News Flash

यंदाचा उन्हाळा घाम फोडणारा

भारतीय हवामानशास्त्र विभाग गेल्या काही वर्षांपासून पावसाप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याचेही ऋतुमान अंदाज वर्तवू लागला आहे.

उन्हाळा

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

भारतीय हवामानशास्त्र विभाग गेल्या काही वर्षांपासून पावसाप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याचेही ऋतुमान अंदाज वर्तवू लागला आहे. देशाच्या विविध भागांतल्या उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम अर्थव्यवस्था, शेती आणि दैनंदिन मानवी जीवनावरही होत असतो. त्यामुळे आपल्या भागात पुढच्या तीन महिन्यांत उन्हाची तीव्रता किती असणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे याचं चित्र दर्शवणारे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) उन्हाळ्याविषयीचे अंदाजही जाहीर झाले. आयएमडीने उपविभागवार अंदाज वर्तवले आहेत. देशात एकूण ३६ उपविभाग असून त्यातले चार महाराष्ट्रात आहेत. कोकण (गोव्यासह), मध्य महाराष्ट्र (हा उत्तर दक्षिण असा उभा पट्टा), विदर्भ आणि मराठवाडा असे हे चार उपविभाग आहेत. त्यापैकी कोकण-गोवा पट्टय़ात यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. कोकण परिसरात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी तापमान जास्तच राहण्याची चिन्हे आहेत. मध्य महाराष्ट्रातही रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रावरून वाहून येणारं बाष्प मध्य महाराष्ट्रातही उकाडा वाढवेल, अशी चिन्हं आहेत. अर्थात हे सगळं त्या त्या वेळच्या वाऱ्यांवर अवलंबून आहे.

देशभराचा विचार करता, दक्षिण भारतात रात्रीचं तापमान एरवीपेक्षा काहीसं जास्त नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. हवेतली आद्र्रता वाढणं आणि काही प्रमाणात पाऊस यामुळे ही स्थिती उद्भवते. उत्तर भारतातील उन्हाळा यंदा जास्त तीव्र असण्याचा अंदाज आहे. या मोसमात पंजाब, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशात कमाल तापमान उन्हाळ्याच्या तीनही महिन्यांत सरासरीपेक्षा काहीसं अधिक असणार आहे. ते या काळात सामान्यपणे नोंदवल्या जाणाऱ्या तापमानापेक्षा ०.७१ टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. या भागांत उष्ण दिवस- रात्रींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशात रात्री अधिक उष्ण असतील.

उष्णतेच्या लाटा

एखाद्या ठिकाणचं कमाल तापमान जेव्हा त्या भागात सामान्यपणे नोंदवल्या जाणाऱ्या तापमानापेक्षा ४ अंश अधिक नोंदवलं जातं, तेव्हा त्या स्थितीला उष्णतेची लाट म्हणून संबोधलं जातं. अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक तात्कालिक घटक कारणीभूत असतात, त्यामुळे ऋतूविषयक अहवालांत उष्णतेच्या लाटा किती येतील, त्या नेहमीपेक्षा संख्येने आणि तीव्रतेने जास्त असतील का याविषयीचे अंदाज वर्तवले जात नाहीत. राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि विदर्भाचा समावेश उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसणाऱ्या भागांमध्ये होतो. या काळात तिथे नेहमीएवढय़ाच किंवा त्यापेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यासंदर्भातले अचूक अंदाज लाट येण्याच्या चार आठवडे आधी वर्तवले जाऊ शकतात, असं आयएमडीने स्पष्ट केलं आहे.

उन्हाळ्याचे अंदाज कशाच्या आधारे?

भारतीय हवामानशास्त्र विभाग पावसाविषयीचे अंदाज फार पूर्वीपासूनच वर्तवत आला आहे, मात्र २०१६ पासून मान्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम मॉडेलच्या आधारे हिवाळा आणि उन्हाळ्याचेही ऋतूविषयक अंदाज वर्तवण्यात येऊ लागले आहेत. सध्या वर्तवण्यात आलेले अंदाज हे फेब्रुवारीतली हवामानाची स्थिती आणि २००३ ते २०१८ दरम्यान आयएमडीनेच बांधलेले ऋतूविषयक आडाखे यांच्या आधारे वर्तवण्यात आले आहेत. म्हणजे यंदा जसं हवामान आहे त्या स्वरूपाचं हवामान आधी कधी निर्माण झालं होतं आणि त्या स्थितीत कोणत्या भागात उन्हाळ्याची तीव्रता किती होती, या आधारे हे अंदाज बांधले जातात. यात वाऱ्यांची दिशा आणि तापमानाच्या नोंदी विचारात घेतल्या जातात.

ला निना

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा भारतातल्या पावसाळ्यावर आणि उन्हाळ्यावर अनेकदा परिणाम होतो. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा कमी झालं की ‘ला निना’ स्थिती निर्माण होते. त्या कालावधीत हिंदी महासागराच्या परिसरात तापमान वाढून कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. बाष्प वाहून येतं आणि भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असते. याच्या नेमकी उलट परिस्थिती म्हणजे ‘एल निनो’. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं तेव्हा तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन बाष्प त्या दिशेने वाहू लागतं. या स्थितीला ‘एल निनो’ म्हटलं जातं. एल निनोच्या कालावधीत हिंदी महासागराच्या पट्टय़ात पाऊस कमी पडण्याची शक्यता असते. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’च्या दरम्यानच्या काळात न्युट्रल स्थितीही उद्भवते आणि हे चक्र सतत सुरू असतं. या चक्राचा परिणाम भारतातल्या पावसाळा आणि उन्हाळ्यावर होत असला, तरीही अन्य अनेक घटकांनुसार या परिणामांची तीव्रता कमी-जास्त होत राहते. याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर सांगतात, ‘विषुववृत्तीय प्रशांत महासागरातल्या स्थितीचा परिणाम भारतातल्या पावसाळ्यावर होतो. अल निनो पावसाळ्यात सक्रिय असेल, तर त्याचा विपरीत परिणाम भारतातल्या पावसावर झाल्याचं अनेकदा दिसलं आहे. तर ला निनामुळे पावसाला बळ मिळाल्याचंही दिसतं. पण काही वेळा असंही होतं की एल निनो सक्रिय असतानाही भारतात चांगला पाऊस पडतो. सध्या ला निना मध्यम स्वरूपाचा आहे. येते तीन महिने ही स्थिती साधारण स्थिर राहण्याचा अंदाज आहे.’

अचूकता

हे अंदाज काहीसे ढोबळ स्वरूपाचे असतात, असं हवमानशास्त्रज्ञ आणि या विषयाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. हवामानशास्त्रज्ञ डॉ. जयप्रकाश कुलकर्णी यांच्या मते, ‘भारतीय हवामानशास्त्र विभागाने उन्हाळ्याविषयी वर्तवलेले अंदाज हे संभाव्यतेवर (प्रोबॅबिलिटी) आधारित आहेत. ही संभाव्यता जिथे ७० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान दर्शवलेली असते त्याच भागांत हे अंदाज बऱ्याच अंशी खरे ठरतात. यंदा अशा स्वरूपाची शक्यता केवळ कोकण-गोवा आणि ओरिसासंदर्भात वर्तवण्यात आली आहे. या भागांत उष्णता वाढण्यामागची कारणं स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. हा किनारपट्टीचा भाग असल्यामुळे हवेतल्या आद्र्रतेमुळे उष्णता वाढू शकते.

भारताच्या बहुतांश भागांत उन्हाळा नेहमीच मेटाकुटीला आणतो. यंदाही त्यात फारसा फरक पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे घामाच्या धारा सहन करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.

कोकण-गोवा, ओदिशा आणि छत्तीसगड या भागांत कमाल आणि किमान तापमान नेहमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कोकणातलं कमाल तापमान ०.२५ अंशांनी आणि किमान तापमान ०.४८ अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. या अंदाजांची संभाव्यता ७० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. किमान तापमानातली वाढ तुलनेने अधिक असण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किमान तापमानात वाढ होणं म्हणजे रात्री नेहमीपेक्षा अधिक उष्ण असू शकतील. इथे संभाव्यता ५० टक्क्यांच्या आसपास आहे. मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळा हा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक तीव्र असतो. तिथे उष्णतेच्या लाटाही निर्माण होतात, मात्र यंदा या भागांत कमाल आणि किमान तापमानात फार वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. ला निना सध्या मध्यम तीव्रतेचा आहे, म्हणजे विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा काहीसं कमी आहे. हे अंदाज मान्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम मॉडेलच्या आधारे वर्तवण्यात आले आहेत. त्यात ला निना हा येत्या दोन-तीन महिन्यांत स्थिर राहण्याची शक्याता दर्शवण्यात आली आहे.

आता जरी ऋतुमान अंदाज वर्तवण्यात आले असले, तरी येत्या काळात विस्तारित अंदाजही वर्तवण्यात येतील. हे पुढील चार आठवडय़ांत कमाल आणि किमान तापमान किती असेल, याचे अंदाज वर्तवले जातील. हे अंदाज धोरणकर्ते, शेतकरी आणि सामान्य माणसांनाही उपयुक्त ठरतील. याव्यतिरिक्त १ एप्रिलला ऋतुमानाचा पुढील अंदाजही वर्तवण्यात येईल.

पावसाळ्याचा अंदाज पूर्वीपासून वर्तवण्यात येत होता. मात्र २०१६पासून हिवाळा आणि उन्हाळ्याचाही ऋतुमान अंदाज वर्तवण्यात येऊ लागला. या दोन ऋतूंतील हवामानाचाही अर्थव्यवस्था, शेती, राहणीमान, आरोग्यावर परिणाम होत असतो. उष्णतेच्या लाटा, त्यात होणारी जीवितहानी याचा विचार करता हे अंदाज वर्तवले जाऊ लागले. शिवाय गेल्या काही वर्षांत या दोन ऋतूंतील हवामानातही बरेच बदल होत गेले. धोरणकर्त्यांनाही असं वाटू लागलं की ऋतू आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत.

– कृष्णानंद होसाळीकर, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

मार्च-एप्रिल- मे दरम्यान हवामान कसं असेल, याचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात सरासरीपेक्षा थोडं जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तापमान थोडं कमी राहील, अशी शक्यता आहे. ऋतुमानविषयक पुढील अंदाज एप्रिलमध्ये जाहीर केले जातील, त्यात पावसाळ्याचं चित्र स्पष्ट होऊ शकेल. सध्याचा काळ स्थित्यंतराचा आहे. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या या काळात तापमान स्थिरावलेलं नसतं, त्यात सतत चढ-उतार होत असतात. तापमानवाढीला विविध घटक कारणीभूत असतात, पण जागतिक तापमानवाढ हे जगभरातल्या तापमानवाढीमागचं महत्त्वाचं कारण आहे.

– शुभांगी भुते, संशोधन संचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, मुंबई

आरोग्याची काळजी घ्या

कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुळातच आद्र्रतेचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे घाम जास्त येतो. या भागात यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा अधिक तीव्र आणि दमट असेल, तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात सर्रास उद्भवणारी समस्या म्हणजे डीहायड्रेशन. हे टाळण्यासाठी रोजच्या आहारात लिंबू सरबत, ताकाचा समावेश करावा. शरीरातलं बरंच पाणी घामावाटे निघून जाऊ लागल्यामुळे क्षारांचा समतोल बिघडतो. तो राखण्यासाठी पाण्यात मीठ विरघळवून ते पाणी प्यावं. केवळ मिठाचं सेवन वाढवण्यामुळे किंवा केवळ पाणी पिण्यामुळे अपेक्षित परिणाम साधता येत नाही. हे दोन्ही घटक एकत्र करून प्यायल्यास क्षारांचा योग्य समतोल साधला जातो. याव्यतिरिक्त कोकणात उन्हात सलग बराच वेळ काम केल्यास पायात गोळे येऊ शकतात. विदर्भात कोरडं हवामान असून तिथे उष्णतेच्या लाटाही येतात. तिथे बराच काळ उन्हात काम करणाऱ्यांना आणि वृद्धांना उष्माघाताचा त्रास उद्भवू शकतो. ही स्थिती अतिशय गंभीर ठरू शकते. त्यामुळे बराच काळ सलग उन्हात काम करण्याऐवजी अधूनमधून सावलीत जावे. असे केल्याने आरोग्यावर होणारे संभाव्य गंभीर दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. घामाचं प्रमाण वाढल्यास लघवीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ज्यांना मूतखडय़ासारखे त्रास आहेत किंवा ज्यांना वारंवार मूत्रमार्गाचे संसर्ग होतात त्यांच्या समस्यांत वाढ होऊ शकते. त्यांनी अधिक प्रमाणात पाणी प्यायला हवं. रक्तातल्या पाण्याचं प्रमाण घटल्यास रक्ताभिसरण प्रक्रियेतही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि रक्तदाबासंदर्भातल्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेणं आवश्यक ठरतं. सर्वानीच चांगल्या प्रतीचा गॉगल वापरणं आवश्यक आहे. कारण सूर्याची तीव्र किरणं डोळ्यांवर पडल्यास मोतिबिंदूचा त्रास उद्भवण्याची शक्यता अधिक असते. योग्य दर्जाचा गॉगल न वापरल्यास डोळ्यांवर अधिकच ताण येऊ शकतो. सनस्क्रीन लोशन वापरणं, बाहेर पडताना स्कार्फने चेहरा झाकून बाहेर पडणं उत्तम. तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही काळजी सर्वानीच घ्यायला हवी.

– डॉ. विराग गोखले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 7:25 am

Web Title: hot summer 2021 coverstory dd 70
Next Stories
1 दुसरी लाट?
2 इंधन दराचा भडका सामान्यांची होरपळ
3 अल्पजीवी विकासाचे भकास वास्तव!
Just Now!
X