10 July 2020

News Flash

भविष्यवेधी!

आयझॅक असिमॉव्ह. त्यांनीच रोबोटिक्स या विषयसंकल्पनेला १९४१ साली जन्म दिला.

रोबो

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

‘‘आणखी ४० वर्षांनी निवडणुकांमध्ये एकूणच देशातील जनतेचा मूड नेमका काय आणि कसा आहे, हे सांगणारे आणि नागरिकांचे वर्तन नेमके सांगू शकतील असे संगणक असतील; त्यावर निवडणुकांचे निकाल ठरतील. त्याचा वापर करणारे यशस्वी ठरतील.’’

‘‘भविष्यात रोबो असतील. रोबो म्हणजे इलेक्ट्रॉनिक यंत्रेच, पण कदाचित माणसासारखी दिसणारी आणि बोलणारीही. आज माणूस जे काही करतो ते सारे काम करणारी. कदाचित त्यामुळे माणसांच्या उपजीविकेच्या साधनांवर गदाही येईल. कदाचित माणसाला नीती-अनीतीचे नवे प्रश्न भेडसावतील. कृत्रिम बुद्धिमत्ता या यंत्रांना प्राप्त होईल. मात्र घाबरण्याचे कारण नाही. कारण माणूस त्याही समस्यांवर यशस्वीरीत्या मात करेल..’’

हे सारे भवितव्य सुमारे ४० वर्षांपूर्वी व्यक्त करणाऱ्या भविष्यवेधी विज्ञानलेखकाचे नाव आयझॅक असिमॉव्ह. त्यांनीच रोबोटिक्स या विषयसंकल्पनेला १९४१ साली जन्म दिला. त्या रोबोंचे भविष्यवेधी रूप दोनच दिवसांपूर्वी पवई येथे आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये पाहायला मिळाले. अशा या भविष्यवेधी विख्यात विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांची जन्मशताब्दी यंदा साजरी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ५० वर्षांपूर्वी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी जे जे सारे सांगितले आणि वैज्ञानिक तर्कशास्त्राच्या बळावर नानाविध संकल्पनांना विज्ञान साहित्यात जन्म दिला, त्यातील मोबाइलसारख्या अनेक कल्पना आज आपण प्रत्यक्षात आल्या आहेत.

२०२० या वर्षांला जगाच्या इतिहासात जसे महत्त्व आहे, त्यापेक्षा कांकणभर अधिक महत्त्व भारताच्या दृष्टीने आहे. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी घालून दिलेला ‘व्हिजन २०२०’चा आदर्श आणि भारताची सारी वाटचाल आज आपल्या नजरेसमोर आहे. त्यात आपण किती मजल मारली हा अभ्यासाचा विषय असला तरी भारतीयांची प्रगती नाकारता येण्यासारखी नाही. यातही विज्ञान तंत्रज्ञानाचा वाटा सर्वात मोठा आहे.

अनेकदा लहान मुलांना किंवा अगदी प्रौढांनाही जगाविषयी अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांच्यातील विज्ञानलेखकाने तर केलाच, पण त्याहीशिवाय विज्ञानाच्या एका रंजक-आश्चर्यकारक अशा विश्वाची सफरही घडवली. तीन-चार पिढय़ा असिमॉव्ह यांच्या विज्ञानलेखनावर पोसल्या गेल्या. १९१९ ते १९२० या काळात नेमका जन्म केव्हा झाला हे माहीत नसल्याने २ जानेवारी हीच आपली जन्मतारीख असे त्यांनीच स्वत ठरविले. जन्माने रशियन, मात्र नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. आज ५००हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. जैवरसायनशास्त्र या विषयात तज्ज्ञ असलेल्या असिमॉव्ह यांनी विज्ञान रंजक करतानाच त्यात विज्ञानाच्या नावाखाली अतार्किक गोष्टी त्यात घुसडण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. ते निरीश्वरवादी होते. भविष्य हे अनेक विद्याशाखांच्या सम्मीलनात (आंतरशाखीय)असणार, असे त्यांनी सांगितले तेव्हा काहींनी त्यांची खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र आज जगभरात सर्व विद्याशाखा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. जग हाय-टेक असेल आणि मोबाइल संवादमाध्यमे घराघरात असतील व त्याने सारे जग जोडले जाईल, असे त्यांनी १९८४ सालीच सांगितले. एका बाजूला माणसाला जग उल्लंघून पलीकडच्या आकाशगंगेत जाण्याची आस असेल आणि दुसरीकडे युद्धाची भीती, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निसर्गाच्या उद्रेकासारख्या घटनांना सामोरे जावे लागेल.. अशा या विद्वानाला त्याच्या स्वतच्या पीएचडीव्यतिरिक्त जगभरातील १४ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली. २०२० खऱ्या अर्थाने साजरे करायचे तर विज्ञानाची कास धरायला हवी, तीच असिमॉव्ह यांच्यासाठी आदरांजलीही ठरेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 1:05 am

Web Title: isaac asimov
Next Stories
1 मर्यादाभंग
2 थोडे सबुरीने!
3 सुरक्षेचीच हत्या
Just Now!
X