यंदाच्या आयपीएलला पहिल्या सत्रात मिळायला हवा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. सार्वत्रिक निवडणुका हे त्यामागचं कारण आहे, असं काही जणांना वाटत असलं तरी आधीच्या सीझनमधली स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी हीच कारणे त्यामागे आहेत.

‘आयपीएल’मध्ये काल कोण जिंकलं रे, अशा चर्चा आपल्याला सर्रासपणे ऐकायला मिळतात, याचा अर्थ असा की, यंदाच्या ‘आयपीएल’कडे लोकांनी जास्त लक्ष दिलेलं नाही किंवा तेवढं गांभीर्याने घेतलेलं नाही. देशात सार्वत्रिक निवडणुका होत्या. तिथली भाषणबाजी म्हणजे एक कॉमेडी सर्कस सुरू असताना दुसरे मनोरंजन कशाला लागतेय. त्यामुळे लोकांनी नेत्यांची भाषणे एन्जॉय केली आणि त्यामुळेच ‘आयपीएल’ला पहिल्या सत्रात हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, पण फक्त हे एकच कारण त्याला कारणीभूत नाही. कारण यंदाच्या ‘आयपीएल’पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा आलेला सहाव्या हंगामातील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भातील अहवाल, त्यानंतर हेकेखोर एन. श्रीनिवासन यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून झालेली हकालपट्टी या साऱ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत.
‘आयपीएल’च्या सहाव्या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांतील काही खेळाडू, अधिकारी यांची नावे सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामध्ये पुढे आली. त्यावेळी यामध्ये श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन याचेही नाव त्यामध्ये होते. चेन्नईचे मालक श्रीनिवासन. मुळात नियम वाकवून त्यांनी अध्यक्ष असताना ‘आयपीएल’मधला संघ विकत घेतला. असे होणे उचित नव्हतेच, पण झाले. त्यानंतर त्यांचा जावई यामध्ये अडकला, त्याला अटक झाली, पण श्रीनिवासन यांनी नैतिकतेच्या आधारावर अध्यक्षपदाची खुर्ची काही सोडली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ते अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बिनविरोध निवडून आले. निवडून आल्यावर सारे काही आलबेल करू, असे त्यांना वाटले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने हे सारे प्रकरण गांर्भीयाने न घेतल्यामुळे त्यांना अध्यक्षपद सोडण्यास सांगितले, तसे आदेश आल्यावर त्यांना ते सोडावेच लागले. हकालपट्टीच केली त्यांची. कारण क्रिकेटमध्ये ही वाढत चाललेली विषवल्ली थांबवायला हवी, याचा गंभीर विचार त्यांनी केलाच नाही. जिथे खेळाडू लिलावात विकले जातात, तिथे हे व्यावसायिक पैसाच कमावणार ना! या साऱ्या प्रकणामुळे दर्दी चाहत्यांची घोर निराशा झाली आणि त्यामुळे चाहत्यांनी यंदाच्या ‘आयपीएल’कडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वीचेच उदाहरण घतले तर सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांच्यासह १३ जणांची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने समिती नेमावी असे सांगण्यात आले होते. बीसीसीआयने तीन सदस्यीय समितीही नेमली, पण या समितीतील व्यक्तींची नावे पाहून सर्वोच्च न्यायालयाला बीसीसीआय म्हणजे नेमकी कशी संस्था आहे, हे कळून चुकले. ज्यांचे व्यवहार बीसीसीआयशी आहेत, जे कोणाचे ना कोणाचे तरी नातेवाईक असतील, तर त्यांच्याकडून निष्पक्षपाती चौकशीची अपेक्षा कशी करता येईल, हे बीसीसीआयला कळले नाही की त्यांना कळल्यामुळेच त्यांनी अशी नियुक्ती केली, हे त्यांचे त्यांनाच माहिती.
देशात निवडणुका असल्यामुळे सुरूवातीचे काही दिवस ही स्पर्धा आपल्याकडे होणार नाही, हे स्पष्ट होते. पण ‘आयपीएल’कडे संशयित नजरेने सारे पाहत असताना या स्पर्धेचे पहिले सत्र यापूर्वी फिक्सिंगचा इतिहास असलेल्या अमिरातीमध्ये का खेळवण्यात आले, हे सारे अनाकलनीयच आहे. ‘आयपीएल’ला विश्वासार्हता कमवण्यासाठी अमिरातीच का सापडली, हे कळू शकले नाही. तिथे आयपीएल खेळवल्याने नक्की कोणाचा फायदा झाला, हेही समजू शकलेले नाही. मुंबईतील पहिल्या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत ‘आयपीएल’चे पहिले सत्र अमिरातीमध्ये खेळवण्याचे समर्थन केले. त्यांनी यावेळी ‘आयपीएल’ची लोकप्रियता वेबसाइट, फेसबुक आणि ट्विटरवर वाढल्याचे गोडवे गायले, पण याची खरंच गरज होती का? जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट ओरडून सांगावी लागते, याचाच अर्थ काय होतो, हे सांगणेच न बरे. यावेळी ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘‘अमिरातीमध्ये काही वर्षांपूर्वी फिक्सिंग झाले होते, तसे ते भारतातही झाले, एका व्यक्तीमुळे देशावर बंदी घालण्यात येऊ शकत नाही.’’ हे गावस्कर यांचे बोलणे किती समर्थनीय आहे? गावस्कर हे नेहमीच सरळ बॅटने खेळले, पण आता मात्र त्यांची ही सवय सुटली की काय? गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष झाल्यावर त्यांच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. एक क्रिकेटपटूच खेळ जाणू शकतो, असे म्हटले जाते. गावस्कर ‘आयपीएल’ला सुतासारखे सरळ करतील, असे वाटले होते, पण ‘आयपीएल’मध्ये काहीही फरक पडलेला नाही. ‘आयपीएल’मध्ये एखादा खेळाडू बाद झाला तर राखीव खेळाडू पाणी घेऊन मैदानात धावताना दिसतात, त्या खेळाडूबरोबर काही तरी संदेश पाठवला जात असतो, इथपर्यंत ठीक आहे. पण या २० षटकांच्या ‘आयपीएल’च्या सामन्यांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक टाइमआऊट’ ही काय भानगड आहे, हे कळत नाही. याची गरज काय, काही वेळेला या ‘स्ट्रॅटेजिक टाइमआऊट’नंतर सामन्याचा नूर बदललेला दिसतो, याचा अर्थ दर्दी चाहत्यांनी काय काढायचा, हे समजत नाही. ही लीग पैशांवर चालते, खेळाडू संघांकडे विकले गेलेलेच आहेत, तर निर्णयही का ठरवले जाऊ शकत नसतील, अशी शंकेची पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकली असावी आणि त्यामुळेच आयपीएलमधून हळूहळू क्रिकेटचा आत्मा संपताना दिसत आहे. ही गमावलेली विश्वासार्हता गावस्कर पुन्हा मिळवून देणार का, हा मोठा प्रश्न आहे. ‘आयपीएल’ पुरतीच त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असली तरी हा कालखंड काही नक्कीच छोटा नाही. आत्तापर्यंत त्यांच्याकडून तसे काही दिसले नाही, यापुढे कदाचित दिसेल, अशी भाबडी आशा चाहत्यांनी बाळगायला हरकत नसावी.

आत्ताचे क्रिकेटपटू स्थानिक सामन्यांमध्ये जीव ओतून खेळत नाहीत, कारण त्यांना दुखापत झाली तर ‘आयपीएल’ला मुकावे लागण्याची भीती असते. तंत्रशुद्ध फलंदाजी ऐवजी वाकडे-तिकडे फटके मारायला ‘आयपीएल’ने शिकवले, हे मात्र नक्की.

‘आयपीएल’ने क्रिकेटला काय दिले. ‘आयपीएल’ने खेळाडूंना अमाप पैसा दिला आणि त्याहून बऱ्याच पटीने माजही दिला. आत्ताचे क्रिकेटपटू स्थानिक सामन्यांमध्ये जीव ओतून खेळत नाहीत, कारण त्यांना दुखापत झाली तर ‘आयपीएल’ला मुकावी लागण्याची भीती असते. तंत्रशुद्ध फलंदाजी ऐवजी वाकडे-तिकडे फटके मारायला ‘आयपीएल’ने शिकवले, हे मात्र नक्की. चेंडू कसा आणि कुठे मारायचा, याचे तंत्र अवगत करण्यापेक्षा जोरात चेंडू कसा मारायचा, याचे प्रशिक्षण ‘आयपीएल’ने दिले.
सध्याचे ‘आयपीएल’ गाजत नसल्याचे एक कारण म्हणजे काही महान क्रिकेटपटूंनी घेतलेली निवृत्ती. गेल्या मोसमापर्यंत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडसारखे मातब्बर खेळाडू होते. काही वर्षांपूर्वी शेन वॉर्न, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, ग्लेन मॅग्रा, शॉन पोलॅक, डॅनियल व्हेटोरीसारखे खेळाडू होते, पण आता ते संघात नाहीत. पण जे अनुभवी खेळाडू आहेत त्यांनाही सूर गवसलेला दिसलेला नाही. फिरकीचा अनभिषिक्त सम्राट असलेला मुथय्या मुरलीधरनला अजूनही छाप पाडता आलेली नाही. जॅक कॅलिससारखा दमदार अष्टपैलू खेळाडू निष्प्रभ वाटताना दिसतो. माइक हसीसारखा धावांची मशीन असलेल्या खेळाडूची बॅटने मौन पाळलेले आहे. गेल्या ‘आयपीएल’पर्यंत जास्त वय असलेले खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत होते, पण यावर्षी मात्र असे होताना दिसत नाही. याला अपवाद फक्त राजस्थान रॉयल्सच्या प्रवीण तांबेचा. वयाच्या चाळिशीतही युवा गोलंदाजाप्रमाणे त्याची कामगिरी होत आहे. पण ख्रिस गेल, ए बी डी व्हिलियर्स, अ‍ॅल्बी मॉर्केल, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युसूफ पठाण, जॉर्ज बेली, महेंद्रसिंग धोनी यांच्या बॅट तळपणार केव्हा, हा एक प्रश्न आहे ज्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. पण असे असले तरी काही युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये संदीप सिंग आणि यजुवेंद्रसिंग यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. यजुवेंद्र मुंबईकडून ‘आयपीएल’मध्ये फक्त एकच सामना खेळला होता, पण त्याला बंगळुरूने संघात घेतले आणि त्याने कामगिरीने या संधीचे सोने केले. मुंबईचे सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे हे दोन्ही युवा तडफदार फलंदाज चांगलेच चमकताना दिसत आहेत.
यंदाच्या ‘आयपीएल’ने अजूनही जोर धरलेला नाही, पण बीसीसीआय मात्र स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे प्रकरणही होऊनही लोकांचा या स्पर्धेला किती जबरदस्त प्रतिसाद आहे, हे दाखवण्यासाठी जीवाचे रान करत आहे. व्यवहार पारदर्शी असला तर संशय घेण्यासाठी जागाच नसते, पण आतापर्यंतचा बीसीसीआयचा व्यवहार मात्र संशयाला जागा देणारा आहे. गावस्कर यांनाही हे चित्र पालटता आलेले नाही. सलामीवीर हा आव्हानवीर असतो, कारण फलंदाजीमध्ये त्याला अन्य फलंदाजांपेक्षा मोठे आव्हान पेलायचे असते. कारण संकट त्याच्यावर पहिल्यांदाच येत असते. खेळताना त्यांनी हे आव्हान लीलया पेलले, पण एक प्रशासक म्हणून ते आयपीएलची विश्वासार्हता वाढवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यांनी जर विश्वासार्हता मिळवली तर ‘आयपीएल’ पुन्हा एकदा आपली लय पकडेल, दर्दी चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा रुंजी घालेल, नाहीतर कोणत्या क्रिकेटपटूला कोणत्या भावाला विकत घेतले किंवा कोणी जेतेपद पटकावले, यापासून दर्दी क्रिकेटप्रेमी लांब राहणेच पसंत करेल. बीसीसीआयने वेळीच सुधारणा केल्या तर ठीक नाहीतर या सोन्याच्या कोंबडीला ‘स्वाइन फ्लू’होऊन ती दगावण्याची भीती असेल.