांबली नाही तर एकीकडे सोन्यासाठी पसे गुंतवत असताना दुसरीकडे ती एका बचत गटात दरमहा पंधराशे रुपये भरत होती आणि उरलेले पसे ठेवण्यासाठी तिने बँकेत बचत खाते उघडले होते.
ही सर्व गुंतवणूक तिने केवळ लग्नाच्या उद्देशाने केली असली तरी त्यामागील दूरदृष्टीने केलेले आíथक व्यवस्थापन निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. समजा, लग्न ठरल्यावर तिने सोने विकत घ्यायचे ठरवले असते तर ते तिला शक्य झाले नसते. कारण तीन-चार वर्षांपूर्वी असणाऱ्या सोन्याच्या किमतीपेक्षा चालू स्थितीतील सोन्याची किंमत ही जास्तच असणार होती. त्यामुळे एकतर तिला सोने विकत घेता आले नसते अथवा तिने बचत केलेल्या पशांचा उपयोग तिला सोनेखरेदीसाठी करावा लागला असता आणि ज्यामुळे तिला लग्नखर्चासाठी पसे उरलेच नसते किंवा कमी पडले असते.
सोने आणि लग्नखर्च या दोन्हीही गोष्टी लग्नासाठी महत्त्वाच्या होत्या. एकासाठी दुसऱ्याचा उपयोग करणे तिला परवडणारे नव्हते. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर आपल्याला तिची भविष्यासाठी केलेल्या पद्धतशीर नियोजनाची हुशारी कळून येते. सोन्यासारखी वस्तू जिची किंमत काही अपवादात्मक परिस्थिती वगळता नेहमी वाढतच असते, त्यात तिने वेळेवर आणि योग्य गुंतवणूक करून त्याचे योग्य ते फायदे मिळवले.
(शब्दांकन : प्राची साटम)गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना कुठलाही गुंतवणूकदार उपलब्ध असलेले गुंतवणुकीचे पर्याय, किमान गुंतवणुकीची रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी, रोकड सुलभता आणि अर्थातच मिळणारा परतावा, इ. बाबींचा विचार करत असतो. अजूनही सर्वसाधारण गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलियोत शेअर्स, म्युच्युअल फंड्स, मुदत ठेवी, कर बचतीच्या योजना, रोखे/ बाँड्स, इ. पर्यायांचा विचार करताना दिसतो. अर्थात म्यूच्युअल फंडांच्या योजनेत एखादी गोल्ड ईटीएफ योजनादेखील असू शकते. मात्र आपल्या पोर्टफोलियोत सोन्यातील गुंतवणूक समाविष्ट करावी का आणि करायची असल्यास त्याचे प्रमाण किती असावे याचाही विचार करायला हवा. गेल्या दशकभरातील बाजाराचा ट्रेंड पहिला तर पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणूक आवश्यक वाटू लागली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सोन्यातील गुंतवणुकीमुळे तुमचा तोटा कमी होऊ शकतो. हे कसे ते आपण आता सोदाहरणच पाहूया.
एखाद्या आर्थिक वर्षांत शेअर बाजार निर्देशांकात १२ टक्के घट झाली, मात्र त्याच आर्थिक वर्षांत सोन्यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजे तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ शेअरमधील गुंतवणुकीत असेल तर तुम्हाला १२ टक्के तोटा होईल, पण पोर्टफोलिओतील केवळ ५टक्के गुंतवणूक जरी सोन्यात केली असेल तर तुमचा तोटा १ टक्क्याने कमी होऊन तो ११ टक्क्यांवर येईल. आणि हेच प्रमाण २५टक्के असते तर तुमचा तोटा कमी होऊन ६.७ टक्के आला असता. म्हणजेच पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणूक ही तुमचा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा धोका कमी करते. अर्थात हेच उदाहरण शेअर बाजार वर गेला तर बदलूही शकते, म्हणूनच पोर्टफोलिओ बॅलन्स्ड असावा. पोर्टफोलियोत सर्वच गुंतवणूक पर्यायांचा विचार करून समतोल गुंतवणूक केली तर ती फायद्याची आणि सुरक्षित ठरते. तज्ज्ञांच्या मते पोर्टफोलिओत सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. सध्याची शेअर बाजाराची परिस्थिती पाहता पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा अंतर्भाव आवश्यक वाटतो.
रोकड सुलभता
कुठल्याही गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्याची रोकड सुलभता सर्वात जास्त आहे. म्युच्युअल फंड्स, मुदत ठेवी, शेअर्स किंवा पोस्टातील गुंतवणूक या सर्वाची द्रवणीयता चांगली असली तरीही रोकड मिळायला तुम्हाला १-२ दिवस लागतातच. सोन्याचे पैसे मात्र तुम्हाला ताबडतोब मिळू शकतात. गेल्या काही वर्षांत सोन्याने उच्चांक गाठल्यापासून तर सोने तारण ठेवून तुम्हाला कर्जही लगेच मिळते. मुथुट, मन्नापुरमसारख्या कंपन्या तर केवळ सोन्यावरच धंदा करीत आहेत. अर्थात सध्या आपल्या देशातील चालू खात्यातील तूट कमी करण्याकरिता सरकारने आणि रिझव्र्ह बँकेने सोन्याच्या आयातीवर कर लावून तसेच इतरही र्निबध लादून या आणि दागिने बनवणाऱ्या कंपन्यांवर चाप बसवला आहे. अर्थात सोने आयातीवर मर्यादा घालून किंवा त्यावर शुल्क लावूनदेखील सोन्याच्या उलाढालीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. आतापर्यंतचा इतिहास पाहता मंदीच्या काळात, युद्धाच्या वेळी किंवा अस्थिर राजकीय परिस्थितीत तुम्हाला तारणहार ठरते ते सोनेच. चलनवाढीतही तारणहार ठरते ते सोनेच. सोने आपण स्वत:जवळ बाळगत असल्यास शेअर्स किंवा इतर युनिट्सप्रमाणे ते हस्तांतर करायला कागदपत्रे किंवा स्टॅम्प डय़ुटी लागत नाही. सासूकडून सुनेला किंवा आजीकडून नातवाला अगदी सहजपणे सोने दिले जाते.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती प्रचंड वेगात वाढल्या, त्यामुळे सध्या सोने हे खूप महागडी गुंतवणूक ठरू शकते असे काहींचे म्हणणे आहे. यात थोडेसे तथ्य जरी असले तरीही आतापर्यंतचा इतिहास पाहता सोन्याच्या किमती खाली येण्याची शक्यता तशी कमी वाटते आणि घसरली तरीही जास्त घसरणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष बाळगलेले सोने कायम तुमच्या जवळ राहते, ते दागिन्यांच्या स्वरूपात वापरता येते. शेअर्सच्या बाबतीत मात्र गुंतवणूक केलेली कंपनी बुडल्यास शेअर सर्टिफिकेटला रद्दीचा भाव येतो. सोन्याचे चढे भाव हा कृत्रिम फुगवलेला फुगा नाही हे निश्चित. त्यामुळेच अजूनही सोन्यातील गुंतवणूक आकर्षक वाटते.
सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय
लेखात वर म्हटल्याप्रमाणे सोने आता गुंतवणूक पर्याय म्हणून आपण स्वीकारू लागलो आहोत, किंबहुना पोर्टफोलिओमध्ये सोन्याची किमान ५ टक्के ते १५ टक्के तरी गुंतवणूक हवी, असं तज्ज्ञांचेही म्हणणे आहे, पण मग ही गुंतवणूक करायची कशी? त्याआधी आपण सोन्यातील गुंतवणुकीसाठी कुठली माध्यमे उपलब्ध आहेत ते पाहू.
(१) प्रत्यक्ष सोने खरेदी (फिजिकल फॉर्म): सरळ सराफाच्या पेढीवर जाऊन सोने खरेदी करणे ही आपली पारंपरिक पद्धत आहे; परंतु ही खरेदी आपण दागिन्यांच्या स्वरूपात करत असल्याने यात घडणावळ आणि मजुरीचा समावेश होतो. त्यामुळे हे सोने महाग तर पडतेच, परंतु विक्री करतानादेखील यात घट पकडतात. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करताना शक्यतो ते बँकेतून खरेदी करावे. हे सोने ९९.५ टक्के शुद्ध असून ते नाण्यांच्या स्वरूपात मिळते. त्यामुळे हे विक्री करताना यात घट होत नाही तसेच यात घडणावळ आणि मजुरीचा खर्चदेखील वाचतो. ही नाणी तुम्हाला १० ग्रॅम ते १०० ग्रॅमपर्यंतच्या वजनात मिळू शकतात.आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्र बँक इ. अनेक बँकांतून ही सुविधा उपलब्ध आहे.
(२) ईटीएफ अर्थात एक्स्चेंज ट्रेडेड फंड : सामान्य गुंतवणूकदाराला पेपर स्वरूपात सोने खरेदी करायची ही उत्तम संधी ईटीएफतर्फे मिळू शकते. म्युच्युल फंडचाच हा एक प्रकार असल्याने गुंतवणूकही म्युच्युअल फंडच्या युनिटसारखीच करायची असते. गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेचे सोने खरेदी केले जात असल्याने सोन्याच्या भावाच्या चढउताराप्रमाणे याच्या युनिट्सचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) बदलत असते. या चढउताराचा फायदा घेऊन हवी तेव्हा खरेदी-विक्री करणे शक्य होते. ईटीएफचा महत्त्वाचा फायदा म्हणजे याची युनिट्स शेअरप्रमाणे शेअर बाजारात ट्रेड करता येतात आणि कुठलाही गुंतवणूकदार ही युनिट्स एखाद्या शेअरप्रमाणे बाजारातून त्याच्या बाजारमूल्याला खरेदी-विक्री करू शकतो. सध्या अनेक ईटीएफ बाजारात उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने स्टेट बँक, कोटक, एचडीएफसी बँक, यूटीआय, आयडीबीआय इ.चा समावेश करता येईल. हे सोने तुम्ही डीमॅट स्वरूपात खरेदी करत असल्याने याची गुंतवणूक आणि निर्गुतवणूक खूप सोपी पडते. अर्थात इतर म्युच्युअल फंडांच्या योजनेप्रमाणे इथेही तुम्हाला १-२ टक्के आकार द्यावा लागतो.
(३) इक्विटी गोल्ड फंड : म्युच्युअल फंडच्या या योजनेत ज्या कंपन्या सोन्याच्या किंवा संबंधित व्यवसायात आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. सोन्याचा भाव वधारल्यावर साहजिकच शेअर्सचा भाव वाढून त्याचा फायदा म्युच्युअल फंड आणि पर्यायाने गुंतवणूकधारकाला होतो. सोन्यातील ही एक प्रकारची अप्रत्यक्ष गुंतवणूक म्हणायला हरकत नाही.
(४) फंड ऑफ फंड : यात नावांत म्हटल्याप्रमाणे एखादा म्युच्युअल फंड दुसऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो. उदा. ईटीएफ किंवा इक्विटी गोल्ड फंडात गुंतवणूक वगैरे. ज्या गुंतवणूकदारांकडे डी मॅट खाते नाही त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे, परंतु हा फंड ऑफ फंड असल्याने तुलनेत परतावा कमी मिळतो.
(५) ई गोल्ड : स्पॉट एक्स्चेंजमध्ये बुलियनप्रमाणे सोने खरेदी करता येते. अर्थात हेही सोने डी मॅट स्वरूपातच असते आणि तुम्हाला ट्रेडिंग अकाऊंट उघडणे आवश्यक असते. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तुमचे सोने री-मॅटेरिलायझेशन करून त्याचे प्रत्यक्ष सोन्यात रूपांतर करून घेऊ शकता. अर्थात तुमच्या वतीने स्पॉट एक्स्चेंज हे सोने ठेवत असल्याने जकात, डिलिव्हरी इ. खर्च गुंतवणूकदाराला द्यावा लागतो. ई गोल्ड हे कधीही प्रत्यक्ष सोन्यात रूपांतर करता येणे शक्य असल्याने दीर्घकालीन भांडवली नफ्याप्रमाणे कर कपातीसाठी किमान तीन वर्षे बाळगणे आवश्यक असते. तसेच वर्षभरात नफा कमवून बाहेर पडायचे असल्यास तुम्हाला त्या नफ्यावर तुमच्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो. ई गोल्डचा महत्त्वाचा विशेष म्हणजे तुम्ही ई गोल्डचे ट्रेडिंग रात्री ११.३० पर्यंत करू शकता आणि याची किंमत पारदर्शक असते.
वरील सर्व पर्याय अभ्यासल्यावर मला ईटीएफमधील गुंतवणूक सोपी, सुटसुटीत आणि फायदेशीर वाटते. प्रत्यक्ष सोने खरेदी केवळ जिकिरीची नाही तर जोखमीची आणि महागही आहे. ईटीएफमार्फत सोन्यातील गुंतवणूक फायद्याची का याची प्रमुख करणे पुढीलप्रमाणे देता येतील:
(१) छोटे गुंतवणूकदार आपल्या ऐपतीप्रमाणे युनिट्स खरेदी करून पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करू शकतात.
(२) खरेदी/ विक्री शेअर बाजारात शेअर्सप्रमाणेच होत असल्याने हवे तेव्हा आणि चढउताराप्रमाणे शक्य होते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक असल्याने एसआयपी देखील करता येते.
(३) युनिट्स डी-मॅट स्वरूपात असल्याने सोन्याची राखण करणे, त्याची सुरक्षा बघणे इ. प्रकार करावे लागत नाहीत. तसेच आपल्याकडे सोन्यातील गुंतवणूक किती आहे आणि त्यातील फायदा व तोटा ऑनलाइन कळू शकतो,
(४) शेअर्सच्या तुलनेतही ईटीएफ खूपच फायद्याचे ठरतात, कारण ईटीएफलारळळ ( रीू४१्र३८ ळ१ंल्ल२ूं३्रल्ल ळं७) लागू होत नाही. तसेच ईटीएफ वर्षभर ठेवल्यास ते दीर्घकालीन भांडवली करास पात्र ठरतात. याउलट प्रत्यक्ष खरेदी केलेले सोने दीर्घकालीन भांडवली नफ्यास पात्र ठरण्यासाठी ३ वर्षे ठेवावे लागते.
(५) ईटीएफ स्वरूपातील सोन्याच्या गुंतवणुकीला संपत्ती कर लागू होत नाही.
इतके फायदे पाहिल्यावर ईटीएफमधील गुंतवणूक उत्तम का याची कारणे लक्षात आली असतीलच. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. ईटीएफ निवडताना मोठय़ा कॉर्पस्चा म्युच्युअल फंड निवडावा. याच मुख्य कारण म्हणजे जितके जास्त युनिट्स तितकी द्रवणीयता जास्त. ईटीएफच्या खरेदी-विक्रीसाठी शेअर्सप्रमाणे ब्रोकरेज द्यावे लागते हेही ध्यानात घ्यायला हवे. तसेच गुंतवणूकदाराकडे प्रत्यक्ष सोने येत नसल्याने फंड निवडताना नावाजलेली अॅसेट मॅनेजमेंट कंपनी निवडावी.
ईटीएफ हा एक उत्तम पर्याय असला तरीही सोने खरेदी करताना सर्वच पर्यायांचा विचार करावा, कारण प्रत्येकाच्या गरजा आणि कारणे वेगळी असू शकतात.
सोने गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली?
१९२५ मध्ये १० ग्रॅम सोने १८.७५ रु पयांना मिळत होते, तर गेल्या दहा वर्षांत सोन्याच्या भावाची चढती कमान पहिली तर सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची ठरू शकते याची कल्पना येईल. २००३ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६०० रु पये होता, तो सध्या ३०,००० वर आहे. इतका उत्तम परतावा दुसऱ्या कुठल्याही गुंतवणुकीने दिला नसेल. मात्र इतक्या वेगात वाढलेले हे सोन्याचे दर यापुढेही असेच चढे राहतील का, हा खरा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्यासारख्या अनमोल धातूमध्ये प्रत्येक मंदीत गुंतवणूक फायद्याची ठरते. उदा. गेल्या वर्षी सोने ३०,००० वर गेल्यानंतर ते दहा महिन्यांत (जून-ऑगस्ट दरम्यान) सुमारे २५ टक्क्य़ांनी खाली आले होते. त्या वेळी ज्यांनी सोने खरेदी केले त्यांचा नक्कीच फायदा झाला असेल. सध्याची जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, वाढते कर्ज, कच्च्या तेलाच्या किमती, घसरता रु पया, चलनांचे युद्ध आणि अवमूल्यन, चलनवाढ इ. पाहता शेअर बाजाराची परिस्थिती अशीच राहील. सोन्याच्या भावातही चढउतार अटळच आहेत, मात्र तरीही सोन्यातील गुंतवणूक शहाणपणाची ठरेल. सामान्य गुंतवणूकदाराला कमी धोका पत्करून गुंतवणूक करायची असेल तर ईटीएफमधील दीर्घकालीन गुंतवणूक, सुरक्षित आणि फायद्याची ठरू शकेल. परिपूर्ण पोर्टफोलिओमध्ये सोन्याला विसरून नाही चालणार.
दिवाळीत जसे मुहूर्त ट्रेडिंग होते त्याप्रमाणेच विजयादशमीच्या सुमुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला सुरवात करा म्हणजे भविष्यकाळ नक्कीच सुवर्णमय होईल.पै पै जोडून सोन्याची खरेदी
तिचं नाव कमला. मूळची कर्नाटकातली. शिक्षण जेमतेम आठवी-नववीपर्यंत. सोळा-सतराव्या वर्षी लग्न झाल्यावर मुंबईत आली. मुंबईत येऊन रुळेपर्यंत चार-पाच वर्षे गेली. तोपर्यंत तीन मुलंही झाली. सासरची एकूण परिस्थिती बघितल्यावर आपल्याला काम करण्याशिवाय पर्याय नाही, हे तिच्या लक्षात आलं होतं. कुणाकुणाच्या ओळखीने तिने धुणीभांडी, लादी फरशी, पोळ्या करणं अशी कामं मिळवली. एका ओळखीतून दुसरं काम मिळत गेलं. गेली सात-आठ वर्षे ती अशी रोज सात-आठ घरची कामं करतेय. तिला त्याचे महिना सहा ते सात हजार रुपये मिळतात.
नवरा लिफ्टमन म्हणून काम करतो. दोन मुली मराठी शाळेत शिकतात. सगळ्यात लहान मुलाला इंग्लिश मीडियममध्ये घातलंय. रोजचा जगण्याचा खर्च, तिन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च, शिवाय तिन्ही मुलांना अभ्यास चांगला यावा म्हणून क्लास लावलाय. शिवाय सतत घरी कुणाकुणाची दुखणी-खुपणी, आजारपणं, लग्नसराई, देवदेव हे सगळं सुरू असतं. या सगळ्यातून हातचं राखत तिनं गेल्या सहा सात वर्षांत एक नेकलेस, एक चेन, दोन मुलींसाठी दोन कानातली असं सहा तोळे सोनं उभं केलंय. सगळ्यात पहिल्यांदा तिला नेकलेस करायचा होता. तेव्हा ती कुणाच्या तरी ओळखीने घराजवळच्या सराफाकडे गेली. सराफाला थोडे पैसे देऊन नेकलेस खरेदी केला आणि तो सराफाकडेच ठेवून दिला. मग दर महिन्याला हजार पाचशे असे जमेल तसे पैसे देत सगळे पैसे फेडले आणि मग तो नेकलेस आणला. नेकलेसचे पैसे फिटल्यावर चेन करायला घेतली. तेव्हाही सुरुवातीला असंच केलं. पण नंतर हळूहळू सराफाच्या लक्षात आलं की ही बाई प्रामाणिक आहे, ती दर महिन्याला नियमित पैसे आणून देते. मग त्याने तिला सगळे पैसे फिटण्याआधीच चेन देऊन टाकली. चेनचे पैसे फिटल्यावर तिने दोन्ही मुलींसाठी दोन सोन्याची कानातली केली. आता त्यांचे पैसे फिटत आले आहेत. मधल्या काळात घरातल्या धार्मिक कार्यक्रमासाठी तिला पैशांची गरज होती. तेव्हा तिने सोन्याची चेन त्याच सराफाकडे गहाण ठेवली आणि २२ हजार रुपये उचलले. आता वर्षभरात ते पैसे निम्मे फिटत आले आहेत. सहा महिन्यांत उरलेले पैसे फिटतील. आता तिला बांगडय़ा करायची स्वप्नं पडायला लागली आहेत. दोन मुली आहेत मला, त्यांची लग्नं करायची आहेत, मुलाचं शिक्षण करायचं आहे. त्यासाठी हे सोनंच वेळप्रसंगी उपयोगी पडेल, असा ठाम विश्वास तिला आहे.
आपल्या समाजातील ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे. भविष्यातील घटना, खर्च डोळ्यासमोर ठेवून आयत्यावेळी आधार हवा म्हणून या दोन महिलांनी निवडलेला हे पर्याय आपल्याला काय सांगतात? या दोन्ही महिलांकडे सोन्यातील गुंतवणूक करण्यासाठी एक विविक्षित असे कारण आहे. लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी सोन्यातील गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. नुसतंच ध्येय ठरवून त्या थांबल्या नाहीत तर ते साध्य करण्यासाठी त्या मेहनत घेत आहेत. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ते झेलायची त्यांची तयारी आहे.
मुख्य म्हणजे यामध्ये प्रामाणिकपणा आहे. हे करत असताना त्याला जोड मिळाली आहे ती आर्थिक नियोजनाची. ठरावीक प्रमाणात पैसे साठवणे, त्यासाठी बॅक अकाऊंट उघडणं अशा गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक केल्या आहेत. या सर्वामधून त्यांच्यामधील प्रचंड आत्मविश्वास दिसून येतो. त्याचा परिणाम म्हणून सराफ देखील त्यांच्यावर विश्वास टाकताना दिसून येतात. याला सर्वात महत्वाची जोड मिळाली ती म्हणजे नशीबाची. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचा फायदा चांगला मिळत गेला.
अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे
सोन्याचा भाव ठरतो कसा?
गेली काही वर्षे सर्वच गुंतवणूकदारांच्या चर्चेचा विषय असलेल्या या बहुमूल्य सोन्याचा भाव ठरवतं कोण आणि कसा? लंडनमध्ये रोज सकाळी १0.३0 आणि दुपारी ३ वाजता लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (छइटअ) सोन्याच्या किमती ठरवते आणि जाहीर करते. या असोसिएशनमध्ये जगातील १00 हून अधिक मोठय़ा बँका तसेच वित्तीय संस्था आणि सोन्याचे मोठे साठेदार सहभागी आहेत. याच असोसिएशनतर्फे सोन्या-चांदीचे प्रमाणीकरण, उलाढालीचे नियम आणि अर्थात किमतीचे नियंत्रण होते. या असोसिएशनमधल्या बहुतांशी कंपन्या मार्केट मेकर्स म्हणून ओळखल्या जातात. रोज ठरलेल्या वेळी दोन कॉन्फरन्स कॉल्समध्ये मागणी आणि पुरवठा तत्त्वावर या किमती ठरवल्या जातात. जगभरातील एकूण सोन्याच्या उलाढालीपैकी ८0 टक्के उलाढाल लंडन येथील या डळउ ( ५ी१ ३ँी- ू४ल्ल३ी१) वर होते. पुरवठा आणि मागणीबरोबरच आर्थिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती, चलनवाढ आणि चलन व्यवहारवरही सोन्याच्या भावाचा संबंध जोडता येतो. थोडक्यात जितकी अनिश्चितता वाढेल तेवढा सोन्याचा भाव चढेल. लंडनखेरीज न्यू यॉर्क, दुबई येथेही सोन्याच्या मोठय़ा उलाढाली होतात. अर्थात तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला दिसणारा सोन्याचा भाव हा स्पॉट एक्स्चेंजवर ठरत असतो. लंडन मार्केटवरील ठरलेल्या किमतीवरून स्पॉट एक्स्चेंजवर (ठरएछ) उलाढालीत दिसणारे भाव हे त्या वेळचे भाव असतात. त्यामुळेच गुंतवणूकदारांसाठी स्पॉट एक्स्चेंजवरचे भाव तर सर्वसामान्य माणसांसाठी पेढीवर दिसणारे भाव. गंमत म्हणजे पेढीवर किंवा सराफकडे दिसणारे भाव हे जाहीर झालेल्या भावापेक्षा कमीजास्त आढळतात. याची दोन मुख्य कारणे म्हणजे एक तर घाऊक बाजारातील आणि किरकोळ बाजारातील दरातील फरक तसेच लागू असलेले कर. त्यामुळे सोन्याचा भाव जो जाहीर होतो त्यात २ टक्के फरक आढळेल. अर्थात सोनं विकत घ्यायचं असेल तर २ टक्के जास्त आणि विकायचे असेल तर २ टक्के कमी. लंडन, न्यू यॉर्क, झुरिक, इस्तंबूल, दुबई, सिंगापूर, हाँगकाँग, टोकिओ, मुंबई ही सोन्याच्या व्यापाराची महत्त्वाची जागतिक केंद्रे असून त्यांपैकी हाँगकाँग, झुरिक, लंडन व न्यूयॉर्क या सोन्याच्या बाजारपेठा दररोज चोवीस तास व्यापारासाठी खुल्या असतात.
(लेखातील काही माहिती आणि संदर्भ मराठी विश्वकोशातून घेतले आहेत.)